Tuesday, November 9, 2021

हिशोब

 

आयुष्याची पस्तिशी ओलांडली, 

की हिशोबाचे मांडणी करावी..

जी काही जमा, जो काही खर्च, 

जी श्रीशिल्लक, ती लिहायला घ्यावी..


आईला विचारावं, काही चुकतंय का माझं, 

तुझ्याशी वागण्यात, बोलण्यात?

पूर्वीसारखा विचारपूस करतो ना मी, 

तुला अजूनही जपतो ना मी?

आईची सगळी उत्तरं जिवापेक्षा मौल्यवान, 

ती तशीच जमेत लिहावीत..


वडिलांना विचारावं, 

गणित बरोबर यायला नक्की काय करावं?

तुमचे आयुष्याचे मार्क्स शंभरपैकी, 

एकशे अठ्ठावन्न कसे आले, मलाही सांगा..

माझं काही चुकत असेल तर 

दोन मार्क जास्त कापा, फक्त नापास करू नका..

झालीच काही गडबड, तर कान धरून चार फटके द्या, 

पण अबोला कधी धरू नका...

वडिलांची उत्तरं जपून ठेवावी, 

शेवटी हिशोब जुळवायला तीच उपयोगी यावी...


बायकोला विचारावं, फार त्रास देतो का मी? 

तुझा योग्य मान राखतो ना मी? 

वरच्या पट्टीत, रागाने, तुझ्याशी बोललोय का कधी? 

माझ्याशी लग्न केल्याचा पश्चात्ताप होतो का ग कधी?

झाला असेल कधी वाद, पण त्याच्या पलीकडे जाऊन माझं प्रेम जाणवलंय ना तुला?

तुझ्याशिवाय पानही हालत नाही हे कळलंय ना तुला?

अप्रतिमच आहेस तू.. 

हे सांगायला शब्द कमी पडले बऱ्याचदा, 

आणि म्हणायचंदेखील राहून गेलं अनेक वेळा..

पण दर वेळी समजून घेतलंसच की तू..

बायकोची उत्तरं बाजू पाहून मांडावीत, 

यातल्या खर्चातून जमेपर्यंत जायचा प्रयत्न म्हणजे आयुष्य..


बहिणीला थोडा त्रास द्यावा, 

मारामाऱ्या, उखाळ्या-पाखाळ्या..

कधी निवांत बसून गप्पा, कविता, गाणीगिणी...

तिचा रागलोभ जमेत मांडावा, आयुष्याची पुण्याई..


भावाला विचारावं, काय ब्रो, सगळं ऑलराईट?

भाऊ सांगेल ते गुमान आईकोनी घ्यावे, 

जमलं तर दोन-चार आपणही द्यावे.. 

तो जैसे वांछील तैसेच घ्यावे-द्यावे, टपाटप..

हा सगळा पॉकेटमनी, ह्याचा हिशोब नाही. 

अमर्याद कारभार..


आईंना विचारावं, माझी गाडी कुठे घसरत नाही ना?

तुमची पोट्टी माझी तक्रार करत नाही ना? 

केली तरी अजिबात लक्ष देऊ नका, 

मलाच तुमचा लेक मानत चला..

त्या सांगतील ते सगळं डोळे मिटून जमेत मांडून टाकावं, 

हे आपल्या मुठीतले झाकलेले सव्वा लाख..


पोरांना विचारावं, या वर्षी काय नवीन?

तुमच्या भरारत्या आयुष्यात काय काय स्थिर?

अधूनमधून भुर्र, टेकडी, पिक्चर, ट्रीप, फोटोगिटो करावं..

त्यांचे हसरे चेहरे कॅमेरात आणि जमेत टिपावेत..


मित्रांना तर विचारायलाच जाऊ नये, 

चाळीस शिव्या, पन्नास सल्ले, गोळ्यांसरखा वर्षाव.. 

डोक्यावर घेऊन जगाला दाखवत फिरावं अशा या मिळकती,

या फक्त जमा, इथे खर्चच नाही..


असा "जमलेला" सगळा खर्च मांडून पहावा, 

जिथे कमी पडेल तिथे किरकोळ आनंद भरून टाकावा..

उतू नये, मातू नये, उगीच माज करू नये..

कारण शेवटी चित्रगुप्त हेच पाहणार आहे, 

आणि खर्च सगळा जमेतून वजा करणार आहे, 

हिशोब सगळा जुळवून बघणार आहे..


शेवटी सगळी सुखाची ऊब, 

त्यासाठी असौख्याचं व्हावं सरपण, 

आनंद तो आपली जमा, 

खर्च तो सारा कृष्णार्पण!!


- समीर

८-११-२०२१ (पु. लं. चा १०२वा वाढदिवस)

Saturday, May 8, 2021

कोरोना आणि मध्यमवर्गीय

गेल्या वर्षी कोरोना सुरू झाला आणि तमाम मध्यमवर्गीय जनता भूमिगत झाली. 'ऑनलाईन शॉपिंग' चळवळ पुढे नेणे, बिना मास्क बाहेर भटकणाऱ्यांच्या नावे बोटं मोडणे, 'घरच्याघरी' या शब्दाचा घासून पुसून गुळगुळीत होईपर्यंत वापर करणे, आणि असं असूनही ऑफिस-ऑफिस खेळत राहणं हे सगळं करण्यात या वर्गाचा सगळा वेळ, सगळी शक्ती खर्ची पडली.

