Saturday, October 4, 2025

फूल

परवा एका मैत्रिणीने प्राजक्ताचा सडा पडलेला फोटो काढून पाठवला (पहा: फोटो) आणि चॅलेंज देऊन म्हणाली, यावर लिही काहीतरी. मग आपण पण म्हणालो, एक और कविता/स्फुट/ललित वगैरे वगैरे. त्यामुळे खालचा डिस्क्लेमर महत्वाचा असतोय!

डिस्क्लेमर: हे जे काय आहे, ते आवडलं तर अर्थातच माझं क्रेडिट, नाहीच आवडलं तर रश्मी जोशी-मेहेंदळे या मुलीला जबाबदार समजण्यात यावे. 




प्राजक्ताच्या फुलाने एक दिवस डिक्लेअरच केलं: I am a fool

आणि लोळण घेतली जमिनीवर 

पडल्यापडल्या बाजूच्या फुलाला विचारलं: 

Are you a fool too?


नक्की काय झालं तुला लोळायला 

कामं खूप झाली आणि झेपेना काही म्हणून

की अजिबात काम नाही आणि 

आयुष्य नुसतंच फुंकून चाललंय म्हणून 


आपल्याला जरासुद्धा ऊन-पाऊस-वारा झेपत नाही 

म्हणून फ्रस्ट्रेशन आलंय 

की आपला देखणेपणा, पहाट, दवबिंदू वगैरेमुळे 

आकाशाला हात टेकले असं वाटतंय?


मेंदूत नक्की काय बिघाड झाल्यावर 

अशी लोळण घ्यायची इच्छा होते 

आणि सुखासुखी देठाला सोडून 

धरित्रीकडे धाव घ्यावीशी वाटते 


जे चालू आहे ते सोडून वेगळंच करायचं कशाला 

चालत्या गाडीला पाना लावायचा कशाला 

आणि ही जमिनीवर लोळायची रिस्क का घ्यावी 

शक्य ते सोडून अशक्याकडे झेप का घ्यावी 


किती चान्स आहे एखाद्या देवघरापर्यंत पोहोचण्याचा 

देवाच्या पायी शेवटचा दीस गोड करायचा 

किंवा एखाद्या मालिनीच्या केसात माळण्याचा 

नाजूकपणावर सौंदर्याचा शिक्का ठसवायचा 


इतके प्रश्न ऐकून बाजूच्या फुलाला झीटच आली 

हा असला विचार त्याला शिवलासुद्धा नव्हता 

इथला मुक्काम उरकला की जमिनीवर 

असा त्याचा साधा सरळ हिशोब होता

 

त्याचा चेहरा पाहून ते विचारवंत फुल म्हणालं 

मी एक फूल, तू पण फूल, आणि हे वाचूनसुद्धा 

ही प्राजक्ताच्या फुलाची गोष्ट असेल 

असं समजणारे सगळ्यात मोठठे फूल 

असो!


- समीर (०२/१०/२०२५ - दसरा)

Sunday, September 14, 2025

पावसाचे स्वर

 

पाऊस पडला की सतार आठवते. कुठे वाजली तर वाजली, नाहीतर मनातल्या मनातच सूर घुमायला लागतात, आणि मग ते सतारीचे साधे सूरसुद्धा जीवघेणे होऊ जातात. अशावेळी सतारीमध्ये कुणालातरी मनापासून बोलावण्याची एक आर्तता जाणवते.

तसं पहाटेच्या गारव्यात बासरी ऐकू येते, सभोवतालचं धुकं त्या सुरांमध्ये अजूनच दाट होतं, आणि आपल्याला लपेटून टाकतं. वातावरणाला एक गूढरम्य पडदा येतो. त्या अतर्क्य धुक्याप्रमाणेच गूढ बासरी घुमवणाऱ्या कृष्णाच्या मुरलीचे सूर मनात पिंगा घालायला लागतात. मन पिसासारखं हलकं होऊन धुक्यात विरून जाऊ पाहतं, आणि वास्तव पाय ओढत राहतं. असे क्षण हाती लागणं म्हणजे भाग्यच!
 
संध्याकाळच्या वेळी वाजलेल्या सारंगीचे सूर काळीज चिरत जातात. त्याची तुलना कशाशीच होत नाही. जुन्या मुरलेल्या जखमांवरच्या खपल्या निघतात, जीव नकोनकोसा होऊन जातो. या जखमा लपवाव्यात कशा, आणि दाखवाव्यात कुणाला, कळेनासे होते. या वेळेला कातरवेळ का म्हणतात हे त्या वेळी सारंगी ऐकल्याशिवाय नाही समजणार. आपले आपणच आपल्या विद्ध मनाशी गप्पा करायची ही वेळ.

