Wednesday, November 30, 2022

नेहेमी खरे बोलावे (का?)

"नेहेमी खरे बोलावे" असं आपल्याला लहानपणापासूनच शिकवलेलं असतं. लहानपणी आपल्याला थोरामोठ्यांनी शिकवलेल्या आणि आपण रीतसर फाट्यावर मारलेल्या अनेक शिकवणींपैकी ही एक.

आता अचानक या अवघड विषयाला हात का घातला असा जर प्रश्न पडला असेल तर तो अगदीच साहजिक आहे. आणि खरं बोलण्याबद्दल मी काहीही भाष्य करू नये असा वैयक्तिक इतिहासदेखील आहे. तरीपण यापूर्वीही अस्मादिकांनी अनेकदा भलभलते लेख लिहून लेखण्या बंबात घातल्या आहेत, त्यात अजून एक भर.

आपण, - मुलांनी खरं बोलावं यासाठी - त्यांना लहानपणापासूनच अनेक गोष्टी सांगतो. एखाद्या लहान मुलाला (आणि मुलीला देखील - पोरीपण जाम टेपा लावतात) खऱ्याचं महत्व पटवून देण्यासाठी खऱ्या खोट्या गोष्टी, किस्से रंगवून सांगितले जातात, दाखले दिले जातात. "अखेर सत्याचाच विजय होतो" हे त्यांच्या मनावर ठसविण्याचा प्रचंड प्रयत्न केला जातो. खरं बोलणारा आणि वागणारा राजा हरिश्चंद्र, न्यायप्रिय, सत्यप्रिय शिबिराजा, एकवचनी श्रीराम हे तर म्हणजे या " नेहेमी(च) खरे(च) बोलावे" चळवळीचे अग्रणी. यांच्याशिवाय कुठल्याही पोराचं बालपण पूर्ण होत नाही. त्यात भर म्हणजे पंचतंत्रातल्या खरे (किंवा खोटे) वागणाऱ्या प्राण्यांच्या गोष्टी. ते प्राणी माणसाच्या भाषेत बोलतात, वागतात, खऱ्याखोट्याचा विधिनिषेध बाळगतात हे पाहिल्यावर त्यांना प्राणी का म्हणायचं हा प्रश्न आहेच. पण त्याचासुद्धा प्रचंड मारा पोरांवर केला जातो. अजून एक इसाप नावाचा गोष्टीवेल्हाळ मनुष्य होऊन गेला, त्यानेसुद्धा अशाच प्राणीमात्रांना वेठीला धरून दुनियेला शेंड्या लावल्या.

मुलांचं काय, आईवडील सांगतात ते सगळं त्यांना खरं वाटतं. हल्ली हे असं वाटायचं वय एका हाताच्या बोटावर मोजण्याइतके सुद्धा राहिलं नाहीये म्हणा. मुलं आईवडील, आजी आजोबा, घरातले मोठे लोक, शिक्षक मंडळी यांनी सांगितलेल्या गोष्टी भक्तिभावाने ऐकतात, बऱ्यापैकी आचरणात आणतात. पण म्हणून पोरं खोटं बोलणं किंवा वागणं सोडत नाहीत. सोयीप्रमाणे त्यांचा पवित्रा बदलत राहतो. आपण मात्र त्यांना खोट्यास शिक्षा आणि खऱ्यास बक्षीस देऊन त्यांचं वागणं बदलायचं सोडत नाही. मानसशास्त्रज्ञ आता सांगतात की लहानपणी खोटं बोलू शकणारी मुलं ही खूप हुशार आणि प्रगतिशील असतात. या हिशोबाने मी जगातला सर्वात हुशार व्यक्ती होतो, फक्त हा शोध माझ्या लहानपणी लागला नव्हता. त्यामुळे थापा मारल्याबद्दल कौतुकाची थाप पाठीवर मिळायच्या ऐवजी धपाट्यांचे धनी झाल्याचेच किस्से आहेत. आता हा असा शोध बघता, आपण मुलांना खरं बोलण्यासाठी उद्युक्त करत रहावं की त्यांच्या कुवतीप्रमाणे खोटं बोलू द्यावं हा प्रश्न उभा राहतो. मन मारून खरं बोलायला भाग पाडून आपण मुलांची कल्पनाशक्ती संकुचित करतो आहोत का? 

पुलंनी म्हणतात त्याप्रमाणे "हट्टीकट्टी गरिबी आणि अपंगपंगू श्रीमंती" ची गोष्टसुद्धा अशीच खोट्याचं खरं केली गेलेली गोष्ट आहे. मोठेपणी ही गोष्ट लहानांना सांगणारे खरंच का हौसेने गरीब राहू इच्छितात का, हा प्रश्न त्यांनी स्वतःलाच विचारून पहावा, उत्तर दर वेळी शंभर टक्के नकारार्थीच येतं. मग हा गरिबीचा अट्टाहास कशासाठी? किंवा आमची आजी म्हणायची तसे हे "भिकेचे डोहाळे" नव्हेत का? कशी का असेना पण एकदा श्रीमंती अनुभवायची इच्छा हट्ट्याकट्ट्या गरिबीने खुंटा हलवून बळकट केलेली असते हे पुलसुद्धा गमतीने म्हणून जातात. किंबहुना श्रीमंती ही काळया पैशातूनच येते हा तद्दन फिल्मी विचार रुजवयाचे दिवस गेले आता. कष्ट करून, नीट पैसा इंवेस्ट करूनदेखील श्रीमंत होता येतं याची शेकडो हजारो उदाहरणं आहेत. मग आपण "गरीब ते सत्यवचनी आणि श्रीमंत ते लुबाडून घेणारे खोटारडे" अशा टायपातला छापेबाज विचार सोडायला पाहिजे की नको?

