Tuesday, December 19, 2023

शिंक - एक देणे

वाचकश्रोतेहो, आजच्या निरुपणाचा विषय अतिशय वेगळा, सर्वश्रृत, सर्वानुभवी आणि सर्वाविधविचित्र असा आहे महाराजा! आजच्या श्रोतृगणांत सर्वांनीच जिचा जवळून अनुभव घेतला आहे, काहींना वार्षिक, काहींना मासिक, काहींना नैमित्यिक, तर काही महानुभावांना नित्य प्रात:स्मरणीय, सायंस्मरणीय वगैरे वगैरे भेटणारी ही “शिंक”! शिंकेचा महिमा काय सांगावा महाराजा, बंद नाकात सदैव रेंगाळणारी, सर्दीत सतत साथीला असणारी, फट म्हणता प्राण नाकाशी आणणारी, आणि त्याच एका फटक्यात दोन्ही नासिका शेंबूडमुक्त करणारी शिंक म्हणजे समस्त प्राणिमात्रांना निसर्गाने बहाल केलेला आपत्कालीन चमत्कारच आहे. शिंकेइतका जोर मनुष्यप्राण्यास बाकी इतर कुठल्याही नैसर्गिक क्रियेस लागत नाही ही वस्तुस्थिती आहे. झोपेशिवाय माणसाला डोळे बंद करावी लागणारी एकमेव कृती म्हणजे शिंक. नाकात दिवसेंदिवस जमा होणारा छुपा ऐवज एकाच दणक्यात बाहेर काढण्याचे कसब जर ईडी, इंकमटॅक्स आणि भेसळप्रतिबंधक पथके शिकतील तर हा देश एका झटक्यात स्वच्छ होईल जाईल. 

अशा या यावत्मनुष्यजातीचे डोळे बंद करून नाक उघडणाऱ्या शिंकेचे अनेकविध प्रकार आणि उच्चार आहेत. सर्दीमुळे येणारी शिंक हा अतिशय सामान्य आणि तितकाच फेमस प्रकार. माणसाची सर्दी हा रोग नसून नाकाची निगा राखण्याचा अतिदक्षता विभाग असल्याचे जाणकार (म्हणजे आम्हीच!) सांगतात. जर सर्दीच मुळात रोग नाही तर त्यायोगे येणारी शिंक हा आजार कसा असेल. त्याचं असं आहे, की सर्दी झालेला माणूस हा दुपारी १ रे ४ या वेळेत झोपमोड झालेल्या पुणेकरासारखा असतो. अबोल, तुसडा, वैतागलेला, आणि ‘काय शिंची कटकट आहे’ असे भाव याच्या तोंडावर असतात. अशा माणसाच्या डोक्यात एक बंद पडलेला मेंदू आणि नाकात ठासून भरलेला शेंबूड असतो. या परिस्थितीत नाकाप्रमाणेच विचारही तुंबतात. अशा जीवघेण्या घुसमटीतून सुटकेचा राजमार्ग म्हणजे एक सणसणून दिलेली शिंक! गाडीवरुन जाताना रस्त्यावर आडव्या गेलेल्या माणसाला जशी सणसणीत शिवी जाते, मैफिलीत गाताना लावलेल्या षड्जाला जशी कडाडून दाद जाते, तशीच भरल्या नाकाने अशी काही ‘ठ्यां’ करुन शिंक जाते की काय सांगावं महाराजा. अशाच सटासट चार शिंका गेल्या की शेंबूड बाहेर, नाक मोकळे, चित्तवृत्ती उल्हासित आणि माणूस प्रफुल्लीत होऊन जातो. सर्दीमुळे सुषुम्नावस्थेत गेलेल्या मेंदूला जागं करायचं काम या शिंकाच करुन जाणे.

धुळीमुळे येणारी शिंक हा दुसरा सर्वमान्य प्रकार. कधीही, कुठेही, केंव्हाही, जरा धूळ जमली की लगेच या प्रकारातल्या शिंकासुरांची मैफिल जमते. माळ्यावरची धूळ, पंख्यावरची धूळ, कपाटातली धूळ, खिडकीच्या कोपऱ्यात साठणारी धूळ, फर्निचरवर थर जमवणारी धूळ यापैकी धुळीचा कुठलाही फ्लेवर यांच्या शिंका सुरू करायला पुरेसा असतो. अशा शिंका सुरु झाल्या की त्या डझनाच्या हिशोबात मोजाव्यात. एक-एक करुन मोजायला गेलं तर शिंका देणाऱ्यापेक्षा मोजणाराच बेजार होऊन जातो. आणि धुळीपायी सुरु झालेला हा शिंकेचा धुमाकुळ पुढे बराच वेळ टिकतो. अशा शिंकांचा सर्वात भारी उपयोग म्हणजे अशा बेजार शिंक्यांवर वरीलपैकी कुठल्याही जागांची साफसफाई करण्याची वेळच येत नाही. पण यामुळे या शिंकपंथात ओरिजनल आणि बाजारभरती असे दोन गट पडले आहेत. अनेक धडधाकट बॅचलरांना लग्नानंतर अचानकच धुळीची आलर्जी आणि शिंकांचा आजार झाल्याचे जाणकार (आम्ही नाही!) सांगतात.

