Friday, July 7, 2017

थेंब!

हुश्श! सुटलो एकदाचा.


खूप दिवस अडकून पडायला झालं होतं. आता कसं मोकळं मोकळं वाटतंय. मस्त गार गार! असं सुसाटत बाणाच्या वेगानं जमिनीकडे जाताना मनाला काय वाटतं ना, सांगताच येणार नाही कधी. असं छान शांत शांत वाटतंय, या वाटण्याची सर त्या तिथे, वर निवांत बसून राहण्याला नव्हतीच कधी. सतत सुटकेची आस, सतत निघून, सोडून, पळून जाण्याची इच्छा! बस्स, आज पूर्ण झाली. 

आता काय करू आणि काय नको असं होतंय. ही तप्त-संतप्त धरा शांत-तृप्त करून टाकेन. जगातल्या कुठल्याही अत्तरतज्ज्ञाला जमणार नाही असा सुगंध निर्माण करेन. या पृथ्वीचं नंदनवन करून टाकेन. सर्वांना पुरेसं आणि पोटभर मिळेल याची तजवीज करेन. जगातल्या प्रत्येक जीवात जगण्याची नवी उर्मी निर्माण करेन मी!

काय करू आणि काय नको असं झालंय. काय नको? कुणाचं नुकसान नको, शिव्याशाप नकोत. ज्यापायी हे होतं तो सुसाटणारा वेगही नको. वेग नको? अरे, मग आत्ताच लाभलेली ही मनाची शांतता कुठून आणायची? वेग नको तर मग ताकद कुठून पैदा करायची? आणि ताकद नको, तर मग चराचरावर सत्ता गाजवायची अशी आयती चालून आलेली संधी सोडून द्यायची? आणि करायचं काय, स्वस्थ पडून राहायचं डबक्यात? हेच करायचं होतं तर मग होतो त्या तिथेच बसून राहायला काय दुखत होतं?

या वेगात, त्याच्या ताकदीत काहीतरी विलक्षणच आहे. अशी नशा, अशी धुंदी आहे जिची तुलनाच नाही. एकाच वेळी हजारो कंपन निर्माण करायची अफाट ताकद. एकाच वेळी अतर्क्य शांतता आणि कुठल्यातरी दैदिप्यमान कोलाहलाची जाणीव करून देणारी ताकद!

काय करू? आता काय काय करू? सद्सद्विवेकबुद्धी, समंजसपणा,  भ्रामक कल्पना आहेत. जेत्यांनी जिंकलेल्यांवर केलेले दुर्बळ संस्कार. खरा संस्कार एकच, ताकदीचा, आणि अशी ताकद देणार हा वेग! अफाट वेग!! आता निघालोच मी, कुणालाही आवरायचा नाही असा वेग. ही ताकद, ही शक्ती, चराचराच्या असण्यानसण्याचं, अस्तित्वाचं क्षणभंगुरत्व आता माझ्या हातात आहे. हा निघालो मी, खळाळत, निनादात, सुसाटत! बरोबरीला आहेतही हजारो लाखो, माझ्यासारखीच ताकद घेऊन प्रवासाला निघालेले! आणि घेऊन जातोय बरोबर हे गडगडणारे दगड,  वाहणारी माती, चिखल. कधी ताठपणाचा माज दाखवणार टोलेजंग वृक्ष आता दयनीय होऊन वाहतायेत. सगळ्यांचीच मुक्ती घडवुन आणतोय मी.

कळून चुकलंय मला आता, की मीच आहे सर्वेसर्वा या वाहत्या जगाचा, मीच संहारकर्ता या सृष्टीचा, तांडवाचा मीच सम्राट! कोण रोखणार मला? माझ्या वाहण्याला, गतीला, आकाशातून जी सुरुवात झालीये त्याला आता ना अंत ना पार. आता फक्त  -  प्रलय!!!

खडक

 बाहेर पाऊस पडतोय. शांत, निवांत! मी उभा आहे खिडकीत, पावसापेक्षाही निवांत! माझ्याच तंद्रीत, त्या हळुवार पडणाऱ्या पावसाकडे लक्ष आहेदेखील, आणि नाहीदेखील. पाऊस रस्त्यावरच्या दिव्यात चमकतोय. देखणा,  सुंदर. रात्रीचा एक वाजलाय, की तीन वाजलेत?  किती वेळ झाला मी उभा आहे इथे, पत्ताच नाही. हातातलं घड्याळही पावसात भिजायला निघून गेलंय.  पाऊस वाढलाय आता. लक्ष देण्याइतका की दुर्लक्ष ना करता येण्याइतका, कळत नाहीये. 


