मला वाटतं, तीन-एक वर्षांपूर्वी मी ही अतिशय छोटी गोष्ट लिहिली होती. तिला रूपक-कथा म्हणावं का नाही ह्यावर वाद होईल, पण तीच आता परत इथे प्रकाशित करत आहे. प्रस्तावना अशी आहे:
गजा कलर TV च्या दुकानात गेला. सगळे TV चालू होते. कोणीही प्रेमळ नव्हतं. कोणी निरागस नव्हतं. TV वरच्या कार्यक्रमात गर्दी होती. गर्दीतही माणसांचे TV आणि तेही सगळे चालू.
आपण सगळेजण आयुष्य जगत असतो, बऱ्याच गोष्टी करत असतो. पण ह्यातही कधी कधी आयुष्यातल्या वारंवारितेचा आणि असहाय नकली खोट्या वागण्याचा वैताग येतो. नाटकाचा अंक संपल्यावर नटाने कपडे बदलावे तसे मुखवटे बदलताना मध्येच प्रश्न पडतो की आपला खरा चेहेरा तरी कसा आहे ? आजच्या जगात माणसाकडे चेहेरा उरलेला नाही पण त्याच्याकडे मुखवटे मात्र भरपूर आहेत असा एक भास होतो. टी.व्ही. म्हणजे एक सतत बदलणाऱ्या गोष्टींचा हलता पडदा, किंवा दुसऱ्या शब्दांत सांगायचं झालं तर, टी.व्ही. म्हणजे असं एक स्वत:बद्दलचं चित्र जे आपण त्या त्या प्रेक्षकांना दाखवू इच्छ्छितो. कॅमेरा म्हणजे हालचाली टिपून घेणारा मेंदू. आपल्या प्रतिनिधीच्या मनातले विचार आणि त्याची इतरांनी घेतलेली दाखल ह्यावर ही कथा बेतली आहे.
गजा कलर TV च्या दुकानात गेला. सगळे TV चालू होते. कोणीही प्रेमळ नव्हतं. कोणी निरागस नव्हतं. TV वरच्या कार्यक्रमात गर्दी होती. गर्दीतही माणसांचे TV आणि तेही सगळे चालू.
तो आत गेला.
" चालू TV बंद पडत नाहीत. आमच्याकडे कधी वीज जात नाही. TV वरचे कार्यक्रम ठरलेले. त्यात तीच गर्दी आणि त्याच गर्दीतले तेच चालू TV. बरं, TV बरोबरच आमच्याकडे कॆमेरे आहेत. मुखवट्यांचे फोटो उत्तम प्रकारे काढून मिळतात....... काय म्हणता, माणसांचे फोटो नाही का मिळत ? अहो मिळतात ना, पण काय हो, तुम्हाला कसं कळतं की कोणता माणूस आणि कोणता मुखवटा ? "
" आणि काय म्हणता, मुखवट्याच्या रंगात थोडा फरक आहे? शक्य नाही, म्हणतात या कंपनीच्या मुखवट्याने कधी माणूस बनवलेला आहे. "
" बरं चला, दया माया वगैरे सगळं TV मधे पाहून घ्या, नंतर स्टुडियो मधे गर्दी नको. पुढचे सुद्धा TV अजून यायचे आहेत. त्यांनाही कॆमेरे दाखवायचे आहेत. आणि शिवाय या दुकानानंतर उरलेल्या दुकानांनाही वेळ आहे. "
" तुम्ही मात्र जरा वेगळेच दिसता. डोळे रोखून मुखवट्याकडे पाहता. अहो, इतकेच जर प्रश्न असतील ना, तर स्वत: च्या TV मधे पहा......."
गजा गर्दीत परतला. सगळ्या गोष्टी टिपणाय्रा CAMERA नं त्यालाही टिपलं. मुखवट्याचे डोळे मिटले. आकाशावर आभाळ आलं
No comments:
Post a Comment