खरंतर मध्यमवर्गीय माणूस कोरोना, कॅन्सर, टिबी, हार्ट अटॅक, कावीळ असल्या आजारांना मुळीच घाबरत नाही. 'रोजरोज तेच' यालाच तो इतका गांजलेला असतो की आजार किंवा मरण हा वेलकम चेंज वाटावा. त्याला भीती वाटते ती खर्चाची. गरिबांना केशरी कार्डाचा पाठींबा भरभक्कम असतो, श्रीमंतांकडे पैसाच भरभक्कम असतो. कुठले आजार आलेच वाट्याला तरी केशरी कार्डाच्या आणि पैसेरी नोटांच्या होड्या करून हे दोन्ही पक्ष तरून जातात. आणि काडीचाही आधार नसलेला मध्यमवर्ग रीतसर बुडतो.

त्याला भीती वाटते खर्चाची, त्याला भीती वाटते ती पै पै जोडून उभ्या केलेल्या त्याच्या इटुकल्या पिटुकल्या इंवेस्टमेंट तोडायची. खरंतर त्या इंवेस्टमेंटचा जीव इतका छोटा असतो की त्यात एका पोराचं सुद्धा शिक्षण होणार नसतं, पण त्यावर बांधलेले स्वप्नांचे इमले चक्काचूर व्हायचीच भीती वाटत असते. 

मध्यमवर्गीय माणूस हा भविष्यातल्या स्वप्नांवरच जगत असतो. त्याचा भूतकाळ अजिबात अभूतपूर्व किंवा सुखनैव नसतो,  सात पिढ्या कारकुनी करण्यात आटोपलेल्या असतात, वर्तमानकाळ त्याच कारकुनीत चाललेला असतो, त्यामुळे 'आपला भविष्यकाळ निश्चितच उज्वल असेल आणि त्यासाठी आपण लागेल ती मेहेनत करू' या एकमेव आशेवर तो प्रत्येक दिवसाचं इंधन जाळत त्या भविष्याकडे जायचा प्रयत्न सुरू असतो. अशात त्या आशेलाच काडी लावणारा कुठलाही खर्च त्याला झेपत नाही. म्हणून तो असल्या कर्मदरिद्री आजारांच्या नादीच लागत नाही.

असो. नातीगोती जपणारा आणि मित्रांसोबत(च) आयुष्य आहे असं मानणारा मध्यमवर्ग कोरोनामुळे हैराण झाला तो मुख्यत्वे घरी बांधून घातल्यामुळे. कुणी कुणाकडे जायचं नाही, यायचं नाही,मित्रांना भेटायचं नाही, ऑफिस बंद, टपरीवरचा चहा बंद, पॉलिटिकल गप्पा बंद, ट्रॅफिक बंद, त्यावरून होणारी चिडचिड बंद. रोजच्या जगण्यातली सगळी टॉनिक बंद झाल्यावर शिट्ट्या वाजणार नाही का राव! त्यातच आयुष्यभर केवळ स्वप्नात बघितलेला 'कुटुंबासमवेत वेळ घालवणे' हा इव्हेंट प्रत्यक्षात अवतरलेला पाहून त्याची खरंतर शाळा झाली. आपली स्वप्न खरी होण्याची जळी-स्थळी-काष्ठी-पाषाणी सुतराम शक्यता नसल्याने त्याला स्वप्नातच रमायला जमतं, अचानक स्वप्न खरं झाल्यामुळे धावपळ झाली. आणि समवेत घालवायला इतका वेळ मिळाला की त्याचं नक्की करायचं काय हेच मुळात समजलेलं नाही, अजूनही!

'ठेविले अनंते तैसेचि रहावे चित्ती असो द्यावे समाधान' यावर ५००% विश्वास ठेवणाऱ्या या वर्गाला अनंताने अचानक इतके चेंजेस आपल्या माथी का मारले असावेत याचा विचार करण्यापलीकडे काहीच पर्याय नाही.

अजून एका विषय म्हणजे मध्यमवर्गीय बायका. लॉकडाऊन झाल्यावर सुरुवातीचे काही दिवस संपूर्ण कुटुंब एकसंध एकत्र सुरक्षित पाहून खूश होणाऱ्या माताभगिनी त्यानंतर लगेचच हैराण झाल्या. भूतालाच काय, स्वतःचे आईवडील आणि सासुसासरे यांनासुद्धा न घाबरणाऱ्या या बायकांना 'खायला काही आहे का ' या प्रश्नाची भीती वाटायला लागली. त्यातच त्यांच्या आयुष्याचा आधार, कामवाल्या बायका, त्यासुद्धा बंद झाल्या.पूर्वी डबे पॅक करून लोकं घराबाहेर घालवले की दिवस पाचाउत्तरी सुफळ संपन्न होत होता, तिथे तोच दिवस आता साठाउत्तरी कहाणी सांगितली तरी संपत नाही. 