मंद्रसप्तकात सुरु असलेला पावसाचा आलाप आता तारसप्तकात पोहोचलाय. तंद्री मोडून काही लक्षात यायच्या आत स्वर टिपेचा झालाय. पावसाला आता आवाजही फुटलाय आणि पायही! जमेल तिकडे, जमेल तसा धावत सुटलाय. कुठे हळू, कुठे जोरात, तिथे सहज, कुठे ठेचकाळत, धावतोय! आवाजही तसाच, जिथे सहज तिथे चुपचाप, जिथे ठेचकाळत तिथे ठणाणत. पण थांबायचं नाव नाही. 

सगळ्याच गोष्टींना एक वेग आलाय.  आजूबाजूची प्रत्येक गोष्ट वाहत चाललीये. वेळसुद्धा! मी इथे असाच उभा.  किती वेळ उभा आहे, का उभा आहे, कशासाठी उभा आहे, कुणासाठी उभा आहे, काही पत्ताच नाहीये. मध्येच मला माझं घड्याळ दिसतंय. आपले दोन्ही हात चालवत पोहतंय मस्त. वेळेचं, स्थळकाळाचं भान ना मला आहे ना त्या घड्याळाला! अचानक बरं वाटतंय, की डिजिटल घड्याळ घेतलं नाही, नाहीतर त्याला पोहता कसं आलं असतं.  सगळ्याच गोष्टी वेगात चालल्यात, मागून पुढे, डावीकडून, उजवीकडून - वाहताहेत! ना दिशांचं भान आहे ना स्वतःचं - एकच दिशा, एकच वेग, पाण्याचा!

मी आपला मध्येच उभा आहे, खडक! सगळं पाहतोय, ऐकतोय. सगळे आपल्याच तंद्रीत, धुंदीत. वाहतायेत! ती लय, तो आवाज, तो ठेका - बेधुंद व्हायला होतंय! हळूहळू हा पाऊस, हे पाणी मला विरघळवून टाकतंय. बहुधा  नववीन क्लुप्ती असावी, पावसाची! माझ्यातला ठामपणा पटला नसावा त्याला. मला असं एकाच जागी स्थिर उभं पाहून जळफळाट झाला असेल त्याचा. त्याला कुठे जमतंय एकाच जागी थांबायला. त्याच्या त्या वेगवान गर्वाला माझी ठेच लागली असेल. 

पण त्याची ताकद जाणवतेय. पूर्ण जोर लावून मला माझ्या जागेवरून हटवायच्या मागे लागलाय हा पाऊस. मला हटवतोय की विरघळून टाकतोय आतून? हळूहळू माझेच तुकडे त्या तुफान वेगात धावताना दिसायाला लागलेत मला. मीच माझ्याशीच शर्यत खेळतोय. कोणता मी पुढे जाणार, कोणता मी जिंकणार. कसली शर्यत आहे कुणास ठाऊक! आणि आता जो मागे राहिलाय, एकटाच, स्वतः:चा खडकपणा सावरून धरणारा मी, त्याचं खडकपणही विरघळून जातंय. त्याला पण धावायचंय, बेफाम, सुसाट. पण जमतच नाहीये. काहीतरी ओढून धरतंय त्याला, थांबूही देत नाहीये आणि सुटूही देत नाहीये. प्रचंड ओढाताण!

आणि एकदम हा  शेवटचा मी, सुटलोच! कसलातरी बेभान आनंद झालाय मला. गडगडत, धावत, पळत निघालोय आता - ते बाकीचे मी आहेत ना, मलाच सोडून पळालेले - त्यांना मागे टाकत! त्या पावसाचा, त्याच्या पाण्याचा, त्या वेगवान गर्वाचा चक्काचूर करत, सगळ्यात जास्त वेगात, वाहात सुटलोय मी!

