(भाग १)
अजून बरोब्बर एका महिन्याने जून महिन्याच्या दुसऱ्या शुक्रवारी (ता. ११), वैशाख कृष्ण अमावास्येच्या अतिशय उच्च मुहूर्तावर फुटबॉलच्या महाकुंभमेळ्याची सुरुवात होत आहे. दक्षिण आफ्रिका देशातील 'लीम्पोपो' आणि 'ऑरेंज' नद्यांच्या काठी सर्व फुटबॉल भाविक या दशकातल्या शेवटच्या महाकुंभमेळ्यासाठी एकत्र जमणार आहेत. दक्षिण आफ्रिका आणि मेक्सिको या दोन देशातील सामन्याने सुरुवात होणाऱ्या या कुंभमेळ्यात अनेक देशांचे संघ सहभागी होणार आहेत. खऱ्या अर्थाने जागतिक असलेला हा खेळ आणि त्या खेळाची ही सर्वोच्च स्पर्धा! प्रत्येक सर्वोत्तम संघ यात सहभागी होतायेत. गत-विजेते इटली, उप-विजेते फ्रांस यांच्या बरोबरीने जर्मनी, ब्राझील, आर्जेन्टिना, स्पेन, पोर्तुगाल असे दिग्गज संघ, आणि आयवरी कोस्ट, दक्षिण कोरिया, यांच्यासारखे 'डार्क हॉर्स', आणि दक्षिण आफ्रिका, उत्तर कोरिया सारखे नवखे संघ... एकूणच धक्कादायक निकाल नोंदवण्याची क्षमता असणारे हे संघ स्पर्धेतील चुरस वाढवणार हे नक्की!
फुटबॉल इतका लोकप्रिय का?? कदाचित याचं उत्तर याच्या साधेपणातच आहे. एक फुटबॉल, थोडेफार भिडू लोक, आणि भरपूर धावायचा उत्साह इतक्या स्वस्त भांडवलावर आधारलेला हा खेळ जागतिक नसता तरच नवल होतं. आता आपल्याकडचे विट्टी-दांडू, गोट्या, भोवरे हे खेळ अति-स्वस्त आणि अति साधे असूनही जागतिक का झाले नाहीत हा एक विचार करण्यासारखा प्रश्न आहे. क्रीडा-मंत्रालय आणि तज्ञ लोक याकडे लक्ष देतील काय? (पुणेरी पाटी: कृपया आपापले विचार मांडावेत, भांडू नये; अन्यथा नारळ दिला जाईल!)
फुटबॉल हा आमचा अतिशय आवडता खेळ असून एके काळी काही फुटबॉल आम्ही चरणस्पर्श करून धन्य केल्याचे आम्हास स्मरते आहे. तसेच श्री. अनुप बडवे यांनी न आणल्यामुळे हरवलेल्या फुटबॉलचे स्मरण होऊन या क्षणी आमचे डोळे पाणावले आहेत. एरवी हजार लाथा खाऊनही ढिम्म असणाऱ्या त्या फुटबॉलची 'मालक विसरोनी गेला' या दु:खापायी अक्षरश: हवा निघून गेली असेल. ऐन पावसाळ्यात सर्वत्र सोसायटीच्या ग्राउंडवर खेळलेले काही अविस्मरणीय सामने आठवून हसू देखील येत आहे. एका डोळ्यात आसू आणि दुसऱ्या डोळ्यात हसू असे तिरळे भाव घेऊन हा लेख लिहायला घेतला आणि जुन्या आठवणी ताज्या झाल्या.
या फुटबॉलची गोडी लावण्याचे पवित्र कार्य केलं ते धनंजयरावांनी. धनंजयने फुटबॉल, बॅडमिंटन, क्रिकेट वगैरे माहिती असणाऱ्या सगळ्या खेळात बालपणीच प्राविण्य मिळवून अभ्यासाशी काडीमोड घेतला होता हेसुद्धा जाता-जाता नमूद करावेसे वाटते. असो. विषय फक्त फुटबॉल असला आणि प्रयत्न वर्ल्डकपची माहिती द्यायचा असला तरी फुटबॉल हा खेळण्याइतकाच दर्शनीय, श्रवणीय, आणि चर्चनीय अनुभव आहे. आणि हे सगळं करण्यासाठी तज्ञ मित्रांची अतिशय गरज असते. तज्ञ मित्रांनासुद्धा गुमान ऐकणारे श्रोते हवेच असतात.
