Monday, June 28, 2010

राखाडी रावण

बालवयात जे आपल्यावर संस्कार होतात त्यात गाणी आणि गोष्टींचा सिंहाचा वाटा असतो! ससा-कासवाच्या ‘classic’ गोष्टीपासून ह्या संस्कारांना सुरुवात होते आणि ‘आळस’ हा जो मित्र वाटणारा शत्रू पुढे आयुष्यभर पाठ सोडणार नसतो, त्याची या गोष्टीतून तोंडओळख करून दिली जाते. त्यानंतर ‘चिऊताई चिऊताई दार उघड..’ सारखं timepass गाणं, ‘गाणं’ म्हणजे काय असतं हे सांगायला शिकवतात. नंतर इसापनीतीतल्या ५०-१०० प्राण्यांच्या गोष्टींचा नंबर लागतो. ह्यात प्रत्येक गोष्टीला काहीतरी तात्पर्य असतंच! ह्या गोष्टी सतत काहीतरी शिकवतच असतात! आणि या गोष्टींचा आपल्यावर एवढा भडीमार होतो की नंतर कुठल्या काका किंवा मामाने ‘ये गोष्ट सांगतो’ म्हणून तात्पर्य नसलेली गोष्ट सांगितली, तर उगाचंच आपल्याला वेड्यात काढल्यासारखं वाटतं! ते झालं की टिळकांच्या शेंगांच्या टरफलावाटे पिल्लाच्या चोचीत संस्काराचा दाणा भरावला जातो! आणि मग पाळी येते सगळ्यात लाडक्या, संस्कारक्षम, ‘देव’ या संकल्पनेची ओळख करून देणाऱ्या दोन महान गोष्टींची.. रामायण आणि महाभारत!

रामायण आणि महाभारत ही दोन अफाट गाजलेली महाकाव्ये! आता त्या गोष्टी खऱ्या का खोट्या, राम-कृष्ण, कौरव-पांडव, हनुमान, वानरसेना हे सगळे खरेच होऊन गेले आहेत का, हा भाग जरा बाजूला ठेवूयात. मुख्य मुद्दा हा, की सगळ्यांना रामायण आणि महाभारत भयंकर आवडतं. पण जर असं कोणी विचारलं की तुम्हाला रामायण जास्त आवडतं का महाभारत? तर बहुतेक सगळ्याचं उत्तर ‘महाभारत’ असंच येईल! आणि ह्याला एक कारण आहे...

लहानपणी या दोन्ही गोष्टी एकाच पठडीत सांगितल्या जातात. म्हणजे बघा, रामायणात राम, लक्ष्मण, सीता हे देव असतात आणि रावण हा राक्षस असतो. दुष्ट रावण सीतेला पळवून नेतो आणि मग राम-लक्ष्मण, हनुमान आणि त्याच्या वानरसेनेच्या मदतीने लंकेवर स्वारी करतात. रावणाचा वध करतात. जिंकतात. सत्याचा विजय होतो! किंवा महाभारतात, कौरवांचा पांडवांवर राग असतो. पांडव ५ तर कौरव १०० असतात. पांडव चांगले आणि कौरव वाईट असतात. कृष्ण देव असतो आणि तो चांगलं वागणाऱ्यांची म्हणजे पांडवांची बाजू घेतो. कौरव आणि पांडवांच्यात घनघोर युद्ध होतं. भर युद्धात कृष्ण अर्जुनाला भगवतगीता सांगतो! पांडव जिंकतात. सत्याचा विजय होतो! ह्या अशा ‘हिरो आणि व्हिलन’, ‘देव आणि राक्षस’ स्वरुपात आपण लहानपणी रामायण-महाभारत ऐकतो. मग त्यात हिरोला अजून हिरो करायला अर्जुनाची पक्ष्याच्या डोळ्याची किंवा लक्ष्मण-शूर्पणखेची गोष्ट असते आणि व्हिलनला आणखी व्हिलन करायला जयद्रथ, शकुनी मामा, दु:शासन, बिभीषण अशी पात्रं प्रवेश घेतात.

