पाऊस पडला की सतार आठवते. कुठे वाजली तर वाजली, नाहीतर मनातल्या मनातच सूर घुमायला लागतात, आणि मग ते सतारीचे साधे सूरसुद्धा जीवघेणे होऊ जातात. अशावेळी सतारीमध्ये कुणालातरी मनापासून बोलावण्याची एक आर्तता जाणवते.
तसं पहाटेच्या गारव्यात बासरी ऐकू येते, सभोवतालचं धुकं त्या सुरांमध्ये अजूनच दाट होतं, आणि आपल्याला लपेटून टाकतं. वातावरणाला एक गूढरम्य पडदा येतो. त्या अतर्क्य धुक्याप्रमाणेच गूढ बासरी घुमवणाऱ्या कृष्णाच्या मुरलीचे सूर मनात पिंगा घालायला लागतात. मन पिसासारखं हलकं होऊन धुक्यात विरून जाऊ पाहतं, आणि वास्तव पाय ओढत राहतं. असे क्षण हाती लागणं म्हणजे भाग्यच!
संध्याकाळच्या वेळी वाजलेल्या सारंगीचे सूर काळीज चिरत जातात. त्याची तुलना कशाशीच होत नाही. जुन्या मुरलेल्या जखमांवरच्या खपल्या निघतात, जीव नकोनकोसा होऊन जातो. या जखमा लपवाव्यात कशा, आणि दाखवाव्यात कुणाला, कळेनासे होते. या वेळेला कातरवेळ का म्हणतात हे त्या वेळी सारंगी ऐकल्याशिवाय नाही समजणार. आपले आपणच आपल्या विद्ध मनाशी गप्पा करायची ही वेळ.
रात्री उशिरा चार “समानशीले व्यसनेशु सख्यं” मैत्र घेऊन पेटीचे सूर आळवत एखाद्या मित्राच्या गायकीचा आस्वाद घ्यायचा असतो. तिथे पेटीच असते, ते सूर तुम्हाला अत्यानंदापासून ते पार व्याकुळ होण्यापर्यंत आणतात. आणि पेटीच्या सुरांची गंमतच वेगळी आहे. ते स्वत: इतके ताकदवान असतात की अजून काही चवीलादेखील लागत नाही. पण त्याच सुरांत शब्द मिसळले की ती कुण्या एका कवीची कल्पना सुरांचं लेणं लेवून येते, की भलेभले सगळंसगळं विसरून तल्लीन होऊन जातात.
आज असाच बेमतलबी पाऊस पडला, दुपारीच वाटा धुकट झाल्या, अलेक्सावर थोडी सतार वाजली, मग मंगेशकरांच्या लताबाईंनी त्यात “ओ सजना, बरखा बहार आयी “ म्हणत आपले सूर मिसळले आणि एक स्वर्गीय धुंद धुंद वातावरण सगळीकडे पसरून राहिलं..
- समीर
(१५/०९/२०२५)