Wednesday, October 12, 2011

मडकं


हल्ली माझ्या कवितांना 'प्रस्तावना दे' अश्या सूचना येत आहेत म्हणून हे थोडसं!
प्रस्तावना अशी आहे की, मला कुंभारकाम किंवा पॉटरी ह्या विषयावर कविता करायची होती. माझ्या मते ती एक सुंदर कला आहे ज्यात वेगवेगळ्या प्रकार, आकार, रंग आणि रूपाचे कुंभ बनवले जातात, त्यांचा वेगवेगळ्या प्रकारे उपयोग केला जातो. काही प्रकारच्या मडक्यांकडे कलाविष्कार म्हणून पाहिलं जातं आणि रूनीची पॉटरी ह्या कलाप्रकारात येते !
हा झाला एक दृष्टीकोन. वेगळ्या चष्म्यातून पाहिलं तर हीच मडकी म्हणजे आपण सगळे आहोत असं वाटतं. ही कविता त्याच विषयावर आहे. कुंभारवाड्यातल्या प्रत्येक मडक्याला आकार, रंग रूप असतं आणि त्यावरूनच त्याची किंमत ठरते, तसंच प्रत्येक माणसाची किंमत ही त्याच्याकडे असणर्‍या आकार रंग आणि रूपावरून नकळत केली जाते. एकमेकांना वाखाणण्यात आपण फक्त एकमेकांचं प्रथमदर्शनी अस्तित्व लक्षात घेतो. शिवाय ह्या मडक्यांमधले फरक म्हणजे ते कोणत्या कुंभारानं बनवलं आहे वगैरे वगैरे.....एकूण काय, माणसाच्या मनातच 'चांगला-वाईट', 'सुंदर-कुरूप', 'स्वस्त-महाग', 'काळा-गोरा', 'दैवी-पाशवी' असा भेदभाव अंतर्भूत असतो, त्यात विकत घेतल्या जाणार्‍या मडक्याचा काही दोश नसतो.
 ही कविता म्हणजे एका कुंभाराचं मनोगत आहे, असा कुंभार ज्याला त्याची  सगळी मडकी सारखीच वाटतात!


मडकं 





कुंभारवाडा तुझा मी
मातीत सांडला की
माती जरी ही एक
कुंभ ते बघ वेगळे की

बुटका कुणी करंटा
ऊत्तुंग तो शैल कुंभ
आकार पद्माचा असे कुणा
काठोकाठ भरला त्यात दंभ

माठास माठ माझ्या
अजिबात तू म्हणू नको
गारवा देतो तुला जो
चकार शब्द तू काढू नको

माध्यान्ही गडूमध्ये त्या
कोण तो चाखतो दही रे
रात्रीस बोल तू हळू अन
मी त्यातच मद्य ओततो रे

नक्षी सुरेख आहे अन
अप्सरा नाचती इथे त्या
देवास कोरले कधी अन
दैत्यासही आसरा मिळे त्या

कुंभात येत आहे
आवाज त्या धन्याचा
रंगात येत आहे
हा सामना खिशा-खिशांचा

दृष्टीत सर्व आहे
मडक्यांस जाण नाही
भेदात सर्व आहे
माणसांत जान नाही

Thursday, September 29, 2011

पूर्वीसारखी झोप

थिएटरमधे पाऊल टाकल्या टाकल्या सिनेमा सुरु व्हावा,
तसं बिछान्यात पडल्या पडल्या झोप लागून मी स्वप्नही पाहू लागायचो!
तेव्हाची स्वप्नं निरागस होती
आता स्वप्नं पाडावी लागतात
पण ठरवून पाडलेली स्वप्नं स्पष्टपणे दिसत नाहीत
हल्ली मला पूर्वीसारखी झोप काही येत नाही.

दुधाचे दात तर केव्हाच गेलेत
त्यानंतर कॉम्प्लानचे दातही येऊन गेले
आता चहाच्या दातांनी खळखळून हसू फुटत नाही
हल्ली मला पूर्वीसारखी झोप येत नाही.

निळ्या निळ्या फेसबुकने प्रत्येकाशी जोडला गेलोय
प्रत्येकच जवळच्याशी कुठेतरी तोडला गेलोय
कुणाची जगणी कुणावाचून अडलीयत?
देवाला वाहिलेली फुलं निर्माल्य होऊन तिथेच सडलीयत
लोकांची आयुष्य त्या wall वर उघडी पडलीयत
झोपताना कुणी आता तेल लावत नाही
हल्ली मला पूर्वीसारखी झोप काही येत नाही.