रात्री उशिरा चार “समानशीले व्यसनेशु सख्यं” मैत्र घेऊन पेटीचे सूर आळवत एखाद्या मित्राच्या गायकीचा आस्वाद घ्यायचा असतो. तिथे पेटीच असते, ते सूर तुम्हाला अत्यानंदापासून ते पार व्याकुळ होण्यापर्यंत आणतात. आणि पेटीच्या सुरांची गंमतच वेगळी आहे. ते स्वत: इतके ताकदवान असतात की अजून काही चवीलादेखील लागत नाही. पण त्याच सुरांत शब्द मिसळले की ती कुण्या एका कवीची कल्पना सुरांचं लेणं लेवून येते, की भलेभले सगळंसगळं विसरून तल्लीन होऊन जातात.

आज असाच बेमतलबी पाऊस पडला, दुपारीच वाटा धुकट झाल्या, अलेक्सावर थोडी सतार वाजली, मग मंगेशकरांच्या लताबाईंनी त्यात “ओ सजना, बरखा बहार आयी “ म्हणत आपले सूर मिसळले आणि एक स्वर्गीय धुंद धुंद वातावरण सगळीकडे पसरून राहिलं..

- समीर 
(१५/०९/२०२५)

Wednesday, May 21, 2025

युद्ध

 

जेव्हा दोन देशांत युद्ध होतं 
नागरिक घरी बसून करतात 
आकांडतांडव 
शत्रूला धडा शिकवलाच पाहिजे, 
आपण जिंकलोच पाहिजे 

आणि हवाई हल्ल्याचा सायरन वाजला 
की हेच शूर नागरिक बसतात 
आपापल्या बिळात लपून 
दिवे घालवून, प्रार्थना करत 
स्वतःसाठी, पोरांबाळांसाठी 

पण जेव्हा दोन देशांत युद्ध होतं 
तेव्हा सैनिक असतात उभे 
सीमेवर ठाम 
गोळ्यांच्या वर्षावात 
शत्रूच्या जीवघेण्या हल्ल्यात 

तिथे हल्ल्याचे सायरन वाजत नाहीत 
वाजतात दूरवर तोफा 
आणि गोळे बरसतात, जणू अग्निप्रलय
सैनिक आसरा घेतात फॉक्सहोल्सचा 
आडव्या टाकलेल्या झाडांचा आणि 
तात्पुरत्या उभारलेल्या पोत्यांच्या भिंतींचा 

जमिनीत, झाडोऱ्यात त्या भीषण तांडवात 
सैनिक उभा असतो प्राण जाईपर्यंत 
त्याची बंदूक आग ओकत असते 
त्याचे डोळे, त्याचा प्राण पेटलेला असतो 
पण त्याच्या मूक प्रार्थनेत असतो 
त्याचा देश आणि त्याचे सहकारी 


जेव्हा दोन देशांत युद्ध होतं 
तेव्हा सैनिक लपून बसत नाहीत, 
ते सामना करतात शत्रूच्या लोंढ्याचा 
लढतात प्राणपणाने भ्याड नागरिकांसाठी
आणि देह ठेवतात मातृभूमीसाठी 


मरेपर्यंत आठवणसुद्धा येत नाही 
त्यांना कुटुंबियांची 
शेवटच्या क्षणी मात्र असतो 
एखादा फोटो हातात 
किंवा एक बारीकशी कळ काळजात 
ती वेदनाच घेऊन जाते त्यांना 
पलीकडे 


जेव्हा सीमेवर सैनिक शहीद होतात 
काहींचे मृतदेह पाठवले जातात 
अंत्यसंस्कारांसाठी 
काही सैनिक मात्र राहतात मागेच 
अनाम बनून, हरवून जातात 
सीमेवरच्या जमिनीत, झाडोऱ्यात 


राहतात त्या त्यांच्या आठवणी 
त्यांच्या कुटुंबासोबत 
कारण त्यांच्याच देशाचे शूर नागरिक 
दुसऱ्याच दिवशी विसरलेले असतात 
त्यांचं हौतात्म्य 
सैनिकांची कुटुंबं उध्वस्त होतात आणि 
नागरिक रमतात त्यांच्या विलासात 


पुन्हा काही वर्षांत 
जेव्हा त्याच दोन देशांत युद्ध होतं 
त्याच सीमा पुन्हा पेटून उठतात 
गोळे आणि गोळ्या अजून भीषण होतात 
अजून सैनिक मरतात शूरपणे 
मातृभूमीसाठी आणि तिथल्या 
भ्याड नागरिकांसाठी