पण जसे आपण मोठे होतो तशी आपल्याला महाभारतातल्या प्रत्येक मुख्य पात्राची नव्याने ओळख होते. कृष्णाची आणि पांडवांची ‘धुतल्या तांदळाची’ आपल्या मनातली छबी साफ धुवून निघते! चंद्रावरचे डाग दिसतात. आणि प्रत्येक पात्र अतीव सुंदर असा करडा रंग धारण करतो. म्हणजे द्रोणाचार्य एकलव्याला शिकवायचं नाकारून ‘racism’ करतात. नेहेमी खरं बोलणारा युधिष्ठीर ऐन युद्धात ‘नरो वा कुंजरो’ अशी थाप मारून आपल्याच गुरूंना आत्महत्येला भाग पाडतो. द्रोपदी भर सभेत सूतपुत्र म्हणून कर्णाचा उगाचंच अपमान करते. आणि कृष्णाने खेळलेली ‘राजनीती’ तर विचारायलाच नको! कर्णाच्या हाती शस्त्र नसताना तो अर्जुनाला कर्णावर बाण मारायला भडकावतो. ही कुठली नीती? का, तर कृष्णालाही माहिती असतं अर्जुन कर्णाशी कधीच जिंकू शकणार नाही. ‘मृत्युंजय’ आणि ‘राधेय’ वाचल्यानंतर तर मला कृष्णाचा एवढा राग आला होता ना...अशाप्रकारे कृष्णही करडाच होतो..

प्रत्येक जिवंत माणसाला जन्मतःच काम, क्रोध, लोभ, मद, मोह, मत्सर हे षडरिपु म्हणजे सहा शत्रू आणि सहस्त्र वेगवेगळ्या भावना असतात. कुठलाच माणूस १००% शुद्ध, चांगला किंवा कुठलाच माणूस १००% वाईट असू शकत नाही. म्हणूनच, ही महाभारतातली राखाडी पात्रं आपल्याला जास्त जवळची वाटतात. मनाला पटतात..भिडतात..

पण रामायणाचं असं नाहीये बघा. रामायणाच्या अगदी शेवटी राम सीतेच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिला अग्निपरीक्षा घ्यायला लावतो, ही गोष्ट सोडल्यास राम नेहेमीच शुद्ध, चांगला असा देव असतो आणि रावण हा नेहेमीच दुष्ट राक्षस असतो.

मध्यंतरी रामायण आणि महाभारतावर २ चित्रपट आले. ‘राजनीती’ ह्या चित्रपटात आधुनिक महाभारत साकारलंय. पण ‘रावण’ या चित्रपटात मणिरत्नमने ‘रामायण’ नव्याने लिहायचं प्रयत्न केलाय...! रामायणात सीता खूप सुंदर असल्याचा उल्लेख आहे. आणि जर रामायणाच्या शेवटी सीता अग्निपरीक्षेत उत्तीर्ण होते, तर एवढा बलशाली रावण हा नक्कीच एक महान व्यक्ती असला पाहिजे. सीतेचे फक्त सौंदर्यच नाही तर अंगभूत गुणांनीही तो चकित झाला असेल, अगदी तिच्या प्रेमातही पडला असेल. मग अशात रावणही रामासारखाच मर्यादापुरुषोत्तम ठरतो! रावणालाही स्वतःची अशी गोष्ट आहे. तो लहानपणी खूप उद्धट आणि चिडका होता. पण म्हणून काही तो outright वाईट ठरत नाही. आणि लक्ष्मणाने शूर्पणखेचं नाक कापल्यानेच चिडून रावणाने सीतेचं अपहरण केलं होतं.

रावणाला दहा तोंडं होती असं त्याचं वर्णन आहे. पण त्यापेक्षा १० पंडितांपेक्षा तो हुशार होता, तो अत्यंत हुशार व्यक्तीपेक्षा १० पट वेगाने विचार करू शकायचा किंवा त्याला ४ वेद आणि ६ उपनिशिदं असं सगळ्याचं ज्ञान होतं हे जास्त पटण्यासारखं आहे. रावण शंकराचा निस्सीम भक्त होता. त्याने सलग कित्येक वर्षे ब्रम्हाची तपश्चर्या केली होती. आणि जर त्याचा वध करायला विष्णूला रामाचा अवतार घ्यायला लागला ह्याचा अर्थ किती सामर्थ्यशाली असेल रावण.. श्रीलंकेत आजही रावणाची मंदिरं आहेत आणि लोकं त्याला देव मानून नियमित दर्शनाला जातात.

ह्या सगळ्या गोष्टी रावणाचा काळा रंग राखाडी बनवतात. रावणाचं हे नवं (आणि कदाचित खरं) रूप मणिरत्नमने पडद्यावर साकारलंय. आणि म्हणूनच चित्रपट कितीही कंटाळवाणा झाला असला, त्याचा first half अगदी बैलगाडीच्या वेगाने पुढे सरकत असला किंवा dialogues अतिशय फुसके असले तरी आता हयात नसलेल्या रावणाच्या मनात जाऊन त्याच्या पात्राचा विचार करून ते पडद्यावर उभ्या करणाऱ्या मणिरत्नमला माझा सलाम!