लहानपणी पत्त्यांचा बंगला करायचो
जरा वारा आला, की पुन्हा सुरु करायचो
आता अपयश काही पचवता येत नाही
त्यामुळे मीही मग यशाची गाडी सेकंड गिअरपुढे नेत नाही
बँक बॅलन्स वाढतोय, पण आयुष्य मात्र भरत नाही
हल्ली मला पूर्वीसारखी झोप काही येत नाही.

स्वप्नांचा बादशाह भविष्यकाळात जगतोय
विचारांचा गणिती भूतकाळातून शिकतोय
वर्तमानातल्या क्षणात क्षणैक सुख शोधतोय
कर्माची फळं वर्मावर भोगतोय
हातावर छडी मिळूनसुद्धा आता वागणं बदलत नाही
हल्ली मला पूर्वीसारखी झोप काही येत नाही...

Thursday, August 18, 2011

धिक्कार हो!


अनेक दिवस आणि महिन्यांनी कशीबशी  ही एक कविता सुचते हो! हल्ली लिहिणं फार far away झालंय! पाचशे ओळी एका वेळी मनात नाचत असतात पण त्याच वेळी grocery आणायला जावं लागतं, वातावरण नीट रहावं म्हणून काही बोलून दाखवावं लागतं...इत्यादि इत्यादि....आपल्याला सगळ्यांना 'एक खिडकी योजना' आवडते ना, तर आपलं आयुष्यही तसंच झालं आहे असं वाटतं..आपण सगळे एक silent obedient consent देऊन बसलो आहोत आणि कुणी कुणाच्या फारसं वाटेला न जाता, फार प्रश्न न विचारता आपलं जे काही असेल ते पुढे चालू ठेवत आहोत......खूप मानवशास्त्रज्ञांच्या मते १९५० नंतरचा काळ हा संपूर्ण पृथ्वीवरच्या आत्तापर्यंतच्या मानवी कालखंडातला 'सगळ्यात शांतततापूर्ण काळ' आहे...आणि 'शांतीत क्रांती' म्हणजे चोरून वडे खाण्यासारखं आहे. बाहेरून दिसणार्‍या शांततेतही खूप गदारोळ आहे. हे झालं बाहेरचं... माझ्या स्वतःत पाहिलं तर आपण कुठे चाललो आहे ह्याचं भान नसलेली व्यक्ती आणि क्रियाहीनता दिसते. तर काही नाही, तर फार न लिहीता ही नवीन कविता...

धिक्कार हो!
धिक्कार हो तुझ्या जिण्याचा
धिक्कार हो तुझ्या जिण्याचा
तू एक पणती मिणमिणती
भिकार ते दिवाळीतले फटाके
जे ऊजळती राहून तुझ्या संगती
भावना तुझ्या बुळबुळीत अश्रू
लेखणी सुतकी रडू लागली
वासना तुझ्या विनोदी झुरळ ते
वहाणही कच खाऊ लागली
जोहार हे जगणे तुझे अन
न मागताच तू मुंडके दिले
सशाचे फुकाचे हृदय तुझे अन
ढगाने मदाने हसूं पाहिले
पाटच्या पाण्यातसुद्धा
रंग तुजला दिसला खूनाचा
वारही तूच केलेस अन
खर्चही मागशी आता वेदनांचा
प्रेम जे केलेस तेही
चोरट्यांना भरपूर दिसले
मद्य जे प्यालेस तेही
शंभरांना आधीच प्याले
प्रार्थना जशी तुझी ती
भज्यांवरची माशीच की
कंटाळूनी तो हाकली देवही
शिळे लपविण्या त्यासही यत्न की
अंगारे धुपारे दुपारी सुपारी
फोटोतही दिवा तूच लावला
विजांच्या कडाक्यातही त्या
अंधारही तूच की कमावला
का उगाच्या फुशारक्या अन
काय तू दिलेस ह्या धरेला
का म्हणशी सूर्यास ह्या आंधळा
ग्रहण जे लागले तुझ्या डोळा
सावकारी हा रथ निघाला
तू बैलजोडी ही कोडगी
आसूडांचा पाऊस पडला
का साहसी सर्व हे, फोड की
धिक्कार हो तुझ्या जिण्याचा
तू एक पणती मिणमिणती
अंतरिक्षात सुस्नात बालक तुझे अन
का दाबशी घशात स्वतःच्या माती ?