नोकरी करणाऱ्या बायकांचे हाल तर अजून बेकार आहेत, ऑफिस सुरू असतं, मध्येच मॅनेजर कॉल ठेवतो, तेव्हा त्याच कॉलवर आलम दुनियेसमोर पोरं पाठीमागून आरडाओरडा करतात, अवेळी खायला मागतात, मारामाऱ्या करतात, मोठमोठ्याने रडतात, नवरा केव्हाही चहा मागतो तेव्हा निव्वळ हताश व्हायला होतं. पूर्वी ऑफिसात चहा रेडिमेड मिळत असायचा, आता त्यांनी केल्याशिवाय कुणालाच चहा मिळत नाही. यात दुःख चहा करावा लागतो हे नाहीये, न मागता एकदाही चहा हातात मिळत नाही हे आहे. पूर्वी ऑफिस मधून घरी आल्यावर 'ऑफिस' हा विषय संपत असे, आता घरीच ऑफिस आल्यामुळे तिन्ही त्रिकाळ काम सुरूच असतं. ऑफिस आणि घर या दोन कधीही एकत्र न येणाऱ्या रुळांचं असं त्रांगडं होईल असा विचारसुद्धा या घर-ऑफिस-ग्रस्त बायकांनी कधी केला नसेल. 

फक्त 'समाधानी' राहता यावं म्हणून सर्व ते प्रयत्न करणाऱ्या या वर्गाला कोरोनामुळे इतकी डोकेफोड करायला लागते आहे, तितकी जर त्या अनंताला करावी लागली तर तो 'ठेविले तैसेचि रहावे' मधून स्वतःचं नाव कटाप करून घेईल. घरीच राहणे, हे जे होईल ते स्वस्थपणे पाहणे, बऱ्यावाईट बातम्या ऐकून त्यावर घरीच प्रतिक्रिया, चर्चा, चर्वितचर्वण करणे, गरजेशिवाय अजिबात बाहेर न पडणे याशिवाय काहीच करू न शकणारे, शासनाचे सगळे नियम निमूट पाळणारे, ना जमल्यास रीतसर दंड भरणारे, इतकं सगळं सोसूनही झालाच कोरोना, तर गुपचूप १५ दिवस एकांतवासात पडून राहणारे, आणि आजमितीला 'आमचा नजीकचा भूतकाळ नक्कीच सुखाचा होता' हे छातीठोकपणे सांगू शकणारे म्हणजेच मध्यमवर्गीय!


- समीर

Friday, April 23, 2021

रिकामा कवी, विचारांच्या तुंबड्या

कोविड झाल्याचं नक्की झालं, १४ दिवसांसाठी रवानगी आतल्या खोलीत झाली. नाही म्हटलं तरी या एकांतवासाचं कुतूहल होतंच. पण पाहिले ४ दिवस तापात गेले, पुढले ४ दिवस अशक्तपणात गेले. उरलेले दिवस फक्त लोळून काढले. सगळा क्वारंटाईन पिरियड लोळून लोळून संपवला, काही नवीन वाचलं नाही, लिहिलं नाही.. 

गेल्या १४ दिवसांची एकांतकोठडी रिकामीच राहिली.



परिस्थिती बेक्कार आहे सध्या, कवितेच्या आस्मानात दुष्काळाचा ढग आहे

शब्दांचा अँसिड-रेन आणि इमोशनचा कोवीड आहे


सुचते सुचते कविता म्हणावं तर ड्रेनेजला बोळा बसलाय

विचारांच्या पन्हाळीत कचरा अडकलाय


डोक्याचं भिरभिरं आणि मनाचं डबकं झालंय

कवितांच्या ओळींच त्यात बेडूकराव डराव होतंय


विचारांचं जंगल, त्यात शब्दाचं माकड

आपल्याच ओळी आणि त्यासुद्धा भाकड


म्हणून हल्ली कविता करत नाही, हल्ली कविता वाचत नाही

आणि तसंही कविता करावी असं काही सुचतच नाही...


कवितेला स्वल्पविराम, विचारांना पूर्णविराम

या कवितेलासुद्धा आपला इथेच राम राम!!


- समीर

Tuesday, February 2, 2021

जाणीवांचा खेळ

 

भाबडे आभाळ, पावसाचा नळ,

वाळवणाची ओली खोळ,

नुसतीच पळापळ!


भाबडा वारा, सोसाट्याच्या फराफरा,

कपडे हवेत नाचले,

पळाले सैरावैरा!


भाबडी शांतता, शब्दवाचा गायब होता,

मन भीतीने गारठता,

निःशब्द, भयचकित!


भाबडी भक्ती, नियमित जपजाप,

कुंडलिनी जागृत,

सिद्धीसाकार!


भाबडे काहूर, नेमकी जाणीव,

ज्ञानेंद्रियांना कल्लोळ,

कल्पनांचा!


प्रकाशाची अक्षरे, वाचता न कळे,

कोठून येणे, कोठेची जाणे,

प्रवासी पक्षी!


- समीर