शिंकेचा तिसरा प्रकार म्हणजे कधीही ‘ठ्यां’ करणारे जन. यांचे नाक यांच्या ताब्यात नसते. अतिशय बेफाम, न ऐकणारे, प्रत्येक वास, तापमानातला सूक्ष्म बदल, हवेची झुळूक, वाऱ्याची बदललेली दिशा, पानगळ, फुलांचा मोसम, ऊन, वारा, थंडी, पाऊस, उकाडा या सर्वांवर अशा लोकांच्या नाकाची एक वेगळी आणि ठ्यांम प्रतिक्रिया असते. तापमानातला बदल थर्मामीटरच्या पाऱ्यालादेखील लक्षात येणार नाही, पण यांच्या नाकाला तो जाणवतो. कुठलाही वास असो, दुनियेत कुणालाही तो वास यायच्या आधी यांच्या नाकाशी खेळून जातो. कुठलीही धूळ, कोणताही मोसम, वाट्टेल त्या वेळी यांच्या नाकाशी झोंबतो. सर्वसामान्य लोकांना सर्दीमुळे शिंका येतात, या लोकांना शिंका देऊन देऊन सर्दी होते. दिवसात केव्हाही, कुठेही, कितीही शिंका देण्याची एक वाढीव कपॅसिटी या लोकांत असते. आजूबाजूच्या लोकांना यांच्या शिंकांची इतकी सवय झालेली असते, की इन्फेक्शन, अपशकुन वगैरे प्रश्नसुद्धा कुणाला पडत नाहीत. एकूणात काय, या लोकांच्या शिंकांचा त्रास मूळ त्यांना आणि फारफार तर ऐकणारांना होतो. पण या टायपातले नाक जाम खर्च काढत राहते, कारण स्पेशलिस्ट डॉक्टरच्या वाऱ्या करीत त्याचे गतजन्मी द्यायचे राहिलेले ‘देणे’ देण्यात यांची हयात खर्ची पडते.


चौथ्या प्रकारातलेलोक थोडे विशेष असतात. यांना स्वतःहून शिंका येतच नाहीत. हे लोक आपोआप तरुण होतात, यांची शिक्षणं आपोआप उरकतात, आपोआप लग्न, पोरंबाळं होतात, त्यांची शिक्षणं, लग्न, नातवंडं देखील आपोआप होतात, पण यांना शिंक काही आपोआप येत नाही. मग हे असले लोक तपकीरच ओढ, शिंकणीच वापर, गेला बाजार कागदाच्या सुरनळ्या करुन नाकात घाल, असले आचरट प्रकार करुन स्वतःचं नाक मोकळं करीत असतात. चारचौघात कसं दिसतं ते. आणि वर त्यांच्या या शिंकसाधनेत व्यत्यय आणलेला त्यांना अजिबात चालत नाही. इतर कुणापेक्षाही हे लोक शिंकेच्या बाबतीत फारच आग्रही असतात. 

 तर, ही झाली शिंकेची मूळ घराणी. यात पांथिक मतभेद असले तरी आवाज लावण्याच्या बाबतीत एकवाक्यता आहे. मनुष्याच्या प्रकृतीनुसार ठ्यां, फॉ:, आँक-शी, छु:, फिक, खूस्स, छिक, आणि अतिशय बारीक अशी ‘उच्’ अश्या आवाजाच्या उतरत्या क्रमाने शिंका दिल्या जातात. आवाजाप्रमाणेच या शिंकांचा जोरदेखील उतरणीचा असतो. एखाद्या गद्यभारती ‘फॉ:’ पुढे कविमनाच्या ‘छिक’चा जोर जाणवतच नाही. ‘उच्’ करणाऱ्यांना शिंक आली की उचकी हे बऱ्याचदा त्यांनादेखील समजत नाही. खूस्स आणि फिक हे आवाज शिंक देतानाच लपवायचा अयशस्वी प्रयत्न केल्यामुळे येतात, त्यामुळे त्यातून काहीच साध्य होत नाही. ठ्यां आणि आँक-शी मात्र निव्वळ गगनभेदी, कोथरुडला दिलेली शिंक विमाननगरला ऐकू येऊ शकते. अशा लोकांनी आरसा किंवा कॅमेरासमोर शिंका देऊ नयेत, काच तडकण्याचा धोका संभवतो.

असो! गरजेप्रमाणे शिंक द्यावीच लागते, त्याला पर्याय नाही. “आत्ता नको, नंतर निवांत शिंकतो” असं म्हणायचा ऑप्शन शिंक आपल्याला देतच नाही. आणि कुठल्यातरी मार्गाने समजा एक शिंक चुकवलीच, तर तीच शिंक इतर अनेकींना साथीला घेऊन येते, लगेचच! शिंकेवाचून पर्याय नाही, आणि शिंकेपासून सुटका नाही. अशा या झटक्यात येणाऱ्या आणि फटक्यात निघून जाणाऱ्या, एकाच दणक्यात नाक उघडून श्वास मोकळा करणाऱ्या शिंकेला शरण जाण्यापलीकडे आपल्या हाती काही नाही महाराजा. शिंका एंजॉय करत करतच आपण आजच्या निरुपणाची सांगता करूयात. इति शिंकोध्याय:। लेखनसीमा।।

- समीर
(डिसक्लेमर: लेखक स्वतः शिंकग्रस्त असून या विषयात स्वयंशिक्षित आहेत. त्यांच्या एका शिंकापुरातच हा लेख लिहिला गेला आहे. यातील संशोधनाबद्दल शंका घेणे म्हणजे ऐन शिंकेच्या भरात नाकात बोटं घालण्यासमान आहे, त्यामुळे कृपया असले उद्योग करू नयेत. 😉)
२०/१२/२०२३