Sunday, May 30, 2010

उद्विग्न!

आज नेट वर सर्फिंग करताना एक लिंक मिळाली. २६/११!

मुंबई हल्ल्याच्या एका वर्षानंतर बनवलेली ही फिल्म! फक्त १० लोक येतात काय आणि ३ दिवस सगळा देश धारेवर धरतात काय? १७० लोक या हल्ल्यात बळी पडल्याचा सरकारी आकडा आहे, आणि ४०० लोक जखमी झाल्याचा. इतका सगळा आगीचा आणि रक्ताचा खेळ मांडला होता यांनी आणि लष्कराची कुमक यायला २४ तास लागले. सी.एस.टी. वर, ताज हॉटेल मध्ये, ट्रायडेंट, लिओपोल्ड मध्ये, नरीमन हाउस मध्ये आपले पोलीस रक्त सांडून सांडून शहीद झाले, तेव्हा आपले गृहमंत्री हायकमांडच्या निर्णयाची वाट पाहत होते. मन शब्दश: उद्विग्न झालं हे सगळं पाहून!
आपला देश इतका पुढारलेला, 'इंडिया शायनिंग'वाला, मग आपल्याकडे या गोष्टी कशा होतात? मुंबई मध्ये हे एकदा झालं, काश्मीर मध्ये तर रोजचंच आहे. २०-२५ वर्ष झाली तिथे हे असलं सगळं चालू आहे, आणि आपण काही नाही करू शकत? का? का नाही आपल्या पोलिसांना संरक्षणाची आणि स्व-संरक्षणाची पुरेशी साधनं मिळत? का त्यांची अशी बिनकामाची धावपळ होते? गणपती मध्ये यांनी राबायचं, आय. पी. एल. च्या सामन्यासाठी यांनीच सुरक्षा यंत्रणा उभी करायची, चोर, दरोडे, लुटमार, आणि अजून असले असंख्य गुन्हे यांनीच हाताळायचे, दहशदवादी आले, तरी त्यांच्याशी यांनीच लढायचं, तेही जुनाट बंदुका, फडतूस पिस्तुलं, आणि काठ्या घेऊन, हे सगळं करताना मरावं लागलं तरी बेहत्तर! आणि इतकं सगळं करून नंतर हे शिव्यांचे धनी! आज किती लोक असे आहेत, ज्यांना रस्त्यावर पोलिसाने लायसन्स मागितल्यावर 'साला, आता हा लुटणार' असा वाटतं? कधी हा विचार मनात येतो का, की कदाचित हि एखादी शोध-मोहीम असू शकते. मान्य आहे की शक्यता कमीच असते, पण त्या १% शक्यतेवर आपल्यातले १% लोक तरी विचार करतात का? मग पोलिसांना शिव्या देण्यात काय अर्थ आहे? आज ही लिंक पाहून खूप काय काय मनात येऊन गेलं. आय. पी. एल. चालू होती, तिथे असे हजारो पोलीस गुरासारखे राबले, पण आपण अक्षरश: सगळं विसरून परत त्यांना मिस-मॅनेजमेंट साठी शिव्या देणार.
पोलीस तरी कुठे कुठे पुरे पडणार? शशांक शिंदे, तुकाराम ओंबाळे, कामटे, साळसकर यांनी आपलं आयुष्य काय असंच दान केलं की काय असा प्रश्न पडण्यासारखं वातावरण अजून आहे. आजही तो हरामी कसाब जिवंत आहे, आणि आपलं षंढ सरकार आणि आंधळी न्याय-व्यवस्था त्याला पोसते आहे. आता निकाल लागायला १.५ वर्ष लागण्यासारखं या केस मध्ये काय आहे, किवा सरकारी वकिलांनी ही केस इतक्या हलगर्जीपणे तयार केली आहे की ज्यात आरोपीच्या वकिलाला 'आरोपीला जन्मठेप मिळावी, त्याच्या कमी वयाचा मानवतेच्या दृष्टीकोनातून विचार व्हावा' असं म्हणायचा चान्स मिळावा? सगळं सूर्यप्रकाशाइतकं स्वच्छ असताना देखील कसाब हा अजून जिवंत कसा राहू शकतो? आता त्याला फाशी सुनावली आहे त्याबद्दल माननीय न्यायाधीशांचे शतश: आभार, पण आता हाय-कोर्ट, सुप्रीम-कोर्ट, मग आपले 'दयावंत' राष्ट्रपती इतक्या सगळ्यातून जायला अजून २-३ वर्ष सहज लागतील! कसाबला पाळणाघरात ठेवायचा खर्च ३१ कोटी आहे. अजून ३-४ वर्ष म्हणजे साधारण अजून फक्त ८०-८५ कोटी लागतील. तेही आपणच देणार आहोत, कारण आपण करदाते आहोत. अफजल गुरुला फाशीची शिक्षा सुनावली त्याला वर्ष लोटून गेली, अजून त्याला फाशी देत नाहीयेत, मग कसाबला फाशी सुनावल्यावर त्याचा नंबर कधी लागायचा? आणि उद्या अफजल गुरूसारखाच कसाबनंदेखील दयेचा अर्ज दाखल केला तर मग फक्त 'नैसर्गिक' मृत्यूच त्याला सोडवू शकेल असं म्हणावं लागण्याइतकी बेकार परिस्थिती आहे. संसदेवर हल्ला करण्याचा मुजोरपणा करणाऱ्या अफजलच्या दयेच्या अर्जावर विचार करायला राष्ट्रपतींना इतका वेळ का लागावा? ह्या मुद्द्यावर विचार करायला त्यांच्याकडे वेळच नाहीये का? त्यांना या मुद्द्यावर विचार करायला आपल्या गृहमंत्रालयाने हा मुद्दा त्यांच्याकडे पाठवला तरी आहे का? जर संसदेवरच्या हल्ल्यात कोणी सांसद जखमी झाला असता, किंवा त्याच्या जीवाचं काही बरवाईट झालं असतं तर अफजल इतके वर्ष जिवंत राहिला असता? किंवा ताज/ट्रायडेंट मध्ये एखादा 'बिगशॉट' चचला असता तर कसाबची केस अशीच लांबली असती? 'नेत्यांना एक न्याय आणि सामान्य जनतेला केवळ अन्याय' हे तर आपलं अलिखित सरकारी धोरण आणि आपल्या राज्य-घटनेचं दु;ख आहे. देशाच्या सुरक्षेशी थेट संबंध असलेल्या ह्या विषयांवर सरकारशी भांडायला आपल्या नेत्यांना वेळ का मिळू नये? थरूर आणि मोदी नावाच्या मस्तवाल खोंडात चाललेली साठमारी चर्चायला फक्त लोकसभाच उरली होती, तिथेही असल्या नासक्या मुद्द्यावरून गुद्दागुद्दीची वेळ यावी? नेतेमंडळींचं जाऊ द्या, ज्या हिणकस बुलेट-प्रुफ जॅकेटमुळे करकरेंचा मृत्यू झाला, ते जॅकेट कचराकुंडीत सापडलं. का, तर म्हणे हॉस्पिटल मधल्या कुणा कर्मचाऱ्याने 'चुकून' फेकलं होता. व्वा! आणि त्यावर जोरदार चर्चा करून नवीन अत्याधुनिक जॅकेट घ्यायचा मानस मुख्यमंत्र्यांनी बोलून दाखवला, त्या जॅकेटची खरेदी अजून झालीच नाहीये. कारण तसल्या जॅकेटना फार खर्च येतो म्हणे. साधारण २.५ लाखाचं एक जॅकेट आहे. जर ते महाग तर मग कसाब काय फुकट आलाय का? की आपल्या परम-मित्र शेजाऱ्याने आंदण म्हणून धाडलाय? आणि तरीसुद्धा आपली अर्थ-व्यवस्था विकासाच्या मार्गावर आहे म्हणे! अरे, जिथे गरजेच्या गोष्टी विकत घ्यायला पैसे पुरत नाहीत, तिथे कसल्या विकासाच्या गप्पा करता? की विकास फक्त पैसे उडवण्यात आहे? दंतेवाडामध्ये ७७ जवान शहीद झाले, पण कुणाला फरक पडला? विरोधी पक्षांनी गृहमंत्र्यांचा राजीनामा मागितल्यासारखं केलं, गृहमंत्र्यांनी राजीनामा दिल्यासारखं केलं, पंतप्रधानांनी तो नाकारल्यासारखं केलं. पुन्हा परिस्थिती 'जैसे थे'! असं का? मग गृहमंत्र्यांनी 'नक्षलवाद संपवण्याची' घोषणा केली. नक्षलवाद संपवला पाहिजे हा साक्षात्कार सरकारला होण्यासाठी ७७ जणांनी हौतात्म्य पत्करावं का? आणि इतकं होऊनही नक्षलवाद मिटवण्यासाठी काही ठोस पाऊल उचलल्याचं ऐकिवात नाही. का? बंदुकीच्या जोरावर मुद्दा संपवायची भाषा करून काही उपयोग नाही हे आमच्या 'अर्थ-तज्ञ' गृहमंत्री आणि पंतप्रधानांना कळत नसेल काय? नक्षलवादाचा मुद्दाच मुळी निखळ दारिद्र्यातून जन्माला आलाय, त्यावर या उधळपट्टी करीत 'विकासाच्या' मार्गावर चालणाऱ्या 'गरीब' देशात काय आणि कसा उपाय निघणार? स्वातंत्र्यानंतर मिळालेली निष्क्रिय धर्म-निरपेक्षता, आणि आताची अमर्याद सहनशीलता - या असल्या कुबड्या घेऊन आपला देश एक पाऊलही पुढे जाऊ शकणार नाहीये याची जाणीव कधी होणारच नाही का? पेशन्स संपायच्या आत काहीतरी चांगलं घडावं अशी किमान अपेक्षा सामान्य नागरिकाने मनात बाळगूच नये का? की जे काही चाललंय त्याकडे डोळे विस्फारून पाहण्यापलीकडे आपण काहीही करू शकत नाही ही अगतिकताच आता मानसिकता म्हणून स्विकारावी? असं गुमान सगळं सोसण्यापलीकडे आपण काहीच करू शकणार नाही का? जिथे देशाच्या सार्वभौमत्वालाच काळिमा फासणाऱ्या घटना घडतायेत आणि त्यावर कुठलीही ठोस कारवाई कारण सरकारला जमत नाहीये, तिथे असल्या समस्यांकडे कोण लक्ष देणार? 'आम्ही ह्यांव करू, आम्ही त्यांव करू' असल्या फालतू गप्पा आणि घोषणा यापलीकडे कोणीही काहीही करत नाहीये.
हे सगळं माझ्याच देशात का घडावं? इतके सगळे प्रश्न माझ्याच देशात का जन्माला यावेत? आणि त्यांच्या उत्तरांऐवजी अजून प्रश्नच का समोर यावेत? ही हजारो प्रश्नांची कहाणी कधी सुफळ संपूर्ण होणार?