"Honesty is the best policy" हे अजून एक वाक्य लहानपणी मुलांच्या मनावर बिंबवलं जातं. अगदी सुविचार म्हणून शाळेत फळ्यावर लिहायला द्यायचे/देतात. आता honesty = प्रामाणिकपणा. हा प्रामाणिकपणा खऱ्या बोलण्यातून आणि वागण्यातून येतो. पण प्रत्येक वेळी खरं बोलून किंवा वागून योग्य परिणाम साधतो का? इथे "हवा तो" परिणाम अपेक्षित नसून "योग्य तो" परिणाम अपेक्षित आहे. बहुतेक वेळा खऱ्या बोलण्याने किंवा वागण्याने आजूबाजूचे लोक दुखावले जातात. "कोणी कितीही दुखावलं गेलं तरी चालेल पण मी खरंच बोलणार, वागणार" असा पवित्रा घेणाऱ्याच्या सावलीलादेखील लोक उभे राहत नाहीत ही वस्तुस्थिती आहे. अशा लोकांची अवस्था बिकट होऊन बसते, कारण खरं बोलायला आणि वागायला यांच्याकडे लोकंच उरत नाहीत.

सत्य आणि त्रेतायुगात पाहायला मिळणारा खरेपणा द्वापारयुगात संपला होता हा इतिहास आहे. एकदम फेमस "नरो वा कुंजरो वा" ने तर युद्धात पांडवांना वाचवलं होतं. नाहीतर त्या दिवशी द्रोण काय कुणाला सोडत नव्हते. त्याची महाभयंकर शिक्षा काय तर म्हणे युधिष्ठिराचा रथ जो पूर्वी जमिनीवर चार अंगुळ तरंगत चालायचा तो जमिनीवर आला. या असल्या वर्तनाच्या हिशोबाने तर युधिष्ठिराने त्याचे भाऊ आणि बायको पणाला लावली तेव्हाच त्याला धरिणीनं गिळंकृत करायला हवा होता. पण द्युत नावाच्या व्यसनाला राजाश्रय मिळाला असल्यानं जमिनीवर येण्यासाठी युधिष्ठिराला खोटं बोलावं लागलं. मग अज्ञातवासात तो काय खरं बोलत फिरत होता का? ही चार अंगुळाची गोष्ट मुळातच निव्वळ थाप आहे असं वाटतं. म्हणजे खरं बोलायला शिकवणारी गोष्टच खोट्यावर अवलंबून आहे.

इतक्या प्रचंड कन्फ्युजनमध्ये काय करावं हा मोठाच प्रश्न आहे. सगळ्यात सोपा उपाय म्हणजे खोटं बोलायची तयारी आणि प्रॅक्टिस पाहिजे. स्वार्थासाठी आणि दुसऱ्याचं नुकसान होणारं खोटं बोलू नये हे अगदीच मान्य, पण स्वतःचा आणि दुसऱ्याचा वेळ वाचवण्यासाठी आणि भावना जपण्यासाठी खोटं बोललं तर त्याला खोटारडेपणा म्हणत नाहीत. महत्वाचं म्हणजे, खोटं बोलायची प्रॅक्टिस असावी लागते, कारण अचानकपणे सराईत खोटं बोलता येत नाही. तिथे पाहिजे तयारीचे, ते येरूचे कामच नव्हे. छोट्या आणि निरुपद्रवी थापा मारत अशी प्रॅक्टिस करता येते हा स्वानुभव आहे.

आता तरीसुद्धा थापा जमत नाहीत असे अनेक जण असतात. यांनी लहानपणी सांगितलेल्या खऱ्याच्या गोष्टींवर फारच विश्वास ठेवलेला असतो. अशा लोकांनी खरंच बोलावं, कारण अर्धवट, न पचणाऱ्या थापा मारून परिस्थिती बिकट करून ठेवण्यात हे लोक पटाईत असतात. फक्त खरं बोलताना गरजेपुरतंच खरं बोलावं, कारण सगळं खरं एकच वेळी ओकायची गरज नसते. परिस्थितीजन्य थोडकं खरं बोलता येणं ही काळाची गरज आहे. "Percentage Truth" ही संकल्पना मांडायचा प्रयत्न केला आहे, गरजूंनी स्वबळावर समजून घ्यावा.

बाकी मुलांना सांगायला खरेपणाच्या गोष्टी छानछान असतात, पण त्यांना कृष्णाच्या, चाणक्याच्या आणि शिवाजी महाराजांच्या गनिमी काव्याच्या गोष्टी पण आवर्जून सांगाव्यात. जेणेकरून "पारमार्थिक" खोटेपणा कसा आणि कुठे वापरायचा याची अक्कल आपोआप येईल. त्याला खोटेपणा म्हणत नाहीत हे सुद्धा अनुभवातून कळायला लागेलं. सध्याच्या युगात खोटेपणातूनसुद्धा चांगले परिणाम साधता येतात, "सर्जिकल स्ट्राईक" हे त्याचे अत्युत्तम उदाहरण आहे. 

असो. आजचे ज्ञानामृत इतुकेच, कारण लेखणी मोडून सदरहू लेखक पोराची शी काढायला जातो आहे. (ही थाप आहे की खरी परिस्थिती, हे ओळखून दाखवा, च्यालेंज असा महाराजा!)


- समीर