'प्रवाहपतित' होण्याचं सुख एखाद्या खडकाला विचारून पहा. स्थळाचे, काळाचे, स्थैर्याचे आणि वेगाचे, पिढ्यानपिढयांचे सगळे बांध फोडून, तोडून, मोडून निघालेल्या त्या खडकाला. आकाशातून आलेली ती मुक्तीची प्रलयांकित, वलयांकित हाक ऐकण्यासाठी उभ्या देहाचे कान केलेल्या त्या खडकाला!

अजून उजाडत का नाहीये?

Friday, March 3, 2017

ताराबलं चंद्रबलं! अर्थात, प्रत्येक लग्नाच्या सुरुवातीची गोष्ट

लग्न! 
भारतीय संस्कृतीचा अविभाज्य घटक, सोळा संस्कारातला सर्वात महत्वाचा संस्कार, दोन जीवांचं मिलन, वंशवृद्धीचा राजमार्ग वगैरे वगैरे. चंद्राचा चंद्रीमा, शुक्राची चांदणी, प्रवाहाचा पतितपणा, आकाशाची गहिराई, सागराची निळाई, गरुडाची झेप, सिंहाचा वाटा इत्यादी विषयांइतकाच घासलेला आणि तरीही अजिबात गुळगुळीत न झालेला विषय. जगातले सर्व पुरुष यावर भरभरून लिहू शकतात आणि सर्व स्त्रीया यावर भरभरून बोलू शकतात. कारण, या विषयावर काही उघडपणे बोलणे पुरुषांना शक्य नाही, आणि काहीच्याबाही लिहून पुरावे निर्माण करण्याचा गाढवपणा बायका करत नाहीत. एकूणच अशा या जागतिक पातळीवरील एका अतिसंवेदनशील विषयाला डिवचण्याचं धाडस या लेखणीने आज केले आहे. उद्या याच प्रमादाबद्दल हीच लेखणी बंबातदेखील जाऊ शकते याची तींस काय कल्पना? असो! नमनालाच मोजून सात घडे तेल गेले आहे.

तर, पूर्वी या लग्न नावाच्या संस्थेची स्थापना वरपिता आणि वधुपिता हे दोन संस्थापक करीत असत. आपापला बाब्या आणि बेबी यांना या संस्थेचे आजीवन सभासद बनवले जात असे. अध्यक्षस्थानी बाब्याला बसवून चिटणीस आणि खजिनदार अशा दोन्ही जिम्मेवाऱ्या बेबीवर सोपवून हे दोन्ही संस्थापक मजा बघत असत. बाकी समस्त इंटरेस्टेड मंडळी ही एखाद्या वाचनालयाच्या मेम्बरांप्रमाणे दैनिक, साप्ताहिक, पाक्षिक, मासिक,  वार्षिक, नित्य आणि नैमित्यिक हजेरी लावीत. कधी विंगेतून, कधी पिटातून, कधी छतातून  एंट्र्या करणाऱ्या हौशी कलाकारांइतकाच या मंडळींचा उत्साह दांडगा असे. असे हे संस्थापक आणि मेंबर मंडळी एकत्र येऊन आपसात खलबतं करून नवऱ्यामुलाची सगळी शस्त्रं नवऱ्यामुलीकडे सुपूर्त करून त्यांना जीवनाच्या वगैरे समरात वगैरे झुंजायला वगैरे पाठवून वगैरे देत वगैरे असत. असा हा 'करी शस्त्रं ना धरीं , सांगेन गोष्टी युक्तीच्या चार' पुरता उरलेला तो नवरा आणि त्याची सगळी शस्त्रं परजून सर्वशक्तीनिशी उभी ठाकलेली ती अष्टभुजा नारायणी नवरी असे दोघेजण बोहल्यापर्यंत पोहोचत. त्यानंतर होणारा सामूहिक 'सावधान' चा गजर. संपूर्ण जगाला 'अखंड सावध' राहायला सांगणारे आणि दासबोधासारखा सांसारिक कर्मयोग शिकवणारे समर्थ रामदास हे याच 'सावधान' पश्चात बोहल्यावरून गायब झाले होते, यातूनच या सावधानाची माहिती लक्षात येते. विशेष म्हणजे या 'सावधान' नंतर पुन्हा अजिबात 'विश्राम' ना होता कायम परेड करावी लागते हे कुणीही आधी सांगत नसे.

