Thursday, August 18, 2011

धिक्कार हो!


अनेक दिवस आणि महिन्यांनी कशीबशी  ही एक कविता सुचते हो! हल्ली लिहिणं फार far away झालंय! पाचशे ओळी एका वेळी मनात नाचत असतात पण त्याच वेळी grocery आणायला जावं लागतं, वातावरण नीट रहावं म्हणून काही बोलून दाखवावं लागतं...इत्यादि इत्यादि....आपल्याला सगळ्यांना 'एक खिडकी योजना' आवडते ना, तर आपलं आयुष्यही तसंच झालं आहे असं वाटतं..आपण सगळे एक silent obedient consent देऊन बसलो आहोत आणि कुणी कुणाच्या फारसं वाटेला न जाता, फार प्रश्न न विचारता आपलं जे काही असेल ते पुढे चालू ठेवत आहोत......खूप मानवशास्त्रज्ञांच्या मते १९५० नंतरचा काळ हा संपूर्ण पृथ्वीवरच्या आत्तापर्यंतच्या मानवी कालखंडातला 'सगळ्यात शांतततापूर्ण काळ' आहे...आणि 'शांतीत क्रांती' म्हणजे चोरून वडे खाण्यासारखं आहे. बाहेरून दिसणार्‍या शांततेतही खूप गदारोळ आहे. हे झालं बाहेरचं... माझ्या स्वतःत पाहिलं तर आपण कुठे चाललो आहे ह्याचं भान नसलेली व्यक्ती आणि क्रियाहीनता दिसते. तर काही नाही, तर फार न लिहीता ही नवीन कविता...

धिक्कार हो!
धिक्कार हो तुझ्या जिण्याचा
धिक्कार हो तुझ्या जिण्याचा
तू एक पणती मिणमिणती
भिकार ते दिवाळीतले फटाके
जे ऊजळती राहून तुझ्या संगती
भावना तुझ्या बुळबुळीत अश्रू
लेखणी सुतकी रडू लागली
वासना तुझ्या विनोदी झुरळ ते
वहाणही कच खाऊ लागली
जोहार हे जगणे तुझे अन
न मागताच तू मुंडके दिले
सशाचे फुकाचे हृदय तुझे अन
ढगाने मदाने हसूं पाहिले
पाटच्या पाण्यातसुद्धा
रंग तुजला दिसला खूनाचा
वारही तूच केलेस अन
खर्चही मागशी आता वेदनांचा
प्रेम जे केलेस तेही
चोरट्यांना भरपूर दिसले
मद्य जे प्यालेस तेही
शंभरांना आधीच प्याले
प्रार्थना जशी तुझी ती
भज्यांवरची माशीच की
कंटाळूनी तो हाकली देवही
शिळे लपविण्या त्यासही यत्न की
अंगारे धुपारे दुपारी सुपारी
फोटोतही दिवा तूच लावला
विजांच्या कडाक्यातही त्या
अंधारही तूच की कमावला
का उगाच्या फुशारक्या अन
काय तू दिलेस ह्या धरेला
का म्हणशी सूर्यास ह्या आंधळा
ग्रहण जे लागले तुझ्या डोळा
सावकारी हा रथ निघाला
तू बैलजोडी ही कोडगी
आसूडांचा पाऊस पडला
का साहसी सर्व हे, फोड की
धिक्कार हो तुझ्या जिण्याचा
तू एक पणती मिणमिणती
अंतरिक्षात सुस्नात बालक तुझे अन
का दाबशी घशात स्वतःच्या माती ?

Friday, August 12, 2011

राजसा निजलास का रे..?

चौथीला स्कॉलरशिपला बसवणार आहात का मुलाला? ५ वी पासून आम्ही ह्याला वेगळ्या शाळेत घालणार आहोत. जरा लांब आहे ती. पण चांगली आहे. आई ७ वीची स्कॉलरशिप अवघड असते का ग? नाही बाळ. तू हुशार आहेस ना? तुला सोप्पी जाईल. ८ वीला परांजपे सरांचा क्लास लावायचाय अहो ह्याला! आता रोज इतक्या लांब सायकल मारत जाणार का हा? जाऊ देत ग, त्याचे सगळे मित्र तिथेच जाणार आहेत म्हणतोय ना..नववी ही दहावीपेक्षा अवघड असते बरं.. आता स्पर्धा काय फक्त शाळेतल्याच मुलांशी नाही.. बोर्डात आलं की आयुष्याची दिशाच बदलते... आर्ट्स साईडला पुढे काय असतं? काहीच नसतं! अरे तू हुशार आहेस ना? हुशार मुलं Science च घेतात. ११ वीत timepass करून career चा बट्ट्याबोळ करून घेतलेल्या मुलांची भरपूर उदाहरणं आहेत.. हे बघ. नीट ऐक. हे वय पाय घसरायचं असतं. या वयात प्रेमात वगैरे पडू नकोस. त्यासाठी अख्खं आयुष्य पडलंय. या वयात मुलांनी मनापासून अभ्यास केला पाहिजे.. हेच तर घडायचे दिवस असतात.. १२ वी बोर्ड आणि दहावी बोर्ड यात जमीन अस्मानाचा फरक आहे... अभिनंदन! बोल. मग काय ठरवलंयस? Engineering का Medical?... मी..? माझं ठरत नाहीये.. कळत नाहीये.. तुला Physics आवडतं का Biology? काहीच नाही.. बरं, मग तुला Maths आवडतं का Bio? Umm.. Maths. म्हणजे Engineering... ए माझं ठरलं रे. Engineering. मी लहानपणीच ठरवलं होतं. मला Computer Engineer व्हायचंय म्हणून. Computer का?.. मला लहानपणापासून Computer ची आवड आहे. माझ्या बाबांचा आहे ना आमच्या घरी. आणि मी आता सुट्टीत एक course पण करणार आहे. आणि सध्या भयंकर scope आहे अरे. माझ्या चुलत भावाला तर ३ कंपन्यांनी offer दिली होती.. MS करावं, MBA करावं की MTech? GRE चे words पाठ झाले का? कुठे कुठे apply करतोयस? मी त्या बँकेचं लोन घेणार आहे. Interest rate सगळ्यात कमी आहे. इकडची education system कसली चांगली आहे ना? Job मिळाला का रे? खूप apply केलंय.. मला आश्चर्य वाटतं की अमेरिकेतही ओळखीने नोकऱ्या मिळतात. आता कमावतोयस तर मार एकदा आमच्या west cost ला ट्रीप! हा..काका काय म्हणताय? काय अमेरिकन..तुम्ही आता तिकडचेच झालात की.. इकडे यायचा विचार आहे की आता तिकडेच..? नाही नाही. असं कसं. येणार ना भारतात.. Frankly speaking, all I am looking for is the results. That's the bottom line. Come on..You know you are intelligent. You are smart. All you have to do is to put little extra bit of efforts.. You are young. You should be more efficient than me!..काय म्हणतेस आई? अरे किती दिवसांनी बोलतोयस..busy असतोस का? बर मी काय म्हणते, आपल्याला तुझ्या लग्नाचं बघायला हवं आता. तू काही ठरवलंयस का तिकडे? नाही आई.. नक्की नाही? नाही. म्हणजे अशी कोणी मिळालीच नाही. ठीक आहे मग आम्ही बघायला लागतो. तुझी काय स्वप्नं आहेत? मला काही वर्ष job करून भारतात यायचंच. Great! आणि तुझी? मलाही काही वर्षे अमेरिकेत राहायला आवडेल. Independent. नंतर सासरच्या लोकांबरोबर राहायचं असतंच.. तुम्ही दोघेही आता तिशीचे झालायत.. तुम्ही family planning करताय की नाही..? हे बघ, योग्य वेळेत सगळं झालं पाहिजे.. हो आई..एक heavy प्रोजेक्ट चालू आहे..promotion चे chances आहेत.. मग आम्ही...



आज मला इतक्या सकाळी का जाग आलीय? किती वाजलेत? ४?! सूर्योदयापूर्वी बाहेर कसं असतं बघून तरी येऊ..बोचरी थंडी आहे..काय सुंदर दिसतीय बाग..धुक्यात. एक मिनिट! माझ्या घरामागे अशी बाग नाहीये.. हे तर माझं आजोळ आहे. मी स्वप्नात आहे का? झाडं अजून झोपेत आहेत.. पानापानातून झोप ओघळतीय खाली.. ह्या कळ्या तर आज उमलतील.. त्यांच्या आयुष्याचा पाहिला दिवस!.. हा प्रेमळ गारवा फक्त पहाटेच पाडतो का? कसे सगळे शांत झोपलेत.. जागा आहे तो फक्त मी आणि ही थंडी. म्हणजे कोणीतरी आहे माझ्या सोबतीला.. मी चप्पल काढावी.. हा... पायरीची फरशी कसली गार पडलीय... इथंच उभं राहावं. हा पायाखालचा गारवा कधी जाऊच नये.. अहाहा.. जग थांबलय असंच वाटतंय. at least वेळ खूप हळू पुढे सरकतीय.. आईनस्टाईन चा काहीतरी प्रमेय आहे ना यावर? आज पहिल्यांदा असं झालंय की मी सोडून बाकी सगळे सजीव झोपलेत. अगदी झाडंसुद्धा.. ती लाडकी मोगऱ्याची फुलंसुद्धा.. त्यामुळेच मला इतकं शांत वाटतंय.. सजीवांचासुद्धा गलका होतो.. मेंदू न चुकता अगदी रोज ठणकतो.. आणि आयुष्यात आपण रोज गुंतत जातो.. समोरची व्यक्ती कोणतीही असू देत.. आई..बायको..Boss..मित्र..काका..मामा.. किंवा आपल्याला ज्याचा सगळ्यात जास्त राग येतो असा तो... मी शेजारी नाही म्हटल्यावर हिला जाग तर आली नसेल..? आणि ती आपल्या मागे उभी तर नसेल..? नाहीये.. मला अजून थोडयावेळ एकांत हवाय.. हे स्वप्न असेल तरीही..please मला कोणी स्वप्नातून उठवू नका.. हा आलाच बघ सूर्य. ए अरे..कशाला पाडतोयस किरणं तुझी? बघ उठायला लागले सगळे.. चिमण्या ओरडायला लागल्या.. झाडं जागी होतायत.. नको ना... त्या समोरच्या मोगऱ्याचा देखील मला राग येतोय आता.. म्हणजे मी त्याच्यावर मनापासून प्रेम केलंच नाही का?... मी जातो आत.. दिवस उजाडायच्या आत मला थोडा वेळ झोपायचंय.. परत तेच सगळं सुरु व्हायच्या आत मला थोडावेळ झोपायचंय... नेमकी आत्ताच बाथरूमला लागायची होती..?

झोपेत सगळा गुंता सुटत असतो.पुन्हा गुंता होण्यासाठी..

Wednesday, February 23, 2011

चरित्र-मंथन


चरित्र-मंथन

खूप गोंधळ चालू आहे सध्या...खासगी आयुष्यातल्या गोष्टी आणि बाहेरच्या गोष्टी, दोन्ही तेवढ्याच तीव्रतेने जाणवत आहेत.....एकीकडे वरवरून दिसणाऱ्या सोयी पण आतून होणारा मनस्ताप , तर दुसरीकडून काहीच न मिळाल्यामुळे 'सगळाच आनंद'(उपरोधिक) ह्यांमुळे मनाचा दाह होतो आहे असं वाटतं. शिवाय, नको असलेलं आयुष्याचं वळण आणि त्यानुसार येणाऱ्या काळज्या-तक्रारी-जबाबदाऱ्या ह्यांच्यामुळे वैयक्तिक योजनांवर पाणी फिरल्यासारखं वाटत आहे.....अगदी ५-६ वर्षांपूर्वी वेगवान वाटणारया आयुष्याचा वेग मंदावत चालला आहे आणि त्याला मीच जबाबदार आहे असं वाटायला लागलंय....कधी-कधी फ्रेडी मर्क्युरीच्या 'बोहेमियन ऱ्हापसोडी' मध्ये एक ओळ आहे ......Sometimes I wish I was never been born at all.........तसं होतं......




चरित्र-मंथन चरित्र-मंथन 
लग्नाचे ते अरुंद भोजन
भेसळ सगळे ते रक्तचंदन
डालडा तुपात तुपकट निरांजन

चरित्र-मंथन||

विरुद्ध दिशेला क्रोधीत जीवन
विचित्र संध्या प्रेमळ अंजन
व्यर्थ सारे मृत्तिका पूजन
घनांच्या कडेला शेणसारवण


निषेध सारा प्रति-वाक्ताडन 
जगण्याचे ते सहा सोपान
प्रबोधनाचे मौलिक प्रकटन
क्रियाहीन तो भेकड सैतान



निरुंद पत्तन सुख-संमार्जन
कुचेष्ट निद्रा मधु-संगोपन
समबुद्धी सुरा-प्राशन
निर्वात घरटे दीन भजन



तुडुंब अश्रू प्रचंड विघटन
क्रंदन नव्हे गुटिका मंजन
लोभस टेंभा निखील वर्तन
अचाट मेंदू निकृष्ट संजीवन


निर्जीव प्रक्रिया पालनपोषण
दु:सह जीवन उघडे दुकान
फेकाड तंतू अरि-वृंदावन
विदीर्ण रेशीम सुधीर भलामण



विलापशोचन हे कीटक-रोदन
प्रसिद्ध-सुमंत असत्य निरुपण
नको विरुद्ध महतीचे गोडवे गायन
प्रतिभा-गुंफन हेच नवयुग गर्जन




विचारमंथन चरित्रमंथन.........


-सारंग 02/23/2011

Wednesday, February 9, 2011

आत्मविश्वास

प्रसंग आहे एका शनिवारी मी लंडनहून गावी परतत होतो तेव्हाचा. लंडनहून घरी परतताना मी नेहेमी रात्री १०:१४ ची ट्रेन पकडायचा प्रयत्न करतो, कारण या गाडीला अजिबात गर्दी नसते. तुरळक प्याशिंजर लोक आपले इथंतिथं सांडलेले असतात. आणि मोजून चार ष्टापात गाडी आमच्या ठेसनात पोहोचतेदेखील. अशी अजिबात गर्दी नसलेली गाडी पकडली की मलासुद्धा फोनाफोनी करायला आणि मोकळ्या आवाजात गप्पा हाणायला बरं पडतं!

