Tuesday, December 19, 2023

शिंक - एक देणे

वाचकश्रोतेहो, आजच्या निरुपणाचा विषय अतिशय वेगळा, सर्वश्रृत, सर्वानुभवी आणि सर्वाविधविचित्र असा आहे महाराजा! आजच्या श्रोतृगणांत सर्वांनीच जिचा जवळून अनुभव घेतला आहे, काहींना वार्षिक, काहींना मासिक, काहींना नैमित्यिक, तर काही महानुभावांना नित्य प्रात:स्मरणीय, सायंस्मरणीय वगैरे वगैरे भेटणारी ही “शिंक”! शिंकेचा महिमा काय सांगावा महाराजा, बंद नाकात सदैव रेंगाळणारी, सर्दीत सतत साथीला असणारी, फट म्हणता प्राण नाकाशी आणणारी, आणि त्याच एका फटक्यात दोन्ही नासिका शेंबूडमुक्त करणारी शिंक म्हणजे समस्त प्राणिमात्रांना निसर्गाने बहाल केलेला आपत्कालीन चमत्कारच आहे. शिंकेइतका जोर मनुष्यप्राण्यास बाकी इतर कुठल्याही नैसर्गिक क्रियेस लागत नाही ही वस्तुस्थिती आहे. झोपेशिवाय माणसाला डोळे बंद करावी लागणारी एकमेव कृती म्हणजे शिंक. नाकात दिवसेंदिवस जमा होणारा छुपा ऐवज एकाच दणक्यात बाहेर काढण्याचे कसब जर ईडी, इंकमटॅक्स आणि भेसळप्रतिबंधक पथके शिकतील तर हा देश एका झटक्यात स्वच्छ होईल जाईल. 

अशा या यावत्मनुष्यजातीचे डोळे बंद करून नाक उघडणाऱ्या शिंकेचे अनेकविध प्रकार आणि उच्चार आहेत. सर्दीमुळे येणारी शिंक हा अतिशय सामान्य आणि तितकाच फेमस प्रकार. माणसाची सर्दी हा रोग नसून नाकाची निगा राखण्याचा अतिदक्षता विभाग असल्याचे जाणकार (म्हणजे आम्हीच!) सांगतात. जर सर्दीच मुळात रोग नाही तर त्यायोगे येणारी शिंक हा आजार कसा असेल. त्याचं असं आहे, की सर्दी झालेला माणूस हा दुपारी १ रे ४ या वेळेत झोपमोड झालेल्या पुणेकरासारखा असतो. अबोल, तुसडा, वैतागलेला, आणि ‘काय शिंची कटकट आहे’ असे भाव याच्या तोंडावर असतात. अशा माणसाच्या डोक्यात एक बंद पडलेला मेंदू आणि नाकात ठासून भरलेला शेंबूड असतो. या परिस्थितीत नाकाप्रमाणेच विचारही तुंबतात. अशा जीवघेण्या घुसमटीतून सुटकेचा राजमार्ग म्हणजे एक सणसणून दिलेली शिंक! गाडीवरुन जाताना रस्त्यावर आडव्या गेलेल्या माणसाला जशी सणसणीत शिवी जाते, मैफिलीत गाताना लावलेल्या षड्जाला जशी कडाडून दाद जाते, तशीच भरल्या नाकाने अशी काही ‘ठ्यां’ करुन शिंक जाते की काय सांगावं महाराजा. अशाच सटासट चार शिंका गेल्या की शेंबूड बाहेर, नाक मोकळे, चित्तवृत्ती उल्हासित आणि माणूस प्रफुल्लीत होऊन जातो. सर्दीमुळे सुषुम्नावस्थेत गेलेल्या मेंदूला जागं करायचं काम या शिंकाच करुन जाणे.

धुळीमुळे येणारी शिंक हा दुसरा सर्वमान्य प्रकार. कधीही, कुठेही, केंव्हाही, जरा धूळ जमली की लगेच या प्रकारातल्या शिंकासुरांची मैफिल जमते. माळ्यावरची धूळ, पंख्यावरची धूळ, कपाटातली धूळ, खिडकीच्या कोपऱ्यात साठणारी धूळ, फर्निचरवर थर जमवणारी धूळ यापैकी धुळीचा कुठलाही फ्लेवर यांच्या शिंका सुरू करायला पुरेसा असतो. अशा शिंका सुरु झाल्या की त्या डझनाच्या हिशोबात मोजाव्यात. एक-एक करुन मोजायला गेलं तर शिंका देणाऱ्यापेक्षा मोजणाराच बेजार होऊन जातो. आणि धुळीपायी सुरु झालेला हा शिंकेचा धुमाकुळ पुढे बराच वेळ टिकतो. अशा शिंकांचा सर्वात भारी उपयोग म्हणजे अशा बेजार शिंक्यांवर वरीलपैकी कुठल्याही जागांची साफसफाई करण्याची वेळच येत नाही. पण यामुळे या शिंकपंथात ओरिजनल आणि बाजारभरती असे दोन गट पडले आहेत. अनेक धडधाकट बॅचलरांना लग्नानंतर अचानकच धुळीची आलर्जी आणि शिंकांचा आजार झाल्याचे जाणकार (आम्ही नाही!) सांगतात.

शिंकेचा तिसरा प्रकार म्हणजे कधीही ‘ठ्यां’ करणारे जन. यांचे नाक यांच्या ताब्यात नसते. अतिशय बेफाम, न ऐकणारे, प्रत्येक वास, तापमानातला सूक्ष्म बदल, हवेची झुळूक, वाऱ्याची बदललेली दिशा, पानगळ, फुलांचा मोसम, ऊन, वारा, थंडी, पाऊस, उकाडा या सर्वांवर अशा लोकांच्या नाकाची एक वेगळी आणि ठ्यांम प्रतिक्रिया असते. तापमानातला बदल थर्मामीटरच्या पाऱ्यालादेखील लक्षात येणार नाही, पण यांच्या नाकाला तो जाणवतो. कुठलाही वास असो, दुनियेत कुणालाही तो वास यायच्या आधी यांच्या नाकाशी खेळून जातो. कुठलीही धूळ, कोणताही मोसम, वाट्टेल त्या वेळी यांच्या नाकाशी झोंबतो. सर्वसामान्य लोकांना सर्दीमुळे शिंका येतात, या लोकांना शिंका देऊन देऊन सर्दी होते. दिवसात केव्हाही, कुठेही, कितीही शिंका देण्याची एक वाढीव कपॅसिटी या लोकांत असते. आजूबाजूच्या लोकांना यांच्या शिंकांची इतकी सवय झालेली असते, की इन्फेक्शन, अपशकुन वगैरे प्रश्नसुद्धा कुणाला पडत नाहीत. एकूणात काय, या लोकांच्या शिंकांचा त्रास मूळ त्यांना आणि फारफार तर ऐकणारांना होतो. पण या टायपातले नाक जाम खर्च काढत राहते, कारण स्पेशलिस्ट डॉक्टरच्या वाऱ्या करीत त्याचे गतजन्मी द्यायचे राहिलेले ‘देणे’ देण्यात यांची हयात खर्ची पडते.


चौथ्या प्रकारातलेलोक थोडे विशेष असतात. यांना स्वतःहून शिंका येतच नाहीत. हे लोक आपोआप तरुण होतात, यांची शिक्षणं आपोआप उरकतात, आपोआप लग्न, पोरंबाळं होतात, त्यांची शिक्षणं, लग्न, नातवंडं देखील आपोआप होतात, पण यांना शिंक काही आपोआप येत नाही. मग हे असले लोक तपकीरच ओढ, शिंकणीच वापर, गेला बाजार कागदाच्या सुरनळ्या करुन नाकात घाल, असले आचरट प्रकार करुन स्वतःचं नाक मोकळं करीत असतात. चारचौघात कसं दिसतं ते. आणि वर त्यांच्या या शिंकसाधनेत व्यत्यय आणलेला त्यांना अजिबात चालत नाही. इतर कुणापेक्षाही हे लोक शिंकेच्या बाबतीत फारच आग्रही असतात. 

 तर, ही झाली शिंकेची मूळ घराणी. यात पांथिक मतभेद असले तरी आवाज लावण्याच्या बाबतीत एकवाक्यता आहे. मनुष्याच्या प्रकृतीनुसार ठ्यां, फॉ:, आँक-शी, छु:, फिक, खूस्स, छिक, आणि अतिशय बारीक अशी ‘उच्’ अश्या आवाजाच्या उतरत्या क्रमाने शिंका दिल्या जातात. आवाजाप्रमाणेच या शिंकांचा जोरदेखील उतरणीचा असतो. एखाद्या गद्यभारती ‘फॉ:’ पुढे कविमनाच्या ‘छिक’चा जोर जाणवतच नाही. ‘उच्’ करणाऱ्यांना शिंक आली की उचकी हे बऱ्याचदा त्यांनादेखील समजत नाही. खूस्स आणि फिक हे आवाज शिंक देतानाच लपवायचा अयशस्वी प्रयत्न केल्यामुळे येतात, त्यामुळे त्यातून काहीच साध्य होत नाही. ठ्यां आणि आँक-शी मात्र निव्वळ गगनभेदी, कोथरुडला दिलेली शिंक विमाननगरला ऐकू येऊ शकते. अशा लोकांनी आरसा किंवा कॅमेरासमोर शिंका देऊ नयेत, काच तडकण्याचा धोका संभवतो.

असो! गरजेप्रमाणे शिंक द्यावीच लागते, त्याला पर्याय नाही. “आत्ता नको, नंतर निवांत शिंकतो” असं म्हणायचा ऑप्शन शिंक आपल्याला देतच नाही. आणि कुठल्यातरी मार्गाने समजा एक शिंक चुकवलीच, तर तीच शिंक इतर अनेकींना साथीला घेऊन येते, लगेचच! शिंकेवाचून पर्याय नाही, आणि शिंकेपासून सुटका नाही. अशा या झटक्यात येणाऱ्या आणि फटक्यात निघून जाणाऱ्या, एकाच दणक्यात नाक उघडून श्वास मोकळा करणाऱ्या शिंकेला शरण जाण्यापलीकडे आपल्या हाती काही नाही महाराजा. शिंका एंजॉय करत करतच आपण आजच्या निरुपणाची सांगता करूयात. इति शिंकोध्याय:। लेखनसीमा।।

- समीर
(डिसक्लेमर: लेखक स्वतः शिंकग्रस्त असून या विषयात स्वयंशिक्षित आहेत. त्यांच्या एका शिंकापुरातच हा लेख लिहिला गेला आहे. यातील संशोधनाबद्दल शंका घेणे म्हणजे ऐन शिंकेच्या भरात नाकात बोटं घालण्यासमान आहे, त्यामुळे कृपया असले उद्योग करू नयेत. 😉)
२०/१२/२०२३

Friday, July 28, 2023

नक्षत्रं

नक्षत्रं पाहिली आहेत मी तुझ्या डोळ्यांत 
सात्विक समाधानाने तेवतना
राजस चेहऱ्यावर चमकताना
जपून ठेवली आहेत मी

नक्षत्रं पाहिली आहेत मी तुझ्या डोळ्यांत
आनंदात लखलखलेली
दुःखात ओथंबून आलेली
साठवून ठेवली आहेत मी 

नक्षत्रं पाहिली आहेत मी तुझ्या डोळ्यांत
काही खास स्वप्नं पाहताना
क्वचित कधी ती तुटताना
स्मरणात कोरली आहेत मी

नक्षत्रं पाहिली आहेत मी तुझ्या डोळ्यांत
कधी भावनांतून, शब्दांतून
या धरणीवर उतरताना
कान होऊन ऐकली आहेत मी
 
नक्षत्रं पाहिली आहेत मी तुझ्या डोळ्यांत
ती दाखवतात रस्ता अंधाररात्री
सोबतीला येतात माझ्या तेव्हा
असतो मी जेव्हा आतून एकाकी

नक्षत्रं पाहिली आहेत मी आकाशात 
ती कधी गणतीत आलीच नाहीत
तुझ्या डोळ्यांतली लक्ष नक्षत्रं मात्र
प्रयत्ने मोजता मोजून येत नाहीत

- समीर
२८/०७/२०२३

Saturday, June 17, 2023

बायको म्हणजे..