Wednesday, May 26, 2010

मला काय आवडतं?

मला बरंच काय काय आवडतं.
मला लोळायला खूप आवडतं.
लोळता-लोळता पुस्तक वाचायला खूप आवडतं. मला बसून, उभ्याने, प्रवासात, ऑफिसमध्ये, शाळेत, कॉलेजात - सगळीकडे पुस्तक वाचायला खूप आवडतं.
क्रिकेटची मॅच बघायला आवडतं. वन-डे मॅचमध्ये ओवर २५ नंतर ओवर ४० पर्यंत मी एखादा पुस्तक घेऊन बसतो. कारण मॅचमधला सगळा रटाळपणा तेव्हाच चालू असतो.
मला फुटबॉलची मॅच पाहायला खूप आवडतं. दीड-दोन तास एकाच जागी गुमान बसायचे असे प्रसंग फार थोडे आहेत. फुटबॉलची मॅच चालू असताना धनूला फोन करून मॅच बद्दल सविस्तर आणि बाकी अवांतर चर्चा करायला फार आवडतं.
मला कुठलाही खेळ पाहायला आवडतो. मला कार्टून्स पाहायला खूप आवडतं. मला पिक्चर पाहायला आवडतात. मला हळू आवाजात गाणी ऐकायला आवडतात.
मला मित्र जमवून दंगा घालायला फार आवडतं. धनूच्या गाडीतून रात्र-रात्र भटकायला आवडतं. स्वत:ची सगळी गुपितं आणि अनुभव शेअर करायला याहून सेफ जागाच नाहीये असं वाटतं. मग पहाटे पहाटे 'स्वीकार'चे पोहे; वा!
मला फोनवर बोलायला आवडतं. मुद्दलात मला बोलायलाच फार आवडतं. त्यामुळे समंजसपणे माझी बडबड ऐकणारे दर्शनसारखे मित्र मला खूप आवडतात. धनू आणि सारंगशी वाट्टेल तेव्हा वाट्टेल त्या विषयावर गप्पांचं गुऱ्हाळ लावायला जाम आवडतं.
अनुपबरोबर 'क्रिकेट' या देशव्यापी विषयावर अतिशय गंभीरपणे बोलायला आवडतं. अनुपच्या बाईकवर बसून झुंsग फिरायला आवडतं. लोक कितीही शिव्या देवोत, मला त्याचं ड्रायव्हिंग जाम आवडतं. आणि इतकं आवडूनही त्याच्या ड्रायव्हिंगबद्दल कंड्या पिकवायलाही खूप आवडतं.
योगेश भेटला की मला 'बाजारबुणग्या ' म्हणतो. मी पण त्याला 'बुजगावण्या' म्हणतो. मग आम्ही दोघं एकमेकांना १५-२० वेळा तरी असंच म्हणून घेतो. मस्त वाटतं एकदम!
मला खेळायला आवडतं. बॅडमिंटन, फुटबॉल, क्रिकेट, पत्ते सगळं सगळं खेळायला आवडतं. मला जिंकायला पण खूप आवडतं. मी आणि धनू बॅडमिंटनमध्ये अनुप आणि सारंगला हरवतो तेव्हा आरडा-ओरडा करायला आवडतं. आणि हरलो तरीपण खुन्नसमध्ये पुढची मॅच खेळायला खूप आवडतं! अशा वेळी 'आता हरलो तर कुणाला तोंड दाखवायला जागा उरणार नाही' असं एक वातावरण तयार होतं, मला ते टेन्शन आवडतं! त्या वेळी एकेका पॅाइंट वरून भांडाभांडी करायला आवडतं.
अमृताबरोबर पुस्तकांबद्दल बोलायला खूप आवडतं. आम्ही वाचलेली पुस्तकं, मी वाचलेली पुस्तकं, तिने वाचलेली पुस्तकं, त्याचं डिस्कशन. अनेक कंगोरे असलेले विषय असतात. एखाद्या पुस्तकाची सगळी ष्टोरी देखील काही वेळा एकमेकांना सांगितली आहे. मला ते पण खूप आवडतं.
मला स्मिताबरोबर कुठल्याही गप्पा मारायला आवडतं. मजाच येते एकदम! मग त्या गप्पा आठवून-आठवून हसायला आवडतं!
मला श्वेताला चिडवायला आवडतं, मग ती पण खोटं खोटं चिडते, सगळी गम्मतच! तिच्या डॉक्टरकीला आणि तिच्या साबुदाण्याच्या गोळ्यांना चिडवायला मला आवडतं बुवा. मग ती मला चुकीच्या गोळ्या देऊन आजारी पाडायच्या धमक्या देते ते पण आवडतं.
मला श्रद्धाला त्रास द्यायला खूप आवडतं. खूप म्हणजे खूपच! तिच्याशी भांडायला पण खूप आवडतं. सगळी भांडणं करून ती गाल फुगवून बसली की तिच्याकडे बघून हसत बसायला आवडतं. मग मी असा हसायला लागलो की ती 'माझा भाऊ अतिशय नालायक आहे' असा चेहरा करते, मग तर मी पोटात स्फोट झाल्यासारखा हसायला लागतो. मला ते पण खूप आवडतं.
मला बाबांशी घरातल्या प्रत्येक विषयावर बोलायला आवडतं. मग तो विषय नवीन टूथ-पेस्ट आणण्यापासून ते नवीन घर घेण्यापर्यंत कुठलाही असो. मला आवडतं. बाबा माझं ऐकून घेतात तेच मला जाम भारी वाटतं!
मला माझी आई खूप आवडते. तिच्या मांडीवर डोकं ठेवून लोळत टी. व्ही. पाहायला मला खूप आवडतं. ती जेव्हा डोक्याला तेल लावून देते तेव्हा तिथेच झोपून जायला खूप आवडतं. आईच्या सगळ्याच गोष्टी मला आवडतात.
मला आजीला नमस्कार करायला आवडतं. नमस्कार करायला वाकलो की ती पाठीवर जोरात शाबासकी देते ते मला खूप आवडतं. ती माझ्या गालावर हात फिरवून आशीर्वाद देते तेव्हा मला फार मस्त वाटतं; म्हणजे पोटातून एकदम असं उबदार फिलिंग येतं.
आशुला फोन करून नवीन गाणी आणि कविता चघळायला खूप आवडतात. आम्ही दोघं तासनतास बोलत बसतो, विषय नुसते आकाशातल्या ढगांसारखे इकडून तिकडे भटकत असतात. मला ते फार आवडतं.
अवनी आणि रीधूशी खेळायला खूप आवडतं. रीधू जेव्हा पाठीवर किवा पोटावर बसून उड्या मारते तेव्हा खूप मजा वाटते. मला रीधूचं बोट पकडून फिरायला जायला खूप आवडतं.
मला ऑफिसला जायला आवडतं. ऑफिसमधल्या कुठल्याही गप्पांचा शेवट अनुपला चिडवण्यात करायला जाम मजा येते. वैभवला 'भूभू' म्हणायला आवडतं. अनुप, वैभव आणि संदीपबरोबर जाऊन त्या 'उपाला' नावाच्या लोकोत्तर टपरीमध्ये ऑम्लेट खायला खूप आवडतं. दीपेनबरोबर टाईमपास करायला आवडतं. आम्ही नवीन पुस्तकं, सिनेमे, टेनिस, क्रिकेटच्या गप्पा मारत बसतो, मला ते खूप आवडतं. टपरीवर जाऊन चहा प्यायला आवडतं. निवेदिताला त्रास द्यायला आवडतो. रश्मीला चिडवायला आवडतं.
मला संदीपच्या घरी जाऊन टाईमपास करायला खूप आवडतं. सोनू काय मस्त चहा बनवते. ते दोघं मधेच काश्मिरीमधून बोलतात. ते काय बोलत असतील याचे तर्क लावायला खूप आवडतं.
गोलू, सँडी, केतन बरोबर टवाळक्या करायला खूप आवडतं. मी आणि केतन बाईक्सवरून एफ. सी. रोडवर भटकायला जातो ते खूप आवडतं. मी आणि गोलू खूप वेळा खूप सिरीयस चर्चा करतो ते पण मला आवडतं. आम्ही सगळे मिळून गणूची शाब्दिक धुलाई करतो ते पण आवडतं!
काय सांगू आणि किती सांगू? थोडसंच सांगितलं आणि खूप काय काय राहून गेलं. मला सगळंच खूप आवडतं. इतक्या सगळ्या आवडणाऱ्या गोष्टी आहेत माझ्याकडे, माझी मजा आहे एकूणच!!!

Tuesday, May 25, 2010

फुगेवाला

प्रत्येक माणूस एक फुगा घेऊन जन्माला येतो. इगोचा फुगा! बालवयात तो न फुगलेल्या अवस्थेत असतो. पण जसं जसं कळायला लागतं तशी तशी त्या फुग्यात हवा भरायला सुरुवात होते...

३री-४थीत असताना ‘अरे, तो ‘ढ’ मुलगा आहे. त्याला नको आपल्या ग्रुपमधे घ्यायला.’ असं कधी आपण मित्रांना म्हणतो. आता हे चूक की बरोबर हा भाग बाजूला ठेवूयात. पण तो मुलगा ‘ढ’ वाटतो कारण आपण स्वतःला हुशार वाटत असतो. आणि आपण हुशार का, तर आपल्याला परीक्षेत जास्त मार्क असतात! म्हणजेच ‘sense of achievement’ आपली ‘image’ तयार करत असते. आपल्या इगोच्या फुग्यात हवा भरत असते. प्रत्येक achievement बरोबर, प्रत्येक झालेल्या कौतुकाबरोबर हवा भरली जाते.

आता achievement किंवा केलेलं कौतुक हे अभ्यासातल्या हुशारीपुरतंच मर्यादित नसतं. कोणी खेळात पुढे असतं, कोणी कुठल्या कलेत पुढे असतं, तर कोणी सगळ्यांकडून ‘गुणी मुलगा’ अशी पदवी मिळालेलं असतं! आणि या प्रत्येक माध्यमातून फुगा फुगवला जात असतो. त्यामुळे होतं असं, की जेव्हा ९वी-१०वी येते, तेव्हा प्रामुख्याने मुलांचे ३ गट पडलेले असतात. पहिला गट असतो हुशार मुलांचा! या गटात ५-६ मुलं असतात. त्यांच्यात पहिल्या तीनात नंबर येण्यासाठी चुरस असते. आपलं करियर उत्कृष्टच होणार असा विश्वास त्यांचा फुगा त्यांना देत असतो आणि वर्गातल्या बाकीच्या मुलांची नाही म्हटलं तरी त्यांना थोडीफार कीव येत असते. दुसरा गट असतो ‘हिरो’ मुलांचा! जे खेळात नाहीतर ‘Extracurricular activities’ मधे पुढे असतात आणि अभ्यासात बऱ्यापैकी असतात. त्यांचा फुगा त्यांना सांगतो की ही पहिली पाच मुलं म्हणजे फक्त पुस्तकी किडे आहेत! पुस्तकं चावून आयुष्यात काही होत नसतं. सर्वांगाने विकास झाला पाहिजे. तुम्हीच खरे ‘हिरो’ आहात! आणि तिसरा गट असतो थोडा आत्मविश्वास कमी असलेल्या मुलांचा. त्यांच्या achievements तशा कमी असतात. कौतुकही कदाचित फारसं झालेलं नसतं. त्यांच्या फुग्यात खूप कमी हवा असते. त्यामुळे त्यांचे फुगे काही बोलण्याच्या अवस्थेत नसतात!