Friday, August 12, 2011

राजसा निजलास का रे..?

चौथीला स्कॉलरशिपला बसवणार आहात का मुलाला? ५ वी पासून आम्ही ह्याला वेगळ्या शाळेत घालणार आहोत. जरा लांब आहे ती. पण चांगली आहे. आई ७ वीची स्कॉलरशिप अवघड असते का ग? नाही बाळ. तू हुशार आहेस ना? तुला सोप्पी जाईल. ८ वीला परांजपे सरांचा क्लास लावायचाय अहो ह्याला! आता रोज इतक्या लांब सायकल मारत जाणार का हा? जाऊ देत ग, त्याचे सगळे मित्र तिथेच जाणार आहेत म्हणतोय ना..नववी ही दहावीपेक्षा अवघड असते बरं.. आता स्पर्धा काय फक्त शाळेतल्याच मुलांशी नाही.. बोर्डात आलं की आयुष्याची दिशाच बदलते... आर्ट्स साईडला पुढे काय असतं? काहीच नसतं! अरे तू हुशार आहेस ना? हुशार मुलं Science च घेतात. ११ वीत timepass करून career चा बट्ट्याबोळ करून घेतलेल्या मुलांची भरपूर उदाहरणं आहेत.. हे बघ. नीट ऐक. हे वय पाय घसरायचं असतं. या वयात प्रेमात वगैरे पडू नकोस. त्यासाठी अख्खं आयुष्य पडलंय. या वयात मुलांनी मनापासून अभ्यास केला पाहिजे.. हेच तर घडायचे दिवस असतात.. १२ वी बोर्ड आणि दहावी बोर्ड यात जमीन अस्मानाचा फरक आहे... अभिनंदन! बोल. मग काय ठरवलंयस? Engineering का Medical?... मी..? माझं ठरत नाहीये.. कळत नाहीये.. तुला Physics आवडतं का Biology? काहीच नाही.. बरं, मग तुला Maths आवडतं का Bio? Umm.. Maths. म्हणजे Engineering... ए माझं ठरलं रे. Engineering. मी लहानपणीच ठरवलं होतं. मला Computer Engineer व्हायचंय म्हणून. Computer का?.. मला लहानपणापासून Computer ची आवड आहे. माझ्या बाबांचा आहे ना आमच्या घरी. आणि मी आता सुट्टीत एक course पण करणार आहे. आणि सध्या भयंकर scope आहे अरे. माझ्या चुलत भावाला तर ३ कंपन्यांनी offer दिली होती.. MS करावं, MBA करावं की MTech? GRE चे words पाठ झाले का? कुठे कुठे apply करतोयस? मी त्या बँकेचं लोन घेणार आहे. Interest rate सगळ्यात कमी आहे. इकडची education system कसली चांगली आहे ना? Job मिळाला का रे? खूप apply केलंय.. मला आश्चर्य वाटतं की अमेरिकेतही ओळखीने नोकऱ्या मिळतात. आता कमावतोयस तर मार एकदा आमच्या west cost ला ट्रीप! हा..काका काय म्हणताय? काय अमेरिकन..तुम्ही आता तिकडचेच झालात की.. इकडे यायचा विचार आहे की आता तिकडेच..? नाही नाही. असं कसं. येणार ना भारतात.. Frankly speaking, all I am looking for is the results. That's the bottom line. Come on..You know you are intelligent. You are smart. All you have to do is to put little extra bit of efforts.. You are young. You should be more efficient than me!..काय म्हणतेस आई? अरे किती दिवसांनी बोलतोयस..busy असतोस का? बर मी काय म्हणते, आपल्याला तुझ्या लग्नाचं बघायला हवं आता. तू काही ठरवलंयस का तिकडे? नाही आई.. नक्की नाही? नाही. म्हणजे अशी कोणी मिळालीच नाही. ठीक आहे मग आम्ही बघायला लागतो. तुझी काय स्वप्नं आहेत? मला काही वर्ष job करून भारतात यायचंच. Great! आणि तुझी? मलाही काही वर्षे अमेरिकेत राहायला आवडेल. Independent. नंतर सासरच्या लोकांबरोबर राहायचं असतंच.. तुम्ही दोघेही आता तिशीचे झालायत.. तुम्ही family planning करताय की नाही..? हे बघ, योग्य वेळेत सगळं झालं पाहिजे.. हो आई..एक heavy प्रोजेक्ट चालू आहे..promotion चे chances आहेत.. मग आम्ही...