बायको म्हणजे बायको म्हणजे बायकोच असते

ती कधी वाऱ्याची झुळूक तर कधी वादळ असते


बायकोला आपण अजिबात कमी लेखत नाही

बायकोच्या सल्ल्याशिवाय काही करतही नाही

तिच्या धाकापुढे तापलेली पळीसुद्धा थंड वाटते

ती कधी वाऱ्याची झुळूक तर कधी वादळ असते 


बायको म्हणजे 4k सीसीटिव्ही स्क्रीन

बायको म्हणजे अतिसूक्ष्म मायक्रोफोन 

तिच्या नजरेतून कधीच काहीदेखील सुटत नसते 

ती कधी वाऱ्याची झुळूक तर कधी वादळ असते


बायकोसमोर कधी टिकले आहेत नियम आणि निती

बायकोपुढे कुणाला वाटली आहे इतर कशाची भीती

बायको स्वतःच धोका आणि इशारासुद्धा असते

ती कधी वाऱ्याची झुळूक तर कधी वादळ असते


बायको सांगेल ते ऐकावं, ती ठेवेल तसं रहावं

बायकोने ऐकलं तर लाईफ 'सुशेगात' असं वाटावं

'तू म्हणशील तसं' यापेक्षा मोठं थ्रील ते काय असते

ती कधी वाऱ्याची झुळूक तर कधी वादळ असते


बायको म्हणजे भावनांचा सदैव खडा पहारा

बायको देते सदैव मोठाल्ल्या धोक्यांचा इशारा

बायको म्हणजे पंचेंद्रियांचं महासंमेलन असते 

ती कधी वाऱ्याची झुळूक तर कधी वादळ असते


बायकोची बोलणी खाण्यातसुद्धा एक मझा असतो

बायकोचं प्रेम म्हणजे पदोपदी साक्षात्कार असतो

तिच्यासाठी जगात फक्त आपलीच काय ती पत असते

ती कधी वाऱ्याची झुळूक तर कधी वादळ असते


बायको नावाचं वादळ आयुष्यात फार गरजेचं आहे

बायकोचा नवरा होता येणं हा मोठाच चॅलेंज आहे

तिच्या अपेक्षाच संसारात तरून जायची नाव असते

कारण आयुष्याच्या शीडांतला वारा बायकोच असते


बायकोच कधी वाऱ्याची झुळूक तर कधी वादळ असते

बायकोच कधी वाऱ्याची झुळूक तर कधी वादळ असते


-- समीर

Thursday, May 11, 2023

ज्याचे त्याचे रण

'काल'च्या दुनियेत झोपलेच नाहीत काही जण
त्यांच्या डोक्यात, नसानसात, पेटले आहे रण

तो एक, त्याच्या डोक्यात कर्जाचा वादा
दिवस थोडे आणि मणामणाच्या हफ्त्यांचा तगादा

ती एक, तिच्या डोक्यात सतत पहाटेचा जागर
आवरायची सोंगे खूप आणि घड्याळाचा भीषण गजर

एक ती, तिला झेलायचा आहे ऑफिसातला विखार 
"नवरा सोडलाय तिने", आणि इतर कॉमेंट्स भिकार

एक तो, त्याच्याकडे सगळं आहे, पार्टनर मात्र नाही
आयुष्यात सगळं मिळवताना, मन कधी कुठे जुळलंच नाही

एक ते, त्यांना म्हातारपणाचे प्रॉब्लेम्स हजार
होत-जात काहीच नाही, मात्र टॉयलेटच्या फेऱ्याच फार 

आणि ते सुद्धा, त्यांना द्यायची आहे उद्या परीक्षा
पाठ मोडून अभ्यास आणि अवाजवी अपेक्षांची शिक्षा

पण एक तो, त्याला द्यायचा आहे उद्या गुलाब
त्याला नाही झोप, पण डोळ्यात इश्काचा ख्वाब

आणि एक तीसुद्धा, तिला विचारायचंय धाडस करून
हो म्हणालाच तो, तर येईल का सगळं जमून

'काल'ची रात्र अशी वैरीण, आणि मनाच्या भुताला जाग्रणं फार
धीर जाणिवेचा सुटता सुटता, फक्त आशेच्या काड्यांचा आधार

तर, ज्याने त्याने करावे, भरावे, जगावेत आपापले क्षण
आणि ज्याची त्याची लढाई, जिंकण्या ज्याचे त्याचे रण
ज्याचे त्याचे रण..


- समीर
(११/०५/२०२३)

Friday, January 13, 2023

पुणे

या कवितेची थोडी प्रस्तावना लिहीतो. 
नुकताच मी पुण्याला, म्हणजे माझ्या पुण्याला सात वर्षांनी जाऊन आलो. 
या भेटीत मला सतत जाणवत होतं की, पुणं ही संकल्पना केवळ तिथल्या लोकांमुळे आणि जुन्या संबंधांमुळे शिल्लक आहे. निसर्ग - जो पूर्वी पुण्याच्या व्यक्तिमत्वातला एक महत्वाचा घटक होता, तो आता कुठेच दिसला नाही आणि कुणाला त्याची आठवणही कदाचित होत नाही. 
ही कविता कोणा एका व्यक्तीबद्दल नसून शहराबद्द्ल आहे, आणि आपलं लाडकं पुणंच ही वाचतेय' असं समजावं! 

हे शहर अजून तसंच उभं आहे 
हा देश सुद्धा अव्याहत सुरू आहे 

वाहनांच्या गोंगाटातून कोंबड्यांच्या तडफडीतून
मटण भाकरी आणि मिसळ पावातून 
लाकडी घाणा, पुणेरी बाणा - तोच तो 
हो, तोच तो - एकतर प्रचंड आस्थेचा 
अथवा मरणप्राय तिरस्काराचा 

आस्थेचं म्हणाल तर आहे जिवापाड प्रयत्न 
अंधारलेलं धुलिकामय सोनेरी पान टिकवण्याचा 
नाहीतर आहेच अभिनिवेश तळपत्या तलवारींतून, 
कडव्या बोलीतून किंवा फडकत्या झालरींतून 

मोठाले इमले मोठाले क्षितीज 
मी आहे उंच रस्त्यात, अहो अगदी खेड्यात 
उत्तुंग दरीखोऱ्यात - मी आहे धूर
मी आहे धूळ सगळ्यांच्या मनांत 

माझ्या छोट्या चौकटीतून का होईना, 
माझ्या गार गार दिवाणखान्यातून का होईना 
गेली अनेक वर्षं मी चिखल उपसातो आहे 
विषण्ण मनानं स्वतः चा मार्ग आरशात शोधतो आहे


- Sarang

Saturday, December 24, 2022

चंद्र कोणास कळला आहे

एक पौर्णिमेचा संपूर्ण चंद्र घ्यावा

गोल गरगरीत वाटोळा, आपण मात्र भोपळा मानावा

परीक्षेतले मार्क म्हणून, पेनाच्या धारेने कापावा..

तुकडा एक त्या चंद्राचा, तुकडा एक त्या मार्कांचा

तुकडा एक आठवणींचा, मनाशी खोल जपून ठेवावा..


एक द्वितीयेची धारदार चंद्रकोर घ्यावी

सगळी स्वप्नं अगदी अलवार, हलक्या हाती त्यावर चिरावी

त्यातले दवबिंदू ते घ्यावे, डोळ्यांच्या कोपऱ्यात ठेवावे..

आठवणींचे दवबिंदू,  ते कुणासाठी तरी ओघळू द्यावे

त्या कुणा कळले ना तरी, मनाच्या तळाशी साठवावे..


एक सप्तमीचा सपाट चंद्र घ्यावा

ओबधोबड अनुभव मिसळून, त्याचा एक सी-सॉ करावा

आयुष्य हे इतकं दोलायमान, एक डाव खेळून पहावा..

आयुष्याचा झुला थोरला, बांधून मोठ्ठा झोका घ्यावा

झुम्म वरून खाली येताना, मनात अनामिक संभ्रम दाटावा..


एक अष्टमीचा निखळ चंद्र घ्यावा

त्या असामान्य मोहकतेशी, एखादं लडिवाळ हितगुज करावं 

त्याचं आणि कृष्णाचं नातं, थोडं समजतंय का ते पाहावं..

कृष्ण कळता कळता, तपं युगं भुर्रकन उडून जावी

मग त्या चंद्राच्या पेपरमधून, आपणही थोडी कॉपी करावी..


चंद्राचं आणि कवीचं हे द्वंद्व, फार फार जुनं आहे

प्रेम, विरह, लफडी, मैत्री, या साऱ्यातून ते टिकलं आहे..,

त्याच्याबद्दल कविता, पुस्तकं, भरभरून लिहिलं आहे 

आणि इतकं सारं लिहूनसुद्धा, चंद्र कोणास कळला आहे..

चंद्र कोणास कळला आहे..


