Thursday, May 6, 2010

जय महाराष्ट्र!!

प्रिय अमुच्या एक महाराष्ट्र देशाला 'जय महाराष्ट्र' करून आता उणेपुरे ५ महिने होऊन गेले. खरंतर गेल्या महिनाअखेर गोऱ्यांच्या राणीला आणि तिच्या देशाला सुद्धा 'जय महाराष्ट्र' करून स्वगृही प्रयाण करायचा विचार होता, पण आमच्या महाराष्ट्रात राहूनही अमहाराष्ट्रीय असणाऱ्या प्रोजेक्ट मधील वरिष्ठाच्या कावेबाज कुटनीतीमुळे तो विचार आता वेस्टमींस्टरच्या कुठल्यातरी थडग्यात चिरविश्रांती घेत पहुडला आहे. आता मला 'जय महाराष्ट्र' करायचं तिकीट श्रावणातलं दिलंय. माननीय राज, किवा श्री. दादू ठाकरे, किवा आपले लाडके जोशी सर, दादा, भाई, किवा झालंच तर साहेबाना सांगून यावर कडक उपाययोजना करावी असा माझा जहाल विचार आहे. एका मराठी माणसाला मातृभूमीपासून दूर ठेवणारे, हे महाराष्ट्रात येऊन काड्या करणाऱ्या पर- प्रांतीयांइतकेच पापी आहेत. महाराष्ट्रातल्या पर- प्रांतीयांकडे जितकं लक्ष या नेतेमंडळींचं आहे त्याच्या १ टक्का लक्ष जरी पर-प्रांतातल्या मराठी लोकांकडे दिलं तरी ती सगळी जनता धन्य होऊन जाईल.
असो! मुद्दा 'जय महाराष्ट्र' करण्याचा आहे. पण एकूणच ह्या 'जय महाराष्ट्र' ची मजा आहे. आधीच्या पक्षाला नुकताच 'जय हिंद' करून आलो, असा कोणी म्हटल्याचं ऐकिवात नाही, किवा अस्सल कन्नडिगा मनुष्य देखील 'जय कर्नाटक' म्हणताना आढळलेला नाही. म्हणजे जयजयकारातच 'कल्टी' देण्याचं सामर्थ्य असलेला नवीन वाक्प्रचार मराठीला अगदीच जमून गेला आहे. हल्ली महाराष्ट्रात जे नवीन पक्षांचं पीक आलंय त्यामध्ये इकडून तिकडे उड्या मारणं याला 'पक्षांतर' असा तांत्रिक शब्द असला, तरी बोलीभाषेत त्याला 'जय महाराष्ट्र करणे' असंच म्हणतात.
'नारायणरावांनी' 'बाळासाहेबाना' केलेला 'जय महाराष्ट्र', 'राजसाहेबांनी' 'शिव-सेना' आणि 'विठ्ठलाच्या बडव्यांना' केलेला 'जय महाराष्ट्र', 'मोठ्या' साहेबांनी 'हाय-कमांडला' केलेला 'राष्ट्रीय' पातळीवरील 'जय महाराष्ट्र' अशी ठळक उदाहरणं आपण पहिलीच आहेत. तर बाकी रोजच्यारोज चालू असणारी राज्य पातळीवरील, जिल्हा, तालुका, शहर, गाव, वार्ड, गल्ली, सोसायटी पातळीवरील 'जय महाराष्ट्र' प्रकरणांचा नुसता पूर आलाय. कोण कुणाला 'जय महाराष्ट्र' करून कुठे जातंय, आणि कोण 'आपण असं काही केलंच नाही' ची कोलांटी मारतंय याचा अजिबात पत्ता लागत नाहीये. आता पब्लिक मध्ये 'जय महाराष्ट्र' म्हणून खाजगीमध्ये आपण असं केलंच नसल्याची कबुली देणारे महाभागही आहेत. एकमेकांना 'जय महाराष्ट्र' करून, पक्ष बदलून, पुन्हा एकाच पक्षात येणारे वीरही आहेत. पण एकदा जाहीर 'जय महाराष्ट्र' केला की आपण तो केलाच नाही असं म्हणणारा, हा राज्याच्या अस्मितेला प्रकट धक्का देतोय हे लोकांच्याच लक्षात आल्याने, असल्या कोलांट्या मारण्याचा उपयोग त्या उमेदवारास फक्त मदाऱ्याकडेच होऊ शकतो हेही आलंच. सरांच्या 'कोहिनूर' मध्ये याचं खास प्रशिक्षण दिलं जातं असं आम्ही ऐकून आहोत!
महाराष्ट्रातल्या सगळ्या बातम्या इकडे परदेशी पोहोचत नाहीयेत, कृपया 'सकाळ' याकडे लक्ष देईल काय? साहेबाना सांगितलं पाहिजे, नाहीतर थोडेच दिवसांनी परत महाराष्ट्राचा जयजयकार गाताना कोण पार्टी कुठे आहे हेच कळणार नाही, आणि पार्टीतला कोण कुठे आहे याचाही पत्ता लागणार नाही. महाराष्ट्रातल्या राजकारणाच्या फडात विलक्षण तन्मयतेने आपापले फेटे उडवून, शिट्ट्या वाजवून दाद देणारे रसिक आम्ही, असल्या न पोहोचणाऱ्या, न कळणाऱ्या बातम्यांमुळे हिरमुसले आहोत. साहेब, किवा दादा याकडे लक्ष देतील तर बरं होईल! महापालिका निवडणुका होतायेत, निकाल लागतायेत. या सगळ्या राजकीय धामधुमीत सुद्धा एक गोष्ट जाणवल्याशिवाय राहत नाही. ती म्हणजे उभा महाराष्ट्र पेटून उठलाय, आगीत होरपळून निघालाय. आणि याचं कारण राजकीय मुळीच नाहीये.
परवाच 'सकाळ' मध्ये एक अजून धगधगीत वाक्प्रचार वाचायला मिळाला. "विदर्भात उन पेटले!" आवरा! कर्नाटकात पाणी पेटले, मराठवाड्यात कापूस पेटला, खानदेशात उसावरून कारखाने पेटले वगैरे ऐकलं होतं, आता तर प्रत्यक्ष उन पेटल्याच्या बातम्या येऊ लागल्यात. आत्ता फक्त उन पेटल्याच्या बातम्या आहेत , पण या पेटलेल्या उन्हामुळे पुढे पाणी , मग वीज आणि त्यानंतर महागाई पेटेल हे या सगळ्या 'जय महाराष्ट्र' वाल्यांना दिसत नाहीये का? आणि इतके सगळे झाल्यावर जनता पेटून उठली आणि ज्या व्हायला नको अश्या दंगल,लुटालूट वगैरे गोष्टी सुरु झाल्या तर जबाबदार कोण? की पुढच्या निवडणुकांच्या वेळीच सगळे जागे होणार? की कोणीतरी यांच्या कानाखाली पेटवल्याशिवाय यांना समजणार नाही?
मातोश्री, वर्षा, कृष्णकुंज, बारामती, सिंधुदुर्ग, मराठवाडा, नागपूर याची वेळीच दखल घेतील काय? की त्यांनी या अति-महत्वाच्या मुद्द्यांना देखील 'जय महाराष्ट्र' ठोकला आहे???

No comments:

Post a Comment