या नंतर एक विचार मनात येतो की जर राम आणि कृष्ण हे जर विष्णूचे म्हणजे साक्षात देवाचे अवतार असतील तर त्यांनी खऱ्या हिरो कर्णाचे किंवा अगदीच वाईट नसूनही रावणाचे प्राण घेऊन काही चूक केली का..? कदाचित नाही! कदाचित कृष्णाला अर्जुनापेक्षा जास्त कर्णच आवडत होता. पण नियतीमुळे म्हणा, कर्ण कौरवांच्या बाजूने होता आणि कौरवांचं हारणं आणि पांडवांचं जिंकणं हे ‘सामाजिक हिताचं’ होतं. आज कदाचित आपणही पांडवांचेच वंशज असू आणि आपल्यालाही कौरवांपेक्षा पांडवांचेच वंशज होणं आवडलं असतं. तसंच रावणाचा वध करणं हेसुद्धा ‘सामाजिक हिताचं’च होतं. आणि भावनेच्या, स्वतःच्या पलीकडे जाऊन समाजाचा फक्त विचारच नाही तर समाजासाठी जो कृती करतो त्याला ‘देवत्व’ प्राप्त झालंय असं म्हणायला हरकत नाही. राम आणि कृष्ण करडया रंगाचे असूनही ह्या देवत्वाने त्यांच्यात एक लकाकी आहे. म्हणूनच त्यांचा करडा रंग स्वर्गीय चंदेरी दिसतो. आणि त्यांचं देवत्व तसूभरही कमी होत नाही..

पण हे काही असलं तरी रावणाचं हे नव्याने समजलेलं राखाडी रूप माझ्या मनाला खूप भावलंय. या राखाडी रावणाला माझे शतश: प्रणाम!

Sunday, June 20, 2010

स्वप्नास्तित्व

‘एक दिवस येईल माझा. मी एक मोठा माणूस असीन. माझी सगळी स्वप्नं पूर्ण होतील तेव्हा. भरपूर पैसा, प्रसिद्धी, सुंदर, समजूतदार आणि प्रेमळ बायको, कौटुंबिक समाधान, सगळं काही असेल माझ्याकडे...’ हा विचार ज्या क्षणी मनात येतो, त्याक्षणी आपला आणि वर्तमानकाळाचा संबंध तुटतो. जणू कुठलंसं circuit break होतं आणि आपल्या स्वप्नातलं आपलं अस्तित्व आपण जगायला घेतो..!

एखादा पारंगत चित्रकार जसं पांढऱ्याशुभ्र कागदावर वेगवेगळे रंग फसाफस् पसरवून चित्र काढायला घेतो आणि काहीच क्षणात जसं ते चित्र अतीव सुंदर दिसायला लागतं, तसंच असतं हे स्वप्नास्तित्व! काहीच क्षणात प्रत्येकाच्या सुखाच्या व्याख्येनुसार भरभरून सुख प्रत्येकाच्या स्वप्नातल्या अस्तित्वाकडे असतं. मन लावून ते आल्हाददायी चित्र आपण रंगवायला घेतो. ते चित्र अगदी मनासारखं पूर्ण होईपर्यंत आपण रंगवत असतो. पण ज्या क्षणी ते चित्र पूर्ण होतं, त्याच क्षणी circuit पुन्हा जोडलं जातं आणि आपण भानावर येतो!