आज मला इतक्या सकाळी का जाग आलीय? किती वाजलेत? ४?! सूर्योदयापूर्वी बाहेर कसं असतं बघून तरी येऊ..बोचरी थंडी आहे..काय सुंदर दिसतीय बाग..धुक्यात. एक मिनिट! माझ्या घरामागे अशी बाग नाहीये.. हे तर माझं आजोळ आहे. मी स्वप्नात आहे का? झाडं अजून झोपेत आहेत.. पानापानातून झोप ओघळतीय खाली.. ह्या कळ्या तर आज उमलतील.. त्यांच्या आयुष्याचा पाहिला दिवस!.. हा प्रेमळ गारवा फक्त पहाटेच पाडतो का? कसे सगळे शांत झोपलेत.. जागा आहे तो फक्त मी आणि ही थंडी. म्हणजे कोणीतरी आहे माझ्या सोबतीला.. मी चप्पल काढावी.. हा... पायरीची फरशी कसली गार पडलीय... इथंच उभं राहावं. हा पायाखालचा गारवा कधी जाऊच नये.. अहाहा.. जग थांबलय असंच वाटतंय. at least वेळ खूप हळू पुढे सरकतीय.. आईनस्टाईन चा काहीतरी प्रमेय आहे ना यावर? आज पहिल्यांदा असं झालंय की मी सोडून बाकी सगळे सजीव झोपलेत. अगदी झाडंसुद्धा.. ती लाडकी मोगऱ्याची फुलंसुद्धा.. त्यामुळेच मला इतकं शांत वाटतंय.. सजीवांचासुद्धा गलका होतो.. मेंदू न चुकता अगदी रोज ठणकतो.. आणि आयुष्यात आपण रोज गुंतत जातो.. समोरची व्यक्ती कोणतीही असू देत.. आई..बायको..Boss..मित्र..काका..मामा.. किंवा आपल्याला ज्याचा सगळ्यात जास्त राग येतो असा तो... मी शेजारी नाही म्हटल्यावर हिला जाग तर आली नसेल..? आणि ती आपल्या मागे उभी तर नसेल..? नाहीये.. मला अजून थोडयावेळ एकांत हवाय.. हे स्वप्न असेल तरीही..please मला कोणी स्वप्नातून उठवू नका.. हा आलाच बघ सूर्य. ए अरे..कशाला पाडतोयस किरणं तुझी? बघ उठायला लागले सगळे.. चिमण्या ओरडायला लागल्या.. झाडं जागी होतायत.. नको ना... त्या समोरच्या मोगऱ्याचा देखील मला राग येतोय आता.. म्हणजे मी त्याच्यावर मनापासून प्रेम केलंच नाही का?... मी जातो आत.. दिवस उजाडायच्या आत मला थोडा वेळ झोपायचंय.. परत तेच सगळं सुरु व्हायच्या आत मला थोडावेळ झोपायचंय... नेमकी आत्ताच बाथरूमला लागायची होती..?

झोपेत सगळा गुंता सुटत असतो.पुन्हा गुंता होण्यासाठी..

Wednesday, February 23, 2011

चरित्र-मंथन


चरित्र-मंथन

खूप गोंधळ चालू आहे सध्या...खासगी आयुष्यातल्या गोष्टी आणि बाहेरच्या गोष्टी, दोन्ही तेवढ्याच तीव्रतेने जाणवत आहेत.....एकीकडे वरवरून दिसणाऱ्या सोयी पण आतून होणारा मनस्ताप , तर दुसरीकडून काहीच न मिळाल्यामुळे 'सगळाच आनंद'(उपरोधिक) ह्यांमुळे मनाचा दाह होतो आहे असं वाटतं. शिवाय, नको असलेलं आयुष्याचं वळण आणि त्यानुसार येणाऱ्या काळज्या-तक्रारी-जबाबदाऱ्या ह्यांच्यामुळे वैयक्तिक योजनांवर पाणी फिरल्यासारखं वाटत आहे.....अगदी ५-६ वर्षांपूर्वी वेगवान वाटणारया आयुष्याचा वेग मंदावत चालला आहे आणि त्याला मीच जबाबदार आहे असं वाटायला लागलंय....कधी-कधी फ्रेडी मर्क्युरीच्या 'बोहेमियन ऱ्हापसोडी' मध्ये एक ओळ आहे ......Sometimes I wish I was never been born at all.........तसं होतं......