त्या दिवशीसुद्धा माझा डबा ऑलमोस्ट मोकळाच होता, अगदीच बोटावर मोजण्याइतकी डोकी होती, दाराजवळची एक मोक्याची जागा पकडून मी बसून घेतलं, सगळं कसं मस्त जमून आलं होतं. मी लगेच फोन काढून सारंगला कॉललो आणि गफ्फा सुरु केल्या! अगदी गाडी सुटायच्या वेळी एक मुलगी शेजारी येऊन बसली.

आश्चर्य! कारण गोर्‍या ललना आपल्या शेजारी फक्त 'इतरत्र जागेचा अभाव' या एकाच कारणास्तव बसतात. वर यांचा आविर्भाव तर असा की जणू शेजारी बसून यांनी मला एकदम पवित्रच करुन टाकलाय आणि या शेजारी बसल्या नसत्या तर मी ट्रेनमधून थेट नरकातच गेलो असतो वगैरे वगैरे! आणि ही पोरगी सगळा डबा रिकामा असताना शेजारी येऊन बसली, आणि अगदी दहा वर्षांची ओळख असल्यासारखं हसली. असला ब्येक्कार धक्का बसला राव! त्या धक्क्यातच मी सारंगला सांगितलं की घरी जाऊन कॉलतो परत आणि फोन कटवला. माझा फोन बंद झाल्याचं पाहून शेजारणीच्या गप्पा चालू!

मन में आश्चर्यका एक और फटाका फुट्या! मी तर पडायचाच बाकी राहीलो होतो. कारण याआधी अशी कधी वेळच आली नव्हती, आणि या ताई तर सुंदर, गोर्‍यापान, सोनेरी केस, निळे डोळे वगैरे होत्या. आता हा नेम कसा काय चुकला याचा विचार करत मी त्या इंग्रजी हल्ल्याला माझ्या पुणेरी इंग्रजीतून जमेल तसं तोंड देऊ लागलो.

त्यानंतर पुढला पाऊण तास त्या ललनेने गावभरच्या गप्पा मारल्या. तिचं नाव 'लिझ' (बहुधा एलिझाबेथ असावं)! पेशाने एक पर्फ्युमिस्ट असलेली लिझ लंडनमधल्या एका फ्येमस पेर्फ्युम फॅक्टरीत काम करीत होती. मग गप्पा सहाजिकच अत्तर, वास वगैरे गोष्टींवर गेल्या. तिच्या कामाच्या बाबतीत ती जाम एक्सपर्ट आहे हे पुरेपूर जाणवत होतं. माझी पण उगाच बॅटींग करुन झाली होतीच, आणि पाठ केलेल्या इंग्रजी शब्दांचा साठा संपत आला होता, तेव्हढ्यात तिचं स्टेशन आलं! जायला उठली, दारापर्यंत गेली, आणि वळून हाक मारून म्हणाली, "मला जरा उतरायला मदत करतोस का?" मी अवाक! म्हणजे शेजारी बसून गप्पा वगैरे ठीक आहे, पण उतरायला मदत वगैरे जरा अतीच होतं! असल्या अनपेक्षीत सलगीच्या धक्क्यातून मी जागा होईपर्यंत तिने पर्समधून एक वॉकींग-स्टिक काढली आणि म्हणाली, "मला दिसत नाही ना, आणि प्लॅटफॉर्म आणि ट्रेनमधल्या गॅपची मला थोडी भितीच वाटते." आणि तिला प्लॅटफॉर्मवर उतरवल्यावर गप्पा मारल्याबद्दल ठांकू म्हणून गेली!

त्यानंतर मी अक्षरश: सुन्न बसून होतो. कुणीतरी सणसणीत कानाखाली वाजवल्यावर कसं सगळं भण्ण होतं ना, तसं वाटत होतं. इतका वेळ मी ज्या मुलीशी गप्पा मारल्या -गप्पा कसल्या, पाऊण तासाची टाईमपास बॅटींग केली- तिला अजिबात दिसत नव्हतं हे कळल्यावर डोकं भणाणून गेलं माझं! तिच्या वागण्या-बोलण्यातून असं एकदाही जाणवलं नाही की तिला दृष्टीदोष आहे. सगळं इतकं सहजपणे चाललं होतं, ती चक्क माझ्याकडे पाहून बोलत वगैरे होती.

मग मला एक एक संदर्भ जाणवायला लागले, की तिच्या बोलण्यातून एकदाही काही पाहिल्याचा, रंगांचा उल्लेख आला नव्हता. सुरुवातीला माझी भाषा मराठी आहे वगैरे गप्पा झाल्यावर तिने पर्फ्युमबद्दल बोलायला सुरु केलं होतं. अर्थातच, 'वास' हे तिचं क्षेत्र होतं आनि ती त्याबद्दल भरभरुन बोलत होती! ती पर्फ्युमिस्ट आहे म्हटल्यावर मी सहाजिकच तिला 'पर्फ्युम' नावाच्या एका इंग्रजी चित्रपटाबद्दल विचारलं होतं तेव्हा तिने "मला चित्रपट पहायला आवडत नाहीत" असं उत्तर देऊन विषय संपवला होता. बोलताबोलता ती बर्‍याच वेळा माझ्या मागे काचेत शून्यात पाहिल्यासारखं बोलायची. या सगळ्याकडे मी खूप सहज दुर्लक्ष केलं होतं हेही आठवलं.

दृष्टीदोषासारखा प्रॉब्लेम असलेली लिझ मला अगदी सहपणे भेटली आणि सहजपणे एक ठसा ऊमटवून गेली. ती मला भेटणं हा संपूर्ण योगायोगाचा भाग होता. म्हणजे तिला मी भेटलो नसतो, दुसरा कोणीही भेटला असता तरी तिला काहीही फरक नव्हताच. असं शेवटच्या क्षणी आपल्या गप्पेकर्‍याला एकदम शॉक देणं तिच्या नकळत ती करतच होती, आणि करत राहीलसुद्धा; पण माझ्या डोक्यात हा प्रसंग इतका फिट्ट बसलाय, की ही लिझ विसरणं केवळ अशक्य!

कुठेही दृष्टीदोषाचा उल्लेखही नाही, की त्यामुळे प्रॉब्लेम होतोय वगैरे तक्रार नाही. रोजच्यारोज घरून लंडनला जा-ये करताना तिचं कुठेही अडत असेल असं नाही! स्वत:च्या सुंदर दिसण्याचा अभिमान नाही की दिसत नसल्याची खंत नाही! असलं आरस्पानी सौंदर्य, देहबोलीतली विलक्षण सहजता आणि तुफान आत्मविश्वास असलेली ही मुलगी त्या दिवशी जाणिवा हलवून गेली हे मात्र नक्की!

Thursday, January 6, 2011

'फेसबुक' वर आहेस का?



फेसबुक........फेसबुक चा तो निळा रंग बघूनच कंटाळा येतो....कधी ह्या कंटाळ्याचा डोंगर पार करून समजा बघितलं तर पुलंनी वर्णन केलेल्या पानवाल्याच्या ठेल्याची आठवण येते...हेच पहा ना....


 सगळ्या मित्रांचे ठराविक फोटोज ( गळ्यात हात टाकून 'ये दोस्ती नही छोडेंगे' वगैरे)........काही मित्रांचा ग्रुप ---ज्यांचे नेहेमी दारू पिताना फोटोज ( टायटल: 'इश्कने दर्दी बनाया' किंवा 'आज थोडी पी ली है' ).... ....मग अजून एक मित्रांचा समूह ज्यांचे नेहेमी कुठल्या तरी गोऱ्या मुलीबरोबर किंवा मेणाचा पुतळा असलेल्या गोऱ्या अभिनेत्री-बरोबर (उदा. शकिरा वगैरे) फोटोज... .
काही मैत्रिणींचे त्यांच्या लग्नातले जगासमोर मांडलेले 'सुंदर' म्हणावं लागतं असे फोटोज आणि त्याखालच्या त्यांच्याच गल्लीत अर्धं आयुष्य घालवलेल्या त्यांच्या मैत्रिणींच्या कॉमेंट्स 'ओह बेब्स, लुकिंग गुड!' किंवा 'वॉव, वंडरफुल कपल, लव यु गाईज!!' किंवा 'सो क्युट!' वगैरे वगैरे .......
अजून काही मैत्रिणी आणि मित्रही, ज्यांचे आपापल्या नवजात अपत्त्यांबारोबारचे फोटोज.....आणि मग त्याखालच्या बाळाचं कौतुक करणाऱ्या मावश्या 'ओह..माय क्युट बेबी !!!' 'सो SSS स्वीट...'. इत्यादी....काही जणांचे कुठल्यातरी बार मधले किंवा क्लब मधले नाचतांनाचे फोटो....आणि त्याखाली 'वॉव ...यु रॉक !!' वगैरे.........
मायामी , न्यूयॉर्क, लंडन, कॅलिफोर्निया, शिकागो, आयफेल टोवर, टोक्यो, सिंगापूर ह्या ठिकाणांचे सुमारे ५ अब्ज फोटो आणि बहुतांश फोटोज मध्ये दोन्ही हात फैलावून आकाशाकडे बघणारी ती व्यक्ती......पावडर ने मढवून अत्यंत मोठा खरा दाणा दिसणाऱ्या साखरपुड्याच्या अल्बम मधल्या  मुलीला 'खूपच छान दिसत आहेस फोटोत !' अश्या प्रतिक्रिया....
काही ठिकाणी हसू येईल इतक्या वैयक्तिक आयुष्यातल्या बाबी ( उदा. 'काल रात्री खाल्लेल्या चोकलेट केक बद्दल माझ्या प्रिय नवऱ्या (हबी डार्लिंग!) , तुला खूप धन्यवाद!' ) .........
काही अजून म्हणजे स्वतःचे किंवा स्वतःशी निगडीत फोटो न लावता कोणीतरी 'अर्जुन रामपाल', 'शाहरुख खान', 'कतरिना कैफ', 'ऐश्वर्या राय' असल्या सुमार लोकांचे  किंवा ज्यांचं नाव तोंडानी उच्चारता येणार नाही अश्या फ्रेंच मॉडेल्सचे फोटोज आणि त्या खाली फोटोच्या टायटल मध्ये 'यु आर सो ब्युटीफुल' असा काही मजकूर..!!......
ह्याशिवाय कोणीतरी गल्लीतला किड्यांचे, माश्यांचे, पानांवर पडलेल्या थेंबांचे, किल्ल्यांवरच्या भग्नावशेषांचे (सेपिया कलर मधले), फटाक्यांचे, सुरकुतलेल्या चेहेऱ्यांचे फोटो काढून एका काळ्या चौकटीत बसवून त्याखाली स्वतःचं नाव (उदा. अमित, आनंद वगैरे !....ही नावं खूप कॉमन आहेत म्हणून बरं का !) लावणारा फोटोग्राफर.........
शिवाय अजून एक नवीन टूम, पुणेरी पाट्या आणि त्याखाली ९०० वेळा 'हा हा हा !!' वगैरे.......काही अति-धार्मिक लोकही आहेतच! रोज बायबल मधलं एक वचन किंवा रोज एक तमिळ शब्द वगैरे.....
अमेरिकेत पाळीव कुत्रीही फेसबुकात समाविष्ट आहेत... कुत्र्यांचे आणि मांजरांचे केविलवाणे फोटो त्यावरची दुनियेची स्तुती-सुमनं. .... .
सचिन आणि गांगुलीचे फोटो आणि त्याखाली त्यांना दिलेलं देवपद, अनुसरून त्यांच्या आरत्या ( 'ऑफ-साईडला आधी साक्षात देव आणि मग गांगुलीच!', 'जय सचिन देवा.!' )........


असे एक नाही अनेक तर्हेचे ग्रुप्स आहेत.....पण प्रत्येकजण कुठला ना कुठला तरी आकृतिबंध अनुसरतोय. सगळेजण लग्नाआधी एकट्याचे फोटो लावणार, दोन-चार गडांवर जाऊन दोन-चारशे फोटोज लावणार नाहीतर लडाखला बाईकवर जाऊन येणार, कॉलेजमधल्या ग्रुपचा फोटो, मग साखरपुड्याचे बटबटीत फोटो, मग प्रत्येकजण आपण किती 'फुलीश रोमांटीक' आहोत हे दाखवणार...आणि लग्नाच्या आधी प्रत्येकाला विरह ( हल्ली त्याला 'जुदाई' म्हणतात!) होणार मग त्याचे फोटो........नंतर लग्नाचे फोटोज ज्यात सगळ्या मुलांनी फेटे घातले असणार, शिवाय हनिमूनचं प्रदर्शन आहेच ! तुमचं कुठल्या व्यक्तीबरोबर काय नातं आहे (प्रेयसी, प्रियकर, एकटा/टी, साखरपुडा झालेला, विवाहित इ.), ते अचूक शब्दांत सांगावं लागणार! मधून मधून आपला नवीन फोटो टाकल्यावर एकमेकांना 'सो चार्मिंग!' म्हणावं लागणार !

ह्या फोटोजवर लिहावं इतकं कमी तर व्हीडीओ चं जग तर त्याहीपेक्षा कमालीचं मजेदार आहे ! शिवाय लोकांचे एकमेकांना मेसेजेस आणि त्यातून घडणारा विनोद हा पराकोटीला जाईल एवढा आहे ! प्रश्न असा आहे, 'का?'...... काय लपवण्यासाठी ही सगळी मास्क्स (मुखवटे) लावावी?.......का सगळ्यांनी इतरांसारखं बनावं? अशी कोणती भीती आहे ज्यामुळे आपण बाहेर फेकले जाऊ ? 
आपण का एवढं खोटं बोलतोय? का उगाच दुसऱ्याबद्दल काळजी असल्याचं दाखवतोय? का इतरांचं अनुकरण करतोय? उगाच सगळ्या फोटोजना 'लाईक' करून, सगळ्यांशी गुडी-गुडी बोलण्याचा आव आणून, अमेरिकेतल्या कंपन्यांच्या फुकट जाहिराती करून, 'पॉलीटिकली करेक्ट' बोलून,  आपल्या घरीच असणाऱ्या आई-बाबांना फेसबुक वर खातं काढायला लावून  आपण काय मिळवतो आहे? भरपूर बुद्धिमत्ता असणारे आपण स्वतःला अश्या सामान्यतेत का ढकलत आहोत?  कोणत्या वेबसाईट वर प्रतिक्रिया व्यक्त करून आपल्याला जग बदलून टाकणारी कल्पना सुचणार आहे ? 