पुढे कॉलेजमधे गेल्यावर कला-गुणांना व्यक्त करायला मोठा मंच मिळतो. तिथे फुगे फुगतात. काही मुली सौंदर्याच्या जोरावर किंवा आपल्याला मुलं किती भाव देतात या गोष्टीमुळे हवा भरत असतात. कॉलेजच्या cultural ग्रुप मधल्या मुलांचे फुगे तर एवढे मोठे असतात की एखादा जुनियर, त्याला अनुभव नसल्यामुळे काही चांगलं करूच शकत नाही यावर त्यांचा गाढ विश्वास असतो! ऑफिसमधे बॉसच्या फुग्यात हवा असते ती त्याला मिळालेल्या खुर्चीमुळे. आणि ‘आपला बॉस बिनडोक आहे. फक्त अनुभवाच्या जोरावर आज तो तिथे आहे.’ असा विचार जो जुनियर लोकांच्या मनात येतो, तो त्यांच्या फुग्यातल्या हवेमुळेच, नाही का!

हा इगोचा फुगा कधीकधी पंक्चर सुद्धा होतो! आपल्याला ज्या गोष्टीचा अभिमान आहे, त्याच गोष्टीत कोणी आपल्यापेक्षा श्रेष्ठ बघितल्यावर आपल्या फुग्याला भोक पडतं आणि हवा निघून जाते. पण निसर्ग तात्काळ आपल्याला पंक्चर काढून देतो आणि आपण पुन्हा त्यात हवा भरायला सज्ज होतो!

हाच फुगा कारणीभूत ठरतो नवरा-बायकोच्या ‘Classic’ भांडणांना! २ पिढ्यांपूर्वी बायका फक्त चूल आणि मूल करायच्या. तेव्हा फक्त पुरुषांच्या फुग्यात हवा असायची! नवऱ्याने उठ म्हटलं उठायचं आणि बस म्हटलं की बसायचं! पण आज मुली शिकल्या. मुलांच्या खांद्याला खांदा लावून achieve करायला लागल्या. आता दोघांचे फुगे फुगलेले असतात. त्यामुळे ‘एवढं असेल तर तू कर ना स्वयंपाक. घर सांभाळ. मी जाते फक्त कमवायला.’ किंवा ‘नेहेमी तुझाच मुद्दा कसा काय रे बरोबर असतो? भांडण तुझ्याच वाक्याने संपलं पाहिजे का?’ ही अशी वाक्यं हमखास बोलली जातात!

‘बघितलंस, तिने स्वत:हून ओळखही नाही दाखवली. मीपण नाही दाखवणार!’, ‘मी का सॉरी म्हणू? तो पण चुकलाय. माझं घोडं काही त्याच्यावाचून अडत नाही!’... ही सगळी त्या फुग्यातल्या हवेचीच करामत..!

पण जरा विचार केला तर लक्षात येईल की हा हवा भरलेला फुगा जगायला आवश्यक असतो. जर त्याची काही गरजच नसती, तर निसर्गाने माणसाला त्याच्या जन्माबरोबर तो दिलाच नसता. माकडाचा माणूस होताना जसं गरज नसल्यामुळे निसर्गाने शेपटी काढून घेतली, तसंच त्याला फुगाही काढून घेता आला असता. आणि त्या फुग्यात हवाही असणं महत्वाचं आहे. नाहीतर अवस्था ९वी-१०वीतल्या त्या तिसऱ्या गटातल्या मुलांसारखी होईल. हवा भरलेला फुगा आपल्याला आत्मविश्वास देतो. फक्त त्या भरल्या जाणाऱ्या हवेवर आपलं नियंत्रण हवं. कुठली आणि किती हवा भरावी हे आपणच ठरवायचं. पाय जमिनीवर राहिले पाहिजेत. फुग्यातल्या हवेने मनाला उभारी यावी, पण त्याच हवेने आयुष्य ‘पोकळ’ होणार नाही ना ह्याची काळजी आपण घ्यायची..

Friday, May 21, 2010

पहिलं प्रेम!

पहिलं प्रेम, म्हणजे ते 'First and Last' प्रेम नाही म्हणायचं मला. 'प्यार जिंदगी में सिर्फ एक ही बार होता है' वगैरे असली काही भानगड नाहीये ही! हे Love, 'Love at first sight' जरी असलं तरी ती अगदीच 'First sight' आहे हो! आपण त्याला भाबडं प्रेम म्हणूयात. शाळेत होणारं प्रेम! आता शाळेत म्हणजे ८ वी , ९ वी, १० वी नाही. कारण पहिली गोष्ट म्हणजे तेव्हा आपण भाबडे मुळीच नसतो! आणि दुसरं म्हणजे तेव्हा बोर्डाच्या परीक्षेची tensions वगैरे असतात. हे प्रेम, 'प्रेम कशाशी खातात' हेही कळायच्या आधीचं आहे! अगदी ३ री, ४ थीतलंच म्हणा ना...!

नवी कोरी वह्या-पुस्तकं आणि ती ठेवायला नवं कोरं दप्तर पाठीवर अडकवून आपण नवीन शालेय वर्षासाठी तयार होतो. पहिल्या दिवशी वर्ग भरतो आणि आपलं 'तिच्याकडे' लक्ष जातं. कडक इस्त्रीचा गणवेशाचा फ्रॉक, त्याला फ्रीलच्या फुगेदार बाह्या, खांद्यांपर्यंत लांब केस, डोक्यावर पांढरा hair-band, त्याला काळी क्लिप लावून त्यात ताज्या-टवटवीत मोगऱ्याच्या फुलांचा गजरा अडकवलेला, डोळ्यात काजळ घातलेलं..पापण्यांची नाजूक तर नाहीच नाही, पण अतिशय स्पीडात फडफड! गौर वर्ण..दोन्ही गालांवर छानशा खळ्या..आणि तोंडाची कधीही न थांबणारी बडबड! हे असं सगळं पाहताना, आपल्या बरगड्यांच्या पिंजऱ्यातल्या, हृदयाच्या पेटीतल्या, सगळ्यात आतल्या चोरकप्प्यात तिने क्षणार्धात जागा घेतली असते! आणि ती जागा एवढी लहान असते, की त्यात फक्त तीच मावू शकते. तिच्या वयाला, आडनावाला, आई-बाबांना त्यात मुळीच जागा नसते!

मराठीचा तास होतो, गणिताचा होतो, शास्त्राचा होतो, तरी अधून-मधून तिच्याकडे लक्ष जाणं काही थांबत नाही. मधल्या सुट्टीत ती डबा खायला बसते. डब्याखाली मस्त मोठ्ठा टर्किश कापडाचा नॅपकिन अंथरते आणि त्यावर डबा ठेवून मैत्रिणींशी गप्पा मारत मारत मधेच फिदीफिदी हसत डबा खाते. आपण तिच्या गप्पा ऐकायला गेलो, तर ऐकू येतं, " अगं काय गंमत झाली..आमच्या त्या शोभाताई आहेत किनई, त्यांच्याकडे किनई, छोटंसं कुत्र्याचं पिल्लू आहे! ते किनई.." आणि गप्पा ऐकून झाल्यावर आपण त्या ‘किनई’ शब्दाच्या प्रेमात पडलेलो असतो! आत्तापर्यंत आयुष्यात आपण ३-४ हिंदी सिनेमे पाहिलेले असतात. त्यामुळे 'हिरो', 'हिरोईन' या concepts अर्धवट का होईना कळलेल्या असतात. पण आपल्याला तिच्याकडे बघितल्यावर सिनेमातली नटी का आठवतीय, ते मात्र कळत नसतं..!

संध्याकाळी शाळा सुटल्यावर आपण घरी येतो. खांद्यावरचं दप्तराचं ओझं काढून, बूट न काढता तसेच आरशात बघायला जातो. तिथे वेगवेगळ्या प्रकारे हसायचा प्रयत्न करून, कुठेतरी छोटीशी तरी खळी पडतीय का.. हे बघत असतो! आईला कळत नाही, ह्याला एकदम काय झालं! मग आपणच आईला म्हणतो, "आई, सांग ना, मी असा मोठ्ठं हसल्यावर मला इकडे उजवीकडे खळी पडते ना?" आई बघते आणि म्हणते, "नाही रे.." "आई पडते ग..छोटीशी पडते.." मग आई विचारते, " काय रे, डबा खाल्लास का? आवडला का?" "हो खाल्ला. आई पण किती भंगार नॅपकिन दिलायस! हा नको मला." "अरे, नवीन आहे तो राजा.." "नाही ग आई. भंगार आहे तो. मला तो, तसा टॉवेलसारखा पंचा असतो बघ..आणि तो पंचा कापून नॅपकिन बनवतात..तसा दे..!”

काही दिवसांनी 'मुलं फार दंगा करतात' म्हणून बाई मुलं-मुलींना शेजारी बसवायचं ठरवून उंचीप्रमाणे उभं करतात. तिकडे पोरींचा कलकलाट सुरु असतो, 'शी बाई! नको हो बाई! बाई आम्ही शांत बसतो. मुलांमुळे आम्हाला का शिक्षा..?" आणि इकडे आपण पहिल्यांदाच गणपतीबाप्पाचा धावा करत असतो! पण आपलं नशीब कुठे आलंय एवढं चांगलं..! आपल्या शेजारी दुसरीच कुठलीतरी मुलगी बसते. 'ती' वर्गातल्या कुठल्यातरी 'ढ' मुलाच्या शेजारी बसलेली असते. आणि 'देवबाप्पाला कधीपासून 'ढ' मुलं आवडायला लागली?!' असा आपल्याला प्रश्न पडलेला असतो..