काही पोहोचतात अंत्यसंस्कारांपर्यंत 
काही सैनिक मात्र पुन्हा राहतात मागेच 
अनाम बनून, हरवून जातात 
सीमेवरच्या जमिनीत, झाडोऱ्यात 
आधीचे अनाम सैनिक असतात तिथेच 
त्यांना समजून घेण्यासाठी 
त्यांना एकटं वाटू नये म्हणून 


दरवेळी जेव्हा दोन देशांत युद्ध होतं 
नागरिक पेटतात, विझतात 
सैनिक मात्र चुकवत राहतात 
देणं मातृभूमीचं 
आणि अनाम सैनिकांची भरती 
होतंच राहते 
सीमेवरच्या जमिनीत, झाडोऱ्यात 

- समीर (२२/०५/२०२५)

Thursday, January 9, 2025

कीप इन टच

आपला एक दोस्त आहे, एकदम घष्टन म्हणावा असा 

प्रचंड हुशार आहे, बोलका आहे, दिसायला बरा वगैरे 

त्याच्या हुशारीवर आणि कर्तृत्वावर आपल्यालाच अभिमान वाटावा असा 

त्याच्यातले कलागुण, त्याचे छंद वाखाणण्याजोगे असे 

एकूणच पॅकेज म्हणता येईल असा मित्र 


आपणही त्याचेच मित्र, म्हणजे आपलंही कर्तृत्व महानच म्हणायचं 

असल्या हरहुन्नरी मित्राची बरोबरी करायची म्हणजे मोठंच काम 

नुसती जुगलबंदी सुरू -गप्पा, गाणी, जागरणं करायची, 

बाता मारायची, खायची-प्यायची आणि मोठाले ढेकर द्यायचीसुद्धा 


देव एखाद्याला सगळंच कसं काय देतो बुवा, 

असं वाटायला लावणारा मित्र आणि त्याची मैत्री 

पण काहीतरी द्यायचं राहून गेलंय देवाचंसुद्धा 

सगळं देऊन देव ही अक्कल वाटायला कसा विसरला असेल


ते काहीतरी म्हणजे ‘स्वतःहून इतर मित्रांच्या टचमध्ये राहणे’

आमच्या मित्राला ते मात्र काही केल्या जमत नाही 

दुनियेचे प्रॉब्लेम चुटकीसरशी सोडवणारा हा हुशारोत्तम 

स्वतःचा चुटकीएवढा प्रॉब्लेम सोडवू शकत नाही 


विसरून जातो म्हणावं तर तसं काही नाही 

फ़ोन केल्यावर काय बोलायचं याचा कधीच प्रश्न पडत नाही 

आपण मेसेज केला तर हे भलेमोठठे रिप्लाय करतो 

मग गाडी कुठे ब्रेकडाउन होते याची तेच कळत नाही 


देव अक्कल वाटत होता तेव्हा 

हा सुद्धा चाळणी घेऊनच गेला असेल 

त्या चाळणीच्या बारीक जाळीतून 

‘काँटॅक्ट ठेवणे’ गुण गळून पडला असेल 


मग अशा महात्म्याचं काय करावं हा प्रश्न पडतो कधीकधी 

मग मीच म्हणतो, जाऊ दे, कसाही असला तरी आपलाच मित्र आहे 

मग आपणच त्याला मेसेज करतो, आणि सुरुवातच ‘श्लोकांनी’ करतो 

मग त्याचा पण लगेच फोन येतो, आणि तासनतास गप्पा मारतो 


असो, या जन्मी ‘कीप इन टच‘ चं काम आपल्याकडे आहे 

औटॉफ्टच रहायचा हक्क त्याच्याकडे राखीव आहे 

या वेळी आपण काम करून टाकू, पुढल्या वेळी माज करू 

पण आपल्याला हे जमणार पण नाही बहुतेक 


असा एखादा दोस्त तुमचा पण आहे का, 

नाव न सांगता, नावं न ठेवता तुम्ही सांगू शकता का 

की तुम्हीच ते दोस्त आहात आणि 

तुम्हाला झन्न जागं व्हायची गरज आहे का 


भेटा/लिहा/बोला, पण टच मध्ये रहा 

सगळ्या दोस्तांना खुशाली कळवत रहा 

न जाणो कुणालातरी तुमच्या फोनची गरज असेल 

न जाणो तुम्हाला कुण्या मित्राची हाक हवी असेल


-समीर 

०९/०१/२०२५