प्रिय वाचकहो, छोटी छोटी निरीक्षणं मांडावी आणि विनोदी लिहावं म्हणून बसलो होतो आणि ठरवलं होतं की कुठलाही शब्द खोडायचा नाही, पण शेवटी थोडं गंभीर झालंच! तुम्हाला काय वाटतं ते जाणून घ्यायचं आहे....

धन्यवाद!


Saturday, November 6, 2010

पाळलेले केस

अतिशय साधी कविता आहे, वाचून विसरून जा !


माझे पाळलेले केस कधी कधी खूपच दंगा करतात
टोपीच्या खालून मानेच्या मागून वर येऊ पहातात
आरशासमोर नीट उभे असलेले 
बॉस समोर आला की उगाच शेळपटतात 

ह्यांना उत्साही ठेवायला चांगली जेल आणा
दिवाळीमध्ये उटणं लावा मध्ये मध्ये शाम्पू चोपडा
ह्यांना हवं तेच ते करणार 
घरी भेटायला आलेल्या मित्रांना जसा
आपलाच कुत्रा चावतो तसे हे पण 
आयत्या वेळी आपलाच गळा कापणार

वय वाढत गेलं की त्यांची मिजास वाढत जाते
त्यांना काळं ठेवायला सतत मशागत करावी लागते
मग आणा की बाजारातून काळ्या मेंद्या
थापा तुमच्या डोक्यावर आणि त्यातून वर बाकीच्यांचं हे ऐका,
म्हणे मेंदीने डोकं शांत राहतं !

केसाच्या लांबीवरून माणसाची ओळख ठरते,
हवंतर केस नसलेल्यांना विचारा !
नसले तरी बेचैनी आणि असले
तर येताजाता आरशात बघून आवरा!

प्रत्येकाला आपापले केस 
नको असले तरी पाळावेच लागतात
आपण चांगलं पौष्टिक खाऊन
त्यांना चार घास द्यावेच लागतात !!

Thursday, October 14, 2010

अजून काय..

बरे झाले न्यायालयाने निकाल देऊन टाकला
पुन्हा एकदा धर्मांधाना भांडायला पॉइन्ट मिळाला
आता परत धर्माच्या नावाखाली कडवटपणा वाढेल
आणि पुन्हा एकदा दंगली होतील नि अजून काय!

महिने आणि वर्षे फार छोट्या गोष्टी झाल्यात
दशकानुदशके पलीकडून फक्त गोळ्याच आल्यात
दहशतवादी पुन्हा एकदा ऐन थंडीत घुसखोरी करतील
आणि पुन्हा एकदा कारगिल होईल नि अजून काय!

आजही अनेक फितूर सूर्याजी पिसाळ जन्माला येतायेत
अतिमहत्वाच्या माहिती शत्रूला विकतायेत
परत एकदा मुठभर लोक आपल्या घरात घुसून दंगा करतील
आणि पुन्हा एकदा २६/११ होईल नि अजून काय!

एकीकडे आयपीएल आणि सीडब्ल्यूजी साजरे होतायेत
आणि हजारो कोटी रुपये पाण्यासारखे वाहतायेत
दुसरीकडे दारिद्र्यरेषा अजून ठळक होत जाईल
आणि पुन्हा एकदा नक्षलबाडी होईल नि अजून काय!

मग 'नक्षलवाद संपवून टाकू' - गृहमंत्री घोष करतील
सगळीकडे फोटो काढून दिल्लीला जाऊन बसतील
पुन्हा एकदा कुठेतरी सत्तर-ऐंशी पोलीस मरतील
परत एक दंतेवाडा तयार होईल नि अजून काय!

इतके सगळे होताना मला नेहेमी प्रश्न असा पडतो
महासत्ता होतानाच्या प्रसववेदना माझाच देश का भोगतो
येतील पुन्हा छत्रपती, नि टिळक, नि सावरकर की
आम्ही असेच पहाटेची वाट पहात मरून जाऊ नि अजून काय!

Thursday, September 9, 2010

आणि आम्ही Engineer होत आलो...

(हा लेख मी Engineering च्या शेवटच्या वर्षात, अगदी वर्ष सरत आलं असताना, 'Engineer' होऊ घातलो असताना लिहिला होता!)


Engineer काय किंवा Doctor काय, या आपल्या भारतातल्या एक प्रकारच्या जमातीच आहेत..! अशा जमाती, ज्यांच्या वाटयाला फक्त कौतुकच यायचं.. पण आता या जमातींची लोकसंख्या एवढी वाढलीय, की जमातीतल्या लोकांचा अभिमान सोडाच, पण जमातीबाहेरच्या लोकांनाही याचे अप्रूप वाटेनासं झालंय! म्हणजे पूर्वी, ‘माझा मुलगा Engineering करतोय..’ ही एकच बाब कॉलर ताठ करायला पुरेशी होती. पण आता, पुढे तो M.Tech करणार आहे, MBA करणार आहे का MS?... यावर ते सगळं अवलंबून आहे!

‘Engineer’ हा शब्दच मोठा विचित्र वाटतो मला! याची संधी सोडवायला जावं, तर Engineचं ज्ञान असणारा किंवा Engine तयार करणारा तो Engineer अशी होते. पण असं जर असेल तर Civil , Metallurgy किंवा IT मधल्या लोकांना Engineers का म्हणावं असा प्रश्न पडतो! कारण, आम्ही Mech, Prod ची लोकंच Engine बद्दल शिकत असतो (असा समज तरी आहे!). हे जरा विविध धर्मांना समान स्थान असून भारताला ‘हिंदू’स्तान म्हटल्यासारखं झालं! एकात्मता वाढावी, ‘मी एक भारतीय आहे..’ सारखं ‘मी एक Engineer आहे..’ अशी भावना प्रत्येकाच्या मनात रुजावी, या कारणाने ते ‘Engineer’ असं नाव ठेवलं गेलं असावं (इथे ‘नामकरण करणं’ असा अर्थ अपेक्षित आहे, ‘नाव ठेवणं’ नाही!). पूर्वजांचा हेतू चांगलाच असावा.. पण Mechanical पासून Production, Computer पासून IT किंवा Electronics पासून Instrumentation सारख्या branches उदयाला आल्याचे पाहता झारखंड, उत्तरांचलची आठवण आल्याखेरीज राहत नाही!

आम्ही अगदी ‘खरे’ Engineers असलो तरी आम्हा Mechanical, Production वाल्यांना तरी ४ वर्षात Engine ची ओळख कुठे होते सगळी! एका Viva ला आम्हाला विचारलं होतं, ‘4-Stroke, Single Cylinder Engine ला Rocker Arm किती असतात?’ आता ‘Rocker Arm’ हा शब्द मी कधी जन्माच्या कर्मात ऐकला नव्हता! मग विचार केला की उत्तर तयार करूयात! ‘उत्तरं येत नसतील तरी ती तयार करता आली पाहिजेत!’ हे प्रत्येक Engineer न शिकवताच शिकलेला असतो! असा विचार करून मी Engine डोळ्यासमोर आणलं. तरी मला कुठे ते Rocker Arms बघितल्यासारखे वाटत नव्हते. त्या ऐवजी तो WWF चा ‘Rock’ आणि त्याचा तो पिळदार दंडच ‘Rocker Arm’ म्हटल्यावर डोळ्यासमोर यायला लागला! आणि मी तसाच मक्खासारखा चेहेरा करून बसलो..! खरंतर Engineering Viva म्हणजे प्रत्येक Engineer च्या आयुष्यातला एक रोमहर्षक अनुभव! त्या २०-२५ मिनटात एका वेगळ्याच विश्वाची सैर घडू येते! जणू एक नाटकंच चालू असतं! त्या नाटकात External Examiner इनिस्पेक्टर ची भूमिका (इन्स्पेक्टर नाही!), Internal Examiner पांडू हवालदाराची आणि विद्यार्थी आरोपीची भूमिका करत असतो! त्या पांडू हवालदाराला आनंद झालेलं असतो की आपण आरोपीला पकडून साहेबांसमोर उभं केलंय.. इनिसपेक्टर त्याला खोदून खोदून प्रश्न विचारात असतो आणि आरोपी मान खाली घालून त्याचे सगळे आरोप कबुल करत असतो. शेवटी ‘मला काहीही येत नाही, मी बिनडोक आहे!’ असं कबुल केल्यावर इनिसपेक्टर आणि पांडू हसतात आणि मगच त्या आरोपीची सुटका होते! पण मुलगी जेव्हा आरोपी असते, तेव्हा चित्र अगदी वेगळं असतं! ती गोड बोलून अशी काही जादू करते की इनिसपेक्टर आणि पांडू त्यांचे dialogues विसरतात आणि तिला पोतंभर मार्क देऊन टाकतात! आपल्याला शेंडी लावली गेलीय हे त्या बिचार्यांच्या ध्यानीही नसतं...! मुलींना असे आरामात मार्क मिळतात आणि आपल्याला इतका त्रास सहन करावा लागतो, याची माझ्या एका मित्राला एवढी चीड होती की एक दिवस मुलीच्या वेशात viva ला जायचं, असं त्याने ठरवलं होतं! आमच्याकडे viva घ्यायची एक विशिष्ठ पद्धत आहे. एका वेळी तिघांना बसवतात. एकच प्रश्न एका पाठोपाठ एक असा तिघांना विचारला जातो. अशात जर कोणी तिसरा असेल, तर त्याच्यासारखा बिचारा तोच! आधीच्या दोघांनी एकाच प्रश्नाची दोन संपूर्ण वेगळी उत्तरे दिलेली असतात आणि या बिचाऱ्या तिसऱ्याला दोन्ही उत्तरं बरोबर वाटत असतात..! अशावेळी External Examiner पटकन कृष्णाच्या भूमिकेत शिरतो आणि, “तुला माझं लक्षावधी सैन्य हवंय का मी स्वतः!” असं विचारून त्या बिचाऱ्या तिसऱ्याची अवस्था दुर्योधानासारखी करून टाकतो! त्यामुळे ‘जग’ ही रंगभूमी आहे की नाही ठाऊक नाही, पण Engineering आणि मुख्यत्वे ‘Engineering Viva’ ही नक्की एक रंगभूमी आहे, या निष्कर्षापर्यंत मी पोहोचलोय आता!

‘Submissions’ हा असाच एक अजब प्रकार! नुसतं हात तुटेपर्यंत लिहायचं. इकडचं तिकडे उतरवायचं आणि Journals पूर्ण करायची ही त्याची थोडक्यात व्याख्या! पण मग हे असं का करायचं असतं याचं उत्तर कधीच कोणाकडे नसतं. Syllabus मधे सांगितलंय, त्यामुळे पास व्हायचं असेल तर ते करायचं, एवढयाच विचाराने प्रत्येक वर्षी पोथ्या भरवल्या जातात. ह्यातून आणि काहीच मिळत नसतं. कृष्णाने गीतेत म्हटलेच आहे, “कर्म करत रहा, फळाची अपेक्षा धरू नका.” आणि आम्ही सगळे Engineers तेव्हा गीता जगत असतो. गेली ४ वर्षे मीसुद्धा नुसता इकडचं तिकडे उतरवतोय.. त्या दिनानाथाची गीता जगतोय..!

ह्या सगळ्या प्रकारामुळे मला एक दिवस खूप गंभीर प्रश्न पडला होता, की ‘आपण Engineer आहोत का Technical कारकून?!’ मला खात्री आहे, हा प्रश्न माझ्यासारख्या प्रत्येक होतकरू Engineerला एकदातरी पडला असणार! पण image आणि ego जपायचा म्हणून प्रत्येकच जण हा टोचणारा काटा हृदयाच्या मखमली पेटीत बंद करून अस्वस्थता अनुभवत असतो.. हे एकमेकांना कधीच सांगितलं जात नाही. दोन Engineers मधलं हे mutual understanding असतं..!

असंच एक न उलगडलेलं कोडं म्हणजे Engineering चे Professors! ‘तुम्ही एकवेळ काहीही शिकवलं नाहीत तरी चालेल, पण विद्यार्थ्यांना त्रास देणं हा तुमचा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो तुम्ही बजावलाच पाहिजे!’ असंच त्यांच्या मनावर जणू बिंबवलं असतं! कदाचित ‘Engineering हे येऱ्यागबाळ्याचं काम नाही. पदोपदी नरकयातना भोगाव्याच लागतात, तरच सिद्धी प्राप्त होते!’ हे सांगण्यासाठीच हा सगळा प्रयत्न असतो! बाहेर हा माणूस अगदी तुमच्या आमच्यासारखाच असतो. पण कॉलेजमधे आल्यावर तो अचानक बदलून जातो! बाहेर रस्त्यात कधी कुठल्या शिक्षकाने आपल्याकडे बघून मंद स्मित केले (Smile दिली!), तर, अनेकवेळा आपल्या sheets वर ‘Redo’ शेरा मारणारा, खंडीभर assignments देणारा, submissions साठी शेवटपर्यंत छळ छळ छळणारा, खुन्नस म्हणून पेपर अवघड काढणारा आणि viva च्या वेळेस External ने विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे आली नाहीत की हळूच खुनशी हसणारा मनुष्य हाच का असा प्रश्न पडतो..! अशाच एका ‘हिटलर’ professorने रस्त्यात आपणहून दिलेली ओळख बघून मला ही नक्की ‘राम और श्याम’ किंवा ‘कुंभ के मेले मे बिछडे हुए भाई’ ची case आहे असं वाटलं होतं!