चरित्र-मंथन चरित्र-मंथन 
लग्नाचे ते अरुंद भोजन
भेसळ सगळे ते रक्तचंदन
डालडा तुपात तुपकट निरांजन

चरित्र-मंथन||

विरुद्ध दिशेला क्रोधीत जीवन
विचित्र संध्या प्रेमळ अंजन
व्यर्थ सारे मृत्तिका पूजन
घनांच्या कडेला शेणसारवण


निषेध सारा प्रति-वाक्ताडन 
जगण्याचे ते सहा सोपान
प्रबोधनाचे मौलिक प्रकटन
क्रियाहीन तो भेकड सैतान



निरुंद पत्तन सुख-संमार्जन
कुचेष्ट निद्रा मधु-संगोपन
समबुद्धी सुरा-प्राशन
निर्वात घरटे दीन भजन



तुडुंब अश्रू प्रचंड विघटन
क्रंदन नव्हे गुटिका मंजन
लोभस टेंभा निखील वर्तन
अचाट मेंदू निकृष्ट संजीवन


निर्जीव प्रक्रिया पालनपोषण
दु:सह जीवन उघडे दुकान
फेकाड तंतू अरि-वृंदावन
विदीर्ण रेशीम सुधीर भलामण



विलापशोचन हे कीटक-रोदन
प्रसिद्ध-सुमंत असत्य निरुपण
नको विरुद्ध महतीचे गोडवे गायन
प्रतिभा-गुंफन हेच नवयुग गर्जन




विचारमंथन चरित्रमंथन.........


-सारंग 02/23/2011

Wednesday, February 9, 2011

आत्मविश्वास

प्रसंग आहे एका शनिवारी मी लंडनहून गावी परतत होतो तेव्हाचा. लंडनहून घरी परतताना मी नेहेमी रात्री १०:१४ ची ट्रेन पकडायचा प्रयत्न करतो, कारण या गाडीला अजिबात गर्दी नसते. तुरळक प्याशिंजर लोक आपले इथंतिथं सांडलेले असतात. आणि मोजून चार ष्टापात गाडी आमच्या ठेसनात पोहोचतेदेखील. अशी अजिबात गर्दी नसलेली गाडी पकडली की मलासुद्धा फोनाफोनी करायला आणि मोकळ्या आवाजात गप्पा हाणायला बरं पडतं!

त्या दिवशीसुद्धा माझा डबा ऑलमोस्ट मोकळाच होता, अगदीच बोटावर मोजण्याइतकी डोकी होती, दाराजवळची एक मोक्याची जागा पकडून मी बसून घेतलं, सगळं कसं मस्त जमून आलं होतं. मी लगेच फोन काढून सारंगला कॉललो आणि गफ्फा सुरु केल्या! अगदी गाडी सुटायच्या वेळी एक मुलगी शेजारी येऊन बसली.

आश्चर्य! कारण गोर्‍या ललना आपल्या शेजारी फक्त 'इतरत्र जागेचा अभाव' या एकाच कारणास्तव बसतात. वर यांचा आविर्भाव तर असा की जणू शेजारी बसून यांनी मला एकदम पवित्रच करुन टाकलाय आणि या शेजारी बसल्या नसत्या तर मी ट्रेनमधून थेट नरकातच गेलो असतो वगैरे वगैरे! आणि ही पोरगी सगळा डबा रिकामा असताना शेजारी येऊन बसली, आणि अगदी दहा वर्षांची ओळख असल्यासारखं हसली. असला ब्येक्कार धक्का बसला राव! त्या धक्क्यातच मी सारंगला सांगितलं की घरी जाऊन कॉलतो परत आणि फोन कटवला. माझा फोन बंद झाल्याचं पाहून शेजारणीच्या गप्पा चालू!

मन में आश्चर्यका एक और फटाका फुट्या! मी तर पडायचाच बाकी राहीलो होतो. कारण याआधी अशी कधी वेळच आली नव्हती, आणि या ताई तर सुंदर, गोर्‍यापान, सोनेरी केस, निळे डोळे वगैरे होत्या. आता हा नेम कसा काय चुकला याचा विचार करत मी त्या इंग्रजी हल्ल्याला माझ्या पुणेरी इंग्रजीतून जमेल तसं तोंड देऊ लागलो.