ती आपल्या शेजारी नसली म्हणून काय झालं..आपण स्वप्नांच्या नगरीत केव्हाच रममाण झालेलो असतो! 'समजा ती माझ्या शेजारी बसत असती आणि समजा लिहिताना तिच्या पेन्सिलीचं टोक तुटलं आणि तिच्याकडे दुसरी कुठलीच पेन्सिल नसली..तर मी माझ्या कंपासच्या खालच्या कप्प्यात ठेवलेली, माझी सगळ्यात लाडकी पेन्सिल तिला लिहायला देईन!' आपणही कधी ती लाडकी पेन्सिल वापरत नसतो! जणू तिच्यासाठीच ती जपून ठेवलेली असते..संध्याकाळी मित्रांबरोबर घरी जाताना रस्त्यात चिंचा घ्यायला आपण थांबतो. एक रुपयाचा सगळ्यात मोठा आकडा आणि अजून थोड्या चिंचा विकत घेतो. 'ती आत्ता इथे असती, तर मी तिला हा सगळ्यात मोठा आकडा दिला असता!' स्वप्नांचे घोडे दौडतच असतात..

बाई तिला कधी रागावल्या की आपल्याला बाईंचाच राग येत असतो! तिला कधी हातावर पट्टी मारली की आपलाच हात खसकन मागे जातो..खेळात आपला हाउस जिंकला नाही तरी चालेल, पण तिचा जिंकावा असं मनोमनी वाटत असतं..तिला 'impress' करायला म्हणून आपण एवढा मनापासून अभ्यास करतो, की चक्क आपला पहिला नंबर येतो! आणि तेव्हा आई-बाबांना वाटतं आपल्या पोटी हिरा जन्माला आलाय..! खरं म्हणजे वार्षिक परीक्षेला थोडं वाईट वाटत असतं की आता सुट्टीत तिची भेट होणार नाही. सुट्टीत कुठेतरी रस्त्यात भेटावी असं वाटत राहतं.. पण ते तेवढ्यापुरतंच! एकदा सुट्टीतला दंगा सुरु झाला की थेट पुढच्या वर्षी शाळा सुरु व्हायच्या वेळेसच तिची आठवण होते! आणि आता पुन्हा भेट होणार म्हणून आपण खुशीत शाळेत जातो!

पालक सभेला वाटतं, तिच्या आईने येऊन आपल्या आईशी बोलावं..म्हणावं, " तुमचा मुलगा केवढा हुशार आहे! कसा अभ्यास करतो तो..?" आणि मग त्यांच्या गप्पा व्हाव्यात..मैत्री व्हावी..पुढे लग्नाची बोलणी व्हावीत! स्वप्नांचे घोडे आता आकाशात उडत असतात..! पण दुसऱ्याच क्षणाला वाटतं, नको रे बाबा! तिची आई विचाराची, 'कसा अभ्यास करतो?' आणि आपली आई म्हणायची, " अहो, काय सांगू, करतंच नाही हा अभ्यास! सारखं मागे लागावं लागतं त्याच्या..!"

कधीतरी चुकून-माखून एकदाच ती आपल्याशी बोलते. गैरहजर राहिल्याने, बुडलेलं भरून काढायला तिला 'हुशार' मुलाची वही हवी असते..आपण ती वही तिला देताना दोनदा तपासून घेतो, की कधी घाईघाईत लिहिताना अक्षर तर खराब आलं नाहीये ना..! तो आपल्या आयुष्यातला सगळ्यात आनंदाचा दिवस असतो..

पण या भाबड्या प्रेमाचं आयुष्य अगदीच कमी असतं. ते कधी संपतं, कळतही नाही. बरगड्यांच्या पिंजऱ्यातलं, हृदयाच्या पेटीतल्या त्या चोरकप्प्यातलं ते प्रेमाचं फुलपाखरू आपल्या नकळत उडून जातं..आणि ते एकटं उडत नाही, आपल्या निरागस बालपणालाही त्याच्याबरोबर घेऊन जातं..भाबडं प्रेम, ही भाबड्या वयाची शेवटची अवस्था असते. आणि हे प्रेम संपणं हीच मोठं झाल्याची पहिली खूण असते..


(हाच लेख http://sushant-thoughts.blogspot.com/ येथेही उपलब्ध)

फुटबॉलचा महाकुंभमेळा अर्थात फिफा वर्ल्ड कप २०१०!!! (२)

भाग-२
(भाग १ इथे वाचायला मिळेल!)

गेल्या वेळी फुटबॉल वर्ल्डकपच्या फक्त गप्पा झाल्या. यावेळी थोडी टेक्निकल माहिती द्यायचा प्रयत्न आहे. सुरुवात आपण पात्रता फेरीपासून करूयात. कारण फिफा वर्ल्डकपशी संबंधित भारताचं नाव फक्त पात्रता फेरीतच येऊ शकतं. खरं सांगायचं तर १९५० साली भारत वर्ल्डकप खेळण्यासाठी पात्र ठरला होता, पण अनवाणी खेळणाऱ्या भारतीय खेळाडूना बुटांची सवय नव्हती, आणि वर्ल्डकप मध्ये बूट घालूनच खेळण्याचा फिफाचा नियम आहे. त्यामुळे तेव्हा पात्र ठरूनही आपण संघ पाठवला नव्हता (कमाल आहे). तेव्हापासून पात्रता फेरीच्या पुढे आपली मजल कधी गेलीच नाही (माज नडला). असो!
तर, फिफाने जगभरातील संघांचे सहा विभाग केले आहेत.
१. AFC (एशियन फुटबाल कॉन्फेडरेशन),
२. OFC (ओशेनिक (पॅसिफिक) फुटबॉल कॉन्फेडरेशन),
३. CONCACAF (कॉन्फेडरेशन ऑफ नॉर्थ, सेन्ट्रल अमेरिकन ॲन्ड कॅरीबियन आसोसिएशन फुटबॉल),
४. UEFA (युरोपिअन फुटबॉल असोसिएअशन),
५. CAF (कॉन्फेडरेशन ऑफ आफ्रिकन फुटबॉल),
६. CONMEBOL (साउथ अमेरिकन फुटबॉल कॉन्फेडरेशन).
यात भारत हा AFC (एशियन फुटबाल कॉन्फेडरेशन) गटात आहे. पात्रता फेरीच्या पहिल्याच राउंड मध्ये लेबनॉन कडून ६-३ (४-१, २-२) असा पराभव स्वीकारावा लागल्याने भारताचं आव्हान यावेळी सुरुवातीलाच संपुष्टात आलं. पात्रता फेरीतून अंतिम ३२ संघांमध्ये गेलेल्यांची विभागवार नावे दिली आहेत. त्याकडे पाहिलं असता असं लक्षात येतं की जगाच्या पाठीवरील खूप छोटे, आणि एरवी आपल्या खिजगणतीत देखील नसलेले देश (यात अनेक गरीब देशही आहेत) वर्ल्डकपसाठी पात्र ठरले आहेत पण १ अब्ज लोकसंख्येच्या भारताला ३० गुणी खेळाडूंचा संघ बनवणं खूप जड जातंय. गेल्या ६० वर्षात तरी हे जमलेलं नाहीये. जागतिक क्रमांक १३२ असलेल्या भारतीय संघाला नजीकच्या काळात तरी अशी संधी मिळण्याचा चान्स जवळपास नाही. अतिशय उच्च प्रतीचे खेळाडू एकाच वेळी खेळले तर कदाचित जमू शकेल. सध्या भारतीय फुटबॉलला बरे दिवस येतायेत. 'नाईके' सारख्या प्रयोजकामुळे काही आर्थिक आघाड्यांवर विशेष प्रगती होऊन खेळाचा किमान दर्जा सुधारलाय हे मात्र नक्की! खालील पात्र संघांच्या यादीत भारताचे नाव यावे अशी मनापासून इच्छा आहे.

पात्र संघांची विभागवार नावे:
एशियन संघ (४ जागा / ४३ देश): ऑस्ट्रेलिया, जपान, दक्षिण कोरिया, उत्तर कोरिया
ओशेनियन संघ (१ जागेची शक्यता / १० देश): न्यूझीलंड (एशियन ओशेनिक यांच्यातील कॉमन जागा जिंकून पात्र ठरले आहेत)
उत्तर, मध्य अमेरिकन आणि कॅरीबियन संघ (३ जागा / ३५ देश): अमेरिका, मेक्सिको, होन्डुरास
युरोपियन संघ (१३ जागा / ५३ देश): डेन्मार्क, इंग्लंड, फ्रांस, जर्मनी, ग्रीस, इटली, हॉलंड, पोर्तुगाल, सर्बिया, स्लोवेनिया, स्लोवाकिया, स्पेन, स्वित्झर्लंड
आफ्रिकन संघ (५ जागा / ५३ देश): अल्जेरिया, कॅमेरून, आयव्हरी कोस्ट, घाना, नायजेरिया, दक्षिण आफ्रिका (यजमान असल्याने पात्र ठरले आहेत)
दक्षिण अमेरिकन संघ (४ जागा / १० देश): आर्जेन्टिना, ब्राझील, चिली, पॅराग्वे, युरुग्वे (उत्तर अमेरिका-दक्षिण अमेरिकेमधील कॉमन जागा जिंकून पात्र ठरले आहेत)

या पात्रता फेऱ्या झाल्यानंतर ४ डिसेंबर २००९ ला मुख्य स्पर्धेचे ड्रॉ काढले गेले. त्यामध्ये पात्र ठरलेल्या ३२ संघांना ८ वेगवेगळ्या गटात विभागण्यात आले आहे. स्पर्धेची मुख्य फेरी या ८ गटात होईल. प्रत्येक गटातून दोन सर्वोत्तम संघ बाद फेरीत प्रवेश करतील.

ग्रुप ' A ' : दक्षिण आफ्रिका, मेक्सिको, युरुग्वे, फ्रांस
या गटातून फ्रांस आणि मेक्सिको आगेकूच करतील अशी अपेक्षा आहे. पण युरुग्वेचा संघ एक जागा बळकावू शकतो, त्यामुळे या गटात थोडीफार चुरस आहे.

ग्रुप ' B ' : आर्जेन्टिना, नायजेरिया, दक्षिण कोरिया, ग्रीस
'B' गटातून मधून आर्जेन्टिनाची आगेकूच स्पष्ट आहे. दुसऱ्या जागेसाठी उरलेले तीन संघ तुल्यबळ आहेत. आर्थिक डबघाईला आलेल्या ग्रीसला बाद फेरीतला प्रवेश सुखावह ठरावा. पण ग्रीसच्या या सुखस्वप्नात दक्षिण कोरिया बिब्बा घालू शकतो. दक्षिण कोरियाचा संघ प्रतिस्पर्ध्याला दमवून हरवण्यात वाकबगार आहे. ग्रीसच काय, पण आर्जेन्टिनासुद्धा दक्षिण कोरियाविरुद्ध जपूनच खेळताना दिसेल.