यानंतर ज्याची प्रत्येक जण ४ वर्षे आतुरतेने वाट पाहत असतो असा तो Engineers च्या आयुष्यातला सोन्याचा दिवस उजाडतो.. दिवस असतो ‘placements’ चा..! सगळीकडे एकच लगीनघाई सुरु असते! असंख्य काका, मामा आणि ‘family friends’ कडे चौकश्या करून झालेल्या असतात. ‘थोडयाच वर्षात Software ची boom परत येईल..’, ‘पण Core ला काही मरण नाही यार..!’, ‘TCS मधे २ वर्षांच्या bond पेक्षा १ वर्षाच्या bond ची Infy बरी, असं माझ्या ताईचे मिस्टर सांगत होते, जे Wipro मधे आहेत!!’ अशी वाक्ये या काळात सगळीकडे सर्रास ऐकू येतात.. त्या दिवशी सगळेजण कडक इस्त्रीच्या स्वच्छ कपडयात असतात आणि मागच्या खिशातल्या कंगव्याने सारखा भंग पाडत असतात..! मधेच polish केलेल्या बुटांवर बसलेली धूळ पाय वर करून pant च्या मागे पुसत असतात.. ‘मी किती cool आहे’ हे दाखवण्याचा प्रत्येकच जण अयशस्वी प्रयत्न करत असतो! कारण प्रत्येकालाच चिंता असते आपल्या placement ची, आपल्या भवितव्याची!

दिवस जेव्हा सरतो तेव्हा आम्हा Engineers च्या चेहेऱ्यावरून निकाल ओळखणे सोपे असते. आमच्यातले काही लोक उडया मारत असतात, काही भावूक होऊन आईशी फोनवर बोलताना दिसतात. तिची स्वप्ने पूर्ण केलेली असतात ना त्यांनी! अगदी हळवा क्षण असतो तो.. तर काही हिरमुसून होस्टेलकडे निघालेले असतात. चेहऱ्यावर निराशा असली तरी मन कणखर असतं त्याचं. ‘अजून युद्ध संपलेलं नाहीये. अजून लढायचं..’ या भावनेने ते दुसऱ्या दिवसाच्या तयारीला लागतात.. पण आठवडा-दोन आठवडयातच चित्र स्पष्ट होतं.. हळूहळू विश्वास बसायला लागतो की आपण एक नव्हे तर दोन कंपनीत place झालोय! आणि मग आनंदाला काही पारावार उरत नाही..

Placement सारख्या खूप आनंद देणाऱ्या अशाच अजूनही काही गोष्टी या माझ्या Engineering च्या आयुष्यात घडून गेल्यात.. आज सगळं आठवतंय.. College चा पहिला दिवस.. Boat Club वर तासनतास मारलेल्या गप्पा.. पावसाच्या काळात दुथडी भरून वाहणारी ती नदी.. तिच्यातलं उसळून वाहणारं पाणी नकळत मनाला उभारी देऊन जायचं.. Freshers’ Party… Technical Events.. Zest मधली केलेली मजा.. Regatta मधले श्वास रोखून ठेवणारे ते events आणि तो दिव्यांचा अद्भूत खेळ.. इच्छेनुसार साजरी होणारी दिवाळी फक्त COEPतच! होस्टेलवर पडीक असणं..खूप खूप cricket खेळणं.. 1st year मधली ट्रीप.. आणि पुढील प्रत्येक वर्षातल्या अशाच सहली.. Traditional dayला ते भान हरपून नाचणं... Valentine’s Day ला लाल नाही निदान पिवळं तरी फुल मिळावं अशी भाबडी आशा.. आणि मिळालं नाही की ‘एक दिवस खूप मोठा होईन आणि मग मनासारखी मुलगी मिळेल मला.. सगळ्यात सुंदर..’ असं पाहिलेलं स्वप्न..! Gathering मधली मजा.. Cultural Group मधे मिळालेला तो अवर्णनीय आनंद..पुरुषोत्तम..फिरोदिया..सगळाच उत्सव, सगळाच सोहळा, सगळाच जश्न...! बेंबीच्या देठापासून अगदी कानठळ्या बसेपर्यंत ओरडून ओरडून आसमंत दणाणून सोडणारा C.O.E.P चा तो गजर... गजर कसला, गर्जनाच असतात त्या! C.O.E.P रूपी सिंहिणीच्या आम्ही केलेल्या छाव्यांनी..! मिळालेल्या करंडकाकडे बघून वाटणारी ती जग्गजेते झाल्याची भावना...

आता जाताना या सगळ्या आठवणी घेऊन जाऊ. जाता जाता प्रत्येक ‘मामू’ professor ला एक ‘जादू की झप्पी’ द्यावीशी वाटतीय! (ज्या शिक्षकांना मानलं त्यांना तर दंडवतच घालीन!) आणि म्हणावसं वाटतं.. “सर, तुमच्यामुळेसुद्धा मी इतक्या छान आठवणी घेऊन जाऊ शकतोय.. तुम्ही दिलेला त्रास आज खरंच प्रेमळ वाटतोय.. धन्यवाद सर!” सगळ्या मित्र-मैत्रिणींना सोडून जावं लागतंय ह्याचं मात्र दु:ख आहे. त्यांच्याही खूप आठवणी आहेतच.. पण ‘एवढया सगळ्या आठवणी कायमच्या राहतील माझाबरोबर?’ असा प्रश्न पडतो, अन् वाटतं 200 GB memory हवी होती आपली! त्या computer नामक निर्जीव यंत्राचा हेवा वाटायला लागतो.. आणि अचानक मनात विचार येतो, ‘200 GB ची Hard Disk माणसात implant करता येऊ शकेल? सगळ्याच आठवणी कायमच्या राहू शकतील मग आपल्याकडे.. Natural आणि Artificial Intelligence चं असं हे hybridization शक्य आहे का..?’ आणि मग माझ्यातला ‘खरा Engineer’ विचार करायला लागतो...

Saturday, July 24, 2010

सप्रेम

बऱ्याच वर्षांपूर्वी मित्रांना सोडून परदेशी येताना खास त्यांच्यासाठी काहीतरी खरडलेलं ..
---------------------------------------------------------------------------------------------------------

मावळतीचा सूर्य पाहताना मला नेहमीच अस्वस्थ वाटतं...
ती प्तरंगाची उधळण, तो केशरी आसमंत दिसायला कितीही सुंदर दिसला तरीही मनाला हुरहूर लावूनच जातो..

मनात कुठेतरी दडलेलं असतं की उद्या पुन्हा एक नवी सकाळ उगवणार आहे, पण तरीही चुकल्यासारखं वाटतंच..
एका दिवसाचा अंत झालेला असतो, आणि पुढच्या दिवसाला अजून उशीर असतो.. अशा वेळेस कुठेतरी एकाकीपणा जाणवतो..
कारण आता काही क्षण एकटेच काढायचे असतात .. त्या मिट्ट काळोखात.. !

पण अशा वेळेस, आकाशातला चंद्र माझी सोबत करतो.. चंद्र - सुशील, शांत .. काळोखाला उजळणारा .. माझ्या एकटेपणाला सोबत करणारा, सांभाळून घेणारा..
अगदी जिवलग विश्वासू मित्रासारखा..

~*~*~

हे बदलतं आयुष्य या घटनेची मला नेहमी आठवण करवतं.. इथेसुद्धा 'एका गोष्टीचा अंत आणि पुढच्या गोष्टीची सुरुवात' हे चक्र नेहमीच चालू असतं..
मग गोष्टीचा अखेर कितीही सुखद असला तरीही तो मनाला चुटका लावतोच.. पण पुन्हा पुढच्या ध्येयासाठी सुद्धा तयार व्हायचं असतंच...
अशावेळेस डगमगायला होतंच.. एकाकीपणा जाणवतोच.. खोलवर कुठेतरी..
कारण आता नाविन्याच्या अडचणींना सामोरं तर जायचं असतंच.. !

पण यावेळेस तुम्हा मित्रांची मैत्रीच मला साथ देते.. ती मैत्री माझा आत्मविश्वास जागवते.. मला एक छानसा Comfort Zone मिळवून देते..
जणू काही त्या आकाशातल्या चंद्रप्रकाशासारखीच - सुशील, शीतल, शांत.. आणि एकटेपणात सदैव माझ्या सोबतीला..

~*~*~

पण प्रेमासारखाच मैत्रीलाही विरहाचा शाप हा असतोच.. आणि ती विरहाची वेळ आता इथेही येउन ठेपली आहे..
पण हीच माझ्यासुद्धा परीक्षेचीही वेळ आहे.. इथेच मला स्वतःला सावरायचं आहे.. काहीतरी करून दाखवायचं आहे..
अनेकांच्या अनेकानेक अपेक्षा पूर्ण करायच्या आहेत.. हाती घेतलेली कामं तडीस न्यायची आहेत..

यापुढे आपण सर्व एकत्र नसलो, तरीही आपली निखळ मैत्री, आपण सर्वांनी एकत्र घालवलेले क्षण, आपल्या picnics.. अगदी सगळ्या आठवणी माझ्यासोबत निरंतर असणार आहेत..
आणि माझ्या पुढील आयुष्यात त्या मला फारच उपयोगी पडणार आहेत.. आणि याबद्दल माझी पूर्ण खात्री आहे..

आज माझ्यात इतका आत्मविश्वास येण्यास तुम्हा सर्वांचा, आपल्या मैत्रीचा फार मोठा हातभार आहे..

हे मैत्रीचं प्रेमळ नातं मी माझ्या मनात नेहमीच जपून ठेवीन..

आजच्या या दिवशी ही एक छोटीशी सदिच्छा तुम्हा सर्वांना एक सप्रेम भेट म्हणून देत आहे..
तुम्हाला आवडेल अशी खात्री बाळगूनच..

चूकभूल द्यावी घ्यावी...

मित्र - निरंतर.
संदीप

Monday, July 19, 2010

पूर्णब्रम्ह

‘आपण कशासाठी जगतो?’ हा प्रश्न मला अधूनमधून पडायचा. अजूनही पडतो! आता हा प्रश्नच इतका भयंकर philosophical असल्यामुळे त्याचं समाधानकारक उत्तर कधी मिळालंच नाहीये. ‘आयुष्यात प्रत्येकाचं काहीतरी ध्येय असतं, ते पूर्ण करण्यासाठी..’, ‘आपल्या माणसांसाठी’, ‘आता आलोच आहोत तर जगायचं आणि वेळ झाली की मरायचं!’ ही त्यातलीच काही उत्तरं.. पण त्यातल्या त्यात मला सगळ्यात पटलेलं उत्तर म्हणजे ‘आपण पोटासाठी जगतो’!

‘कशासाठी-पोटासाठी’ हे वर वर बघता फारच फालतू उत्तर वाटतं, पण नीट विचार केल्यावर त्यातली गंमत दिसून येते! मानवी शरीराला काही ठराविक अवयव असतात आणि प्रत्येक अवयवाच्या ठराविक अशा गरजा असतात. बाकी सगळ्या अवयवांच्या गरजा भागवणं सोपं असतं. म्हणजे गणितं सोडवली, विचार केला, की मेंदूची गरज भागली. सुंदर गोष्टी बघितल्या की डोळ्यांची गरज भागली. श्रवणीय संगीत ऐकलं की कानांची गरज भागली. खेळलं, व्यायाम केला, की हातापायांची गरज भागली. पण पोटाचं असं नाहीये बघा. कारण पोटाची गरज भागवायला अन्न लागतं आणि ते मिळवण्यासाठी आणि शिजवण्यासाठीच तर सगळा खटाटोप असतो!

अन्न मिळवण्यासाठी पैसे कमवा, पैसे कमावण्यासाठी नोकरी करा, नोकरीसाठी शिक्षण हे लागतंच आणि एकदा का नोकरी सुरु झाली की तुमचं काम अगदी रिटायर्ड होईपर्यंत करत बसा! नाहीतर ‘पोटा-पाण्याचे’ वांधे होतात! आणि फक्त एवढंच नाही. अन्न मिळवल्यावर ते शिजवायचं असतं. त्यासाठी घरातलं स्वयंपाकघर आयुष्यभर चालू ठेवा. मग ते एकटयाला कसं झेपणार? त्यामुळे लग्न करा! चार दिवस प्रेमात घालवा. पुढची चाळीस वर्षे भांडत बसा! पण ते स्वयंपाकघर अखंड चालू राहिलं पाहिजे..कशासाठी?..अहो पोटासाठीच नाही का!

तर अशा ह्या पोटासाठी जगण्यानेच ज्यात ‘scope’ आहे तिकडे माणूस वळाला, आणि ह्या जगाचा विकास झाला! शेती, मासेमारी, घरबांधणी, व्यापार, धातू, खनिजे, तंत्रज्ञानाची सुरुवात, रस्ते, गाडी, रेल्वे, विमानं, संगणक, इलेक्ट्रोनिक्स, मोबाईल्स, इंटरनेट, सोशल नेटवर्किंग... जे विकलं जाईल ते तो तयार करत गेला. एका कुठल्या व्यवसायात गर्दी झाली की तो दुसरं काहीतरी करू लागला. नवीन शोध लावू लागला..सगळं पोटासाठी, म्हणजेच जगण्यासाठी! असं हे पोटासाठी जगणंच हे जग अखंड चालू ठेवतं आणि या जगाचा विकास करतं.

आता हे जे अन्न आपण मिळवतो, वेगवेगळ्या पद्धतीने शिजवतो, ते खाऊन पोट भरायच्या आधी त्याला एका ‘जीभ’ नावाच्या Quality Assurance Inspector मार्फत जायला लागतं! आणि या ‘जीभ’ नावाच्या Quality Inspectorला जे आवडतं, तेच आपल्यालाही खावंसं वाटतं आणि त्याला जे आवडत नाही, ते आपल्यालाही आवडत नाही. प्रत्येक माणसाचा तो ‘Quality Inspector’ थोडयाफार फरकाने सारखाच असतो. त्याला पुरणपोळी, बासुंदी, जिलबी.. असे गोडधोड पदार्थ, वडापाव, समोसा, भजी.. यासारखे तळलेले पदार्थ, पावभाजी, चायनिज, पंजाबी किंवा नॉनव्हेज सारखे चमचमीत पदार्थ, बर्गर, पिझ्झा सारखं फास्ट फूड किंवा आईस्क्रीम, मिल्कशेक, कोल्ड्रिंक सारखे गोड आणि गार पदार्थ खूप आवडतात. पण दोडकं,पडवळ, तोंडलं, कारलं या सारख्या फळभाज्या आणि माठ, आंबट-चुका, करडई यासारख्या पालेभाज्या आवडत नाहीत. आणि तिथेच निसर्ग एक खेळ मांडतो!