- समीर

(२५/१२/२०२२)

Thursday, December 15, 2022

मुखवटा

वापरला मुखवटा मी प्रत्येक वेळी

तोच ठेवला लक्षात साऱ्यांनी

जेव्हा ओळख द्यायची वेळ आली

नाकारला खरा चेहरा सगळ्यांनी


मुखवटा होता एक सोय

मुखवटा आहे एक सुख

लपवून माझा नाव गाव

एका चेहेऱ्यास मुखवटे लाख


लावले मी शेकडो मुखवटे

अज्ञातवास जणू संपूच नये

काय कुणास मी का सांगावे

अंतरीचे गूढ कुणाच्या भये


मी कुणास ओळखत नाही

कोणी मला ओळखत नाही

मुखवटाच जाणे मुखवट्यास 

या ओळखीचा उपयोग नाही


खरे खरे म्हणजे ते काय

मुखवटा उतरवणे म्हणजे काय

आतून असेल का अजून एक

मुखवटा चढवून फेकांवर फेक


खरे कळता नाती तुटती

खरे कळता कलह होती

खोटेच ते फार सोयीस्कर

खरे पचवणे फार भयंकर


बरे झाले मुखवटा लावला

खरा चेहरा न दाखविला

माझ्या भीषण सत्यापेक्षा

दांभिक मुखवटाच आवडून गेला


- समीर

Wednesday, December 7, 2022

ज्ञानदेवांची रोजनिशी

संजीवन समाधी दिनानिमित्त (कार्तिक वद्य त्रयोदशी) सुरू केलेला विषय हा, अनेक दिवस झाले, नीट काही सुचतच नव्हतं. अचानक एका रात्री माझ्या कल्पनेतही नसताना संपूर्ण कविता एकटाकी लिहून झाली. 


ज्ञानेश्वर लिहितात रोजनिशी

त्यात हिशोब दुनियेच्या पापाचा

ज्ञानदेव म्हणती आता आसरा

फक्त रखुमादेविवरु बापाचा


लोक येती, लोक जाती

इडा पिडा सांगुनी म्हणती

ज्ञानदेवो आम्हावर कृपा करा

यातून उपाय काय तो सांगा


ज्ञान म्हणे निवृत्ती हाच मार्ग

सोपान त्यास, ज्यास आस 

मुक्त होण्यास एकच उपाय

ज्ञानदेव वदती दुनियेस


तद्वत ज्ञानेश्वर सांगती उपाय

विठ्ठल तोच तरणोपाय

लिहितो त्याची रोजनिशी

त्याच्याच जावे चरणांशी


तरी तुम्ही-आम्ही चांगदेव

ज्ञान-गर्व-दंभ आपणास

त्या ज्ञानियाची वाणी हाच

आपल्या सुटकेचा मार्ग खास


जरी वाचली ज्ञानेश्वरी लक्ष वेळा

परी करुण्याचा पाझर ना फुटला

कैसा हा ज्ञानाचा अपमान केला

त्या रचियत्याला दुःखी केला


ज्ञानदेव लिहिती रोजनिशी

देवा सांगती पृथ्वीवरचे पाप

म्हणती विठ्ठला सोडव रे

असह्य झाला हा ताप 


कंटाळा आला रोज तेच

ऐकण्याचा, लिहिण्याचा

कंटाळा आला आता देवा

तुझ्याशिवाय राहण्याचा


संजीवन ती समाधी विठ्ठला

म्हणती ज्ञानदेव उपाय एकला 

ईश्वराचे ज्ञान वाटून लोकां

निघाले स्वोजस परलोका


रोजनिशी लिहिण्यास आता

विठ्ठल शोधी ज्ञानी सकल 

परि एकही ना सापडे त्यांस

ब्रह्मांडनायक होतसे हतबल..


- समीर

Wednesday, November 30, 2022

नेहेमी खरे बोलावे (का?)

"नेहेमी खरे बोलावे" असं आपल्याला लहानपणापासूनच शिकवलेलं असतं. लहानपणी आपल्याला थोरामोठ्यांनी शिकवलेल्या आणि आपण रीतसर फाट्यावर मारलेल्या अनेक शिकवणींपैकी ही एक.

आता अचानक या अवघड विषयाला हात का घातला असा जर प्रश्न पडला असेल तर तो अगदीच साहजिक आहे. आणि खरं बोलण्याबद्दल मी काहीही भाष्य करू नये असा वैयक्तिक इतिहासदेखील आहे. तरीपण यापूर्वीही अस्मादिकांनी अनेकदा भलभलते लेख लिहून लेखण्या बंबात घातल्या आहेत, त्यात अजून एक भर.

आपण, - मुलांनी खरं बोलावं यासाठी - त्यांना लहानपणापासूनच अनेक गोष्टी सांगतो. एखाद्या लहान मुलाला (आणि मुलीला देखील - पोरीपण जाम टेपा लावतात) खऱ्याचं महत्व पटवून देण्यासाठी खऱ्या खोट्या गोष्टी, किस्से रंगवून सांगितले जातात, दाखले दिले जातात. "अखेर सत्याचाच विजय होतो" हे त्यांच्या मनावर ठसविण्याचा प्रचंड प्रयत्न केला जातो. खरं बोलणारा आणि वागणारा राजा हरिश्चंद्र, न्यायप्रिय, सत्यप्रिय शिबिराजा, एकवचनी श्रीराम हे तर म्हणजे या " नेहेमी(च) खरे(च) बोलावे" चळवळीचे अग्रणी. यांच्याशिवाय कुठल्याही पोराचं बालपण पूर्ण होत नाही. त्यात भर म्हणजे पंचतंत्रातल्या खरे (किंवा खोटे) वागणाऱ्या प्राण्यांच्या गोष्टी. ते प्राणी माणसाच्या भाषेत बोलतात, वागतात, खऱ्याखोट्याचा विधिनिषेध बाळगतात हे पाहिल्यावर त्यांना प्राणी का म्हणायचं हा प्रश्न आहेच. पण त्याचासुद्धा प्रचंड मारा पोरांवर केला जातो. अजून एक इसाप नावाचा गोष्टीवेल्हाळ मनुष्य होऊन गेला, त्यानेसुद्धा अशाच प्राणीमात्रांना वेठीला धरून दुनियेला शेंड्या लावल्या.

मुलांचं काय, आईवडील सांगतात ते सगळं त्यांना खरं वाटतं. हल्ली हे असं वाटायचं वय एका हाताच्या बोटावर मोजण्याइतके सुद्धा राहिलं नाहीये म्हणा. मुलं आईवडील, आजी आजोबा, घरातले मोठे लोक, शिक्षक मंडळी यांनी सांगितलेल्या गोष्टी भक्तिभावाने ऐकतात, बऱ्यापैकी आचरणात आणतात. पण म्हणून पोरं खोटं बोलणं किंवा वागणं सोडत नाहीत. सोयीप्रमाणे त्यांचा पवित्रा बदलत राहतो. आपण मात्र त्यांना खोट्यास शिक्षा आणि खऱ्यास बक्षीस देऊन त्यांचं वागणं बदलायचं सोडत नाही. मानसशास्त्रज्ञ आता सांगतात की लहानपणी खोटं बोलू शकणारी मुलं ही खूप हुशार आणि प्रगतिशील असतात. या हिशोबाने मी जगातला सर्वात हुशार व्यक्ती होतो, फक्त हा शोध माझ्या लहानपणी लागला नव्हता. त्यामुळे थापा मारल्याबद्दल कौतुकाची थाप पाठीवर मिळायच्या ऐवजी धपाट्यांचे धनी झाल्याचेच किस्से आहेत. आता हा असा शोध बघता, आपण मुलांना खरं बोलण्यासाठी उद्युक्त करत रहावं की त्यांच्या कुवतीप्रमाणे खोटं बोलू द्यावं हा प्रश्न उभा राहतो. मन मारून खरं बोलायला भाग पाडून आपण मुलांची कल्पनाशक्ती संकुचित करतो आहोत का? 

पुलंनी म्हणतात त्याप्रमाणे "हट्टीकट्टी गरिबी आणि अपंगपंगू श्रीमंती" ची गोष्टसुद्धा अशीच खोट्याचं खरं केली गेलेली गोष्ट आहे. मोठेपणी ही गोष्ट लहानांना सांगणारे खरंच का हौसेने गरीब राहू इच्छितात का, हा प्रश्न त्यांनी स्वतःलाच विचारून पहावा, उत्तर दर वेळी शंभर टक्के नकारार्थीच येतं. मग हा गरिबीचा अट्टाहास कशासाठी? किंवा आमची आजी म्हणायची तसे हे "भिकेचे डोहाळे" नव्हेत का? कशी का असेना पण एकदा श्रीमंती अनुभवायची इच्छा हट्ट्याकट्ट्या गरिबीने खुंटा हलवून बळकट केलेली असते हे पुलसुद्धा गमतीने म्हणून जातात. किंबहुना श्रीमंती ही काळया पैशातूनच येते हा तद्दन फिल्मी विचार रुजवयाचे दिवस गेले आता. कष्ट करून, नीट पैसा इंवेस्ट करूनदेखील श्रीमंत होता येतं याची शेकडो हजारो उदाहरणं आहेत. मग आपण "गरीब ते सत्यवचनी आणि श्रीमंत ते लुबाडून घेणारे खोटारडे" अशा टायपातला छापेबाज विचार सोडायला पाहिजे की नको?

"Honesty is the best policy" हे अजून एक वाक्य लहानपणी मुलांच्या मनावर बिंबवलं जातं. अगदी सुविचार म्हणून शाळेत फळ्यावर लिहायला द्यायचे/देतात. आता honesty = प्रामाणिकपणा. हा प्रामाणिकपणा खऱ्या बोलण्यातून आणि वागण्यातून येतो. पण प्रत्येक वेळी खरं बोलून किंवा वागून योग्य परिणाम साधतो का? इथे "हवा तो" परिणाम अपेक्षित नसून "योग्य तो" परिणाम अपेक्षित आहे. बहुतेक वेळा खऱ्या बोलण्याने किंवा वागण्याने आजूबाजूचे लोक दुखावले जातात. "कोणी कितीही दुखावलं गेलं तरी चालेल पण मी खरंच बोलणार, वागणार" असा पवित्रा घेणाऱ्याच्या सावलीलादेखील लोक उभे राहत नाहीत ही वस्तुस्थिती आहे. अशा लोकांची अवस्था बिकट होऊन बसते, कारण खरं बोलायला आणि वागायला यांच्याकडे लोकंच उरत नाहीत.

सत्य आणि त्रेतायुगात पाहायला मिळणारा खरेपणा द्वापारयुगात संपला होता हा इतिहास आहे. एकदम फेमस "नरो वा कुंजरो वा" ने तर युद्धात पांडवांना वाचवलं होतं. नाहीतर त्या दिवशी द्रोण काय कुणाला सोडत नव्हते. त्याची महाभयंकर शिक्षा काय तर म्हणे युधिष्ठिराचा रथ जो पूर्वी जमिनीवर चार अंगुळ तरंगत चालायचा तो जमिनीवर आला. या असल्या वर्तनाच्या हिशोबाने तर युधिष्ठिराने त्याचे भाऊ आणि बायको पणाला लावली तेव्हाच त्याला धरिणीनं गिळंकृत करायला हवा होता. पण द्युत नावाच्या व्यसनाला राजाश्रय मिळाला असल्यानं जमिनीवर येण्यासाठी युधिष्ठिराला खोटं बोलावं लागलं. मग अज्ञातवासात तो काय खरं बोलत फिरत होता का? ही चार अंगुळाची गोष्ट मुळातच निव्वळ थाप आहे असं वाटतं. म्हणजे खरं बोलायला शिकवणारी गोष्टच खोट्यावर अवलंबून आहे.