त्यानंतर पुढला पाऊण तास त्या ललनेने गावभरच्या गप्पा मारल्या. तिचं नाव 'लिझ' (बहुधा एलिझाबेथ असावं)! पेशाने एक पर्फ्युमिस्ट असलेली लिझ लंडनमधल्या एका फ्येमस पेर्फ्युम फॅक्टरीत काम करीत होती. मग गप्पा सहाजिकच अत्तर, वास वगैरे गोष्टींवर गेल्या. तिच्या कामाच्या बाबतीत ती जाम एक्सपर्ट आहे हे पुरेपूर जाणवत होतं. माझी पण उगाच बॅटींग करुन झाली होतीच, आणि पाठ केलेल्या इंग्रजी शब्दांचा साठा संपत आला होता, तेव्हढ्यात तिचं स्टेशन आलं! जायला उठली, दारापर्यंत गेली, आणि वळून हाक मारून म्हणाली, "मला जरा उतरायला मदत करतोस का?" मी अवाक! म्हणजे शेजारी बसून गप्पा वगैरे ठीक आहे, पण उतरायला मदत वगैरे जरा अतीच होतं! असल्या अनपेक्षीत सलगीच्या धक्क्यातून मी जागा होईपर्यंत तिने पर्समधून एक वॉकींग-स्टिक काढली आणि म्हणाली, "मला दिसत नाही ना, आणि प्लॅटफॉर्म आणि ट्रेनमधल्या गॅपची मला थोडी भितीच वाटते." आणि तिला प्लॅटफॉर्मवर उतरवल्यावर गप्पा मारल्याबद्दल ठांकू म्हणून गेली!

त्यानंतर मी अक्षरश: सुन्न बसून होतो. कुणीतरी सणसणीत कानाखाली वाजवल्यावर कसं सगळं भण्ण होतं ना, तसं वाटत होतं. इतका वेळ मी ज्या मुलीशी गप्पा मारल्या -गप्पा कसल्या, पाऊण तासाची टाईमपास बॅटींग केली- तिला अजिबात दिसत नव्हतं हे कळल्यावर डोकं भणाणून गेलं माझं! तिच्या वागण्या-बोलण्यातून असं एकदाही जाणवलं नाही की तिला दृष्टीदोष आहे. सगळं इतकं सहजपणे चाललं होतं, ती चक्क माझ्याकडे पाहून बोलत वगैरे होती.

मग मला एक एक संदर्भ जाणवायला लागले, की तिच्या बोलण्यातून एकदाही काही पाहिल्याचा, रंगांचा उल्लेख आला नव्हता. सुरुवातीला माझी भाषा मराठी आहे वगैरे गप्पा झाल्यावर तिने पर्फ्युमबद्दल बोलायला सुरु केलं होतं. अर्थातच, 'वास' हे तिचं क्षेत्र होतं आनि ती त्याबद्दल भरभरुन बोलत होती! ती पर्फ्युमिस्ट आहे म्हटल्यावर मी सहाजिकच तिला 'पर्फ्युम' नावाच्या एका इंग्रजी चित्रपटाबद्दल विचारलं होतं तेव्हा तिने "मला चित्रपट पहायला आवडत नाहीत" असं उत्तर देऊन विषय संपवला होता. बोलताबोलता ती बर्‍याच वेळा माझ्या मागे काचेत शून्यात पाहिल्यासारखं बोलायची. या सगळ्याकडे मी खूप सहज दुर्लक्ष केलं होतं हेही आठवलं.

दृष्टीदोषासारखा प्रॉब्लेम असलेली लिझ मला अगदी सहपणे भेटली आणि सहजपणे एक ठसा ऊमटवून गेली. ती मला भेटणं हा संपूर्ण योगायोगाचा भाग होता. म्हणजे तिला मी भेटलो नसतो, दुसरा कोणीही भेटला असता तरी तिला काहीही फरक नव्हताच. असं शेवटच्या क्षणी आपल्या गप्पेकर्‍याला एकदम शॉक देणं तिच्या नकळत ती करतच होती, आणि करत राहीलसुद्धा; पण माझ्या डोक्यात हा प्रसंग इतका फिट्ट बसलाय, की ही लिझ विसरणं केवळ अशक्य!

