Saturday, December 24, 2022

चंद्र कोणास कळला आहे

एक पौर्णिमेचा संपूर्ण चंद्र घ्यावा

गोल गरगरीत वाटोळा, आपण मात्र भोपळा मानावा

परीक्षेतले मार्क म्हणून, पेनाच्या धारेने कापावा..

तुकडा एक त्या चंद्राचा, तुकडा एक त्या मार्कांचा

तुकडा एक आठवणींचा, मनाशी खोल जपून ठेवावा..


एक द्वितीयेची धारदार चंद्रकोर घ्यावी

सगळी स्वप्नं अगदी अलवार, हलक्या हाती त्यावर चिरावी

त्यातले दवबिंदू ते घ्यावे, डोळ्यांच्या कोपऱ्यात ठेवावे..

आठवणींचे दवबिंदू,  ते कुणासाठी तरी ओघळू द्यावे

त्या कुणा कळले ना तरी, मनाच्या तळाशी साठवावे..


एक सप्तमीचा सपाट चंद्र घ्यावा

ओबधोबड अनुभव मिसळून, त्याचा एक सी-सॉ करावा

आयुष्य हे इतकं दोलायमान, एक डाव खेळून पहावा..

आयुष्याचा झुला थोरला, बांधून मोठ्ठा झोका घ्यावा

झुम्म वरून खाली येताना, मनात अनामिक संभ्रम दाटावा..


एक अष्टमीचा निखळ चंद्र घ्यावा

त्या असामान्य मोहकतेशी, एखादं लडिवाळ हितगुज करावं 

त्याचं आणि कृष्णाचं नातं, थोडं समजतंय का ते पाहावं..

कृष्ण कळता कळता, तपं युगं भुर्रकन उडून जावी

मग त्या चंद्राच्या पेपरमधून, आपणही थोडी कॉपी करावी..


चंद्राचं आणि कवीचं हे द्वंद्व, फार फार जुनं आहे

प्रेम, विरह, लफडी, मैत्री, या साऱ्यातून ते टिकलं आहे..,

त्याच्याबद्दल कविता, पुस्तकं, भरभरून लिहिलं आहे 

आणि इतकं सारं लिहूनसुद्धा, चंद्र कोणास कळला आहे..

चंद्र कोणास कळला आहे..


- समीर

(२५/१२/२०२२)

Thursday, December 15, 2022

मुखवटा

वापरला मुखवटा मी प्रत्येक वेळी

तोच ठेवला लक्षात साऱ्यांनी

जेव्हा ओळख द्यायची वेळ आली

नाकारला खरा चेहरा सगळ्यांनी


मुखवटा होता एक सोय

मुखवटा आहे एक सुख

लपवून माझा नाव गाव

एका चेहेऱ्यास मुखवटे लाख


लावले मी शेकडो मुखवटे

अज्ञातवास जणू संपूच नये

काय कुणास मी का सांगावे

अंतरीचे गूढ कुणाच्या भये


मी कुणास ओळखत नाही

कोणी मला ओळखत नाही

मुखवटाच जाणे मुखवट्यास 

या ओळखीचा उपयोग नाही


खरे खरे म्हणजे ते काय

मुखवटा उतरवणे म्हणजे काय

आतून असेल का अजून एक

मुखवटा चढवून फेकांवर फेक


खरे कळता नाती तुटती

खरे कळता कलह होती

खोटेच ते फार सोयीस्कर

खरे पचवणे फार भयंकर


बरे झाले मुखवटा लावला

खरा चेहरा न दाखविला

माझ्या भीषण सत्यापेक्षा

दांभिक मुखवटाच आवडून गेला


- समीर

Wednesday, December 7, 2022

ज्ञानदेवांची रोजनिशी

संजीवन समाधी दिनानिमित्त (कार्तिक वद्य त्रयोदशी) सुरू केलेला विषय हा, अनेक दिवस झाले, नीट काही सुचतच नव्हतं. अचानक एका रात्री माझ्या कल्पनेतही नसताना संपूर्ण कविता एकटाकी लिहून झाली. 


ज्ञानेश्वर लिहितात रोजनिशी

त्यात हिशोब दुनियेच्या पापाचा

ज्ञानदेव म्हणती आता आसरा

फक्त रखुमादेविवरु बापाचा


लोक येती, लोक जाती

इडा पिडा सांगुनी म्हणती

ज्ञानदेवो आम्हावर कृपा करा

यातून उपाय काय तो सांगा


ज्ञान म्हणे निवृत्ती हाच मार्ग

सोपान त्यास, ज्यास आस 

मुक्त होण्यास एकच उपाय

ज्ञानदेव वदती दुनियेस


तद्वत ज्ञानेश्वर सांगती उपाय

विठ्ठल तोच तरणोपाय

लिहितो त्याची रोजनिशी

त्याच्याच जावे चरणांशी


तरी तुम्ही-आम्ही चांगदेव

ज्ञान-गर्व-दंभ आपणास

त्या ज्ञानियाची वाणी हाच

आपल्या सुटकेचा मार्ग खास


जरी वाचली ज्ञानेश्वरी लक्ष वेळा

परी करुण्याचा पाझर ना फुटला

कैसा हा ज्ञानाचा अपमान केला

त्या रचियत्याला दुःखी केला


ज्ञानदेव लिहिती रोजनिशी

देवा सांगती पृथ्वीवरचे पाप

म्हणती विठ्ठला सोडव रे

असह्य झाला हा ताप 


कंटाळा आला रोज तेच

ऐकण्याचा, लिहिण्याचा

कंटाळा आला आता देवा

तुझ्याशिवाय राहण्याचा


संजीवन ती समाधी विठ्ठला

म्हणती ज्ञानदेव उपाय एकला 

ईश्वराचे ज्ञान वाटून लोकां

निघाले स्वोजस परलोका


रोजनिशी लिहिण्यास आता

विठ्ठल शोधी ज्ञानी सकल 

परि एकही ना सापडे त्यांस

ब्रह्मांडनायक होतसे हतबल..


- समीर