इतक्या प्रचंड कन्फ्युजनमध्ये काय करावं हा मोठाच प्रश्न आहे. सगळ्यात सोपा उपाय म्हणजे खोटं बोलायची तयारी आणि प्रॅक्टिस पाहिजे. स्वार्थासाठी आणि दुसऱ्याचं नुकसान होणारं खोटं बोलू नये हे अगदीच मान्य, पण स्वतःचा आणि दुसऱ्याचा वेळ वाचवण्यासाठी आणि भावना जपण्यासाठी खोटं बोललं तर त्याला खोटारडेपणा म्हणत नाहीत. महत्वाचं म्हणजे, खोटं बोलायची प्रॅक्टिस असावी लागते, कारण अचानकपणे सराईत खोटं बोलता येत नाही. तिथे पाहिजे तयारीचे, ते येरूचे कामच नव्हे. छोट्या आणि निरुपद्रवी थापा मारत अशी प्रॅक्टिस करता येते हा स्वानुभव आहे.

आता तरीसुद्धा थापा जमत नाहीत असे अनेक जण असतात. यांनी लहानपणी सांगितलेल्या खऱ्याच्या गोष्टींवर फारच विश्वास ठेवलेला असतो. अशा लोकांनी खरंच बोलावं, कारण अर्धवट, न पचणाऱ्या थापा मारून परिस्थिती बिकट करून ठेवण्यात हे लोक पटाईत असतात. फक्त खरं बोलताना गरजेपुरतंच खरं बोलावं, कारण सगळं खरं एकच वेळी ओकायची गरज नसते. परिस्थितीजन्य थोडकं खरं बोलता येणं ही काळाची गरज आहे. "Percentage Truth" ही संकल्पना मांडायचा प्रयत्न केला आहे, गरजूंनी स्वबळावर समजून घ्यावा.

बाकी मुलांना सांगायला खरेपणाच्या गोष्टी छानछान असतात, पण त्यांना कृष्णाच्या, चाणक्याच्या आणि शिवाजी महाराजांच्या गनिमी काव्याच्या गोष्टी पण आवर्जून सांगाव्यात. जेणेकरून "पारमार्थिक" खोटेपणा कसा आणि कुठे वापरायचा याची अक्कल आपोआप येईल. त्याला खोटेपणा म्हणत नाहीत हे सुद्धा अनुभवातून कळायला लागेलं. सध्याच्या युगात खोटेपणातूनसुद्धा चांगले परिणाम साधता येतात, "सर्जिकल स्ट्राईक" हे त्याचे अत्युत्तम उदाहरण आहे. 

असो. आजचे ज्ञानामृत इतुकेच, कारण लेखणी मोडून सदरहू लेखक पोराची शी काढायला जातो आहे. (ही थाप आहे की खरी परिस्थिती, हे ओळखून दाखवा, च्यालेंज असा महाराजा!)


- समीर

Friday, June 24, 2022

आठवांचा प्रवास

 

केव्हातरी उठावे, जावे स्वतःच्याच प्रवासा

मनाच्याच वाटा, मनातील देशा,

कधी, कुठे, कसे, कुठलेच प्रश्न नसावे

जिथे जीव जडला, तिथलेच विसावे..


स्वतःच्या प्रश्नां, स्वतःचीच उत्तरे

मनातून उतरण्या आधीच सावरावे,

स्वतःच्या प्रवासा असावे सांगाती

असे मैत्र जीवांचे बांधून घ्यावे..


मनातील कप्पे, भुयारे, चोरवाटा

तिथे सापडावा विस्मरणाचा खजिना,

या खजिन्याचे स्वतः काय करावे

असे माणिक पाचू, सर्वांत वाटून द्यावे..


विसराच्या खिडकीतून, स्मरणांचे कवडसे

त्यांचे आकार, रुकार, भान हेलावतसे,

या आकारांची करावी, छोटीशी एक नाव

वारा भरून शिडांत, गाठावा आठवणींचा गाव..


स्वतःच्या प्रवासा, असावा का किनारा

तिथे पोहोचण्या, आठवांचा ध्रुवतारा,

अशा वाटेवरती, एक स्मरणगंगा असावी

जिच्या अथांग डोही, शांतता मिळावी..


तरी वाटावे, कधी, की, परतून यावे

'स्वयम्' मधून कधी बाहेर डोकावून पहावे,

स्वतःसारखेच काही स्वप्रवासी जोडावे

'वयम्' च्या प्रवासा साथ देते असावे..


जिथे मैत्र सारे, तोच स्वदेश व्हावा

ज्यावरी मित्र सगळे, त्या वाटा जुळाव्या,

आठवांच्या सागरात, एक असे बेट असावे

सारे प्रवासी पक्षी, तिथे एक यावे..


आठवांचा प्रवास, आठवांचा विसावा,

आठवांचा प्रवासी, कधीतरी, किनारी परतून यावा..


- समीर

२५/६/२०२२

Tuesday, November 9, 2021

हिशोब

 

आयुष्याची पस्तिशी ओलांडली, 

की हिशोबाचे मांडणी करावी..

जी काही जमा, जो काही खर्च, 

जी श्रीशिल्लक, ती लिहायला घ्यावी..


आईला विचारावं, काही चुकतंय का माझं, 

तुझ्याशी वागण्यात, बोलण्यात?

पूर्वीसारखा विचारपूस करतो ना मी, 

तुला अजूनही जपतो ना मी?

आईची सगळी उत्तरं जिवापेक्षा मौल्यवान, 

ती तशीच जमेत लिहावीत..


वडिलांना विचारावं, 

गणित बरोबर यायला नक्की काय करावं?

तुमचे आयुष्याचे मार्क्स शंभरपैकी, 

एकशे अठ्ठावन्न कसे आले, मलाही सांगा..

माझं काही चुकत असेल तर 

दोन मार्क जास्त कापा, फक्त नापास करू नका..

झालीच काही गडबड, तर कान धरून चार फटके द्या, 

पण अबोला कधी धरू नका...

वडिलांची उत्तरं जपून ठेवावी, 

शेवटी हिशोब जुळवायला तीच उपयोगी यावी...


बायकोला विचारावं, फार त्रास देतो का मी? 

तुझा योग्य मान राखतो ना मी? 

वरच्या पट्टीत, रागाने, तुझ्याशी बोललोय का कधी? 

माझ्याशी लग्न केल्याचा पश्चात्ताप होतो का ग कधी?

झाला असेल कधी वाद, पण त्याच्या पलीकडे जाऊन माझं प्रेम जाणवलंय ना तुला?

तुझ्याशिवाय पानही हालत नाही हे कळलंय ना तुला?

अप्रतिमच आहेस तू.. 

हे सांगायला शब्द कमी पडले बऱ्याचदा, 

आणि म्हणायचंदेखील राहून गेलं अनेक वेळा..

पण दर वेळी समजून घेतलंसच की तू..

बायकोची उत्तरं बाजू पाहून मांडावीत, 

यातल्या खर्चातून जमेपर्यंत जायचा प्रयत्न म्हणजे आयुष्य..


बहिणीला थोडा त्रास द्यावा, 

मारामाऱ्या, उखाळ्या-पाखाळ्या..

कधी निवांत बसून गप्पा, कविता, गाणीगिणी...

तिचा रागलोभ जमेत मांडावा, आयुष्याची पुण्याई..


भावाला विचारावं, काय ब्रो, सगळं ऑलराईट?

भाऊ सांगेल ते गुमान आईकोनी घ्यावे, 

जमलं तर दोन-चार आपणही द्यावे.. 

तो जैसे वांछील तैसेच घ्यावे-द्यावे, टपाटप..

हा सगळा पॉकेटमनी, ह्याचा हिशोब नाही. 

अमर्याद कारभार..


आईंना विचारावं, माझी गाडी कुठे घसरत नाही ना?

तुमची पोट्टी माझी तक्रार करत नाही ना? 

केली तरी अजिबात लक्ष देऊ नका, 

मलाच तुमचा लेक मानत चला..

त्या सांगतील ते सगळं डोळे मिटून जमेत मांडून टाकावं, 

हे आपल्या मुठीतले झाकलेले सव्वा लाख..


पोरांना विचारावं, या वर्षी काय नवीन?

तुमच्या भरारत्या आयुष्यात काय काय स्थिर?

अधूनमधून भुर्र, टेकडी, पिक्चर, ट्रीप, फोटोगिटो करावं..

त्यांचे हसरे चेहरे कॅमेरात आणि जमेत टिपावेत..


मित्रांना तर विचारायलाच जाऊ नये, 

चाळीस शिव्या, पन्नास सल्ले, गोळ्यांसरखा वर्षाव.. 

डोक्यावर घेऊन जगाला दाखवत फिरावं अशा या मिळकती,

या फक्त जमा, इथे खर्चच नाही..


असा "जमलेला" सगळा खर्च मांडून पहावा, 

जिथे कमी पडेल तिथे किरकोळ आनंद भरून टाकावा..

उतू नये, मातू नये, उगीच माज करू नये..

कारण शेवटी चित्रगुप्त हेच पाहणार आहे, 

आणि खर्च सगळा जमेतून वजा करणार आहे, 

हिशोब सगळा जुळवून बघणार आहे..


शेवटी सगळी सुखाची ऊब, 

त्यासाठी असौख्याचं व्हावं सरपण, 

आनंद तो आपली जमा, 

खर्च तो सारा कृष्णार्पण!!


- समीर

८-११-२०२१ (पु. लं. चा १०२वा वाढदिवस)

Saturday, May 8, 2021

कोरोना आणि मध्यमवर्गीय

गेल्या वर्षी कोरोना सुरू झाला आणि तमाम मध्यमवर्गीय जनता भूमिगत झाली. 'ऑनलाईन शॉपिंग' चळवळ पुढे नेणे, बिना मास्क बाहेर भटकणाऱ्यांच्या नावे बोटं मोडणे, 'घरच्याघरी' या शब्दाचा घासून पुसून गुळगुळीत होईपर्यंत वापर करणे, आणि असं असूनही ऑफिस-ऑफिस खेळत राहणं हे सगळं करण्यात या वर्गाचा सगळा वेळ, सगळी शक्ती खर्ची पडली.

खरंतर मध्यमवर्गीय माणूस कोरोना, कॅन्सर, टिबी, हार्ट अटॅक, कावीळ असल्या आजारांना मुळीच घाबरत नाही. 'रोजरोज तेच' यालाच तो इतका गांजलेला असतो की आजार किंवा मरण हा वेलकम चेंज वाटावा. त्याला भीती वाटते ती खर्चाची. गरिबांना केशरी कार्डाचा पाठींबा भरभक्कम असतो, श्रीमंतांकडे पैसाच भरभक्कम असतो. कुठले आजार आलेच वाट्याला तरी केशरी कार्डाच्या आणि पैसेरी नोटांच्या होड्या करून हे दोन्ही पक्ष तरून जातात. आणि काडीचाही आधार नसलेला मध्यमवर्ग रीतसर बुडतो.