तर, सुरुवात अशी होते. काळ: इसवी सन १९९४. स्थळ: श्री. अनुपरावजी बडवेसाहेबांच्या घराचा दिवाण-खाना. वेळ: फिफा-१९९४ 'वर्ल्डकप इन अमेरिका' ची फायनल. सगळी अमेरिका, ब्राझील, इटली आणि उरलं-सुरलं सगळं जग डोळ्यात प्राण आणून रॉबर्टो बॅजिओला बघत होतं. काहीश्या निरस फुल-टाईम नंतर पेनल्टी शूट-आउटचा खतरनाक खेळ. म्हणजे पेनल्टी गोलात गेली तर हिरो, नाहीतर झिरो! पहिली पेनल्टी दोन्ही संघांच्या खेळाडूंनी मिस केली. मग सलग २ पेनल्टी गोलात गेल्या. २-२ अश्या गोल-बरोबरीनंतर इटलीची एक किक मिस झाली. ब्राझीलच्या कॅप्टनने (डुंगा त्याचं नाव) चौथी पेनल्टी नेम धरून गोलात मारली. आता ब्राझील कडे ३-२ चा लीड होता. इटलीचा कॅप्टन आणि 'भरवश्याचा खेळाडू' अशी ख्याती असणाऱ्या रॉबर्टो बॅजिओने चक्क एक उंच झाड लावलं! त्याची किक गोल वरून मागे प्रेक्षकात निघून गेली आणि संपूर्ण स्टेडीयम "ब्राझील ब्राझील " जयघोषात जे काय न्हाऊन निघालंय महाराजा. अशा वेळी झालेला 'फुटबॉलु' चा 'आनंदू' माझे मुखी काय वर्णू?
त्यानंतरचा १९९८चा 'सबकुछ झिदान' वर्ल्डकप, २००२चा ब्राझीलने विक्रमी पाचव्यांदा जिंकलेला वर्ल्डकप, २००६चा जर्मनीमध्ये झालेला आजपर्यंतचा सगळ्यात भव्यदिव्य वर्ल्डकप! प्रत्येक वर्ल्डकप संपताना एक आठवण मागे ठेवून गेला. यातली सगळ्यात ठळक आठवण म्हणजे २००२ मध्ये वर्ल्डकप फायनल हरल्यावर गोल-पोस्टला टेकून हताशपणे रडणारा ऑलिवर कान. कान या वर्ल्डकप मध्ये जर्मनीचा कॅप्टन होता, आणि पूर्ण स्पर्धेत त्याने एकच गोल खाल्ला होता. पण शेवटच्या सामन्यात परिस्थिती थोडी बिकट होती. एक तर जर्मनीचा मातब्बर मिड-फिल्डर बॅलाक दोन यलो-कार्ड मिळाल्यामुळे बाहेर होता. आणि ब्राझीलचे खेळाडू कडक फॉर्मात होते. त्यांनी कानची अभेद्य समजली जाणारी जर्मन भिंत २ गोल ठोकून पुरी नेस्तनाबूत करून टाकली आणि त्याचबरोबर वर्ल्डकप जिंकायचं कानचं स्वप्नसुद्धा नेस्तनाबूत झालं. एरवी सिंहासारख्या गर्जना करणाऱ्या कानला असा सर्वस्व लुटून गेल्यासारखं रडताना पाहून जाम वाईट वाटलं होतं. आणि दुसरी आठवण म्हणजे २००६ च्या वर्ल्डकप फायनलमध्ये झिदानने 'हेड-बट' करून हाराकिरी केली ती. झिदान हा फ्रांसचा आधारस्तंभ! पण फायनलमध्ये त्याचा राग अनावर झाला आणि त्याने इटलीच्या मॅटेराझ्झीला डोक्याने जोरदार धडक देऊन पाडलं. साहजिकचं साहेब रेड-कार्ड घेऊन बाहेर गेले, आणि फ्रांस हरला.