काळ बदलला, वेळ टळली, आणि विवाह नावाच्या संस्थेच्या स्थापनाप्रक्रियेत सूक्ष्म बदल घडून आले. आता यातले  भिडू लोक आधीच एकेमेकांना भेटून, बोलून, जोखून घेतात. जमलं, पटलं, झेपलं, तर दोन्ही चाकांचा सांधा जुळतो. वरपिता, वधुपिता या 'मानद' खुर्च्या आहेत, बाकी इंटरेस्टेड मंडळाची गिनती सेम आहे अजून. पूर्वी लग्न करून पाहत असत, आता पाहून लग्न करतात एव्हढाच काय तो फरक. याउपर या संस्थेच्या कारभारात काहीही फरक नाही.

विवाहप्रसंगी मंगल सनई वाजायला लागते, 'सावधान'चे गजर टिपेला पोहोचू लागतात, अक्षता डोक्यावर पडतात. काही सव्यसाची मित्रांमुळे त्याच अक्षता डोळ्यात, कानात, नाकात, झब्ब्यात आणि जाकिटाच्या खिश्यातदेखील पडतात, त्याला इलाज नाही. आमच्या मातु:श्री म्हणतात त्याप्रमाणे त्या लग्नकलशातल्या पाण्यात खरंच काहीतरी जादू असावी. ते पाणी डोक्यावर पडलं कि नवरदेवातला सगळा दैवीपणा ओसरून त्याचा अक्षरशः नवरा होतो, आणि त्या अंतरपाटापलीकडल्या अष्टभुजेची ताकद अमाप वाढते.

लग्नाच्या मंगलाष्टका जर नीट पहिल्या तर त्यातलं व्यवहारी सावधपण आणि छुपे संदेश जिज्ञासूंना दिसून येतील. सुरुवात होते ती गणेशवंदनेने! 'स्वस्तिश्रि गणनायकं गजमुखं' म्हणत आद्यदेवांना बोलावून घेतात. ते उभे नवऱ्यामुलाकडून. त्यानंतर गंगा, सिंधू, सरस्वती, यमुना, गोदावरी, नर्मदा, कावेरी, शरयू, महेंद्रतनया, चर्मण्वती, वेदिका, क्षिप्रा, वेदवती, महासुरनदी, गंडकी, पूर्णा या मिळून साऱ्याजणी नवऱ्यामुलीकडून. इथेच नारीशक्तीची वाढलेली संख्या आणि ताकद चाणाक्ष नजरेला दिसून येते.  मग कुण्या रुक्मि राजाच्या रुक्मिणीनामे सुविद्य कन्येस श्रीकृष्ण नामक अनुरूप जोडीदार कसा मिळाला याची सुरस आणि रम्य कथा रंगवून सांगितली जाते. इथेसुद्धा जगातले सगळे लग्न झालेले पौराणिक, ऐतिहासिक, वास्तविक, काल्पनिक नवरे सोडून फक्त 'करी शस्त्रं ना धरीं' कृष्णाचंच उदाहरण पुढे केलं जातं हे (त्याच) चाणाक्ष नजरेतून सुटत नाही.

यानंतरच्या स्टेशनवर आत्या, मावशी, मामी, अशा एकापेक्षा एक गायिकांची चढाओढीने जुगलबंदी होते. त्या मैफिलीतून जाग येईपर्यंत गाडी पोहोचते ती 'तदेव लग्नं, सुदिनं तदेव' पाशी. हे फार्फार महत्वाचं आहे. "आज तुझे लग्न आहे मित्रा, याहून उच्च सुदिन तुझिया आयुष्यास शक्य नाही. तरी वत्सा, तुजप्रत कल्याण असो" असा संदेश स्वतः आद्यदेव नवरदेवाच्या कानात सांगून त्याचा उत्साह वाढवताना (पुन्हा त्याच) जाणकार नजरेने पहिले आहेत. आणि "आज तुझे लग्न आहे देवी, यापुढील सगळे दिवस तुझेच सुदिन, आजपासून सुरुवात" हे सगळ्या सरिता आपल्या नवरीस सांगताना (तेच) दिव्यचक्षु बघत असल्याचा दिव्य पुरावा आहे.