त्याला भीती वाटते खर्चाची, त्याला भीती वाटते ती पै पै जोडून उभ्या केलेल्या त्याच्या इटुकल्या पिटुकल्या इंवेस्टमेंट तोडायची. खरंतर त्या इंवेस्टमेंटचा जीव इतका छोटा असतो की त्यात एका पोराचं सुद्धा शिक्षण होणार नसतं, पण त्यावर बांधलेले स्वप्नांचे इमले चक्काचूर व्हायचीच भीती वाटत असते. 

मध्यमवर्गीय माणूस हा भविष्यातल्या स्वप्नांवरच जगत असतो. त्याचा भूतकाळ अजिबात अभूतपूर्व किंवा सुखनैव नसतो,  सात पिढ्या कारकुनी करण्यात आटोपलेल्या असतात, वर्तमानकाळ त्याच कारकुनीत चाललेला असतो, त्यामुळे 'आपला भविष्यकाळ निश्चितच उज्वल असेल आणि त्यासाठी आपण लागेल ती मेहेनत करू' या एकमेव आशेवर तो प्रत्येक दिवसाचं इंधन जाळत त्या भविष्याकडे जायचा प्रयत्न सुरू असतो. अशात त्या आशेलाच काडी लावणारा कुठलाही खर्च त्याला झेपत नाही. म्हणून तो असल्या कर्मदरिद्री आजारांच्या नादीच लागत नाही.

असो. नातीगोती जपणारा आणि मित्रांसोबत(च) आयुष्य आहे असं मानणारा मध्यमवर्ग कोरोनामुळे हैराण झाला तो मुख्यत्वे घरी बांधून घातल्यामुळे. कुणी कुणाकडे जायचं नाही, यायचं नाही,मित्रांना भेटायचं नाही, ऑफिस बंद, टपरीवरचा चहा बंद, पॉलिटिकल गप्पा बंद, ट्रॅफिक बंद, त्यावरून होणारी चिडचिड बंद. रोजच्या जगण्यातली सगळी टॉनिक बंद झाल्यावर शिट्ट्या वाजणार नाही का राव! त्यातच आयुष्यभर केवळ स्वप्नात बघितलेला 'कुटुंबासमवेत वेळ घालवणे' हा इव्हेंट प्रत्यक्षात अवतरलेला पाहून त्याची खरंतर शाळा झाली. आपली स्वप्न खरी होण्याची जळी-स्थळी-काष्ठी-पाषाणी सुतराम शक्यता नसल्याने त्याला स्वप्नातच रमायला जमतं, अचानक स्वप्न खरं झाल्यामुळे धावपळ झाली. आणि समवेत घालवायला इतका वेळ मिळाला की त्याचं नक्की करायचं काय हेच मुळात समजलेलं नाही, अजूनही!

'ठेविले अनंते तैसेचि रहावे चित्ती असो द्यावे समाधान' यावर ५००% विश्वास ठेवणाऱ्या या वर्गाला अनंताने अचानक इतके चेंजेस आपल्या माथी का मारले असावेत याचा विचार करण्यापलीकडे काहीच पर्याय नाही.

अजून एका विषय म्हणजे मध्यमवर्गीय बायका. लॉकडाऊन झाल्यावर सुरुवातीचे काही दिवस संपूर्ण कुटुंब एकसंध एकत्र सुरक्षित पाहून खूश होणाऱ्या माताभगिनी त्यानंतर लगेचच हैराण झाल्या. भूतालाच काय, स्वतःचे आईवडील आणि सासुसासरे यांनासुद्धा न घाबरणाऱ्या या बायकांना 'खायला काही आहे का ' या प्रश्नाची भीती वाटायला लागली. त्यातच त्यांच्या आयुष्याचा आधार, कामवाल्या बायका, त्यासुद्धा बंद झाल्या.पूर्वी डबे पॅक करून लोकं घराबाहेर घालवले की दिवस पाचाउत्तरी सुफळ संपन्न होत होता, तिथे तोच दिवस आता साठाउत्तरी कहाणी सांगितली तरी संपत नाही. 

नोकरी करणाऱ्या बायकांचे हाल तर अजून बेकार आहेत, ऑफिस सुरू असतं, मध्येच मॅनेजर कॉल ठेवतो, तेव्हा त्याच कॉलवर आलम दुनियेसमोर पोरं पाठीमागून आरडाओरडा करतात, अवेळी खायला मागतात, मारामाऱ्या करतात, मोठमोठ्याने रडतात, नवरा केव्हाही चहा मागतो तेव्हा निव्वळ हताश व्हायला होतं. पूर्वी ऑफिसात चहा रेडिमेड मिळत असायचा, आता त्यांनी केल्याशिवाय कुणालाच चहा मिळत नाही. यात दुःख चहा करावा लागतो हे नाहीये, न मागता एकदाही चहा हातात मिळत नाही हे आहे. पूर्वी ऑफिस मधून घरी आल्यावर 'ऑफिस' हा विषय संपत असे, आता घरीच ऑफिस आल्यामुळे तिन्ही त्रिकाळ काम सुरूच असतं. ऑफिस आणि घर या दोन कधीही एकत्र न येणाऱ्या रुळांचं असं त्रांगडं होईल असा विचारसुद्धा या घर-ऑफिस-ग्रस्त बायकांनी कधी केला नसेल. 

फक्त 'समाधानी' राहता यावं म्हणून सर्व ते प्रयत्न करणाऱ्या या वर्गाला कोरोनामुळे इतकी डोकेफोड करायला लागते आहे, तितकी जर त्या अनंताला करावी लागली तर तो 'ठेविले तैसेचि रहावे' मधून स्वतःचं नाव कटाप करून घेईल. घरीच राहणे, हे जे होईल ते स्वस्थपणे पाहणे, बऱ्यावाईट बातम्या ऐकून त्यावर घरीच प्रतिक्रिया, चर्चा, चर्वितचर्वण करणे, गरजेशिवाय अजिबात बाहेर न पडणे याशिवाय काहीच करू न शकणारे, शासनाचे सगळे नियम निमूट पाळणारे, ना जमल्यास रीतसर दंड भरणारे, इतकं सगळं सोसूनही झालाच कोरोना, तर गुपचूप १५ दिवस एकांतवासात पडून राहणारे, आणि आजमितीला 'आमचा नजीकचा भूतकाळ नक्कीच सुखाचा होता' हे छातीठोकपणे सांगू शकणारे म्हणजेच मध्यमवर्गीय!


- समीर

Friday, April 23, 2021

रिकामा कवी, विचारांच्या तुंबड्या

कोविड झाल्याचं नक्की झालं, १४ दिवसांसाठी रवानगी आतल्या खोलीत झाली. नाही म्हटलं तरी या एकांतवासाचं कुतूहल होतंच. पण पाहिले ४ दिवस तापात गेले, पुढले ४ दिवस अशक्तपणात गेले. उरलेले दिवस फक्त लोळून काढले. सगळा क्वारंटाईन पिरियड लोळून लोळून संपवला, काही नवीन वाचलं नाही, लिहिलं नाही.. 

गेल्या १४ दिवसांची एकांतकोठडी रिकामीच राहिली.



परिस्थिती बेक्कार आहे सध्या, कवितेच्या आस्मानात दुष्काळाचा ढग आहे

शब्दांचा अँसिड-रेन आणि इमोशनचा कोवीड आहे


सुचते सुचते कविता म्हणावं तर ड्रेनेजला बोळा बसलाय

विचारांच्या पन्हाळीत कचरा अडकलाय


डोक्याचं भिरभिरं आणि मनाचं डबकं झालंय

कवितांच्या ओळींच त्यात बेडूकराव डराव होतंय


विचारांचं जंगल, त्यात शब्दाचं माकड

आपल्याच ओळी आणि त्यासुद्धा भाकड


म्हणून हल्ली कविता करत नाही, हल्ली कविता वाचत नाही

आणि तसंही कविता करावी असं काही सुचतच नाही...


कवितेला स्वल्पविराम, विचारांना पूर्णविराम

या कवितेलासुद्धा आपला इथेच राम राम!!


- समीर

Tuesday, February 2, 2021

जाणीवांचा खेळ

 

भाबडे आभाळ, पावसाचा नळ,

वाळवणाची ओली खोळ,

नुसतीच पळापळ!


भाबडा वारा, सोसाट्याच्या फराफरा,

कपडे हवेत नाचले,

पळाले सैरावैरा!


भाबडी शांतता, शब्दवाचा गायब होता,

मन भीतीने गारठता,

निःशब्द, भयचकित!


भाबडी भक्ती, नियमित जपजाप,

कुंडलिनी जागृत,

सिद्धीसाकार!


भाबडे काहूर, नेमकी जाणीव,

ज्ञानेंद्रियांना कल्लोळ,

कल्पनांचा!


प्रकाशाची अक्षरे, वाचता न कळे,

कोठून येणे, कोठेची जाणे,

प्रवासी पक्षी!


- समीर

Wednesday, November 4, 2020

मृत्तिकेची साम्राज्ये

 

अथांग निळ्या आकाशाकडे पाहत ते वारंवार विचारतात, 

अजून किती दिवस?


पृथ्वी नि:क्षत्रिय केली एकवीस वेळा

परशू उगारून चालून गेलो प्रत्येक वेळी

जो कोणी उभा राहिला माझ्याविरुद्ध, 

अश्व-गज-रथातून, तो रथी महारथी

कुणाची टाप होती मला मारायची

मी अजिंक्य, मी अमर, मी चिरंजीव!!


वडिलांना बायको हवी होती, नवीन

तिला मी मुळीच नको होतो, कारण

मी तिच्या होणाऱ्या मुलांचा प्रतिस्पर्धी

वडीलांच्या इच्छेसाठी मी वचन दिलं, ब्रह्मचर्याचं

तेव्हापासूनच मी हा असा एकटा, एकाकी

सव्वाशे वर्षे जपतोय त्या कुटुंबाला, ज्यांना मी कधीच नको होतो

बापाने वरदान म्हणून इच्छामरण दिलं आणि 

पुन्हा एकदा घात केला माझा

मी पराक्रमी, मी इच्छामरणी, मी चिरंजीव!!


कायम दयेवरच वाढलो मी,

कधी शेजाऱ्यांच्या, कधी मामाच्या,

कधी पितामह तर कधी राजकुमाराच्या

युद्धात मला रसच नव्हता, पण

बाप मेल्याचं कळलं तेव्हा सैरभैर झालो मी,

आणि नंतर माझ्या शेवटच्या दयावानाला असं

छिन्नविछिन्न मरताना पाहून वचन दिलं मी

सूड घेईन सूड, त्याच्यासाठी, माझ्यासाठी, शंभरांसाठी

मारले पाचपन्नास, सोडलं ब्रह्मास्त्र

काय केलं, काय मिळवलं, आता उरलो फक्त जखमेपुरता,

तेलापुरता, मी चिरंजीव!!