(मला स्वत:ला जर्मन टीम अतिशय आवडते. एक अतिशय कट्टर जर्मन समर्थक म्हणालात तरी हरकत नाही. वारा फिरेल आणि गोल होईल तसा पाठींबा बदलणाऱ्यातले आम्ही नाही. 'फर्स्ट लव्ह' जर्मनीला आमचा सनातन काळापासून पाठींबा आहे, आणि तो यापुढेही कायम राहील अशी ग्वाही आम्ही सर्व जर्मन-समर्थकांना याआधीच दिलेली आहे.)
फुटबॉलचा उत्साह, माझ्यासारखेच फुटबॉलवेडे असणारे माझे मित्र, आणि अजिबात कुरकुर न करता आम्हाला दंगा करू देणारे आमचे पालक यांच्यामुळे माझा प्रत्येक वर्ल्डकप साजरा झालाय. माझ्या आजपर्यंतच्या फुटबॉल प्रवासात अनेक नवीन मित्र मिळाले. कुणाला फुटबॉल कळायचा, कुणाला नाही, कुणाला प्रचंड आवड तर कुणाला पुरेपूर उत्सुकता, कुणी त्याचा आवडता देश जिंकावा म्हणून देवाला नमस्कार करून सामने पाहायला बसतोय अशा हवश्या, नवश्या, गवश्या मित्रांबरोबर मी आता माझ्या पाचव्या वर्ल्डकपसाठी सज्ज होतोय. गेल्या वर्ल्डकपच्या फायनलच्या वेळचा स्मिताचा चकित करून टाकणारा उत्साह आणि पुष्करची फुल-टाईम धमाल कॉमेंटरी हे वर्ल्डकपइतकच रंगतदार होतं. तसाच अनुप आणि सारंगने झोपेत पाहिलेली फायनल असंही या फायनलबद्दल सांगता येईल. या वर्षी मात्र जनता जमवून वर्ल्डकप पाहता येणार नाही याचा अतोनात दु:ख आहे. राणीच्या देशात कमतरता कशाची असेल तर मित्रांची. तरी सुद्धा वर्ल्डकप पाहून त्यावर सविस्तर चर्चा करायचं मात्र आम्ही बंद करू शकत नाही.
धनंजयरावांनी यावेळी स्पेनचं पारडं जड असल्याचं सप्रमाण सिद्ध केल्याने आता विजेतेपदाच्या स्पर्धेत जर्मनी बरोबरच स्पेनचाही विचार करावा लागेल. आणि इटली, ब्राझील, फ्रांस, आर्जेन्टिना हे अतिशय ताकदवान संघ आहेत. काही नवखे वाटणारे संघ धक्कादायक निकाल नोंदवू शकतात. मात्र, इंग्लंडची अजिबात काळजी नाही, कारण वर्ल्डकप मध्ये सुमार खेळ करायचं त्यांचं फार जुनं धोरण आहे, आणि ते यावेळीही तसंच करतील यावर माझा पूर्ण विश्वास आहे.
धनंजय, अनुप, सारंग, आणि स्मिता हे यावेळच्या वर्ल्डकपचे उत्साही पार्टनर आहेत. तुम्हीसुद्धा वर्ल्डकप पहा, आणि एन्जॉय करा! माहितीची गरज काही अंशी पूर्ण करायचा मी प्रयत्न करेन. पुढच्या वेळी या स्पर्धेत भाग घेणारे संघ आणि त्यांचे ड्रॉ यांची माहिती पाहूयात!
जाता जाता: ही लिंक नक्की पहा! फिफा वर्ल्डकपचं गाणं आहे हे!!
क्रमश:
No comments:
Post a Comment