तुम्हाला कधी असा प्रश्न पडलाय का, की जे पदार्थ आपल्याला भयंकर आवडतात, ते नेहेमीच अपायकारक, हानिकारक किंवा शरीराला वाईट का असतात? आणि जे पदार्थ आपल्याला मुळीच आवडत नाहीत ते प्रचंड पोषण करणारे, शरीराची वाढ आणि विकास करणारे का असतात? कधी आई किंवा आपले डॉक्टर आपल्याला असं म्हणतात का की, ‘तू रोज सकाळ संध्याकाळ बासुंदी पीत जा! भरपूर तेल घालून deep fried भजी खा! रोज एक बर्गर तर खाल्लंच पाहिजेस आणि आईस्क्रीमची एखादी बादली फ्रीजरमधे ठेवत जा!’ हे सगळे आवडणारे पदार्थ आपलं वजन वाढवतात, cholesterol वाढवतात, आपल्याला डायबेटीस होऊ शकतो आणि पुढे Heart Attack ही येऊ शकतो..
या उलट पथ्य-पाणी म्हणजे, ‘दुधी भोपळ्याचा रस प्या. उकडलेली कडधान्य खा. उपासाचे पदार्थ खा. बिनसाखरेचं दूध प्या. कमी तेलाची भाजी खा. Lettuce सारखा पालापाचोळा खा!’ म्हणजे अगदी त्या ‘Quality Inspector’ला काळ्यापाण्याची शिक्षा देऊन, त्याचा जीव घ्यायचा प्रयत्न करा! म्हणजे तुम्ही तंदुरुस्त व्हाल!

लहानपणी आईने मला डब्यात कधी आंबट-चुक्याची भाजी दिली, तर मी तसाच न खाता डबा संध्याकाळी घरी आणायचो. आईला उघडून दाखवायचो. हात जोडायचो आणि विचारायचो, “आई माझ्या हातून काही ‘चुका’ झाल्यात का!” पडवळ, दोडकं या सारख्या बेचव भाज्या कसं काय पोषण करू शकतात? कारलं तर म्हणे भयंकर healthy असतं! पण ते खाताना मला कुठलीतरी शिक्षा भोगत असल्याची जाणीव होत असते! हिरवा माठ, लाल माठ खाऊन बुद्धी तल्लख होऊच कशी शकते? आणि जर होते, तर ‘माठ’ नाव ते कशाला! आणि बिनसाखरेचा चहा किंवा दूध प्यायचं असेल तर वासरू होऊयात किंवा मांजराचा जन्म घेऊयात! Sprouts किंवा lettuce ‘चरायचं’ असेल तर शेळी होण्यात काय वाईट आहे!

असा हा विरोधाभासाचा खेळ निसर्ग मांडतो आणि चविष्ट अन्नाच्या मोहात पाडून रोज जिभेची लढाई लढायला लावतो! पण अशावेळी निसर्ग मला आई-वडिलांसारखा वाटतो. ‘काय चांगलं आहे, पेक्षा काय योग्य आहे’ ते करत रहा असे संस्कार जणू तो करत असतो. हा त्याने मांडलेला खेळ ही वडीलकीच्या नात्यानेच केलेली गोष्ट आहे.
आता आपण पोटासाठी जगतो, अन्न मिळवतो. पण जे अन्न खूप चविष्ट आहे ते जर मुळीच हानिकारक नसतं, उलट जर का ते पौष्टिक असतं, तर ते आपण गरजेच्या पलीकडे जाऊन खाल्लं असतं. माणसाचं खाण्याचं प्रमाण वाढलं असतं. नावडत्या भाज्यांची शेतीच केली गेली नसती. अन्नधान्य साठा मर्यादित असल्याने आणि श्रीमंत लोकांचा आहार वाढल्याने गरीब नेहेमीच उपाशी राहिले असते. लोकं, जिभेचे आनंद उपभोगत बसले असते. जगाचा विकास थांबला असता. अपरंपार प्राणिहत्या झाली असती. एक दिवस अन्नधान्य संपूनही गेलं असतं. सगळंच विस्कळीत झालं असतं..

लहानपणी आई म्हणायची, “वरण भाताचे हे शेवटचे तीन घास खाल्लेस तर चॉकलेट मिळेल..” आणि मी ते तीन घास खायचो.
पोटासाठी असणाऱ्या या जगण्यात, निसर्गाचं ऐकायचं असतं. तीन घास ‘वरण भाताचे’ खाऊनच मग एक ‘चॉकलेट’ खायचं. जगण्याची लढाई आणि स्वतःशी लढाई एवढंच तर सगळं काही असतं. म्हणूनच कदाचित अन्नाला ‘पूर्णब्रम्ह’ असं म्हणतात..

Monday, June 28, 2010

राखाडी रावण

बालवयात जे आपल्यावर संस्कार होतात त्यात गाणी आणि गोष्टींचा सिंहाचा वाटा असतो! ससा-कासवाच्या ‘classic’ गोष्टीपासून ह्या संस्कारांना सुरुवात होते आणि ‘आळस’ हा जो मित्र वाटणारा शत्रू पुढे आयुष्यभर पाठ सोडणार नसतो, त्याची या गोष्टीतून तोंडओळख करून दिली जाते. त्यानंतर ‘चिऊताई चिऊताई दार उघड..’ सारखं timepass गाणं, ‘गाणं’ म्हणजे काय असतं हे सांगायला शिकवतात. नंतर इसापनीतीतल्या ५०-१०० प्राण्यांच्या गोष्टींचा नंबर लागतो. ह्यात प्रत्येक गोष्टीला काहीतरी तात्पर्य असतंच! ह्या गोष्टी सतत काहीतरी शिकवतच असतात! आणि या गोष्टींचा आपल्यावर एवढा भडीमार होतो की नंतर कुठल्या काका किंवा मामाने ‘ये गोष्ट सांगतो’ म्हणून तात्पर्य नसलेली गोष्ट सांगितली, तर उगाचंच आपल्याला वेड्यात काढल्यासारखं वाटतं! ते झालं की टिळकांच्या शेंगांच्या टरफलावाटे पिल्लाच्या चोचीत संस्काराचा दाणा भरावला जातो! आणि मग पाळी येते सगळ्यात लाडक्या, संस्कारक्षम, ‘देव’ या संकल्पनेची ओळख करून देणाऱ्या दोन महान गोष्टींची.. रामायण आणि महाभारत!

रामायण आणि महाभारत ही दोन अफाट गाजलेली महाकाव्ये! आता त्या गोष्टी खऱ्या का खोट्या, राम-कृष्ण, कौरव-पांडव, हनुमान, वानरसेना हे सगळे खरेच होऊन गेले आहेत का, हा भाग जरा बाजूला ठेवूयात. मुख्य मुद्दा हा, की सगळ्यांना रामायण आणि महाभारत भयंकर आवडतं. पण जर असं कोणी विचारलं की तुम्हाला रामायण जास्त आवडतं का महाभारत? तर बहुतेक सगळ्याचं उत्तर ‘महाभारत’ असंच येईल! आणि ह्याला एक कारण आहे...

लहानपणी या दोन्ही गोष्टी एकाच पठडीत सांगितल्या जातात. म्हणजे बघा, रामायणात राम, लक्ष्मण, सीता हे देव असतात आणि रावण हा राक्षस असतो. दुष्ट रावण सीतेला पळवून नेतो आणि मग राम-लक्ष्मण, हनुमान आणि त्याच्या वानरसेनेच्या मदतीने लंकेवर स्वारी करतात. रावणाचा वध करतात. जिंकतात. सत्याचा विजय होतो! किंवा महाभारतात, कौरवांचा पांडवांवर राग असतो. पांडव ५ तर कौरव १०० असतात. पांडव चांगले आणि कौरव वाईट असतात. कृष्ण देव असतो आणि तो चांगलं वागणाऱ्यांची म्हणजे पांडवांची बाजू घेतो. कौरव आणि पांडवांच्यात घनघोर युद्ध होतं. भर युद्धात कृष्ण अर्जुनाला भगवतगीता सांगतो! पांडव जिंकतात. सत्याचा विजय होतो! ह्या अशा ‘हिरो आणि व्हिलन’, ‘देव आणि राक्षस’ स्वरुपात आपण लहानपणी रामायण-महाभारत ऐकतो. मग त्यात हिरोला अजून हिरो करायला अर्जुनाची पक्ष्याच्या डोळ्याची किंवा लक्ष्मण-शूर्पणखेची गोष्ट असते आणि व्हिलनला आणखी व्हिलन करायला जयद्रथ, शकुनी मामा, दु:शासन, बिभीषण अशी पात्रं प्रवेश घेतात.

पण जसे आपण मोठे होतो तशी आपल्याला महाभारतातल्या प्रत्येक मुख्य पात्राची नव्याने ओळख होते. कृष्णाची आणि पांडवांची ‘धुतल्या तांदळाची’ आपल्या मनातली छबी साफ धुवून निघते! चंद्रावरचे डाग दिसतात. आणि प्रत्येक पात्र अतीव सुंदर असा करडा रंग धारण करतो. म्हणजे द्रोणाचार्य एकलव्याला शिकवायचं नाकारून ‘racism’ करतात. नेहेमी खरं बोलणारा युधिष्ठीर ऐन युद्धात ‘नरो वा कुंजरो’ अशी थाप मारून आपल्याच गुरूंना आत्महत्येला भाग पाडतो. द्रोपदी भर सभेत सूतपुत्र म्हणून कर्णाचा उगाचंच अपमान करते. आणि कृष्णाने खेळलेली ‘राजनीती’ तर विचारायलाच नको! कर्णाच्या हाती शस्त्र नसताना तो अर्जुनाला कर्णावर बाण मारायला भडकावतो. ही कुठली नीती? का, तर कृष्णालाही माहिती असतं अर्जुन कर्णाशी कधीच जिंकू शकणार नाही. ‘मृत्युंजय’ आणि ‘राधेय’ वाचल्यानंतर तर मला कृष्णाचा एवढा राग आला होता ना...अशाप्रकारे कृष्णही करडाच होतो..

प्रत्येक जिवंत माणसाला जन्मतःच काम, क्रोध, लोभ, मद, मोह, मत्सर हे षडरिपु म्हणजे सहा शत्रू आणि सहस्त्र वेगवेगळ्या भावना असतात. कुठलाच माणूस १००% शुद्ध, चांगला किंवा कुठलाच माणूस १००% वाईट असू शकत नाही. म्हणूनच, ही महाभारतातली राखाडी पात्रं आपल्याला जास्त जवळची वाटतात. मनाला पटतात..भिडतात..

पण रामायणाचं असं नाहीये बघा. रामायणाच्या अगदी शेवटी राम सीतेच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिला अग्निपरीक्षा घ्यायला लावतो, ही गोष्ट सोडल्यास राम नेहेमीच शुद्ध, चांगला असा देव असतो आणि रावण हा नेहेमीच दुष्ट राक्षस असतो.

मध्यंतरी रामायण आणि महाभारतावर २ चित्रपट आले. ‘राजनीती’ ह्या चित्रपटात आधुनिक महाभारत साकारलंय. पण ‘रावण’ या चित्रपटात मणिरत्नमने ‘रामायण’ नव्याने लिहायचं प्रयत्न केलाय...! रामायणात सीता खूप सुंदर असल्याचा उल्लेख आहे. आणि जर रामायणाच्या शेवटी सीता अग्निपरीक्षेत उत्तीर्ण होते, तर एवढा बलशाली रावण हा नक्कीच एक महान व्यक्ती असला पाहिजे. सीतेचे फक्त सौंदर्यच नाही तर अंगभूत गुणांनीही तो चकित झाला असेल, अगदी तिच्या प्रेमातही पडला असेल. मग अशात रावणही रामासारखाच मर्यादापुरुषोत्तम ठरतो! रावणालाही स्वतःची अशी गोष्ट आहे. तो लहानपणी खूप उद्धट आणि चिडका होता. पण म्हणून काही तो outright वाईट ठरत नाही. आणि लक्ष्मणाने शूर्पणखेचं नाक कापल्यानेच चिडून रावणाने सीतेचं अपहरण केलं होतं.

रावणाला दहा तोंडं होती असं त्याचं वर्णन आहे. पण त्यापेक्षा १० पंडितांपेक्षा तो हुशार होता, तो अत्यंत हुशार व्यक्तीपेक्षा १० पट वेगाने विचार करू शकायचा किंवा त्याला ४ वेद आणि ६ उपनिशिदं असं सगळ्याचं ज्ञान होतं हे जास्त पटण्यासारखं आहे. रावण शंकराचा निस्सीम भक्त होता. त्याने सलग कित्येक वर्षे ब्रम्हाची तपश्चर्या केली होती. आणि जर त्याचा वध करायला विष्णूला रामाचा अवतार घ्यायला लागला ह्याचा अर्थ किती सामर्थ्यशाली असेल रावण.. श्रीलंकेत आजही रावणाची मंदिरं आहेत आणि लोकं त्याला देव मानून नियमित दर्शनाला जातात.

ह्या सगळ्या गोष्टी रावणाचा काळा रंग राखाडी बनवतात. रावणाचं हे नवं (आणि कदाचित खरं) रूप मणिरत्नमने पडद्यावर साकारलंय. आणि म्हणूनच चित्रपट कितीही कंटाळवाणा झाला असला, त्याचा first half अगदी बैलगाडीच्या वेगाने पुढे सरकत असला किंवा dialogues अतिशय फुसके असले तरी आता हयात नसलेल्या रावणाच्या मनात जाऊन त्याच्या पात्राचा विचार करून ते पडद्यावर उभ्या करणाऱ्या मणिरत्नमला माझा सलाम!