कुणीतरी लोगान जन्मा येतो, मरायचं नाव नाही

मारतोय, मारतोय, भल्यासाठी, बुऱ्यासाठी,

कधी सैनिक म्हणून, तर  कधी भाडोत्री

मग कोणी एक झेवियर भेटतो, आता आम्ही एक्स-मेन

पण कत्तल सुटत नाही, मनातून रक्ताळलेपण जात नाही

संसार नाही, मैत्र नाही, यातून अजिबात सुटका नाही

आणि आम्ही कोण, आम्ही चिरंजीव!!


आमची धुळीचीच चित्रे, धुळीचीच साम्राज्ये

वाळूचे किल्ले आणि मातीचे इमले

जग जातंय पुढे, युगामागून युगं

आम्ही तिथेच, त्याच अमरत्वाच्या गर्तेत

सगळ्यांचेच हात रक्ताळलेले, मनं उद्विग्न

आणि जेव्हा जेव्हा कोणी सर्वसामान्य मरतो ना जगात, 

शपथ घेऊन सांगतो, सगळे असामान्य चिरंजीव थुंकतात स्वतःच्या जिंदगानीवर


- समीर

Monday, September 21, 2020

त्याला तयारी पाहिजे..

सन्मित्रचं नाव ठरवायच्या वेळी सन्मित्र आणि साकेत या नावांवरून मनात बराच गडबडगुंडा सुरू होता. सन्मित्र हे रामाचं नाव, तर साकेत कृष्णाचं; त्या दरम्यान विंदांची कविता वाचनात आली होती. तिथूनच या कवितेची शेवटची ओळ सुचली, आणि संपूर्ण कविता एका झटक्यात जमून आली.

अर्थात, विंदाच्या नखाचीसुद्धा सर नाही येणार, पण एक प्रामाणिक प्रयत्न करून पाहिला आहे.


त्याला तयारी पाहिजे..

 

वाद घरी-दारी, चीड खोटेपणाची

वाद स्वतःच्याही खोटेपणाशी, त्याला तयारी पाहिजे


असत्य सदैव मदमस्त, सत्य उघडे नागडे

सत्यास दत्तक घेण्यासही, त्याला तयारी पाहिजे


जिंकून घेता जग हे, आनंदवनभुवन अनुभव

स्वानंद निष्कांचनतेतही, त्याला तयारी पाहिजे


ज्ञानमार्तंड असता, ज्ञान वाटता जगासही

विनम्र ज्ञानार्जन जमावे, त्याला तयारी पाहिजे


सोने माणिक रजत पाचू, खरिदसी मोल चुकवून

मोल मृत्तिकेचे जाणण्या, त्याला तयारी पाहिजे


देवास मानता मनोभावे, पाहसी आनंदे कृष्णलीला

मर्यादा त्या पुरुषोत्तमाची पाहण्या, त्याला तयारी पाहिजे

त्याला तयारी पाहिजे!


- समीर

Sunday, July 26, 2020

पुस्तक कसे वाचावे? - अर्थात माझे रिकामे उद्योग



आपण एरवी बरेच वेळा खाद्यपदार्थांचे लेख - ते बनवण्याचे, सजावटीचे, खाण्याचे - पाहतो, वाचतो, अनुभवतो. पण कधी हा विचार केला आहे का, की आपण पुस्तक कसं वाचतो. मी भरल्या पोटी आणि रिकाम्या डोक्याने जे विचाराचं गुऱ्हाळ चालवतो, त्यातून निघालेली रत्नं अशी कधीकधी वाचणाऱ्यांना वाटत असतो. हे सुद्धा त्यातलंच एक.

पुस्तक कोणतंही असो, विषय काहीही असो, लेखक कोणीही असो, पुस्तक वाचायला घेताना ते संपूर्ण वाचण्याचा संकल्प करूनच त्याला हात घालावा. पुस्तक अर्धवट वाचून, आपले विचार खरकटे करून तसेच सोडून देणारे लोक मुळी पुस्तक वाचतच नाहीत. ते आपले उगाच कुणाच्या तरी सांगण्यावरून, दबावाखाली पुस्तकाला शिवतात फक्त. मिसळ खायला बसल्यावर अस्सल तब्येतीत खाणारा खवय्या जसा मिसळीचा, तर्रीचा एक थेंब सुद्धा मागे सोडत नाही, तसचं एक अस्सल वाचक पुस्तकाचं पहिलं, शेवटचं पान, प्रस्तावना, अपोद्घात, उपोद्घात, काहीकाही सोडत नाही.

पुस्तक वाचताना शक्यतो पहिल्या पानापासून शेवटपर्यंत वाचावे. उगीच  पुढल्या पानांवर उड्या मारत मारत वाचू नये. काही लोक शेवटसुद्धा वाचून घेतात. हे म्हणजे पंगतीला बसल्यावर यजमानांनी पानापुढे विडा- दक्षिणा ठेवल्यावर जेवण सोडून तो विडाच आधी खाण्यासारखे आहे. शक्यतो असला आचरटपणा टाळावा. पुस्तक वाचणे ही पंगत रंगवण्यासारखीच कला आहे. तिथे उनाडपणा कामाचा नाही.

एखादं सनसनाटी पुस्तक वाचताना पहिल्या वेळी तरी ते पुस्तकाच्या वेगाने वाचावे. त्याची समीक्षा, चर्चा, रवंथ हे सगळं नंतरच्या वाचनांसाठी राखून ठेवावे. अशी पुस्तकं वाचताना सुरुवात ते शेवट कथानकाच्या वेगाने वाचून एकाच बैठकीत एकसंध वाचून काढण्यात जी मजा आहे, त्याची तुलना केवळ पाणीपुरीशीच होऊ शकते. पाणीपुरी जशी - "देणाऱ्याने देत जावे, खवय्याने खात जावे, खाताखाता पुन्हा पुढली डिश ऑर्डर करत रहावे" - खातात तसचं. पाणीपुरी अर्धवट सोडून ती तासाभराने खाणाऱ्याला जशी भर चौकात मिरच्यांची धुरी द्यायची इच्छा होते, तशीच इच्छा थ्रिलर पुस्तक टप्याटप्याने वाचणारे लोक पाहून होते. ती पाणीपुरी बिचारी लिबलिबीत होऊन असहाय्य स्थितीत प्लेटमध्ये पडून राहते तशीच पुस्तकं सुद्धा वाचकांची वाट बघत पडून राहतात.

याच्या बरोबर उलट, जेव्हा आपण ऐतिहासिक कादंबऱ्या वाचतो, तेव्हा त्यातले प्रसंग समजून घेऊन त्यावर आपला विचार पणाला लावून, गरजेप्रमाणे गोष्टी गुगलून,  पुस्तक शांतपणे आस्तेकदम बामुलाहिजा वाचावे. तिथे घाई करायची नाही.  पुस्तकातल्या समरप्रसंगात आपणही तिथेच जिवाच्या आकांताने लढतो आहोत असे वाटून अंगात वीरश्री संचारली पाहिजे. पन्नास कोसावर ढग गडगडून काही फायदा नाही.

कवितांची पुस्तकं ही रसिक मैत्र जमवून रसग्रहण करत वाचावीत. कवीला कवितेत काय सांगायचे आहे ते सगळं एका वाचकाच्या लक्षात येणे केवळ अशक्य. तिथे 'समानशीले व्यसनेशु सख्यं' मित्र घेऊन कवितेचे साधकबाधक रसग्रहण करून ती वाचावी. बासुंदी जशी भसाभसा पित नाहीत, ती कशी तब्येतीत, प्रत्येक चमच्यात अवीट सुंदरता भरून प्यायची असते, तसचं कवितेचं.
'मधुशाला' सारख्या कविता मात्र रंगील्या मिजाशीत रांगील्या दोस्तांबरोबर ऐकाव्या, वाचाव्या. तुम्ही भले रंगीले नसाल तरीही अशा वातावरणात त्या सायंस्मरणी कवितेची झिंगच तुम्हाला पुरेशी होते.

लघुकथा संग्रह वाचताना सोबत चणे फुटाणे वगैरे घेऊन बसावे. कथेबरोबर जिभेचेसुद्धा लाड करावे. कथेची चव जिव्हेला आवडेपर्यंत हा कथायज्ञ सुरू ठेवावा. प्रत्येक कथेला पुरेसा वेळ आणि न्याय देण्याचा प्रयत्न करावा.  इथे वेळेचे बंधन नाही. हवे तसे हवे तेव्हा वाचन हीच त्याची खासियत.

विनोदी कथा वाचताना त्यातल्या विनोदाला मनमोकळी दाद द्यावी. उत्तम विनोदनिर्मिती ही अतिशय सिन्सियरपणे करायची गोष्ट आहे हे तसा विनोद स्वतःला सुचेपर्यंत कळत नाही. त्यामुळे उगीच चोरून वाचल्यासारखे करू नये. 'टवाळा आवडे विनोद' असं समर्थांनी सांगून ठेवलेलं आहेच, त्यामुळे तात्पुरतं  टवाळपण अंगिकारून पुस्तकाची मजा घ्यावी.

इतकं करूनही काही पुस्तकं असतात जी लवकर पचत नाहीत, संपता संपत नाहीत. अशा पुस्तकांना तोंडीलावणे म्हणून दुसऱ्या किंवा तिसऱ्या वाचनातली पुस्तकं घेऊन ती पूर्ण करावी. सत्याचे प्रयोग हे पुस्तक मी सुशिंच्या कादंबऱ्या सोबतीला घेऊन संपवलं होतं. इच्छाशक्तीला थेट आव्हान देणारी अशी पुस्तकं वाचून साधारणपणे एव्हरेस्ट सर केल्याचा आनंद होतो. तेवढंच काय ते सिल्व्हर लायनिंग.

ज्ञानेश्वरी, भगवदगीता, दासबोध ही वडील मंडळी, यांच्या खोड्या काढायला जाऊ नये. आपली वैचारिक पातळी, समज, आपल्या डोक्यातला कंदील एकूणच किती उजेड पाडतो या सगळ्याचा एकत्रित विचार करून या अशा पुस्तकांना हात घालावा. 'येथे पाहिजे जातीचें, येरागबाळ्याचे हे काम नव्हें', तेव्हा आपण येरूपणाच्या पुढे गेल्यावरच करायचा हा उद्योग आहे. थिल्लरपणा इथे वाचकाला सर्वस्वी उघडा पाडतो. जिथे ज्ञानेश्वरांचे पसायदान समजणेच इतके अवघड, तिथे ज्ञानेश्वरी वाचायचा प्रमाद येरुंनी शक्यतो टाळावा. दासबोध हा वाचकाच्या वर्तनातल्या ढोबळ चुका इतक्या मर्मावर बोट ठेवून दाखवून देतो की मनातल्या मनात कित्येक वेळा स्वतःचीच धिंड निघाल्याचा फिल येतो. यांच्यासाठी पोक्त वय राखून ठेवणेच योग्य. संसारातून तावून सुलाखून निघाल्याशिवाय यांच्यातला खरा अर्थ कळणार नाही, झेपणार नाही. 