पण या सगळ्यात गंमत अशी होते की, स्वप्नातलं अस्तित्व हे केवळ मृगजळ असतं आणि त्यात जगल्याने आपलं खरोखरीचं अस्तित्व कमी होत असतं! म्हणजे बघा ना, एखाद्या गोष्टीचा, कामाचा पूर्ण आनंद आपण कधी घेऊ शकतो? जेव्हा आपण पूर्ण एकाग्रतेने आणि मन लावून ते काम करतो. पण जर त्यावेळी वर्तमानकाळातलं circuitच break झालं, तर कुठून एकाग्रता येणार आणि कुठून आपण त्या कामाचा आनंद उपभोगू शकणार! सतत परतत बसायला लावणारी भेंडीची भाजी नेमकी शिजल्याचा क्षण किंवा चहाला हवा तसा लाल रंग येण्यासाठी, दूध घालायच्या आधी तो किती वेळ उकळावा हे कळण्यासाठी आपल्याला एकाग्रताच लागते. बॅडमिंटन खेळताना हव्या त्या जागी हव्या तितक्या वेगाने शटल जाणं, बॅक्टेरिया कल्चर अगदी नीट बनवून microscopeचा exact focus adjust करून हवा तो result येणं किंवा ‘मृत्युंजय’ मधलं कर्णाच्या तोंडातलं एक जबरदस्त वाक्य पूर्णपणे मनाला भिडणं, हे आपण १००% वर्तमानात असल्याशिवाय होणं केवळ अशक्यच! म्हणजे मन सुखवायला आपण स्वप्नं बघतो खरी, पण स्वप्नं बघताना आपण वर्तमानातला आनंद, सुख गमावत असतो! केवढा हा विरोधाभास! नेहेमीच्या रस्त्यावरून जाताना आपण आजूबाजूच्या किती गोष्टी निरखून बघतो? मनात साठवतो? दोनच आठवडयापूर्वी ओळख झालेल्या आणि पुन्हा दिसलेल्या व्यक्तीचं नाव आपण का विसरतो? सध्या सहवासात नसलेल्या एखाद्या व्यक्तीला तिच्या लकबींसकट आपण तंतोतंत डोळ्यासमोर उभं का करू शकत नाही? एवढी कमी निरीक्षण किंवा स्मरणशक्ती आहे का आपल्याला? नाही! हे सगळं पूर्णपणे वर्तमानात न जगल्याने होतं. आपण पूर्णवेळ आपल्या अस्तित्वात जगतंच नाही! कुठल्याश्या मृगजळापायी आपण आपले हातचे आनंद गमावत असतो. म्हणजेच याचाच अर्थ, आपण आपलं आयुष्य वाया घालवत असतो..!

पण मला वाटतं या नाण्याला अगदी खणखणीत अशी दुसरी बाजू आहे! असं म्हणतात, स्वप्नं बघावीत. खूप मोठी स्वप्नं बघावीत. त्यानेच पंखात बळ येतं. वर्तमानात राहून पूर्ण एकाग्रतेने एखादं काम आपण चोख करू, त्यात पारंगत होऊ. दुसरंही तसंच करू आणि तिसरंही..पण पुढे काय? आणि अशी कामं का करत बसावं? याचं उत्तर आपली स्वप्नं देतात. प्रत्येकाच्या मते त्याला काय मिळालं की तो सुखी होईल ह्याचं उत्तर म्हणजे त्याची स्वप्नं! ही स्वप्नं त्याच्या जगण्याला एक उद्दिष्ट देतात. स्वप्नातलं जगणं म्हणजे सत्यात अथक जगण्यासाठी लागणारं इंधन. रखरखत्या उन्हात मिळालेली किंचीतशी सावली. एक मृगजळ.. जे तहान भागवत नाही पण पुढे जायचं बळ मात्र देतं..!

बऱ्याच वेळा आपण दु:खी होतो, रडतो, आपला आत्मविश्वास खूप वेळा कोलमडतो. पण आपलं मनंच असं आहे ना, जे फार वेळ दु:खी राहू शकत नाही. ते मग काही वेळ स्वप्नात जगू पाहतं. मग इंधन भरलं जातं. मनाला उभारी येते आणि आपण पुन्हा एकदा आत्मविश्वासाने सत्यात जगायला सुरुवात करतो.

ह्याचाच अर्थ असा की पूर्णवेळ स्वप्नात जगणं चांगलं नाही, पण पूर्णवेळ सत्यातही जगणं अशक्यच असतं. जगताना कुठे खरचटलं तर फुंकर मारावी. ती स्वप्नातल्या अस्तित्वात जगायची वेळ असते. मन तेव्हा जणू बुद्धीला आर्जवत असतं, ‘बेहेने दे, मुझे बेहेने दे.. बेहेने दे घनघोर घटा, बेहेने दे पानी की तरहा|’

हा circuit ‘make’ आणि ‘break’ चा खेळ अगदी ऊन-पावसाच्या पाठशिवणीच्या खेळासारखाच असतो. निसर्गासारखा मस्तपणे आपल्याला तो खेळता आला पाहिजे. तरंच आयुष्याचं सप्तरंगी इंद्रधनुष्य दिसू शकेल...!

Monday, June 14, 2010

ब्रायटनचा किनारा!