या नंतर एक विचार मनात येतो की जर राम आणि कृष्ण हे जर विष्णूचे म्हणजे साक्षात देवाचे अवतार असतील तर त्यांनी खऱ्या हिरो कर्णाचे किंवा अगदीच वाईट नसूनही रावणाचे प्राण घेऊन काही चूक केली का..? कदाचित नाही! कदाचित कृष्णाला अर्जुनापेक्षा जास्त कर्णच आवडत होता. पण नियतीमुळे म्हणा, कर्ण कौरवांच्या बाजूने होता आणि कौरवांचं हारणं आणि पांडवांचं जिंकणं हे ‘सामाजिक हिताचं’ होतं. आज कदाचित आपणही पांडवांचेच वंशज असू आणि आपल्यालाही कौरवांपेक्षा पांडवांचेच वंशज होणं आवडलं असतं. तसंच रावणाचा वध करणं हेसुद्धा ‘सामाजिक हिताचं’च होतं. आणि भावनेच्या, स्वतःच्या पलीकडे जाऊन समाजाचा फक्त विचारच नाही तर समाजासाठी जो कृती करतो त्याला ‘देवत्व’ प्राप्त झालंय असं म्हणायला हरकत नाही. राम आणि कृष्ण करडया रंगाचे असूनही ह्या देवत्वाने त्यांच्यात एक लकाकी आहे. म्हणूनच त्यांचा करडा रंग स्वर्गीय चंदेरी दिसतो. आणि त्यांचं देवत्व तसूभरही कमी होत नाही..

पण हे काही असलं तरी रावणाचं हे नव्याने समजलेलं राखाडी रूप माझ्या मनाला खूप भावलंय. या राखाडी रावणाला माझे शतश: प्रणाम!

Sunday, June 20, 2010

स्वप्नास्तित्व

‘एक दिवस येईल माझा. मी एक मोठा माणूस असीन. माझी सगळी स्वप्नं पूर्ण होतील तेव्हा. भरपूर पैसा, प्रसिद्धी, सुंदर, समजूतदार आणि प्रेमळ बायको, कौटुंबिक समाधान, सगळं काही असेल माझ्याकडे...’ हा विचार ज्या क्षणी मनात येतो, त्याक्षणी आपला आणि वर्तमानकाळाचा संबंध तुटतो. जणू कुठलंसं circuit break होतं आणि आपल्या स्वप्नातलं आपलं अस्तित्व आपण जगायला घेतो..!

एखादा पारंगत चित्रकार जसं पांढऱ्याशुभ्र कागदावर वेगवेगळे रंग फसाफस् पसरवून चित्र काढायला घेतो आणि काहीच क्षणात जसं ते चित्र अतीव सुंदर दिसायला लागतं, तसंच असतं हे स्वप्नास्तित्व! काहीच क्षणात प्रत्येकाच्या सुखाच्या व्याख्येनुसार भरभरून सुख प्रत्येकाच्या स्वप्नातल्या अस्तित्वाकडे असतं. मन लावून ते आल्हाददायी चित्र आपण रंगवायला घेतो. ते चित्र अगदी मनासारखं पूर्ण होईपर्यंत आपण रंगवत असतो. पण ज्या क्षणी ते चित्र पूर्ण होतं, त्याच क्षणी circuit पुन्हा जोडलं जातं आणि आपण भानावर येतो!

पण या सगळ्यात गंमत अशी होते की, स्वप्नातलं अस्तित्व हे केवळ मृगजळ असतं आणि त्यात जगल्याने आपलं खरोखरीचं अस्तित्व कमी होत असतं! म्हणजे बघा ना, एखाद्या गोष्टीचा, कामाचा पूर्ण आनंद आपण कधी घेऊ शकतो? जेव्हा आपण पूर्ण एकाग्रतेने आणि मन लावून ते काम करतो. पण जर त्यावेळी वर्तमानकाळातलं circuitच break झालं, तर कुठून एकाग्रता येणार आणि कुठून आपण त्या कामाचा आनंद उपभोगू शकणार! सतत परतत बसायला लावणारी भेंडीची भाजी नेमकी शिजल्याचा क्षण किंवा चहाला हवा तसा लाल रंग येण्यासाठी, दूध घालायच्या आधी तो किती वेळ उकळावा हे कळण्यासाठी आपल्याला एकाग्रताच लागते. बॅडमिंटन खेळताना हव्या त्या जागी हव्या तितक्या वेगाने शटल जाणं, बॅक्टेरिया कल्चर अगदी नीट बनवून microscopeचा exact focus adjust करून हवा तो result येणं किंवा ‘मृत्युंजय’ मधलं कर्णाच्या तोंडातलं एक जबरदस्त वाक्य पूर्णपणे मनाला भिडणं, हे आपण १००% वर्तमानात असल्याशिवाय होणं केवळ अशक्यच! म्हणजे मन सुखवायला आपण स्वप्नं बघतो खरी, पण स्वप्नं बघताना आपण वर्तमानातला आनंद, सुख गमावत असतो! केवढा हा विरोधाभास! नेहेमीच्या रस्त्यावरून जाताना आपण आजूबाजूच्या किती गोष्टी निरखून बघतो? मनात साठवतो? दोनच आठवडयापूर्वी ओळख झालेल्या आणि पुन्हा दिसलेल्या व्यक्तीचं नाव आपण का विसरतो? सध्या सहवासात नसलेल्या एखाद्या व्यक्तीला तिच्या लकबींसकट आपण तंतोतंत डोळ्यासमोर उभं का करू शकत नाही? एवढी कमी निरीक्षण किंवा स्मरणशक्ती आहे का आपल्याला? नाही! हे सगळं पूर्णपणे वर्तमानात न जगल्याने होतं. आपण पूर्णवेळ आपल्या अस्तित्वात जगतंच नाही! कुठल्याश्या मृगजळापायी आपण आपले हातचे आनंद गमावत असतो. म्हणजेच याचाच अर्थ, आपण आपलं आयुष्य वाया घालवत असतो..!

पण मला वाटतं या नाण्याला अगदी खणखणीत अशी दुसरी बाजू आहे! असं म्हणतात, स्वप्नं बघावीत. खूप मोठी स्वप्नं बघावीत. त्यानेच पंखात बळ येतं. वर्तमानात राहून पूर्ण एकाग्रतेने एखादं काम आपण चोख करू, त्यात पारंगत होऊ. दुसरंही तसंच करू आणि तिसरंही..पण पुढे काय? आणि अशी कामं का करत बसावं? याचं उत्तर आपली स्वप्नं देतात. प्रत्येकाच्या मते त्याला काय मिळालं की तो सुखी होईल ह्याचं उत्तर म्हणजे त्याची स्वप्नं! ही स्वप्नं त्याच्या जगण्याला एक उद्दिष्ट देतात. स्वप्नातलं जगणं म्हणजे सत्यात अथक जगण्यासाठी लागणारं इंधन. रखरखत्या उन्हात मिळालेली किंचीतशी सावली. एक मृगजळ.. जे तहान भागवत नाही पण पुढे जायचं बळ मात्र देतं..!

बऱ्याच वेळा आपण दु:खी होतो, रडतो, आपला आत्मविश्वास खूप वेळा कोलमडतो. पण आपलं मनंच असं आहे ना, जे फार वेळ दु:खी राहू शकत नाही. ते मग काही वेळ स्वप्नात जगू पाहतं. मग इंधन भरलं जातं. मनाला उभारी येते आणि आपण पुन्हा एकदा आत्मविश्वासाने सत्यात जगायला सुरुवात करतो.

ह्याचाच अर्थ असा की पूर्णवेळ स्वप्नात जगणं चांगलं नाही, पण पूर्णवेळ सत्यातही जगणं अशक्यच असतं. जगताना कुठे खरचटलं तर फुंकर मारावी. ती स्वप्नातल्या अस्तित्वात जगायची वेळ असते. मन तेव्हा जणू बुद्धीला आर्जवत असतं, ‘बेहेने दे, मुझे बेहेने दे.. बेहेने दे घनघोर घटा, बेहेने दे पानी की तरहा|’

हा circuit ‘make’ आणि ‘break’ चा खेळ अगदी ऊन-पावसाच्या पाठशिवणीच्या खेळासारखाच असतो. निसर्गासारखा मस्तपणे आपल्याला तो खेळता आला पाहिजे. तरंच आयुष्याचं सप्तरंगी इंद्रधनुष्य दिसू शकेल...!

Monday, June 14, 2010

ब्रायटनचा किनारा!




"ब्रायटनचा किनारा" असं नाव असलेल्या लेखात प्रवास-वर्णन, सहलीची कहाणी आणि भरपूर फोटो पाहायला मिळणार असा जर तुमचा अंदाज असेल तर तो जरा चुकलाय. ब्रायटन हा इतर सर्वसामान्य बीचसारखाच बीच असला तरी त्याचं महत्व भारतीयांच्या दृष्टीने अनन्यसाधारण आहे. कारण याच किनाऱ्यावर स्वातंत्र्यवीर सावरकरांना एक अजरामर काव्य स्फुरलं, 'ने मजसि ने'! सावरकरांच्या काव्याबद्दल सर्वाना माहिती आहेच, पण हे काव्य जिथे स्फुरलं तो ब्रायटनचा किनारा आहे हा तपशील आपण फारसा लक्षात ठेवत नाही. कारण भारतात बसून इंग्लंडमधले सगळे किनारे सारखेच वाटतात. फार लांब कशाला जा, मला स्वत:ला ब्रायटनचं नाव माहिती असून देखील ते कुठेतरी विसरून जायला झालं होतं.
पण विस्मरण होवो किवा काहीही, अश्या गोष्टी गरजेप्रमाणे आठवतात खऱ्या! या वेळी पण असंच झालं. भटकायला जायचा ठराव पास झाला आणि ठिकाण ब्रायटन ठरलं तेव्हा अंधुकपणे हे नाव कुठेतरी वाचल्याचं आठवत होतं. संदर्भ लागत नव्हता. मग काय, गुगल झिंदाबाद! १५-२० मिनिट गुगलशी झटापट केल्यावर माहिती मिळाली की स्वातंत्र्यवीर सावरकरांनी 'ने मजसि ने' ची रचना केली तो हाच किनारा. उगाच खूप भारी वाटलं, सावरकर जिथे जाऊन आल्याचा ठोस पुरावा आहे ती ही जागा आहे कळल्यावर काय होणार दुसरं (एकदा अंदमानला सुद्धा जायचंय)! कारण म्हणजे सावरकरांबद्दल असणारा नितांत आदर! जेव्हा जेव्हा त्यांचं नाव ऐकतो, त्यांच्याबद्दल कुठे काही वाचतो, पाहतो, तेव्हा केवळ नतमस्तक व्हावंसं वाटतं. अजून थोडी माहिती मिळाली तेव्हा असं कळलं की सावरकरांच्या 'ने मजसि ने' काव्याचं हे शतक-महोत्सवी वर्ष आहे. ब्रायटनला जायचा चाललंच होतं, डायरी मध्ये संपूर्ण कविता लिहून घेतली.
ब्रायटनला पोहोचलो तेव्हा एकदम टाईमपास मूड होता. ज्या मित्रांबरोबर गेलो होतो ते मित्र आहेत उत्तर-भारतीय! सावरकरांविषयी फारशी माहिती नसलेले. (का असावी, कारण सावरकरांनी कधी दिल्लीवर आपला हक्क सांगितला नाही, आणि तत्कालीन नेत्यांनासुद्धा असा सडेतोड नेता/मंत्री दिल्लीत असणं धोक्याचंच वाटलं असणार) ब्रायटनला पोहोचल्यावर खूप वेळ तर भटकण्यातच गेला. फुल टाईमपास , समुद्रात खेळा, फोटो काढा, चकाट्या पिटत बीचवर फिरा आणि अजून काय काय!
दुपार होऊन गेली होती. 'ब्रायटन', 'सावरकर', 'ने मजसि ने' डोक्यात होतंच. मग मी मित्रांना सावरकरांची गोष्ट सांगायला सुरुवात केली. सुरुवातीला त्यांना वाटलंच की काय बोअर करतोय हा (माझ्या वक्तृत्वाचा दोष), पण मी आपलं रेटलं पुढे! जेव्हा त्यांना कळलं सावरकरांविषयी, ज्यांनी देशासाठी २ वेळा काळ्या-पाण्याची सजा भोगली, सर्व व्यक्तिगत सुख-दु:ख बाजूला ठेवून फक्त देशाची सेवा केली तेव्हा त्यांनाही सावरकरांबद्दल आदरमिश्रित कुतूहल वाटायला लागलं. सावरकरांच्या 'ने मजसि ने' ची स्टोरी त्यांना सांगितली तेव्हा (मला सगळं हिंदीत अनुवाद करून सांगावं लागलं) बहुतेक त्या कवितेचा इफेक्ट झाला असावा कारण जेव्हा मी 'ने मजसि ने' म्हणायची कल्पना त्यांना सांगितली तेव्हा एका मित्राने माझ्याबरोबर कविता म्हणायची इच्छा व्यक्त केली. व्वा!



घोटाभर पाण्यात उभे राहून आम्ही दोघं डायरी मधून कविता वाचायला लागलो. (सुरुवातीला एक-दोन वेळा फक्त वाचली, कारण त्याला मराठी शब्दांची थोडी ओळख व्हावी असा उद्देश होता) जेव्हा त्याला थोडं जमायला लागलं तेव्हा आम्ही मोठ्याने म्हणायला सुरुवात केली. सुरुवातीला एखादा मिनिट बिचकायला झालं, कारण एक तर मला गाता वगैरे अजिबात येत नाही, आणि आजुबाजुनी जाणारे गोरे लोक आमच्याकडे विशेष कुतूहलाने पाहत होते. पण जशी लय सापडत गेली तसा सगळ्याचा विसर पडला आणि संपूर्ण कविता म्हणून झाल्यावरच थांबलो. माझा मित्र आधीच थांबला होता, पण तो चक्क हात जोडून उभा होता; मला या गोष्टीचं फार आश्चर्य वाटलं, अजूनही वाटतं. स्वत:बद्दल सांगायचं तर माझ्या डोळ्यातून पाणी आलं नाही म्हणून म्हणायचं की मी रडत नव्हतो, पण खूप भरून आलं होतं. सांगता येत नाही शब्दात, पण अतिशय सुंदर अनुभव होता तो! आणि एका महाकाव्याच्या शंभराव्या वर्षी आम्ही त्या तीर्थक्षेत्री जाऊन ते म्हणून आलो याचा विलक्षण अभिमान वाटत होता. एखादी गोष्ट करण्यात 'धन्यता वाटणे' काय असतं हे कळलं! त्या उर्मीमध्ये थोडा वेळ आम्ही तिथेच उभे होतो. नंतर कधीतरी थोड्या वेळाने आजूबाजूचं भान आलं, आणि आम्ही तिथून जेवायला गेलो. उरलेली ट्रीप पण मस्तच झाली पण 'ने मजसि ने' चा अनुभव त्यात सगळ्यात सुंदर होता. आयुष्यभर लक्षात ठेवावा असा!!!




