एकदा काय झालं,
पारावरच्या वडाला आली प्लॅस्टिकची वांगी
केळीच्या झाडाला फुटले आंब्याचे घोस
ताडाच्या झाडाला लागली शेकडो शहाळी
तर मग घे शिडी, उतरव शहाळी आणि ढोस
एकदा काय झालं,
कुत्रं गेलं जंगलात तर हत्ती घाबरून पळाला
हरणाच्या डरकाळीने बिबट्या बिळात लपला
खुंखार उंदरानं केली ढाण्या वाघाची शिकार
जंगल झालं त्याचं, अन् अस्वलावर माशा स्वार
एकदा काय झालं
नवरा उठला पहाटे आणि घर घेतलं झाडून
पोरं दिली आवरून आणि शाळेत दिली धाडून
चहा केला, ओटा स्वच्छ, स्वयंपाक केला रांधून
बायकोला पत्त्याच नाही, ती राहिली झोपून
एकदा काय झालं
नेते झाले सरळमार्गी, मंत्री प्रामाणिक झाले
कार्यकर्ते झाले डांबरट आणि लोक चतुर झाले
मंत्र्यांची सिक्युरिटी आणि ताफा बंद झाला
मग पोलिसांना ड्यूटी करायला पुरेसा वेळ मिळाला
एकदा काय झालं
मास्तर झाले चलाख आणि गाव झाला मंद
क्लास झाले थोर आणि शाळा झाल्या बंद
पालक झाले येडे आणि एंट्रन्सचा नुसता थाट
पोरं गेली वाया आणि कॉलेजात भरले माठ
एकदा काय झालं
स्वप्न झाली खरी आणि खऱ्याचं झालं स्वप्न
दिवस झाला की रात्र ते अजाबात कळेना
काय ते एकदाचं व्हायचं होतं ते झालं
की नाहीच झालं काही, ते काही उमजेना
एकदा काय झालं
कवी झाला खंप्लिट म्याड, लिहायला गेला एक
लिहिलं काही भलतंच आणि लोकांना बेदम आवडलं
कवी म्हणाला च्यामारी, लोकांची टेस्टच बदलली राव
आता वड्याबरोबर पुरी आणि भेंडीसोबत पाव
एकदा काय झालं
जे काय व्हायचं होतं ते काही झालंच नाही
रात्रीच्या अंधाराला काडी कोणी लावलीच नाही
उद्या आहे उगवायचा अजून, सोंगंच फार रात्रीची
कवी बंद पडतोय, वेळ झाली आता त्याच्या झोपेची
समीर
२१/०६/२०२६