कुठेही दृष्टीदोषाचा उल्लेखही नाही, की त्यामुळे प्रॉब्लेम होतोय वगैरे तक्रार नाही. रोजच्यारोज घरून लंडनला जा-ये करताना तिचं कुठेही अडत असेल असं नाही! स्वत:च्या सुंदर दिसण्याचा अभिमान नाही की दिसत नसल्याची खंत नाही! असलं आरस्पानी सौंदर्य, देहबोलीतली विलक्षण सहजता आणि तुफान आत्मविश्वास असलेली ही मुलगी त्या दिवशी जाणिवा हलवून गेली हे मात्र नक्की!

Thursday, January 6, 2011

'फेसबुक' वर आहेस का?



फेसबुक........फेसबुक चा तो निळा रंग बघूनच कंटाळा येतो....कधी ह्या कंटाळ्याचा डोंगर पार करून समजा बघितलं तर पुलंनी वर्णन केलेल्या पानवाल्याच्या ठेल्याची आठवण येते...हेच पहा ना....


 सगळ्या मित्रांचे ठराविक फोटोज ( गळ्यात हात टाकून 'ये दोस्ती नही छोडेंगे' वगैरे)........काही मित्रांचा ग्रुप ---ज्यांचे नेहेमी दारू पिताना फोटोज ( टायटल: 'इश्कने दर्दी बनाया' किंवा 'आज थोडी पी ली है' ).... ....मग अजून एक मित्रांचा समूह ज्यांचे नेहेमी कुठल्या तरी गोऱ्या मुलीबरोबर किंवा मेणाचा पुतळा असलेल्या गोऱ्या अभिनेत्री-बरोबर (उदा. शकिरा वगैरे) फोटोज... .
काही मैत्रिणींचे त्यांच्या लग्नातले जगासमोर मांडलेले 'सुंदर' म्हणावं लागतं असे फोटोज आणि त्याखालच्या त्यांच्याच गल्लीत अर्धं आयुष्य घालवलेल्या त्यांच्या मैत्रिणींच्या कॉमेंट्स 'ओह बेब्स, लुकिंग गुड!' किंवा 'वॉव, वंडरफुल कपल, लव यु गाईज!!' किंवा 'सो क्युट!' वगैरे वगैरे .......
अजून काही मैत्रिणी आणि मित्रही, ज्यांचे आपापल्या नवजात अपत्त्यांबारोबारचे फोटोज.....आणि मग त्याखालच्या बाळाचं कौतुक करणाऱ्या मावश्या 'ओह..माय क्युट बेबी !!!' 'सो SSS स्वीट...'. इत्यादी....काही जणांचे कुठल्यातरी बार मधले किंवा क्लब मधले नाचतांनाचे फोटो....आणि त्याखाली 'वॉव ...यु रॉक !!' वगैरे.........
मायामी , न्यूयॉर्क, लंडन, कॅलिफोर्निया, शिकागो, आयफेल टोवर, टोक्यो, सिंगापूर ह्या ठिकाणांचे सुमारे ५ अब्ज फोटो आणि बहुतांश फोटोज मध्ये दोन्ही हात फैलावून आकाशाकडे बघणारी ती व्यक्ती......पावडर ने मढवून अत्यंत मोठा खरा दाणा दिसणाऱ्या साखरपुड्याच्या अल्बम मधल्या  मुलीला 'खूपच छान दिसत आहेस फोटोत !' अश्या प्रतिक्रिया....
काही ठिकाणी हसू येईल इतक्या वैयक्तिक आयुष्यातल्या बाबी ( उदा. 'काल रात्री खाल्लेल्या चोकलेट केक बद्दल माझ्या प्रिय नवऱ्या (हबी डार्लिंग!) , तुला खूप धन्यवाद!' ) .........
काही अजून म्हणजे स्वतःचे किंवा स्वतःशी निगडीत फोटो न लावता कोणीतरी 'अर्जुन रामपाल', 'शाहरुख खान', 'कतरिना कैफ', 'ऐश्वर्या राय' असल्या सुमार लोकांचे  किंवा ज्यांचं नाव तोंडानी उच्चारता येणार नाही अश्या फ्रेंच मॉडेल्सचे फोटोज आणि त्या खाली फोटोच्या टायटल मध्ये 'यु आर सो ब्युटीफुल' असा काही मजकूर..!!......
ह्याशिवाय कोणीतरी गल्लीतला किड्यांचे, माश्यांचे, पानांवर पडलेल्या थेंबांचे, किल्ल्यांवरच्या भग्नावशेषांचे (सेपिया कलर मधले), फटाक्यांचे, सुरकुतलेल्या चेहेऱ्यांचे फोटो काढून एका काळ्या चौकटीत बसवून त्याखाली स्वतःचं नाव (उदा. अमित, आनंद वगैरे !....ही नावं खूप कॉमन आहेत म्हणून बरं का !) लावणारा फोटोग्राफर.........
शिवाय अजून एक नवीन टूम, पुणेरी पाट्या आणि त्याखाली ९०० वेळा 'हा हा हा !!' वगैरे.......काही अति-धार्मिक लोकही आहेतच! रोज बायबल मधलं एक वचन किंवा रोज एक तमिळ शब्द वगैरे.....
अमेरिकेत पाळीव कुत्रीही फेसबुकात समाविष्ट आहेत... कुत्र्यांचे आणि मांजरांचे केविलवाणे फोटो त्यावरची दुनियेची स्तुती-सुमनं. .... .
सचिन आणि गांगुलीचे फोटो आणि त्याखाली त्यांना दिलेलं देवपद, अनुसरून त्यांच्या आरत्या ( 'ऑफ-साईडला आधी साक्षात देव आणि मग गांगुलीच!', 'जय सचिन देवा.!' )........