बाकी पुस्तकं वाचताना दुमडू नयेत, त्यावर लिहू नये, फराटे रेघोट्या मारू नये हे तर शहाण्यास सांगणे न लगे. पुस्तकं विद्रूप करणारे पुढल्या जन्मी गांडूळ होतात असा माझा ठाम समज आहे. पुस्तक शक्यतो दोनदा तीनदा वाचावे, प्रत्येक वेळी ते नव्याने कळते हा स्वानुभव आहे. असे हे पुस्तकवाचन पुराण प्रत्येक वाचकास पुस्तक वाचनात उपयोगी पडेल असा गैरसमज करून घेऊन  हा रिकाम्या वेळचा उद्योग थांबवतो.

समीर

Friday, July 7, 2017

थेंब!

हुश्श! सुटलो एकदाचा.


खूप दिवस अडकून पडायला झालं होतं. आता कसं मोकळं मोकळं वाटतंय. मस्त गार गार! असं सुसाटत बाणाच्या वेगानं जमिनीकडे जाताना मनाला काय वाटतं ना, सांगताच येणार नाही कधी. असं छान शांत शांत वाटतंय, या वाटण्याची सर त्या तिथे, वर निवांत बसून राहण्याला नव्हतीच कधी. सतत सुटकेची आस, सतत निघून, सोडून, पळून जाण्याची इच्छा! बस्स, आज पूर्ण झाली. 

आता काय करू आणि काय नको असं होतंय. ही तप्त-संतप्त धरा शांत-तृप्त करून टाकेन. जगातल्या कुठल्याही अत्तरतज्ज्ञाला जमणार नाही असा सुगंध निर्माण करेन. या पृथ्वीचं नंदनवन करून टाकेन. सर्वांना पुरेसं आणि पोटभर मिळेल याची तजवीज करेन. जगातल्या प्रत्येक जीवात जगण्याची नवी उर्मी निर्माण करेन मी!

काय करू आणि काय नको असं झालंय. काय नको? कुणाचं नुकसान नको, शिव्याशाप नकोत. ज्यापायी हे होतं तो सुसाटणारा वेगही नको. वेग नको? अरे, मग आत्ताच लाभलेली ही मनाची शांतता कुठून आणायची? वेग नको तर मग ताकद कुठून पैदा करायची? आणि ताकद नको, तर मग चराचरावर सत्ता गाजवायची अशी आयती चालून आलेली संधी सोडून द्यायची? आणि करायचं काय, स्वस्थ पडून राहायचं डबक्यात? हेच करायचं होतं तर मग होतो त्या तिथेच बसून राहायला काय दुखत होतं?

या वेगात, त्याच्या ताकदीत काहीतरी विलक्षणच आहे. अशी नशा, अशी धुंदी आहे जिची तुलनाच नाही. एकाच वेळी हजारो कंपन निर्माण करायची अफाट ताकद. एकाच वेळी अतर्क्य शांतता आणि कुठल्यातरी दैदिप्यमान कोलाहलाची जाणीव करून देणारी ताकद!

काय करू? आता काय काय करू? सद्सद्विवेकबुद्धी, समंजसपणा,  भ्रामक कल्पना आहेत. जेत्यांनी जिंकलेल्यांवर केलेले दुर्बळ संस्कार. खरा संस्कार एकच, ताकदीचा, आणि अशी ताकद देणार हा वेग! अफाट वेग!! आता निघालोच मी, कुणालाही आवरायचा नाही असा वेग. ही ताकद, ही शक्ती, चराचराच्या असण्यानसण्याचं, अस्तित्वाचं क्षणभंगुरत्व आता माझ्या हातात आहे. हा निघालो मी, खळाळत, निनादात, सुसाटत! बरोबरीला आहेतही हजारो लाखो, माझ्यासारखीच ताकद घेऊन प्रवासाला निघालेले! आणि घेऊन जातोय बरोबर हे गडगडणारे दगड,  वाहणारी माती, चिखल. कधी ताठपणाचा माज दाखवणार टोलेजंग वृक्ष आता दयनीय होऊन वाहतायेत. सगळ्यांचीच मुक्ती घडवुन आणतोय मी.

कळून चुकलंय मला आता, की मीच आहे सर्वेसर्वा या वाहत्या जगाचा, मीच संहारकर्ता या सृष्टीचा, तांडवाचा मीच सम्राट! कोण रोखणार मला? माझ्या वाहण्याला, गतीला, आकाशातून जी सुरुवात झालीये त्याला आता ना अंत ना पार. आता फक्त  -  प्रलय!!!

खडक

 बाहेर पाऊस पडतोय. शांत, निवांत! मी उभा आहे खिडकीत, पावसापेक्षाही निवांत! माझ्याच तंद्रीत, त्या हळुवार पडणाऱ्या पावसाकडे लक्ष आहेदेखील, आणि नाहीदेखील. पाऊस रस्त्यावरच्या दिव्यात चमकतोय. देखणा,  सुंदर. रात्रीचा एक वाजलाय, की तीन वाजलेत?  किती वेळ झाला मी उभा आहे इथे, पत्ताच नाही. हातातलं घड्याळही पावसात भिजायला निघून गेलंय.  पाऊस वाढलाय आता. लक्ष देण्याइतका की दुर्लक्ष ना करता येण्याइतका, कळत नाहीये. 


मंद्रसप्तकात सुरु असलेला पावसाचा आलाप आता तारसप्तकात पोहोचलाय. तंद्री मोडून काही लक्षात यायच्या आत स्वर टिपेचा झालाय. पावसाला आता आवाजही फुटलाय आणि पायही! जमेल तिकडे, जमेल तसा धावत सुटलाय. कुठे हळू, कुठे जोरात, तिथे सहज, कुठे ठेचकाळत, धावतोय! आवाजही तसाच, जिथे सहज तिथे चुपचाप, जिथे ठेचकाळत तिथे ठणाणत. पण थांबायचं नाव नाही. 

सगळ्याच गोष्टींना एक वेग आलाय.  आजूबाजूची प्रत्येक गोष्ट वाहत चाललीये. वेळसुद्धा! मी इथे असाच उभा.  किती वेळ उभा आहे, का उभा आहे, कशासाठी उभा आहे, कुणासाठी उभा आहे, काही पत्ताच नाहीये. मध्येच मला माझं घड्याळ दिसतंय. आपले दोन्ही हात चालवत पोहतंय मस्त. वेळेचं, स्थळकाळाचं भान ना मला आहे ना त्या घड्याळाला! अचानक बरं वाटतंय, की डिजिटल घड्याळ घेतलं नाही, नाहीतर त्याला पोहता कसं आलं असतं.  सगळ्याच गोष्टी वेगात चालल्यात, मागून पुढे, डावीकडून, उजवीकडून - वाहताहेत! ना दिशांचं भान आहे ना स्वतःचं - एकच दिशा, एकच वेग, पाण्याचा!

मी आपला मध्येच उभा आहे, खडक! सगळं पाहतोय, ऐकतोय. सगळे आपल्याच तंद्रीत, धुंदीत. वाहतायेत! ती लय, तो आवाज, तो ठेका - बेधुंद व्हायला होतंय! हळूहळू हा पाऊस, हे पाणी मला विरघळवून टाकतंय. बहुधा  नववीन क्लुप्ती असावी, पावसाची! माझ्यातला ठामपणा पटला नसावा त्याला. मला असं एकाच जागी स्थिर उभं पाहून जळफळाट झाला असेल त्याचा. त्याला कुठे जमतंय एकाच जागी थांबायला. त्याच्या त्या वेगवान गर्वाला माझी ठेच लागली असेल. 

पण त्याची ताकद जाणवतेय. पूर्ण जोर लावून मला माझ्या जागेवरून हटवायच्या मागे लागलाय हा पाऊस. मला हटवतोय की विरघळून टाकतोय आतून? हळूहळू माझेच तुकडे त्या तुफान वेगात धावताना दिसायाला लागलेत मला. मीच माझ्याशीच शर्यत खेळतोय. कोणता मी पुढे जाणार, कोणता मी जिंकणार. कसली शर्यत आहे कुणास ठाऊक! आणि आता जो मागे राहिलाय, एकटाच, स्वतः:चा खडकपणा सावरून धरणारा मी, त्याचं खडकपणही विरघळून जातंय. त्याला पण धावायचंय, बेफाम, सुसाट. पण जमतच नाहीये. काहीतरी ओढून धरतंय त्याला, थांबूही देत नाहीये आणि सुटूही देत नाहीये. प्रचंड ओढाताण!

आणि एकदम हा  शेवटचा मी, सुटलोच! कसलातरी बेभान आनंद झालाय मला. गडगडत, धावत, पळत निघालोय आता - ते बाकीचे मी आहेत ना, मलाच सोडून पळालेले - त्यांना मागे टाकत! त्या पावसाचा, त्याच्या पाण्याचा, त्या वेगवान गर्वाचा चक्काचूर करत, सगळ्यात जास्त वेगात, वाहात सुटलोय मी!

'प्रवाहपतित' होण्याचं सुख एखाद्या खडकाला विचारून पहा. स्थळाचे, काळाचे, स्थैर्याचे आणि वेगाचे, पिढ्यानपिढयांचे सगळे बांध फोडून, तोडून, मोडून निघालेल्या त्या खडकाला. आकाशातून आलेली ती मुक्तीची प्रलयांकित, वलयांकित हाक ऐकण्यासाठी उभ्या देहाचे कान केलेल्या त्या खडकाला!

अजून उजाडत का नाहीये?

Friday, March 3, 2017

ताराबलं चंद्रबलं! अर्थात, प्रत्येक लग्नाच्या सुरुवातीची गोष्ट

लग्न! 
भारतीय संस्कृतीचा अविभाज्य घटक, सोळा संस्कारातला सर्वात महत्वाचा संस्कार, दोन जीवांचं मिलन, वंशवृद्धीचा राजमार्ग वगैरे वगैरे. चंद्राचा चंद्रीमा, शुक्राची चांदणी, प्रवाहाचा पतितपणा, आकाशाची गहिराई, सागराची निळाई, गरुडाची झेप, सिंहाचा वाटा इत्यादी विषयांइतकाच घासलेला आणि तरीही अजिबात गुळगुळीत न झालेला विषय. जगातले सर्व पुरुष यावर भरभरून लिहू शकतात आणि सर्व स्त्रीया यावर भरभरून बोलू शकतात. कारण, या विषयावर काही उघडपणे बोलणे पुरुषांना शक्य नाही, आणि काहीच्याबाही लिहून पुरावे निर्माण करण्याचा गाढवपणा बायका करत नाहीत. एकूणच अशा या जागतिक पातळीवरील एका अतिसंवेदनशील विषयाला डिवचण्याचं धाडस या लेखणीने आज केले आहे. उद्या याच प्रमादाबद्दल हीच लेखणी बंबातदेखील जाऊ शकते याची तींस काय कल्पना? असो! नमनालाच मोजून सात घडे तेल गेले आहे.