(टीप: स्वा. सावरकरांचा फोटो आंतरजालावरून साभार!)

Thursday, June 3, 2010

सखये तुझ्याचसाठी..

एक गवताचं पातं होतं..
रानावनात उगवणारं अन रानावनातच झीजणारं..
उन्हाळ्यात सुरकुतणारं - पावसाळ्यात भरकटणारं..
चारचौघांसारखंच असणारं अन चारचौघांसारखंच दिसणारं..

पण एक दिवस काहीतरी वेगळंच घडलं..

आज सगळ्यांची नजर त्या पात्याकडे वळली..
आज ते पातं कुणाच्या चित्रात जाउन बसलं तर कुणाच्या आठवणींत..
कुणा कवीच्या कवितेत दिसलं, तर कुणा लेखकाच्या लेखात हसलं..

कारण..

कारण, आज त्या पत्यावर दंव बरसलं होतं.. एका दंवबिंदूने त्या पात्याला नवीन स्वरूप दिलं होतं..
आज ते पातं स्वतःशीच हसत होतं, मनाशीच खुलत होतं..
आता उन असो वा पाउस, रात्र असो वा दिवस..
त्या दंवाने त्या पात्याला फक्त आणि फक्त खुश रहायला शिकवलं होतं..

आज त्या दंवाने त्या पात्याला स्वतःचं अस्तित्व मिळवून दिलं होतं..

मीसुद्धा अगदी तसाच होतो गं..
त्याच त्या गवताच्या पात्यासारखा..

अस्तित्वाला विसरलेला, स्वाभिमानाला दुरावलेला..
दुःखात निराश होणारा अन सुखात हरवून जाणारा..
चारचौघांसारखा असणारा आणि चारचौघांसारखाच दिसणारा..

माझ्या अशा नेहमीच्या जगण्याला सोनेरी किरण दिल्याबद्दल आणि मला तुझा मानण्याबद्दल शतशः धन्यवाद..
ही मैत्री, आपलं प्रेम, हे नातं असंच निखळ राहो हीच माझी सप्रेम सदिच्छा..

- संदीप

Sunday, May 30, 2010

उद्विग्न!

आज नेट वर सर्फिंग करताना एक लिंक मिळाली. २६/११!

मुंबई हल्ल्याच्या एका वर्षानंतर बनवलेली ही फिल्म! फक्त १० लोक येतात काय आणि ३ दिवस सगळा देश धारेवर धरतात काय? १७० लोक या हल्ल्यात बळी पडल्याचा सरकारी आकडा आहे, आणि ४०० लोक जखमी झाल्याचा. इतका सगळा आगीचा आणि रक्ताचा खेळ मांडला होता यांनी आणि लष्कराची कुमक यायला २४ तास लागले. सी.एस.टी. वर, ताज हॉटेल मध्ये, ट्रायडेंट, लिओपोल्ड मध्ये, नरीमन हाउस मध्ये आपले पोलीस रक्त सांडून सांडून शहीद झाले, तेव्हा आपले गृहमंत्री हायकमांडच्या निर्णयाची वाट पाहत होते. मन शब्दश: उद्विग्न झालं हे सगळं पाहून!
आपला देश इतका पुढारलेला, 'इंडिया शायनिंग'वाला, मग आपल्याकडे या गोष्टी कशा होतात? मुंबई मध्ये हे एकदा झालं, काश्मीर मध्ये तर रोजचंच आहे. २०-२५ वर्ष झाली तिथे हे असलं सगळं चालू आहे, आणि आपण काही नाही करू शकत? का? का नाही आपल्या पोलिसांना संरक्षणाची आणि स्व-संरक्षणाची पुरेशी साधनं मिळत? का त्यांची अशी बिनकामाची धावपळ होते? गणपती मध्ये यांनी राबायचं, आय. पी. एल. च्या सामन्यासाठी यांनीच सुरक्षा यंत्रणा उभी करायची, चोर, दरोडे, लुटमार, आणि अजून असले असंख्य गुन्हे यांनीच हाताळायचे, दहशदवादी आले, तरी त्यांच्याशी यांनीच लढायचं, तेही जुनाट बंदुका, फडतूस पिस्तुलं, आणि काठ्या घेऊन, हे सगळं करताना मरावं लागलं तरी बेहत्तर! आणि इतकं सगळं करून नंतर हे शिव्यांचे धनी! आज किती लोक असे आहेत, ज्यांना रस्त्यावर पोलिसाने लायसन्स मागितल्यावर 'साला, आता हा लुटणार' असा वाटतं? कधी हा विचार मनात येतो का, की कदाचित हि एखादी शोध-मोहीम असू शकते. मान्य आहे की शक्यता कमीच असते, पण त्या १% शक्यतेवर आपल्यातले १% लोक तरी विचार करतात का? मग पोलिसांना शिव्या देण्यात काय अर्थ आहे? आज ही लिंक पाहून खूप काय काय मनात येऊन गेलं. आय. पी. एल. चालू होती, तिथे असे हजारो पोलीस गुरासारखे राबले, पण आपण अक्षरश: सगळं विसरून परत त्यांना मिस-मॅनेजमेंट साठी शिव्या देणार.
पोलीस तरी कुठे कुठे पुरे पडणार? शशांक शिंदे, तुकाराम ओंबाळे, कामटे, साळसकर यांनी आपलं आयुष्य काय असंच दान केलं की काय असा प्रश्न पडण्यासारखं वातावरण अजून आहे. आजही तो हरामी कसाब जिवंत आहे, आणि आपलं षंढ सरकार आणि आंधळी न्याय-व्यवस्था त्याला पोसते आहे. आता निकाल लागायला १.५ वर्ष लागण्यासारखं या केस मध्ये काय आहे, किवा सरकारी वकिलांनी ही केस इतक्या हलगर्जीपणे तयार केली आहे की ज्यात आरोपीच्या वकिलाला 'आरोपीला जन्मठेप मिळावी, त्याच्या कमी वयाचा मानवतेच्या दृष्टीकोनातून विचार व्हावा' असं म्हणायचा चान्स मिळावा? सगळं सूर्यप्रकाशाइतकं स्वच्छ असताना देखील कसाब हा अजून जिवंत कसा राहू शकतो? आता त्याला फाशी सुनावली आहे त्याबद्दल माननीय न्यायाधीशांचे शतश: आभार, पण आता हाय-कोर्ट, सुप्रीम-कोर्ट, मग आपले 'दयावंत' राष्ट्रपती इतक्या सगळ्यातून जायला अजून २-३ वर्ष सहज लागतील! कसाबला पाळणाघरात ठेवायचा खर्च ३१ कोटी आहे. अजून ३-४ वर्ष म्हणजे साधारण अजून फक्त ८०-८५ कोटी लागतील. तेही आपणच देणार आहोत, कारण आपण करदाते आहोत. अफजल गुरुला फाशीची शिक्षा सुनावली त्याला वर्ष लोटून गेली, अजून त्याला फाशी देत नाहीयेत, मग कसाबला फाशी सुनावल्यावर त्याचा नंबर कधी लागायचा? आणि उद्या अफजल गुरूसारखाच कसाबनंदेखील दयेचा अर्ज दाखल केला तर मग फक्त 'नैसर्गिक' मृत्यूच त्याला सोडवू शकेल असं म्हणावं लागण्याइतकी बेकार परिस्थिती आहे. संसदेवर हल्ला करण्याचा मुजोरपणा करणाऱ्या अफजलच्या दयेच्या अर्जावर विचार करायला राष्ट्रपतींना इतका वेळ का लागावा? ह्या मुद्द्यावर विचार करायला त्यांच्याकडे वेळच नाहीये का? त्यांना या मुद्द्यावर विचार करायला आपल्या गृहमंत्रालयाने हा मुद्दा त्यांच्याकडे पाठवला तरी आहे का? जर संसदेवरच्या हल्ल्यात कोणी सांसद जखमी झाला असता, किंवा त्याच्या जीवाचं काही बरवाईट झालं असतं तर अफजल इतके वर्ष जिवंत राहिला असता? किंवा ताज/ट्रायडेंट मध्ये एखादा 'बिगशॉट' चचला असता तर कसाबची केस अशीच लांबली असती? 'नेत्यांना एक न्याय आणि सामान्य जनतेला केवळ अन्याय' हे तर आपलं अलिखित सरकारी धोरण आणि आपल्या राज्य-घटनेचं दु;ख आहे. देशाच्या सुरक्षेशी थेट संबंध असलेल्या ह्या विषयांवर सरकारशी भांडायला आपल्या नेत्यांना वेळ का मिळू नये? थरूर आणि मोदी नावाच्या मस्तवाल खोंडात चाललेली साठमारी चर्चायला फक्त लोकसभाच उरली होती, तिथेही असल्या नासक्या मुद्द्यावरून गुद्दागुद्दीची वेळ यावी? नेतेमंडळींचं जाऊ द्या, ज्या हिणकस बुलेट-प्रुफ जॅकेटमुळे करकरेंचा मृत्यू झाला, ते जॅकेट कचराकुंडीत सापडलं. का, तर म्हणे हॉस्पिटल मधल्या कुणा कर्मचाऱ्याने 'चुकून' फेकलं होता. व्वा! आणि त्यावर जोरदार चर्चा करून नवीन अत्याधुनिक जॅकेट घ्यायचा मानस मुख्यमंत्र्यांनी बोलून दाखवला, त्या जॅकेटची खरेदी अजून झालीच नाहीये. कारण तसल्या जॅकेटना फार खर्च येतो म्हणे. साधारण २.५ लाखाचं एक जॅकेट आहे. जर ते महाग तर मग कसाब काय फुकट आलाय का? की आपल्या परम-मित्र शेजाऱ्याने आंदण म्हणून धाडलाय? आणि तरीसुद्धा आपली अर्थ-व्यवस्था विकासाच्या मार्गावर आहे म्हणे! अरे, जिथे गरजेच्या गोष्टी विकत घ्यायला पैसे पुरत नाहीत, तिथे कसल्या विकासाच्या गप्पा करता? की विकास फक्त पैसे उडवण्यात आहे? दंतेवाडामध्ये ७७ जवान शहीद झाले, पण कुणाला फरक पडला? विरोधी पक्षांनी गृहमंत्र्यांचा राजीनामा मागितल्यासारखं केलं, गृहमंत्र्यांनी राजीनामा दिल्यासारखं केलं, पंतप्रधानांनी तो नाकारल्यासारखं केलं. पुन्हा परिस्थिती 'जैसे थे'! असं का? मग गृहमंत्र्यांनी 'नक्षलवाद संपवण्याची' घोषणा केली. नक्षलवाद संपवला पाहिजे हा साक्षात्कार सरकारला होण्यासाठी ७७ जणांनी हौतात्म्य पत्करावं का? आणि इतकं होऊनही नक्षलवाद मिटवण्यासाठी काही ठोस पाऊल उचलल्याचं ऐकिवात नाही. का? बंदुकीच्या जोरावर मुद्दा संपवायची भाषा करून काही उपयोग नाही हे आमच्या 'अर्थ-तज्ञ' गृहमंत्री आणि पंतप्रधानांना कळत नसेल काय? नक्षलवादाचा मुद्दाच मुळी निखळ दारिद्र्यातून जन्माला आलाय, त्यावर या उधळपट्टी करीत 'विकासाच्या' मार्गावर चालणाऱ्या 'गरीब' देशात काय आणि कसा उपाय निघणार? स्वातंत्र्यानंतर मिळालेली निष्क्रिय धर्म-निरपेक्षता, आणि आताची अमर्याद सहनशीलता - या असल्या कुबड्या घेऊन आपला देश एक पाऊलही पुढे जाऊ शकणार नाहीये याची जाणीव कधी होणारच नाही का? पेशन्स संपायच्या आत काहीतरी चांगलं घडावं अशी किमान अपेक्षा सामान्य नागरिकाने मनात बाळगूच नये का? की जे काही चाललंय त्याकडे डोळे विस्फारून पाहण्यापलीकडे आपण काहीही करू शकत नाही ही अगतिकताच आता मानसिकता म्हणून स्विकारावी? असं गुमान सगळं सोसण्यापलीकडे आपण काहीच करू शकणार नाही का? जिथे देशाच्या सार्वभौमत्वालाच काळिमा फासणाऱ्या घटना घडतायेत आणि त्यावर कुठलीही ठोस कारवाई कारण सरकारला जमत नाहीये, तिथे असल्या समस्यांकडे कोण लक्ष देणार? 'आम्ही ह्यांव करू, आम्ही त्यांव करू' असल्या फालतू गप्पा आणि घोषणा यापलीकडे कोणीही काहीही करत नाहीये.
हे सगळं माझ्याच देशात का घडावं? इतके सगळे प्रश्न माझ्याच देशात का जन्माला यावेत? आणि त्यांच्या उत्तरांऐवजी अजून प्रश्नच का समोर यावेत? ही हजारो प्रश्नांची कहाणी कधी सुफळ संपूर्ण होणार?

Wednesday, May 26, 2010

मला काय आवडतं?