ग्रुप ' C ' : इंग्लंड, अमेरिका, अल्जेरिया, स्लोवेनिया
ग्रुप 'C' मधून इंग्लंड आणि अमेरिका हे थेट पुढे जाऊ शकतात. बाकीचे ग्रुप पाहता हा ग्रुप सगळ्यात सोपा म्हणावा लागेल.

ग्रुप ' D ': जर्मनी, ऑस्ट्रेलिया, सर्बिया, घाना
'D' गटातून जर्मनी पुढे जाण्याची सर्वाधिक शक्यता आहे. माझ्यातला जर्मन समर्थक उड्या मारून मारून हे वाक्य बदलून 'जर्मनी नक्की पुढे जाणार' असं लिहायला सांगतोय. पण पूर्णपणे निष्पक्ष राहून शक्यता मांडण्याचा प्रयत्न आहे. ऑस्ट्रेलिया अतिशय धोकादायक संघ आहे. तसेच घानाला कमी लेखून चालणार नाही.

ग्रुप ' E ' : हॉलंड, जपान, डेन्मार्क, कॅमेरून
'E' गटातून दोन चांगल्या संघाना मुख्य फेरीतूनच स्पर्धेबाहेर जावे लागेल. हॉलंड, जपान, डेन्मार्क आणि कॅमेरून हे चारही गुणी संघ एकाच गटात आल्याने अतिशय चुरशीच्या लढती पाहायला मिळतील. फुटबॉल शौकिनांसाठी मेजवानी असलेला हा गट आहे.

ग्रुप ' F ' : इटली, पॅराग्वे, न्यूझीलंड, स्लोवाकिया
'F' गटातून इटली नक्की पुढे जाईल. पराग्वे हा दुसरा संघ पुढे जाऊ शकतो. न्यूझीलंड आणि स्लोवाकिया हे तुलनेने नवीन आणि पात्रता फेरीत फारशी दिमाखदार कामगिरी न केलेले संघ असल्याने हा दुसरा सोपा गट आहे. इटलीचा 'आयर्न डिफेन्स' ही विशेष पाहण्यासारखी बाब असल्याने या लढती चुकवू नयेत.

ग्रुप ' G ' : ब्राझील, उत्तर कोरिया, आयव्हरी कोस्ट, पोर्तुगाल
'G' गट हा अजून एक कडवी चुरस असलेला गट आहे. ब्राझील आणि पोर्तुगाल यांना पुढे जाण्यास प्रत्यवाय नसावा. पण आयव्हरी कोस्ट चा संघ धक्के देऊ शकतो. पात्रता फेरीतील आकडे आणि दिदिएर ड्रोग्बा सारखा आंतरराष्ट्रीय प्रतीचा खेळाडू आयव्हरी कोस्ट खरोखर धोकादायक असल्याचं स्पष्ट करतायेत. ब्राझील आणि पोर्तुगाल बद्दल काही सांगायची गरज नाहीये. रोनाल्डोला पाहायला सगळेच शौकीन उत्सुक असतील. या गटात 'इंडीविज्युअल टॅलेंट' अगदी ठासून भरलाय. एकांडे गोल पहायची उत्तम संधी असे या गटाचे शलके वर्णन करता येईल. उत्तर कोरियाबद्दल आत्ताच काही भाकीत करणे अवघड आहे.

ग्रुप ' H ' : स्पेन, स्वित्झर्लंड, होन्डुरास, चिली
'H' गटातून स्पेन आणि चिली पुढे जातील असे वाटते आहे. होन्डुरास संघाबद्दल फारशी माहिती नाही. पण पात्रता फेरीतील भक्कम कामगिरी त्यांना मुख्य स्पर्धेसाठी आत्मविश्वास देत असेल. पात्रता फेरीत शब्दश: डझनावारी गोल करून होन्डुरास संघाने ते 'जायंट किलर' बनू शकतात हे दाखवून दिलंय.

अनेक तज्ञ लोकांच्या मते यावेळी कुठलाही गट हा 'ग्रुप ऑफ डेथ' नाहीये. पण 'E' गटात ४ चांगले संघ आल्याने त्यातील दोन संघांना मुख्य फेरीतूनच घरी जायचं तिकीट मिळेल हे नक्की. बाकी गटातून सुद्धा खूप चुरस आहे. मुख्य संघ बाद फेरीत पोहोचावेत आणि एक सुरेख बाद फेरी पाहायला मिळावी अशी अपेक्षा आहे. जर्मनी आणि स्पेनला अनेक शुभेच्छा आणि इंग्लंड संघाने यावेळी तरी काही कामगिरी करून दाखवावी ही विनंती.
पुढच्या वेळी काही विशेष संघ आणि त्यांचे फेमस प्लेयर्स यांनी काय 'उजेड' पाडलाय याच्यावर आपण उजेड पाडूयात.

जाता जाता: ही लिंक नक्की पहा! फुटबॉलची अफलातून सेलीब्रेशन्स आहेत ही!
क्रमश:

Thursday, May 20, 2010

गजा


मला वाटतं, तीन-एक  वर्षांपूर्वी मी ही अतिशय छोटी गोष्ट लिहिली होती. तिला रूपक-कथा म्हणावं का नाही ह्यावर वाद होईल,  पण तीच आता परत इथे प्रकाशित करत आहे. प्रस्तावना अशी आहे:
 आपण सगळेजण आयुष्य जगत असतो, बऱ्याच गोष्टी करत असतो. पण ह्यातही कधी कधी आयुष्यातल्या वारंवारितेचा आणि असहाय नकली खोट्या वागण्याचा वैताग येतो. नाटकाचा अंक संपल्यावर नटाने कपडे बदलावे तसे मुखवटे बदलताना मध्येच प्रश्न पडतो की आपला खरा चेहेरा तरी कसा आहे ? आजच्या जगात माणसाकडे चेहेरा उरलेला नाही पण त्याच्याकडे मुखवटे मात्र भरपूर आहेत असा एक भास होतो.  टी.व्ही. म्हणजे एक सतत बदलणाऱ्या गोष्टींचा हलता पडदा, किंवा दुसऱ्या शब्दांत सांगायचं झालं तर, टी.व्ही. म्हणजे असं एक स्वत:बद्दलचं चित्र  जे आपण त्या त्या प्रेक्षकांना दाखवू इच्छ्छितो. कॅमेरा म्हणजे हालचाली टिपून घेणारा मेंदू. आपल्या प्रतिनिधीच्या मनातले विचार आणि त्याची इतरांनी घेतलेली दाखल ह्यावर ही कथा बेतली आहे.





गजा कलर TV च्या दुकानात गेला. सगळे TV चालू होते. कोणीही प्रेमळ नव्हतं. कोणी निरागस नव्हतं. TV वरच्या कार्यक्रमात गर्दी होती. गर्दीतही माणसांचे TV आणि तेही सगळे चालू.
तो आत गेला.
" चालू TV बंद पडत नाहीत. आमच्याकडे कधी वीज जात नाही. TV वरचे कार्यक्रम ठरलेले. त्यात तीच गर्दी आणि त्याच गर्दीतले तेच चालू TV.  बरं,  TV बरोबरच आमच्याकडे कॆमेरे आहेत. मुखवट्यांचे फोटो उत्तम प्रकारे काढून मिळतात....... काय म्हणता, माणसांचे फोटो नाही का मिळत ? अहो मिळतात ना, पण काय हो, तुम्हाला कसं कळतं की कोणता माणूस आणि कोणता मुखवटा ? "
" आणि काय म्हणता, मुखवट्याच्या रंगात थोडा फरक आहे? शक्य नाही, म्हणतात या कंपनीच्या मुखवट्याने कधी माणूस बनवलेला आहे. "
" बरं चला, दया माया वगैरे सगळं TV मधे पाहून घ्या, नंतर स्टुडियो मधे गर्दी नको. पुढचे सुद्धा TV अजून यायचे आहेत. त्यांनाही कॆमेरे दाखवायचे आहेत. आणि शिवाय या दुकानानंतर उरलेल्या दुकानांनाही वेळ आहे. "
 " तुम्ही मात्र जरा वेगळेच दिसता. डोळे रोखून मुखवट्याकडे पाहता. अहो, इतकेच जर प्रश्न असतील ना, तर स्वत: च्या TV मधे पहा......."
गजा गर्दीत परतला. सगळ्या गोष्टी टिपणाय्रा CAMERA नं त्यालाही टिपलं. मुखवट्याचे डोळे मिटले. आकाशावर आभाळ आलं

साधनेला मन उपाशी हवं !




लहानपणी आजी बरोबर पोथ्या ऐकताना कधीतरी ही ओळ ऐकली असावी. पण तेव्हा मात्र , शाळेतून घरी आल्यामुळे पोटात जो भुकेचा आगडोंब उसळलेला असायचा की, 'आजी, मला साधना नको मला आमटी-पोळी हवी आहे'. असं ओरडतच येत असे ! एकदा दोन घास पोटात गेले की मग तेवढा अध्यायाचा शेवट होईपर्यंत थांबावं लागे. समोरच्या रिकाम्या पाटावर अदृश्य स्वरूपात असलेल्या मारुतीबाप्पाला नमस्कार करण्याच्या उत्सुकतेमुळे फक्त दम निघत असे ! तो एकदा नमस्कार झाला आणि मग आजीच्या तोंडून 'गुणी आहे हो मुलगा, रोज देवापुढे बसतो' असे शब्द ऐकले की मग बाहेर खेळायला जायला तय्यार ! मग नंतर राणी सुद्धा तसंच करायला लागली तेव्हा तिला तिच्या छोट्या छोट्या बोटांनी फुलं वाहताना पाहून खूप मजा यायची. पुढे अजून मोठा झालो आणि साधारण पाचवी-सहावीत असेन तेव्हाही हे वाक्य मधून मधून कधी प्रवचनात , कधी सज्जनगडावर गेल्यावर किंवा एखादं पुस्तक वाचताना झळकून जायचं. तोपर्यंत नुसतीच मजा वाटायची की का बरं उपाशी हवं ? समजा मी जेवण करून बसलो तर मला लिहिता वाचता येईल ? अवघड गणित सुटेल ? हो ! सुटेल की ! त्यात काय , अभ्यास तयार असेल आणि वर्गात लक्ष असेल तर जगात काहीच अवघड नव्हतं !

दहावीत मात्र आजीचे ग्रंथ, पोथ्या आणि प्रवचन यामध्ये लक्षच गेलं नाही. 'कोणीही उपाशी असू दे मी जर आत्ता मार्क मिळवले नाहीत तर नंतर मी खरंच उपाशी राहीन !' असं धमकीवजा तत्वज्ञान डोक्यात भरलं गेलं. पुढच्या वर्षी मात्र थोडं पुन्हा वाचन चालू झालं आणि मग साधना वगैरे शब्दांची पुन्हा उजळणी झाली. फक्त हेच नव्हे तर विवेकानंदांची वेदान्तावरची पुस्तकं वाचण्याएवढी मजल गेली. वेगवेगळ्या मोठ्या लोकांना भेटलो, माहिती गोळा केली पण सगळं करताना मी उपाशी नव्हतो, अधाशी होतो कदाचित ! आयुष्यात ज्या क्षणाला अनन्यसाधारण महत्व आहे तो शंकेचा क्षण आला आणि त्यानंतर वाचन थांबलं, पण हे वाक्य सतत मनात घोळत होतं.