तर, पूर्वी या लग्न नावाच्या संस्थेची स्थापना वरपिता आणि वधुपिता हे दोन संस्थापक करीत असत. आपापला बाब्या आणि बेबी यांना या संस्थेचे आजीवन सभासद बनवले जात असे. अध्यक्षस्थानी बाब्याला बसवून चिटणीस आणि खजिनदार अशा दोन्ही जिम्मेवाऱ्या बेबीवर सोपवून हे दोन्ही संस्थापक मजा बघत असत. बाकी समस्त इंटरेस्टेड मंडळी ही एखाद्या वाचनालयाच्या मेम्बरांप्रमाणे दैनिक, साप्ताहिक, पाक्षिक, मासिक,  वार्षिक, नित्य आणि नैमित्यिक हजेरी लावीत. कधी विंगेतून, कधी पिटातून, कधी छतातून  एंट्र्या करणाऱ्या हौशी कलाकारांइतकाच या मंडळींचा उत्साह दांडगा असे. असे हे संस्थापक आणि मेंबर मंडळी एकत्र येऊन आपसात खलबतं करून नवऱ्यामुलाची सगळी शस्त्रं नवऱ्यामुलीकडे सुपूर्त करून त्यांना जीवनाच्या वगैरे समरात वगैरे झुंजायला वगैरे पाठवून वगैरे देत वगैरे असत. असा हा 'करी शस्त्रं ना धरीं , सांगेन गोष्टी युक्तीच्या चार' पुरता उरलेला तो नवरा आणि त्याची सगळी शस्त्रं परजून सर्वशक्तीनिशी उभी ठाकलेली ती अष्टभुजा नारायणी नवरी असे दोघेजण बोहल्यापर्यंत पोहोचत. त्यानंतर होणारा सामूहिक 'सावधान' चा गजर. संपूर्ण जगाला 'अखंड सावध' राहायला सांगणारे आणि दासबोधासारखा सांसारिक कर्मयोग शिकवणारे समर्थ रामदास हे याच 'सावधान' पश्चात बोहल्यावरून गायब झाले होते, यातूनच या सावधानाची माहिती लक्षात येते. विशेष म्हणजे या 'सावधान' नंतर पुन्हा अजिबात 'विश्राम' ना होता कायम परेड करावी लागते हे कुणीही आधी सांगत नसे.

काळ बदलला, वेळ टळली, आणि विवाह नावाच्या संस्थेच्या स्थापनाप्रक्रियेत सूक्ष्म बदल घडून आले. आता यातले  भिडू लोक आधीच एकेमेकांना भेटून, बोलून, जोखून घेतात. जमलं, पटलं, झेपलं, तर दोन्ही चाकांचा सांधा जुळतो. वरपिता, वधुपिता या 'मानद' खुर्च्या आहेत, बाकी इंटरेस्टेड मंडळाची गिनती सेम आहे अजून. पूर्वी लग्न करून पाहत असत, आता पाहून लग्न करतात एव्हढाच काय तो फरक. याउपर या संस्थेच्या कारभारात काहीही फरक नाही.

विवाहप्रसंगी मंगल सनई वाजायला लागते, 'सावधान'चे गजर टिपेला पोहोचू लागतात, अक्षता डोक्यावर पडतात. काही सव्यसाची मित्रांमुळे त्याच अक्षता डोळ्यात, कानात, नाकात, झब्ब्यात आणि जाकिटाच्या खिश्यातदेखील पडतात, त्याला इलाज नाही. आमच्या मातु:श्री म्हणतात त्याप्रमाणे त्या लग्नकलशातल्या पाण्यात खरंच काहीतरी जादू असावी. ते पाणी डोक्यावर पडलं कि नवरदेवातला सगळा दैवीपणा ओसरून त्याचा अक्षरशः नवरा होतो, आणि त्या अंतरपाटापलीकडल्या अष्टभुजेची ताकद अमाप वाढते.

लग्नाच्या मंगलाष्टका जर नीट पहिल्या तर त्यातलं व्यवहारी सावधपण आणि छुपे संदेश जिज्ञासूंना दिसून येतील. सुरुवात होते ती गणेशवंदनेने! 'स्वस्तिश्रि गणनायकं गजमुखं' म्हणत आद्यदेवांना बोलावून घेतात. ते उभे नवऱ्यामुलाकडून. त्यानंतर गंगा, सिंधू, सरस्वती, यमुना, गोदावरी, नर्मदा, कावेरी, शरयू, महेंद्रतनया, चर्मण्वती, वेदिका, क्षिप्रा, वेदवती, महासुरनदी, गंडकी, पूर्णा या मिळून साऱ्याजणी नवऱ्यामुलीकडून. इथेच नारीशक्तीची वाढलेली संख्या आणि ताकद चाणाक्ष नजरेला दिसून येते.  मग कुण्या रुक्मि राजाच्या रुक्मिणीनामे सुविद्य कन्येस श्रीकृष्ण नामक अनुरूप जोडीदार कसा मिळाला याची सुरस आणि रम्य कथा रंगवून सांगितली जाते. इथेसुद्धा जगातले सगळे लग्न झालेले पौराणिक, ऐतिहासिक, वास्तविक, काल्पनिक नवरे सोडून फक्त 'करी शस्त्रं ना धरीं' कृष्णाचंच उदाहरण पुढे केलं जातं हे (त्याच) चाणाक्ष नजरेतून सुटत नाही.

यानंतरच्या स्टेशनवर आत्या, मावशी, मामी, अशा एकापेक्षा एक गायिकांची चढाओढीने जुगलबंदी होते. त्या मैफिलीतून जाग येईपर्यंत गाडी पोहोचते ती 'तदेव लग्नं, सुदिनं तदेव' पाशी. हे फार्फार महत्वाचं आहे. "आज तुझे लग्न आहे मित्रा, याहून उच्च सुदिन तुझिया आयुष्यास शक्य नाही. तरी वत्सा, तुजप्रत कल्याण असो" असा संदेश स्वतः आद्यदेव नवरदेवाच्या कानात सांगून त्याचा उत्साह वाढवताना (पुन्हा त्याच) जाणकार नजरेने पहिले आहेत. आणि "आज तुझे लग्न आहे देवी, यापुढील सगळे दिवस तुझेच सुदिन, आजपासून सुरुवात" हे सगळ्या सरिता आपल्या नवरीस सांगताना (तेच) दिव्यचक्षु बघत असल्याचा दिव्य पुरावा आहे.

यापुढील ओळी या फक्त नवरदेवास उद्देशून असतात. 'ताराबलं चंद्रबलं तदेव, विद्याबलं दैवबलं तदेव', म्हणजे हे नवऱ्या, तुझे सगळे ताराबळ, चंद्रबळ, विद्याबळ, दैवबळ वापरलेस तरीदेखील या अष्टभुजेपुढे तुझी तारांबळच होणार आहे. तरी तू त्या लक्ष्मीपती विष्णूला पर्यायाने कृष्णाला शरण जा. त्याने सांगितलेला 'करी शस्त्रं ना धरीं , सांगेन गोष्टी युक्तीच्या चार' हा बाणा आत्मसात कर. बाकी संसारसागरातून तुझी नैय्या पार नेण्यास तुझी अष्टभुजा, जी सध्या तुझ्यासमोर सात्विक उभी आहे, ती सदैव तुझ्या पाठीशी राहो. इतका सगळा उपदेश स्वतः आद्यदेव नवरदेवास करतात आणि त्याला बायकोहाती सोपवून पुढल्या लग्नास प्रस्थान करतात. आद्यदेवांचं काम लग्नसराईत फार वाढतं, त्याला ते तरी काय करणार. ऑफिसात बॉस आणि घरी दोन-दोन बायका यात त्यांचादेखील पिट्टा पडतो. असो.

आणि मग, एखाद्या उस्फुर्त रणभेदी गर्जनेप्रमाणे सर्व उपस्थित समुदाय एकच 'सावधान' ची ललकारी देतो. त्यामुळे नवरदेवास अचानक, तोफा होईतो खिंड लढविणारा बाजीप्रभू देशपांडा, दोन तलवारीं घेऊन पेटलेला मुरारबाजी, लाखोंच्या सैन्याला भिडलेले प्रतापराव, बुराडीच्या घाटावरचा दत्ताजी, पानपतात सूर्यमंडळ भेदून चाललेला सदाशिवरावभाऊ, असे अनेक पराक्रमी वीर पूर्वज दिसू लागतात. नसा नसा पेटून उठतात, वीरश्री खुणावू लागते, आत्ताक्षणी घोड्याला टाच मारून गनिमांचा खुर्दा करायची उर्मी  दाटून येते. पण हे तेव्हढ्यापुरतंच! दोन्ही बाजूस 'अखंड सावध' उभे ठाकलेले मामा लोक संसारनाटकाचा पडदा उघडतात, आणि नवरी मुलगी नवरदेवास 'वेलकम टू ब्याटलफिल्ड, आता जीत आपलीच असा' असा हार घालते. नवरदेवही तिला 'देवी, मी तुला शरण आलो आहे' अशा विनम्र आविर्भावात हार घालतो. अशा तऱ्हेने वैजयंतीहार घातलेला तो नरनारायण आणि त्याची ती सौम्यमुद्रा अष्टभुजा नारायणी समस्त उपस्थितवर्गाला कृतकृत्य करून टाकण्यासाठी लक्ष्मी-नारायणाचा जोडा बनून सज्ज होतात.

यानंतर नव्याचे नऊ दिवस येतात, जातात. खरा संसार सुरु होतो, तो प्रत्येकाने आपापला बघावा, बायकोवर सोपवून सुखी करावा. आपली सौम्यमुद्रा अष्टभुजा नारायणी आपला संसार सुखी करतेच. तिच्याशी पंगे घेऊ नयेत अन्यथा आपला "महिषासुर होण्यास वेळ लागत नाही", असे संसार या विषयातले जाणकार सांगतात. खरे-खोटे देवाक ठाऊक.

अशाप्रकारे जाणकार आणि संशोधक यांजकडून माहीती संकलित करून जमवलेल्या या प्रास्ताविक लेखानंतर आता 'लग्नसंस्था, संस्कृती आणि आपण' हा विवेचनग्रंथ, 'कर्मयोग आणि लग्नयोग' हा संशोधनलेख उर्फ थिसीस, 'लग्न, लिव्ह-इन, ब्रह्मचर्य' ही तुलनात्मक लेखमाला, 'सतराशे विघ्नं, तरीही नकटीचं लग्न' हा विनोदीकथासंग्रह आणि 'ठोंब्याच्या लग्नाच्या बोंबा' हा दीर्घ लघुकवितासंग्रह हे सगळे प्रसिद्धीसाठी रांगेत आहेत. अधिक माहितीसाठी जाणकार आणि जिज्ञासूंनी लिहावे/भेटावे, हि णम्र वीनंति!