मला बरंच काय काय आवडतं.
मला लोळायला खूप आवडतं.
लोळता-लोळता पुस्तक वाचायला खूप आवडतं. मला बसून, उभ्याने, प्रवासात, ऑफिसमध्ये, शाळेत, कॉलेजात - सगळीकडे पुस्तक वाचायला खूप आवडतं.
क्रिकेटची मॅच बघायला आवडतं. वन-डे मॅचमध्ये ओवर २५ नंतर ओवर ४० पर्यंत मी एखादा पुस्तक घेऊन बसतो. कारण मॅचमधला सगळा रटाळपणा तेव्हाच चालू असतो.
मला फुटबॉलची मॅच पाहायला खूप आवडतं. दीड-दोन तास एकाच जागी गुमान बसायचे असे प्रसंग फार थोडे आहेत. फुटबॉलची मॅच चालू असताना धनूला फोन करून मॅच बद्दल सविस्तर आणि बाकी अवांतर चर्चा करायला फार आवडतं.
मला कुठलाही खेळ पाहायला आवडतो. मला कार्टून्स पाहायला खूप आवडतं. मला पिक्चर पाहायला आवडतात. मला हळू आवाजात गाणी ऐकायला आवडतात.
मला मित्र जमवून दंगा घालायला फार आवडतं. धनूच्या गाडीतून रात्र-रात्र भटकायला आवडतं. स्वत:ची सगळी गुपितं आणि अनुभव शेअर करायला याहून सेफ जागाच नाहीये असं वाटतं. मग पहाटे पहाटे 'स्वीकार'चे पोहे; वा!
मला फोनवर बोलायला आवडतं. मुद्दलात मला बोलायलाच फार आवडतं. त्यामुळे समंजसपणे माझी बडबड ऐकणारे दर्शनसारखे मित्र मला खूप आवडतात. धनू आणि सारंगशी वाट्टेल तेव्हा वाट्टेल त्या विषयावर गप्पांचं गुऱ्हाळ लावायला जाम आवडतं.
अनुपबरोबर 'क्रिकेट' या देशव्यापी विषयावर अतिशय गंभीरपणे बोलायला आवडतं. अनुपच्या बाईकवर बसून झुंsग फिरायला आवडतं. लोक कितीही शिव्या देवोत, मला त्याचं ड्रायव्हिंग जाम आवडतं. आणि इतकं आवडूनही त्याच्या ड्रायव्हिंगबद्दल कंड्या पिकवायलाही खूप आवडतं.
योगेश भेटला की मला 'बाजारबुणग्या ' म्हणतो. मी पण त्याला 'बुजगावण्या' म्हणतो. मग आम्ही दोघं एकमेकांना १५-२० वेळा तरी असंच म्हणून घेतो. मस्त वाटतं एकदम!
मला खेळायला आवडतं. बॅडमिंटन, फुटबॉल, क्रिकेट, पत्ते सगळं सगळं खेळायला आवडतं. मला जिंकायला पण खूप आवडतं. मी आणि धनू बॅडमिंटनमध्ये अनुप आणि सारंगला हरवतो तेव्हा आरडा-ओरडा करायला आवडतं. आणि हरलो तरीपण खुन्नसमध्ये पुढची मॅच खेळायला खूप आवडतं! अशा वेळी 'आता हरलो तर कुणाला तोंड दाखवायला जागा उरणार नाही' असं एक वातावरण तयार होतं, मला ते टेन्शन आवडतं! त्या वेळी एकेका पॅाइंट वरून भांडाभांडी करायला आवडतं.
अमृताबरोबर पुस्तकांबद्दल बोलायला खूप आवडतं. आम्ही वाचलेली पुस्तकं, मी वाचलेली पुस्तकं, तिने वाचलेली पुस्तकं, त्याचं डिस्कशन. अनेक कंगोरे असलेले विषय असतात. एखाद्या पुस्तकाची सगळी ष्टोरी देखील काही वेळा एकमेकांना सांगितली आहे. मला ते पण खूप आवडतं.
मला स्मिताबरोबर कुठल्याही गप्पा मारायला आवडतं. मजाच येते एकदम! मग त्या गप्पा आठवून-आठवून हसायला आवडतं!
मला श्वेताला चिडवायला आवडतं, मग ती पण खोटं खोटं चिडते, सगळी गम्मतच! तिच्या डॉक्टरकीला आणि तिच्या साबुदाण्याच्या गोळ्यांना चिडवायला मला आवडतं बुवा. मग ती मला चुकीच्या गोळ्या देऊन आजारी पाडायच्या धमक्या देते ते पण आवडतं.
मला श्रद्धाला त्रास द्यायला खूप आवडतं. खूप म्हणजे खूपच! तिच्याशी भांडायला पण खूप आवडतं. सगळी भांडणं करून ती गाल फुगवून बसली की तिच्याकडे बघून हसत बसायला आवडतं. मग मी असा हसायला लागलो की ती 'माझा भाऊ अतिशय नालायक आहे' असा चेहरा करते, मग तर मी पोटात स्फोट झाल्यासारखा हसायला लागतो. मला ते पण खूप आवडतं.
मला बाबांशी घरातल्या प्रत्येक विषयावर बोलायला आवडतं. मग तो विषय नवीन टूथ-पेस्ट आणण्यापासून ते नवीन घर घेण्यापर्यंत कुठलाही असो. मला आवडतं. बाबा माझं ऐकून घेतात तेच मला जाम भारी वाटतं!
मला माझी आई खूप आवडते. तिच्या मांडीवर डोकं ठेवून लोळत टी. व्ही. पाहायला मला खूप आवडतं. ती जेव्हा डोक्याला तेल लावून देते तेव्हा तिथेच झोपून जायला खूप आवडतं. आईच्या सगळ्याच गोष्टी मला आवडतात.
मला आजीला नमस्कार करायला आवडतं. नमस्कार करायला वाकलो की ती पाठीवर जोरात शाबासकी देते ते मला खूप आवडतं. ती माझ्या गालावर हात फिरवून आशीर्वाद देते तेव्हा मला फार मस्त वाटतं; म्हणजे पोटातून एकदम असं उबदार फिलिंग येतं.
आशुला फोन करून नवीन गाणी आणि कविता चघळायला खूप आवडतात. आम्ही दोघं तासनतास बोलत बसतो, विषय नुसते आकाशातल्या ढगांसारखे इकडून तिकडे भटकत असतात. मला ते फार आवडतं.
अवनी आणि रीधूशी खेळायला खूप आवडतं. रीधू जेव्हा पाठीवर किवा पोटावर बसून उड्या मारते तेव्हा खूप मजा वाटते. मला रीधूचं बोट पकडून फिरायला जायला खूप आवडतं.
मला ऑफिसला जायला आवडतं. ऑफिसमधल्या कुठल्याही गप्पांचा शेवट अनुपला चिडवण्यात करायला जाम मजा येते. वैभवला 'भूभू' म्हणायला आवडतं. अनुप, वैभव आणि संदीपबरोबर जाऊन त्या 'उपाला' नावाच्या लोकोत्तर टपरीमध्ये ऑम्लेट खायला खूप आवडतं. दीपेनबरोबर टाईमपास करायला आवडतं. आम्ही नवीन पुस्तकं, सिनेमे, टेनिस, क्रिकेटच्या गप्पा मारत बसतो, मला ते खूप आवडतं. टपरीवर जाऊन चहा प्यायला आवडतं. निवेदिताला त्रास द्यायला आवडतो. रश्मीला चिडवायला आवडतं.
मला संदीपच्या घरी जाऊन टाईमपास करायला खूप आवडतं. सोनू काय मस्त चहा बनवते. ते दोघं मधेच काश्मिरीमधून बोलतात. ते काय बोलत असतील याचे तर्क लावायला खूप आवडतं.
गोलू, सँडी, केतन बरोबर टवाळक्या करायला खूप आवडतं. मी आणि केतन बाईक्सवरून एफ. सी. रोडवर भटकायला जातो ते खूप आवडतं. मी आणि गोलू खूप वेळा खूप सिरीयस चर्चा करतो ते पण मला आवडतं. आम्ही सगळे मिळून गणूची शाब्दिक धुलाई करतो ते पण आवडतं!
काय सांगू आणि किती सांगू? थोडसंच सांगितलं आणि खूप काय काय राहून गेलं. मला सगळंच खूप आवडतं. इतक्या सगळ्या आवडणाऱ्या गोष्टी आहेत माझ्याकडे, माझी मजा आहे एकूणच!!!

Tuesday, May 25, 2010

फुगेवाला

प्रत्येक माणूस एक फुगा घेऊन जन्माला येतो. इगोचा फुगा! बालवयात तो न फुगलेल्या अवस्थेत असतो. पण जसं जसं कळायला लागतं तशी तशी त्या फुग्यात हवा भरायला सुरुवात होते...

३री-४थीत असताना ‘अरे, तो ‘ढ’ मुलगा आहे. त्याला नको आपल्या ग्रुपमधे घ्यायला.’ असं कधी आपण मित्रांना म्हणतो. आता हे चूक की बरोबर हा भाग बाजूला ठेवूयात. पण तो मुलगा ‘ढ’ वाटतो कारण आपण स्वतःला हुशार वाटत असतो. आणि आपण हुशार का, तर आपल्याला परीक्षेत जास्त मार्क असतात! म्हणजेच ‘sense of achievement’ आपली ‘image’ तयार करत असते. आपल्या इगोच्या फुग्यात हवा भरत असते. प्रत्येक achievement बरोबर, प्रत्येक झालेल्या कौतुकाबरोबर हवा भरली जाते.

आता achievement किंवा केलेलं कौतुक हे अभ्यासातल्या हुशारीपुरतंच मर्यादित नसतं. कोणी खेळात पुढे असतं, कोणी कुठल्या कलेत पुढे असतं, तर कोणी सगळ्यांकडून ‘गुणी मुलगा’ अशी पदवी मिळालेलं असतं! आणि या प्रत्येक माध्यमातून फुगा फुगवला जात असतो. त्यामुळे होतं असं, की जेव्हा ९वी-१०वी येते, तेव्हा प्रामुख्याने मुलांचे ३ गट पडलेले असतात. पहिला गट असतो हुशार मुलांचा! या गटात ५-६ मुलं असतात. त्यांच्यात पहिल्या तीनात नंबर येण्यासाठी चुरस असते. आपलं करियर उत्कृष्टच होणार असा विश्वास त्यांचा फुगा त्यांना देत असतो आणि वर्गातल्या बाकीच्या मुलांची नाही म्हटलं तरी त्यांना थोडीफार कीव येत असते. दुसरा गट असतो ‘हिरो’ मुलांचा! जे खेळात नाहीतर ‘Extracurricular activities’ मधे पुढे असतात आणि अभ्यासात बऱ्यापैकी असतात. त्यांचा फुगा त्यांना सांगतो की ही पहिली पाच मुलं म्हणजे फक्त पुस्तकी किडे आहेत! पुस्तकं चावून आयुष्यात काही होत नसतं. सर्वांगाने विकास झाला पाहिजे. तुम्हीच खरे ‘हिरो’ आहात! आणि तिसरा गट असतो थोडा आत्मविश्वास कमी असलेल्या मुलांचा. त्यांच्या achievements तशा कमी असतात. कौतुकही कदाचित फारसं झालेलं नसतं. त्यांच्या फुग्यात खूप कमी हवा असते. त्यामुळे त्यांचे फुगे काही बोलण्याच्या अवस्थेत नसतात!

पुढे कॉलेजमधे गेल्यावर कला-गुणांना व्यक्त करायला मोठा मंच मिळतो. तिथे फुगे फुगतात. काही मुली सौंदर्याच्या जोरावर किंवा आपल्याला मुलं किती भाव देतात या गोष्टीमुळे हवा भरत असतात. कॉलेजच्या cultural ग्रुप मधल्या मुलांचे फुगे तर एवढे मोठे असतात की एखादा जुनियर, त्याला अनुभव नसल्यामुळे काही चांगलं करूच शकत नाही यावर त्यांचा गाढ विश्वास असतो! ऑफिसमधे बॉसच्या फुग्यात हवा असते ती त्याला मिळालेल्या खुर्चीमुळे. आणि ‘आपला बॉस बिनडोक आहे. फक्त अनुभवाच्या जोरावर आज तो तिथे आहे.’ असा विचार जो जुनियर लोकांच्या मनात येतो, तो त्यांच्या फुग्यातल्या हवेमुळेच, नाही का!

हा इगोचा फुगा कधीकधी पंक्चर सुद्धा होतो! आपल्याला ज्या गोष्टीचा अभिमान आहे, त्याच गोष्टीत कोणी आपल्यापेक्षा श्रेष्ठ बघितल्यावर आपल्या फुग्याला भोक पडतं आणि हवा निघून जाते. पण निसर्ग तात्काळ आपल्याला पंक्चर काढून देतो आणि आपण पुन्हा त्यात हवा भरायला सज्ज होतो!

हाच फुगा कारणीभूत ठरतो नवरा-बायकोच्या ‘Classic’ भांडणांना! २ पिढ्यांपूर्वी बायका फक्त चूल आणि मूल करायच्या. तेव्हा फक्त पुरुषांच्या फुग्यात हवा असायची! नवऱ्याने उठ म्हटलं उठायचं आणि बस म्हटलं की बसायचं! पण आज मुली शिकल्या. मुलांच्या खांद्याला खांदा लावून achieve करायला लागल्या. आता दोघांचे फुगे फुगलेले असतात. त्यामुळे ‘एवढं असेल तर तू कर ना स्वयंपाक. घर सांभाळ. मी जाते फक्त कमवायला.’ किंवा ‘नेहेमी तुझाच मुद्दा कसा काय रे बरोबर असतो? भांडण तुझ्याच वाक्याने संपलं पाहिजे का?’ ही अशी वाक्यं हमखास बोलली जातात!

‘बघितलंस, तिने स्वत:हून ओळखही नाही दाखवली. मीपण नाही दाखवणार!’, ‘मी का सॉरी म्हणू? तो पण चुकलाय. माझं घोडं काही त्याच्यावाचून अडत नाही!’... ही सगळी त्या फुग्यातल्या हवेचीच करामत..!

पण जरा विचार केला तर लक्षात येईल की हा हवा भरलेला फुगा जगायला आवश्यक असतो. जर त्याची काही गरजच नसती, तर निसर्गाने माणसाला त्याच्या जन्माबरोबर तो दिलाच नसता. माकडाचा माणूस होताना जसं गरज नसल्यामुळे निसर्गाने शेपटी काढून घेतली, तसंच त्याला फुगाही काढून घेता आला असता. आणि त्या फुग्यात हवाही असणं महत्वाचं आहे. नाहीतर अवस्था ९वी-१०वीतल्या त्या तिसऱ्या गटातल्या मुलांसारखी होईल. हवा भरलेला फुगा आपल्याला आत्मविश्वास देतो. फक्त त्या भरल्या जाणाऱ्या हवेवर आपलं नियंत्रण हवं. कुठली आणि किती हवा भरावी हे आपणच ठरवायचं. पाय जमिनीवर राहिले पाहिजेत. फुग्यातल्या हवेने मनाला उभारी यावी, पण त्याच हवेने आयुष्य ‘पोकळ’ होणार नाही ना ह्याची काळजी आपण घ्यायची..