बौद्ध-जातककथांमध्ये एक अशी कथा आहे की ज्यात एक अतिशय हुशार शिष्य गुरूला विचारतो, की मला समाधी का लागत नाही. त्यावर गुरु काही न बोलता एका तांब्यातून फुलपात्रात पाणी ओतू लागतो. पाणी ओसंडून वाहायला लागतं तरीही गुरु न थांबता ओततच असतो. खूप वेळानंतर म्हणतो 'तुझं मन हे ह्या फुलपात्राप्रमाणे काठोकाठ भरलं आहे. तू कितीही श्रम केलेस तरी ते वाहून जाणार!' 

खरंच आत्ताची अवस्था काही वेगळी नाही. एखाद्या विषयावर काही लिहावं म्हणलं तर सगळ्या टीपा आणि मुद्दे असूनही डोकं रिकामं होईल तेव्हाच हात आपोपाप चालतात! भरल्यापोटी आणि सगळ्यांभोवती क्वचितच काही सुचत असेल. कवी लोक ह्याला 'कवींची वेदना' म्हणत असतील, संगीतकार त्याला 'सुरांचं बोलावणं' म्हणत असतील, माझ्या बाबांसारखे चित्रकार त्याला 'रंगांची समाधी' म्हणत असतील किंवा सखाराम गटणेच्या शब्दांत ह्याला 'प्रतिभा-साधनेची वेळ !' म्हणत असतील, पण नवीन रचना उपाशी असल्याशिवाय होत नाही!

Wednesday, May 12, 2010

फुटबॉलचा महाकुंभमेळा अर्थात फिफा वर्ल्डकप २०१०!!! (१)

(भाग १)
अजून बरोब्बर एका महिन्याने जून महिन्याच्या दुसऱ्या शुक्रवारी (ता. ११), वैशाख कृष्ण अमावास्येच्या अतिशय उच्च मुहूर्तावर फुटबॉलच्या महाकुंभमेळ्याची सुरुवात होत आहे. दक्षिण आफ्रिका देशातील 'लीम्पोपो' आणि 'ऑरेंज' नद्यांच्या काठी सर्व फुटबॉल भाविक या दशकातल्या शेवटच्या महाकुंभमेळ्यासाठी एकत्र जमणार आहेत. दक्षिण आफ्रिका आणि मेक्सिको या दोन देशातील सामन्याने सुरुवात होणाऱ्या या कुंभमेळ्यात अनेक देशांचे संघ सहभागी होणार आहेत. खऱ्या अर्थाने जागतिक असलेला हा खेळ आणि त्या खेळाची ही सर्वोच्च स्पर्धा! प्रत्येक सर्वोत्तम संघ यात सहभागी होतायेत. गत-विजेते इटली, उप-विजेते फ्रांस यांच्या बरोबरीने जर्मनी, ब्राझील, आर्जेन्टिना, स्पेन, पोर्तुगाल असे दिग्गज संघ, आणि आयवरी कोस्ट, दक्षिण कोरिया, यांच्यासारखे 'डार्क हॉर्स', आणि दक्षिण आफ्रिका, उत्तर कोरिया सारखे नवखे संघ... एकूणच धक्कादायक निकाल नोंदवण्याची क्षमता असणारे हे संघ स्पर्धेतील चुरस वाढवणार हे नक्की!
फुटबॉल इतका लोकप्रिय का?? कदाचित याचं उत्तर याच्या साधेपणातच आहे. एक फुटबॉल, थोडेफार भिडू लोक, आणि भरपूर धावायचा उत्साह इतक्या स्वस्त भांडवलावर आधारलेला हा खेळ जागतिक नसता तरच नवल होतं. आता आपल्याकडचे विट्टी-दांडू, गोट्या, भोवरे हे खेळ अति-स्वस्त आणि अति साधे असूनही जागतिक का झाले नाहीत हा एक विचार करण्यासारखा प्रश्न आहे. क्रीडा-मंत्रालय आणि तज्ञ लोक याकडे लक्ष देतील काय? (पुणेरी पाटी: कृपया आपापले विचार मांडावेत, भांडू नये; अन्यथा नारळ दिला जाईल!)
फुटबॉल हा आमचा अतिशय आवडता खेळ असून एके काळी काही फुटबॉल आम्ही चरणस्पर्श करून धन्य केल्याचे आम्हास स्मरते आहे. तसेच श्री. अनुप बडवे यांनी न आणल्यामुळे हरवलेल्या फुटबॉलचे स्मरण होऊन या क्षणी आमचे डोळे पाणावले आहेत. एरवी हजार लाथा खाऊनही ढिम्म असणाऱ्या त्या फुटबॉलची 'मालक विसरोनी गेला' या दु:खापायी अक्षरश: हवा निघून गेली असेल. ऐन पावसाळ्यात सर्वत्र सोसायटीच्या ग्राउंडवर खेळलेले काही अविस्मरणीय सामने आठवून हसू देखील येत आहे. एका डोळ्यात आसू आणि दुसऱ्या डोळ्यात हसू असे तिरळे भाव घेऊन हा लेख लिहायला घेतला आणि जुन्या आठवणी ताज्या झाल्या.
या फुटबॉलची गोडी लावण्याचे पवित्र कार्य केलं ते धनंजयरावांनी. धनंजयने फुटबॉल, बॅडमिंटन, क्रिकेट वगैरे माहिती असणाऱ्या सगळ्या खेळात बालपणीच प्राविण्य मिळवून अभ्यासाशी काडीमोड घेतला होता हेसुद्धा जाता-जाता नमूद करावेसे वाटते. असो. विषय फक्त फुटबॉल असला आणि प्रयत्न वर्ल्डकपची माहिती द्यायचा असला तरी फुटबॉल हा खेळण्याइतकाच दर्शनीय, श्रवणीय, आणि चर्चनीय अनुभव आहे. आणि हे सगळं करण्यासाठी तज्ञ मित्रांची अतिशय गरज असते. तज्ञ मित्रांनासुद्धा गुमान ऐकणारे श्रोते हवेच असतात.
तर, सुरुवात अशी होते. काळ: इसवी सन १९९४. स्थळ: श्री. अनुपरावजी बडवेसाहेबांच्या घराचा दिवाण-खाना. वेळ: फिफा-१९९४ 'वर्ल्डकप इन अमेरिका' ची फायनल. सगळी अमेरिका, ब्राझील, इटली आणि उरलं-सुरलं सगळं जग डोळ्यात प्राण आणून रॉबर्टो बॅजिओला बघत होतं. काहीश्या निरस फुल-टाईम नंतर पेनल्टी शूट-आउटचा खतरनाक खेळ. म्हणजे पेनल्टी गोलात गेली तर हिरो, नाहीतर झिरो! पहिली पेनल्टी दोन्ही संघांच्या खेळाडूंनी मिस केली. मग सलग २ पेनल्टी गोलात गेल्या. २-२ अश्या गोल-बरोबरीनंतर इटलीची एक किक मिस झाली. ब्राझीलच्या कॅप्टनने (डुंगा त्याचं नाव) चौथी पेनल्टी नेम धरून गोलात मारली. आता ब्राझील कडे ३-२ चा लीड होता. इटलीचा कॅप्टन आणि 'भरवश्याचा खेळाडू' अशी ख्याती असणाऱ्या रॉबर्टो बॅजिओने चक्क एक उंच झाड लावलं! त्याची किक गोल वरून मागे प्रेक्षकात निघून गेली आणि संपूर्ण स्टेडीयम "ब्राझील ब्राझील " जयघोषात जे काय न्हाऊन निघालंय महाराजा. अशा वेळी झालेला 'फुटबॉलु' चा 'आनंदू' माझे मुखी काय वर्णू?
त्यानंतरचा १९९८चा 'सबकुछ झिदान' वर्ल्डकप, २००२चा ब्राझीलने विक्रमी पाचव्यांदा जिंकलेला वर्ल्डकप, २००६चा जर्मनीमध्ये झालेला आजपर्यंतचा सगळ्यात भव्यदिव्य वर्ल्डकप! प्रत्येक वर्ल्डकप संपताना एक आठवण मागे ठेवून गेला. यातली सगळ्यात ठळक आठवण म्हणजे २००२ मध्ये वर्ल्डकप फायनल हरल्यावर गोल-पोस्टला टेकून हताशपणे रडणारा ऑलिवर कान. कान या वर्ल्डकप मध्ये जर्मनीचा कॅप्टन होता, आणि पूर्ण स्पर्धेत त्याने एकच गोल खाल्ला होता. पण शेवटच्या सामन्यात परिस्थिती थोडी बिकट होती. एक तर जर्मनीचा मातब्बर मिड-फिल्डर बॅलाक दोन यलो-कार्ड मिळाल्यामुळे बाहेर होता. आणि ब्राझीलचे खेळाडू कडक फॉर्मात होते. त्यांनी कानची अभेद्य समजली जाणारी जर्मन भिंत २ गोल ठोकून पुरी नेस्तनाबूत करून टाकली आणि त्याचबरोबर वर्ल्डकप जिंकायचं कानचं स्वप्नसुद्धा नेस्तनाबूत झालं. एरवी सिंहासारख्या गर्जना करणाऱ्या कानला असा सर्वस्व लुटून गेल्यासारखं रडताना पाहून जाम वाईट वाटलं होतं. आणि दुसरी आठवण म्हणजे २००६ च्या वर्ल्डकप फायनलमध्ये झिदानने 'हेड-बट' करून हाराकिरी केली ती. झिदान हा फ्रांसचा आधारस्तंभ! पण फायनलमध्ये त्याचा राग अनावर झाला आणि त्याने इटलीच्या मॅटेराझ्झीला डोक्याने जोरदार धडक देऊन पाडलं. साहजिकचं साहेब रेड-कार्ड घेऊन बाहेर गेले, आणि फ्रांस हरला.
(मला स्वत:ला जर्मन टीम अतिशय आवडते. एक अतिशय कट्टर जर्मन समर्थक म्हणालात तरी हरकत नाही. वारा फिरेल आणि गोल होईल तसा पाठींबा बदलणाऱ्यातले आम्ही नाही. 'फर्स्ट लव्ह' जर्मनीला आमचा सनातन काळापासून पाठींबा आहे, आणि तो यापुढेही कायम राहील अशी ग्वाही आम्ही सर्व जर्मन-समर्थकांना याआधीच दिलेली आहे.)
फुटबॉलचा उत्साह, माझ्यासारखेच फुटबॉलवेडे असणारे माझे मित्र, आणि अजिबात कुरकुर न करता आम्हाला दंगा करू देणारे आमचे पालक यांच्यामुळे माझा प्रत्येक वर्ल्डकप साजरा झालाय. माझ्या आजपर्यंतच्या फुटबॉल प्रवासात अनेक नवीन मित्र मिळाले. कुणाला फुटबॉल कळायचा, कुणाला नाही, कुणाला प्रचंड आवड तर कुणाला पुरेपूर उत्सुकता, कुणी त्याचा आवडता देश जिंकावा म्हणून देवाला नमस्कार करून सामने पाहायला बसतोय अशा हवश्या, नवश्या, गवश्या मित्रांबरोबर मी आता माझ्या पाचव्या वर्ल्डकपसाठी सज्ज होतोय. गेल्या वर्ल्डकपच्या फायनलच्या वेळचा स्मिताचा चकित करून टाकणारा उत्साह आणि पुष्करची फुल-टाईम धमाल कॉमेंटरी हे वर्ल्डकपइतकच रंगतदार होतं. तसाच अनुप आणि सारंगने झोपेत पाहिलेली फायनल असंही या फायनलबद्दल सांगता येईल. या वर्षी मात्र जनता जमवून वर्ल्डकप पाहता येणार नाही याचा अतोनात दु:ख आहे. राणीच्या देशात कमतरता कशाची असेल तर मित्रांची. तरी सुद्धा वर्ल्डकप पाहून त्यावर सविस्तर चर्चा करायचं मात्र आम्ही बंद करू शकत नाही.
धनंजयरावांनी यावेळी स्पेनचं पारडं जड असल्याचं सप्रमाण सिद्ध केल्याने आता विजेतेपदाच्या स्पर्धेत जर्मनी बरोबरच स्पेनचाही विचार करावा लागेल. आणि इटली, ब्राझील, फ्रांस, आर्जेन्टिना हे अतिशय ताकदवान संघ आहेत. काही नवखे वाटणारे संघ धक्कादायक निकाल नोंदवू शकतात. मात्र, इंग्लंडची अजिबात काळजी नाही, कारण वर्ल्डकप मध्ये सुमार खेळ करायचं त्यांचं फार जुनं धोरण आहे, आणि ते यावेळीही तसंच करतील यावर माझा पूर्ण विश्वास आहे.
धनंजय, अनुप, सारंग, आणि स्मिता हे यावेळच्या वर्ल्डकपचे उत्साही पार्टनर आहेत. तुम्हीसुद्धा वर्ल्डकप पहा, आणि एन्जॉय करा! माहितीची गरज काही अंशी पूर्ण करायचा मी प्रयत्न करेन. पुढच्या वेळी या स्पर्धेत भाग घेणारे संघ आणि त्यांचे ड्रॉ यांची माहिती पाहूयात!
जाता जाता: ही लिंक नक्की पहा! फिफा वर्ल्डकपचं गाणं आहे हे!!
क्रमश:

Thursday, May 6, 2010

पूर्णब्रह्म!

खाण्याचा विषय निघाला आणि पुणेकरांनी तिथे आपले मत व्यक्त केले नाही असं आजपर्यंत झालं नाहीये. आणि मीही अस्सल पुणेकर आहे, त्यामुळे जाईन तिथे, आणि जमेल तिथे मत-प्रदर्शन करणे हा माझा जन्मसिद्ध हक्क आणि आद्यकर्तव्य आहे. असो, पुणेकरांचे हक्क आणि त्यांचे कर्तव्यपालन हा एक चर्चेचा वेगळा विषय होऊ शकतो, तूर्तास आपण खाण्याकडे वळूयात.
मुळात आपण भारतीय लोक हे अतिशय लकी आणि सुखी आहोत. याचा शोध मला भारतात होतो तेव्हा लागला नव्हता हे करंटेपण मान्य करूनही मी हे सांगू इच्छितो की आपली खाद्य-संस्कृती ही आंग्लभूमीला खरोखर भयभीत करून सोडणारी आहे. एखादा इंग्रज खाण्याचे असे किती प्रकार सांगू शकेल? मी खाण्याचे प्रकार म्हणतोय, पदार्थ नाही. सांगून सांगून किती सांगणार? १०,२० फारतर ५०! आपल्याकडे अक्षरश: हजारो खाद्यप्रकार आहेत, आणि अस्सल सुगरिणी रोजच्यारोज नवनवे पदार्थ शोधून काढतायेत. माझ्यासारखा खाण्याच्या बाबतीत अतिशय अडाणी मनुष्यसुद्धा इथल्या कुठल्याही एक्स्पर्ट माणसाला बोलून झोपवून टाकेल. आता काही इंग्रजांचं असं म्हणणं आहे की 'चटणी' हा 'ओरिजिनल इंग्लिश' पदार्थ आहे. अरे, पण मग इंग्लिश जेवणात चटणी का नाहीये? येडे कुठले.. गो-ब्राह्मण प्रतिपालक राजाधिराज शिवाजी महाराजांची तलवार ढापली, शहाजहानचं मयूर-सिंहासन ढापलं, कोहिनूर ढापून झाला, एवढंच काय पण टिपू सुलतानाच्या महालाचे खांब देखील सोडले नाहीत यांनी. आता चटणी ढापायला निघालेत, चोर लेकाचे! इंग्रज चोर आहेत की नाहीत यावर चर्चा होऊच शकत नाही, कारण ते आहेतच. असो!
मूळ विषय 'खाणे आणि त्याच्या गप्पा' हा आहे, आणि आपण लोक पट्टीचे खाणारे आहोत. सण-उत्सव हे आपोआप आलेले नसून, ते त्या-त्या सणाच्या 'नैवेद्य स्पेशल' पदार्थासाठी 'ॲरेंज' केलेले आहेत, असा माझा पक्का समज आहे. उदाहरणार्थ, मोदक! कधीही करा, चव बदलत नाही, पण गणपतीत करा, आहाहाहा! पुरण-पोळी आणि वाट्टेल तेव्हा वाट्टेल तितक्या पुरणपोळ्या करून वाढणारी आई असेल तर जेवणाच्या पंगतीत साक्षात स्वर्ग अवतरतो! पण ऐन होळीच्या दिवशी पुरणपोळीच्या ऐवजी मोदक केले तर बेत जमून येत नाही राव. 'तेव्हा असावे पुरणपोळीचे, कुणा मोदकाचे ते कामच नव्हे!' चकली हा पदार्थ कधीही टाईमपास करण्यासाठीच बनवला गेलाय! पण दिवाळीच्या दिवसात चिवडा, लाडवाच्या संगतीत चकली कशी शोभून दिसते. शिरा एरवीही आवडेल, पण चतुर्थीच्या नैवेद्याला केलेला शिरा एकदम सात्विकच बनवून टाकतो! त्यातही केळं,वेलची वगैरे घालून केलेला शिरा असेल तर एकदम सारसबागेचाच गणपती आठवणार बघा!
कालच मी आणि माझा मित्र 'मऱ्हाटी खाद्यप्रकार' यावर जरा गप्पा मारत बसलो होतो. जरा म्हणजे ऑफिस मध्ये जेवण करून सुस्ती येते त्या वेळी. थोडक्यात दुपारी २ ते ४:३०! दोन-अडीच तास आम्ही फक्त 'मिसळ' वर गप्पा मारल्या. पुण्याची रामनाथ, बेडेकर, श्रीकृष्ण, श्री इत्यादी अतिशय फेमस आणि बाकी नॉर्मल पुण्यातली वर्ल्ड फेमस 'मिसळ' नावाचं पूर्णब्रह्म पुरवणारी केंद्र, आणि ठाण्याचं 'मामलेदार'! (मित्र मुंबैकर आहे, थोडा मान ठेवावा लागतो!) अशी मैफिल जमलीये म्हणून सांगू! बास, त्याच्या नंतर फक्त एक प्लेट मिसळ, ४ पाव, एक जोरदार लालभडक तर्री आणि नंतर गार गार ताक ऑर्डर करायचं राहिलं होतं. पण हाय, आम्ही बसलो होतो गोऱ्या साहेबाच्या ऑफिसात; तिथे बर्गर, बिन्स, आणि पास्ता याच्या पलीकडे कोणी काही गिळेल तर शपथ आहे. डुक्कर खायला सांगा यांना, डुक्कर मेले! आणि सगळ्यात विशेष म्हणजे इथल्या 'इंडियन' हॉटेलात गोऱ्यांची जितकी गर्दी असते तितकी गर्दी त्या हॉटेल च्या आजूबाजूच्या ४ इंग्रजी हॉटेलात मिळूनदेखील नसते. म्हणजे चव वगैरे कळते यांना थोडीफार, पण तिथेही नाक वर! त्या हॉटेलात खाणार आणि मग 'करी' इथेच कशी 'भारी' बनते याच्या बाष्फळ बाता मारणार.
फक्त मिसळीवर २ तास गेले, वडा-पाव वर तर चकार शब्द बोललो नाही आम्ही. पुरणपोळी आणि मोदक तर अजून लिस्ट मध्ये यायचेत. खीर, बासुंदी, खव्याच्या पोळ्या, शिरा, झणझणीत भरीत, बटाट्याची रस्सा भाजी, भरली भेंडी हे तर मिडल-ऑर्डर बॅट्समन आहेत. स्वीकारचे पोहे, अण्णाचा चहा, अप्पाची खिचडी, वैशाली, रुपाली, सोलकडी, दुर्गाची कॉफी वगैरे तर एक्स्ट्रा मधेच! इथे सलामीचा पहिला फलंदाजच दुसऱ्याला बॅटिंग करू देत नाहीये अजून.
तसं पाहायला गेलं तर मला भारतीय पदार्थांचा अगदीच उपास वगैरे घडलेला नाहीये. देवाच्या कृपेने मी जिथे राहतो ते स्वत: 'मुंबै' कर आहेत, आणि मालकीणबाईंच्या जेवणाला झकासच चव आहे. अहो, होळीच्या दिवशी एकदम अस्सल साजूक तुपातली पुरणपोळी मिळाली आहे मला! रोजच्यारोज वरण-भात, कढी/आमटी, २ भाज्या, गरमागरम पोळी असा साग्रसंगीत आणि सणसणीत बेत असतो. भरपूर वेळ, मोकळ्याढाकळ्या गप्पा आणि त्या जोडीला मस्त जेवण. अजून काय हवं?
पण कधीतरी अचानकच 'पुणेरी' पदार्थ डोक्यात रुंजी घालायला लागतात, स्वत:ची महती सांगायला सुरुवात करतात आणि आमचा कलेजा पार खलास होऊन जातो. आम्ही आमचे रहात नाही, कश्शाकश्शाचं भान उरत नाही, 'देह इथे आणि मन थेट पुण्यात, स्वयंपाकघरात' अशी अवस्था होऊन जाते. आईच्या हातची चव, आत्त्याने केलेली चिंच-गुळाची आमटी, साउच्या हातचे मोदक, श्रद्धाचे स्पेशल 'दादा' साठी बनवलेले पोहे- सतराशे साठ पदार्थ आठवतात, आणि खरोखर हळवं होऊन जायला होतं. आपले लोक आणि आपली चव यांचं महत्व बाहेर राहिल्याशिवाय कळत नाही म्हणतात हेच खरं!!!