"ब्रायटनचा किनारा" असं नाव असलेल्या लेखात प्रवास-वर्णन, सहलीची कहाणी आणि भरपूर फोटो पाहायला मिळणार असा जर तुमचा अंदाज असेल तर तो जरा चुकलाय. ब्रायटन हा इतर सर्वसामान्य बीचसारखाच बीच असला तरी त्याचं महत्व भारतीयांच्या दृष्टीने अनन्यसाधारण आहे. कारण याच किनाऱ्यावर स्वातंत्र्यवीर सावरकरांना एक अजरामर काव्य स्फुरलं, 'ने मजसि ने'! सावरकरांच्या काव्याबद्दल सर्वाना माहिती आहेच, पण हे काव्य जिथे स्फुरलं तो ब्रायटनचा किनारा आहे हा तपशील आपण फारसा लक्षात ठेवत नाही. कारण भारतात बसून इंग्लंडमधले सगळे किनारे सारखेच वाटतात. फार लांब कशाला जा, मला स्वत:ला ब्रायटनचं नाव माहिती असून देखील ते कुठेतरी विसरून जायला झालं होतं.
पण विस्मरण होवो किवा काहीही, अश्या गोष्टी गरजेप्रमाणे आठवतात खऱ्या! या वेळी पण असंच झालं. भटकायला जायचा ठराव पास झाला आणि ठिकाण ब्रायटन ठरलं तेव्हा अंधुकपणे हे नाव कुठेतरी वाचल्याचं आठवत होतं. संदर्भ लागत नव्हता. मग काय, गुगल झिंदाबाद! १५-२० मिनिट गुगलशी झटापट केल्यावर माहिती मिळाली की स्वातंत्र्यवीर सावरकरांनी 'ने मजसि ने' ची रचना केली तो हाच किनारा. उगाच खूप भारी वाटलं, सावरकर जिथे जाऊन आल्याचा ठोस पुरावा आहे ती ही जागा आहे कळल्यावर काय होणार दुसरं (एकदा अंदमानला सुद्धा जायचंय)! कारण म्हणजे सावरकरांबद्दल असणारा नितांत आदर! जेव्हा जेव्हा त्यांचं नाव ऐकतो, त्यांच्याबद्दल कुठे काही वाचतो, पाहतो, तेव्हा केवळ नतमस्तक व्हावंसं वाटतं. अजून थोडी माहिती मिळाली तेव्हा असं कळलं की सावरकरांच्या 'ने मजसि ने' काव्याचं हे शतक-महोत्सवी वर्ष आहे. ब्रायटनला जायचा चाललंच होतं, डायरी मध्ये संपूर्ण कविता लिहून घेतली.
ब्रायटनला पोहोचलो तेव्हा एकदम टाईमपास मूड होता. ज्या मित्रांबरोबर गेलो होतो ते मित्र आहेत उत्तर-भारतीय! सावरकरांविषयी फारशी माहिती नसलेले. (का असावी, कारण सावरकरांनी कधी दिल्लीवर आपला हक्क सांगितला नाही, आणि तत्कालीन नेत्यांनासुद्धा असा सडेतोड नेता/मंत्री दिल्लीत असणं धोक्याचंच वाटलं असणार) ब्रायटनला पोहोचल्यावर खूप वेळ तर भटकण्यातच गेला. फुल टाईमपास , समुद्रात खेळा, फोटो काढा, चकाट्या पिटत बीचवर फिरा आणि अजून काय काय!
दुपार होऊन गेली होती. 'ब्रायटन', 'सावरकर', 'ने मजसि ने' डोक्यात होतंच. मग मी मित्रांना सावरकरांची गोष्ट सांगायला सुरुवात केली. सुरुवातीला त्यांना वाटलंच की काय बोअर करतोय हा (माझ्या वक्तृत्वाचा दोष), पण मी आपलं रेटलं पुढे! जेव्हा त्यांना कळलं सावरकरांविषयी, ज्यांनी देशासाठी २ वेळा काळ्या-पाण्याची सजा भोगली, सर्व व्यक्तिगत सुख-दु:ख बाजूला ठेवून फक्त देशाची सेवा केली तेव्हा त्यांनाही सावरकरांबद्दल आदरमिश्रित कुतूहल वाटायला लागलं. सावरकरांच्या 'ने मजसि ने' ची स्टोरी त्यांना सांगितली तेव्हा (मला सगळं हिंदीत अनुवाद करून सांगावं लागलं) बहुतेक त्या कवितेचा इफेक्ट झाला असावा कारण जेव्हा मी 'ने मजसि ने' म्हणायची कल्पना त्यांना सांगितली तेव्हा एका मित्राने माझ्याबरोबर कविता म्हणायची इच्छा व्यक्त केली. व्वा!