यापुढील ओळी या फक्त नवरदेवास उद्देशून असतात. 'ताराबलं चंद्रबलं तदेव, विद्याबलं दैवबलं तदेव', म्हणजे हे नवऱ्या, तुझे सगळे ताराबळ, चंद्रबळ, विद्याबळ, दैवबळ वापरलेस तरीदेखील या अष्टभुजेपुढे तुझी तारांबळच होणार आहे. तरी तू त्या लक्ष्मीपती विष्णूला पर्यायाने कृष्णाला शरण जा. त्याने सांगितलेला 'करी शस्त्रं ना धरीं , सांगेन गोष्टी युक्तीच्या चार' हा बाणा आत्मसात कर. बाकी संसारसागरातून तुझी नैय्या पार नेण्यास तुझी अष्टभुजा, जी सध्या तुझ्यासमोर सात्विक उभी आहे, ती सदैव तुझ्या पाठीशी राहो. इतका सगळा उपदेश स्वतः आद्यदेव नवरदेवास करतात आणि त्याला बायकोहाती सोपवून पुढल्या लग्नास प्रस्थान करतात. आद्यदेवांचं काम लग्नसराईत फार वाढतं, त्याला ते तरी काय करणार. ऑफिसात बॉस आणि घरी दोन-दोन बायका यात त्यांचादेखील पिट्टा पडतो. असो.

आणि मग, एखाद्या उस्फुर्त रणभेदी गर्जनेप्रमाणे सर्व उपस्थित समुदाय एकच 'सावधान' ची ललकारी देतो. त्यामुळे नवरदेवास अचानक, तोफा होईतो खिंड लढविणारा बाजीप्रभू देशपांडा, दोन तलवारीं घेऊन पेटलेला मुरारबाजी, लाखोंच्या सैन्याला भिडलेले प्रतापराव, बुराडीच्या घाटावरचा दत्ताजी, पानपतात सूर्यमंडळ भेदून चाललेला सदाशिवरावभाऊ, असे अनेक पराक्रमी वीर पूर्वज दिसू लागतात. नसा नसा पेटून उठतात, वीरश्री खुणावू लागते, आत्ताक्षणी घोड्याला टाच मारून गनिमांचा खुर्दा करायची उर्मी  दाटून येते. पण हे तेव्हढ्यापुरतंच! दोन्ही बाजूस 'अखंड सावध' उभे ठाकलेले मामा लोक संसारनाटकाचा पडदा उघडतात, आणि नवरी मुलगी नवरदेवास 'वेलकम टू ब्याटलफिल्ड, आता जीत आपलीच असा' असा हार घालते. नवरदेवही तिला 'देवी, मी तुला शरण आलो आहे' अशा विनम्र आविर्भावात हार घालतो. अशा तऱ्हेने वैजयंतीहार घातलेला तो नरनारायण आणि त्याची ती सौम्यमुद्रा अष्टभुजा नारायणी समस्त उपस्थितवर्गाला कृतकृत्य करून टाकण्यासाठी लक्ष्मी-नारायणाचा जोडा बनून सज्ज होतात.

यानंतर नव्याचे नऊ दिवस येतात, जातात. खरा संसार सुरु होतो, तो प्रत्येकाने आपापला बघावा, बायकोवर सोपवून सुखी करावा. आपली सौम्यमुद्रा अष्टभुजा नारायणी आपला संसार सुखी करतेच. तिच्याशी पंगे घेऊ नयेत अन्यथा आपला "महिषासुर होण्यास वेळ लागत नाही", असे संसार या विषयातले जाणकार सांगतात. खरे-खोटे देवाक ठाऊक.

अशाप्रकारे जाणकार आणि संशोधक यांजकडून माहीती संकलित करून जमवलेल्या या प्रास्ताविक लेखानंतर आता 'लग्नसंस्था, संस्कृती आणि आपण' हा विवेचनग्रंथ, 'कर्मयोग आणि लग्नयोग' हा संशोधनलेख उर्फ थिसीस, 'लग्न, लिव्ह-इन, ब्रह्मचर्य' ही तुलनात्मक लेखमाला, 'सतराशे विघ्नं, तरीही नकटीचं लग्न' हा विनोदीकथासंग्रह आणि 'ठोंब्याच्या लग्नाच्या बोंबा' हा दीर्घ लघुकवितासंग्रह हे सगळे प्रसिद्धीसाठी रांगेत आहेत. अधिक माहितीसाठी जाणकार आणि जिज्ञासूंनी लिहावे/भेटावे, हि णम्र वीनंति!