माहित नाही ....(कविता)

3/25/2010

माहित नाही ....

आजवर अनेक कविता केल्या 

त्याहूनही जास्त वारेमाप पुसून टाकल्या
हीसुद्धा कदाचित शेवटी पुसून टाकीन
काय आहे, शब्दांचा सुद्धा येतो कंटाळा, कधी कधी 


मी अडचणीतच कविता खूप करतो,
मी एकटेपणातच खूप लिहितो, असंही नाही 
कागदही फाटतो, शाई उठत नाही
काय आहे, पेन्सीलही नाही म्हणते, कधी कधी 


शब्दांची रेलचेल बघतो आपण,
निष्पाप जीवांची घालमेल बघतो आपण
मन हेलावताना कोंबडी खातो आपण 
काय आहे, कशातच अर्थ नसतो , कधी कधी



तुम्हाला सगळ्या कविता आयुष्याबद्दलच हव्या,
कविता करताना मनाला वेदनाच हव्या 
प्रखर,गंभीर, रसपूर्ण शब्दांची मोहिनी सुद्धा हवी, पण
काय आहे, देवही अमृताऐवजी चहा घेतो कधी कधी 


प्रेमात कवितेच्या कळ्या होतात, वैराग्यात ती फुलते 
धुंदीत कविता दिसते, शुद्धीत तिचं स्तोत्र बनतं, पण 
वेदनेत कविता साधळते आणि मृत्यूत कविताच गोठते 
हे सारं सारं नकोसं वाटतंही , कधी कधी 

जय महाराष्ट्र!!

प्रिय अमुच्या एक महाराष्ट्र देशाला 'जय महाराष्ट्र' करून आता उणेपुरे ५ महिने होऊन गेले. खरंतर गेल्या महिनाअखेर गोऱ्यांच्या राणीला आणि तिच्या देशाला सुद्धा 'जय महाराष्ट्र' करून स्वगृही प्रयाण करायचा विचार होता, पण आमच्या महाराष्ट्रात राहूनही अमहाराष्ट्रीय असणाऱ्या प्रोजेक्ट मधील वरिष्ठाच्या कावेबाज कुटनीतीमुळे तो विचार आता वेस्टमींस्टरच्या कुठल्यातरी थडग्यात चिरविश्रांती घेत पहुडला आहे. आता मला 'जय महाराष्ट्र' करायचं तिकीट श्रावणातलं दिलंय. माननीय राज, किवा श्री. दादू ठाकरे, किवा आपले लाडके जोशी सर, दादा, भाई, किवा झालंच तर साहेबाना सांगून यावर कडक उपाययोजना करावी असा माझा जहाल विचार आहे. एका मराठी माणसाला मातृभूमीपासून दूर ठेवणारे, हे महाराष्ट्रात येऊन काड्या करणाऱ्या पर- प्रांतीयांइतकेच पापी आहेत. महाराष्ट्रातल्या पर- प्रांतीयांकडे जितकं लक्ष या नेतेमंडळींचं आहे त्याच्या १ टक्का लक्ष जरी पर-प्रांतातल्या मराठी लोकांकडे दिलं तरी ती सगळी जनता धन्य होऊन जाईल.
असो! मुद्दा 'जय महाराष्ट्र' करण्याचा आहे. पण एकूणच ह्या 'जय महाराष्ट्र' ची मजा आहे. आधीच्या पक्षाला नुकताच 'जय हिंद' करून आलो, असा कोणी म्हटल्याचं ऐकिवात नाही, किवा अस्सल कन्नडिगा मनुष्य देखील 'जय कर्नाटक' म्हणताना आढळलेला नाही. म्हणजे जयजयकारातच 'कल्टी' देण्याचं सामर्थ्य असलेला नवीन वाक्प्रचार मराठीला अगदीच जमून गेला आहे. हल्ली महाराष्ट्रात जे नवीन पक्षांचं पीक आलंय त्यामध्ये इकडून तिकडे उड्या मारणं याला 'पक्षांतर' असा तांत्रिक शब्द असला, तरी बोलीभाषेत त्याला 'जय महाराष्ट्र करणे' असंच म्हणतात.
'नारायणरावांनी' 'बाळासाहेबाना' केलेला 'जय महाराष्ट्र', 'राजसाहेबांनी' 'शिव-सेना' आणि 'विठ्ठलाच्या बडव्यांना' केलेला 'जय महाराष्ट्र', 'मोठ्या' साहेबांनी 'हाय-कमांडला' केलेला 'राष्ट्रीय' पातळीवरील 'जय महाराष्ट्र' अशी ठळक उदाहरणं आपण पहिलीच आहेत. तर बाकी रोजच्यारोज चालू असणारी राज्य पातळीवरील, जिल्हा, तालुका, शहर, गाव, वार्ड, गल्ली, सोसायटी पातळीवरील 'जय महाराष्ट्र' प्रकरणांचा नुसता पूर आलाय. कोण कुणाला 'जय महाराष्ट्र' करून कुठे जातंय, आणि कोण 'आपण असं काही केलंच नाही' ची कोलांटी मारतंय याचा अजिबात पत्ता लागत नाहीये. आता पब्लिक मध्ये 'जय महाराष्ट्र' म्हणून खाजगीमध्ये आपण असं केलंच नसल्याची कबुली देणारे महाभागही आहेत. एकमेकांना 'जय महाराष्ट्र' करून, पक्ष बदलून, पुन्हा एकाच पक्षात येणारे वीरही आहेत. पण एकदा जाहीर 'जय महाराष्ट्र' केला की आपण तो केलाच नाही असं म्हणणारा, हा राज्याच्या अस्मितेला प्रकट धक्का देतोय हे लोकांच्याच लक्षात आल्याने, असल्या कोलांट्या मारण्याचा उपयोग त्या उमेदवारास फक्त मदाऱ्याकडेच होऊ शकतो हेही आलंच. सरांच्या 'कोहिनूर' मध्ये याचं खास प्रशिक्षण दिलं जातं असं आम्ही ऐकून आहोत!
महाराष्ट्रातल्या सगळ्या बातम्या इकडे परदेशी पोहोचत नाहीयेत, कृपया 'सकाळ' याकडे लक्ष देईल काय? साहेबाना सांगितलं पाहिजे, नाहीतर थोडेच दिवसांनी परत महाराष्ट्राचा जयजयकार गाताना कोण पार्टी कुठे आहे हेच कळणार नाही, आणि पार्टीतला कोण कुठे आहे याचाही पत्ता लागणार नाही. महाराष्ट्रातल्या राजकारणाच्या फडात विलक्षण तन्मयतेने आपापले फेटे उडवून, शिट्ट्या वाजवून दाद देणारे रसिक आम्ही, असल्या न पोहोचणाऱ्या, न कळणाऱ्या बातम्यांमुळे हिरमुसले आहोत. साहेब, किवा दादा याकडे लक्ष देतील तर बरं होईल! महापालिका निवडणुका होतायेत, निकाल लागतायेत. या सगळ्या राजकीय धामधुमीत सुद्धा एक गोष्ट जाणवल्याशिवाय राहत नाही. ती म्हणजे उभा महाराष्ट्र पेटून उठलाय, आगीत होरपळून निघालाय. आणि याचं कारण राजकीय मुळीच नाहीये.
परवाच 'सकाळ' मध्ये एक अजून धगधगीत वाक्प्रचार वाचायला मिळाला. "विदर्भात उन पेटले!" आवरा! कर्नाटकात पाणी पेटले, मराठवाड्यात कापूस पेटला, खानदेशात उसावरून कारखाने पेटले वगैरे ऐकलं होतं, आता तर प्रत्यक्ष उन पेटल्याच्या बातम्या येऊ लागल्यात. आत्ता फक्त उन पेटल्याच्या बातम्या आहेत , पण या पेटलेल्या उन्हामुळे पुढे पाणी , मग वीज आणि त्यानंतर महागाई पेटेल हे या सगळ्या 'जय महाराष्ट्र' वाल्यांना दिसत नाहीये का? आणि इतके सगळे झाल्यावर जनता पेटून उठली आणि ज्या व्हायला नको अश्या दंगल,लुटालूट वगैरे गोष्टी सुरु झाल्या तर जबाबदार कोण? की पुढच्या निवडणुकांच्या वेळीच सगळे जागे होणार? की कोणीतरी यांच्या कानाखाली पेटवल्याशिवाय यांना समजणार नाही?
मातोश्री, वर्षा, कृष्णकुंज, बारामती, सिंधुदुर्ग, मराठवाडा, नागपूर याची वेळीच दखल घेतील काय? की त्यांनी या अति-महत्वाच्या मुद्द्यांना देखील 'जय महाराष्ट्र' ठोकला आहे???

बधीर (कविता)

बधीर

फार मोठे शब्द वापरत नाही
थोडक्यातच सांगतो
ह्या शहराच्या अलोट गर्दीमध्ये
खूप आवाज आहेत चांगले,वाईटही

आवाजांचीही गर्दी झाली आहे!
प्रत्येक कुंपणात एक कुत्रा भुंकतोय
कुठे कुत्र्यांमधे मारामारी आहे
कोणी चेहे-याला कुंपण घालतोय

प्रत्येक मालकाचे नियम ठरलेले
कोणाच्या आवारात शिरकाव करावा
खाली पडलेल्या पावासाठी
कुंपण नसल्याचा बहाणा करावा

आवाजाच्या जंगलामध्ये
निवडुंगाशिवाय झाडी नाही
काट्यांचे प्रकार सातशे
पाण्याचा मात्र एक थेंबही नाही

हरएक आवाजामागे इथे
किमान एक मुखवटा जगतो
मझासुद्धा चेहेरा मला
आरशात बघावा लागतो

युद्ध चालू आहे बाहेर
काचा काळ्या आणि कुंपण उंच
लहान बाळ रडतंय घरात
दरवाजे खिडक्या कडेकोट बंद

कुंपणावरुन उडालेल्या भांडणात
तुझ्या संगीताची कोण करेल फिकीर
गिलमोर, तू बरोबर बोलतोस
सगळेच आहेत सोयीस्कररित्या बधीर....

Last 4 lines dedicated to David Gilmour! ( Pink Floyd )