घोटाभर पाण्यात उभे राहून आम्ही दोघं डायरी मधून कविता वाचायला लागलो. (सुरुवातीला एक-दोन वेळा फक्त वाचली, कारण त्याला मराठी शब्दांची थोडी ओळख व्हावी असा उद्देश होता) जेव्हा त्याला थोडं जमायला लागलं तेव्हा आम्ही मोठ्याने म्हणायला सुरुवात केली. सुरुवातीला एखादा मिनिट बिचकायला झालं, कारण एक तर मला गाता वगैरे अजिबात येत नाही, आणि आजुबाजुनी जाणारे गोरे लोक आमच्याकडे विशेष कुतूहलाने पाहत होते. पण जशी लय सापडत गेली तसा सगळ्याचा विसर पडला आणि संपूर्ण कविता म्हणून झाल्यावरच थांबलो. माझा मित्र आधीच थांबला होता, पण तो चक्क हात जोडून उभा होता; मला या गोष्टीचं फार आश्चर्य वाटलं, अजूनही वाटतं. स्वत:बद्दल सांगायचं तर माझ्या डोळ्यातून पाणी आलं नाही म्हणून म्हणायचं की मी रडत नव्हतो, पण खूप भरून आलं होतं. सांगता येत नाही शब्दात, पण अतिशय सुंदर अनुभव होता तो! आणि एका महाकाव्याच्या शंभराव्या वर्षी आम्ही त्या तीर्थक्षेत्री जाऊन ते म्हणून आलो याचा विलक्षण अभिमान वाटत होता. एखादी गोष्ट करण्यात 'धन्यता वाटणे' काय असतं हे कळलं! त्या उर्मीमध्ये थोडा वेळ आम्ही तिथेच उभे होतो. नंतर कधीतरी थोड्या वेळाने आजूबाजूचं भान आलं, आणि आम्ही तिथून जेवायला गेलो. उरलेली ट्रीप पण मस्तच झाली पण 'ने मजसि ने' चा अनुभव त्यात सगळ्यात सुंदर होता. आयुष्यभर लक्षात ठेवावा असा!!!




(टीप: स्वा. सावरकरांचा फोटो आंतरजालावरून साभार!)

Thursday, June 3, 2010

सखये तुझ्याचसाठी..

एक गवताचं पातं होतं..
रानावनात उगवणारं अन रानावनातच झीजणारं..
उन्हाळ्यात सुरकुतणारं - पावसाळ्यात भरकटणारं..
चारचौघांसारखंच असणारं अन चारचौघांसारखंच दिसणारं..

पण एक दिवस काहीतरी वेगळंच घडलं..

आज सगळ्यांची नजर त्या पात्याकडे वळली..
आज ते पातं कुणाच्या चित्रात जाउन बसलं तर कुणाच्या आठवणींत..
कुणा कवीच्या कवितेत दिसलं, तर कुणा लेखकाच्या लेखात हसलं..

कारण..

कारण, आज त्या पत्यावर दंव बरसलं होतं.. एका दंवबिंदूने त्या पात्याला नवीन स्वरूप दिलं होतं..
आज ते पातं स्वतःशीच हसत होतं, मनाशीच खुलत होतं..
आता उन असो वा पाउस, रात्र असो वा दिवस..
त्या दंवाने त्या पात्याला फक्त आणि फक्त खुश रहायला शिकवलं होतं..

आज त्या दंवाने त्या पात्याला स्वतःचं अस्तित्व मिळवून दिलं होतं..

मीसुद्धा अगदी तसाच होतो गं..
त्याच त्या गवताच्या पात्यासारखा..

अस्तित्वाला विसरलेला, स्वाभिमानाला दुरावलेला..
दुःखात निराश होणारा अन सुखात हरवून जाणारा..
चारचौघांसारखा असणारा आणि चारचौघांसारखाच दिसणारा..

माझ्या अशा नेहमीच्या जगण्याला सोनेरी किरण दिल्याबद्दल आणि मला तुझा मानण्याबद्दल शतशः धन्यवाद..
ही मैत्री, आपलं प्रेम, हे नातं असंच निखळ राहो हीच माझी सप्रेम सदिच्छा..

- संदीप