असे एक नाही अनेक तर्हेचे ग्रुप्स आहेत.....पण प्रत्येकजण कुठला ना कुठला तरी आकृतिबंध अनुसरतोय. सगळेजण लग्नाआधी एकट्याचे फोटो लावणार, दोन-चार गडांवर जाऊन दोन-चारशे फोटोज लावणार नाहीतर लडाखला बाईकवर जाऊन येणार, कॉलेजमधल्या ग्रुपचा फोटो, मग साखरपुड्याचे बटबटीत फोटो, मग प्रत्येकजण आपण किती 'फुलीश रोमांटीक' आहोत हे दाखवणार...आणि लग्नाच्या आधी प्रत्येकाला विरह ( हल्ली त्याला 'जुदाई' म्हणतात!) होणार मग त्याचे फोटो........नंतर लग्नाचे फोटोज ज्यात सगळ्या मुलांनी फेटे घातले असणार, शिवाय हनिमूनचं प्रदर्शन आहेच ! तुमचं कुठल्या व्यक्तीबरोबर काय नातं आहे (प्रेयसी, प्रियकर, एकटा/टी, साखरपुडा झालेला, विवाहित इ.), ते अचूक शब्दांत सांगावं लागणार! मधून मधून आपला नवीन फोटो टाकल्यावर एकमेकांना 'सो चार्मिंग!' म्हणावं लागणार !

ह्या फोटोजवर लिहावं इतकं कमी तर व्हीडीओ चं जग तर त्याहीपेक्षा कमालीचं मजेदार आहे ! शिवाय लोकांचे एकमेकांना मेसेजेस आणि त्यातून घडणारा विनोद हा पराकोटीला जाईल एवढा आहे ! प्रश्न असा आहे, 'का?'...... काय लपवण्यासाठी ही सगळी मास्क्स (मुखवटे) लावावी?.......का सगळ्यांनी इतरांसारखं बनावं? अशी कोणती भीती आहे ज्यामुळे आपण बाहेर फेकले जाऊ ? 
आपण का एवढं खोटं बोलतोय? का उगाच दुसऱ्याबद्दल काळजी असल्याचं दाखवतोय? का इतरांचं अनुकरण करतोय? उगाच सगळ्या फोटोजना 'लाईक' करून, सगळ्यांशी गुडी-गुडी बोलण्याचा आव आणून, अमेरिकेतल्या कंपन्यांच्या फुकट जाहिराती करून, 'पॉलीटिकली करेक्ट' बोलून,  आपल्या घरीच असणाऱ्या आई-बाबांना फेसबुक वर खातं काढायला लावून  आपण काय मिळवतो आहे? भरपूर बुद्धिमत्ता असणारे आपण स्वतःला अश्या सामान्यतेत का ढकलत आहोत?  कोणत्या वेबसाईट वर प्रतिक्रिया व्यक्त करून आपल्याला जग बदलून टाकणारी कल्पना सुचणार आहे ? 



प्रिय वाचकहो, छोटी छोटी निरीक्षणं मांडावी आणि विनोदी लिहावं म्हणून बसलो होतो आणि ठरवलं होतं की कुठलाही शब्द खोडायचा नाही, पण शेवटी थोडं गंभीर झालंच! तुम्हाला काय वाटतं ते जाणून घ्यायचं आहे....

धन्यवाद!