Sunday, July 26, 2020

पुस्तक कसे वाचावे? - अर्थात माझे रिकामे उद्योग



आपण एरवी बरेच वेळा खाद्यपदार्थांचे लेख - ते बनवण्याचे, सजावटीचे, खाण्याचे - पाहतो, वाचतो, अनुभवतो. पण कधी हा विचार केला आहे का, की आपण पुस्तक कसं वाचतो. मी भरल्या पोटी आणि रिकाम्या डोक्याने जे विचाराचं गुऱ्हाळ चालवतो, त्यातून निघालेली रत्नं अशी कधीकधी वाचणाऱ्यांना वाटत असतो. हे सुद्धा त्यातलंच एक.

पुस्तक कोणतंही असो, विषय काहीही असो, लेखक कोणीही असो, पुस्तक वाचायला घेताना ते संपूर्ण वाचण्याचा संकल्प करूनच त्याला हात घालावा. पुस्तक अर्धवट वाचून, आपले विचार खरकटे करून तसेच सोडून देणारे लोक मुळी पुस्तक वाचतच नाहीत. ते आपले उगाच कुणाच्या तरी सांगण्यावरून, दबावाखाली पुस्तकाला शिवतात फक्त. मिसळ खायला बसल्यावर अस्सल तब्येतीत खाणारा खवय्या जसा मिसळीचा, तर्रीचा एक थेंब सुद्धा मागे सोडत नाही, तसचं एक अस्सल वाचक पुस्तकाचं पहिलं, शेवटचं पान, प्रस्तावना, अपोद्घात, उपोद्घात, काहीकाही सोडत नाही.

पुस्तक वाचताना शक्यतो पहिल्या पानापासून शेवटपर्यंत वाचावे. उगीच  पुढल्या पानांवर उड्या मारत मारत वाचू नये. काही लोक शेवटसुद्धा वाचून घेतात. हे म्हणजे पंगतीला बसल्यावर यजमानांनी पानापुढे विडा- दक्षिणा ठेवल्यावर जेवण सोडून तो विडाच आधी खाण्यासारखे आहे. शक्यतो असला आचरटपणा टाळावा. पुस्तक वाचणे ही पंगत रंगवण्यासारखीच कला आहे. तिथे उनाडपणा कामाचा नाही.

एखादं सनसनाटी पुस्तक वाचताना पहिल्या वेळी तरी ते पुस्तकाच्या वेगाने वाचावे. त्याची समीक्षा, चर्चा, रवंथ हे सगळं नंतरच्या वाचनांसाठी राखून ठेवावे. अशी पुस्तकं वाचताना सुरुवात ते शेवट कथानकाच्या वेगाने वाचून एकाच बैठकीत एकसंध वाचून काढण्यात जी मजा आहे, त्याची तुलना केवळ पाणीपुरीशीच होऊ शकते. पाणीपुरी जशी - "देणाऱ्याने देत जावे, खवय्याने खात जावे, खाताखाता पुन्हा पुढली डिश ऑर्डर करत रहावे" - खातात तसचं. पाणीपुरी अर्धवट सोडून ती तासाभराने खाणाऱ्याला जशी भर चौकात मिरच्यांची धुरी द्यायची इच्छा होते, तशीच इच्छा थ्रिलर पुस्तक टप्याटप्याने वाचणारे लोक पाहून होते. ती पाणीपुरी बिचारी लिबलिबीत होऊन असहाय्य स्थितीत प्लेटमध्ये पडून राहते तशीच पुस्तकं सुद्धा वाचकांची वाट बघत पडून राहतात.

याच्या बरोबर उलट, जेव्हा आपण ऐतिहासिक कादंबऱ्या वाचतो, तेव्हा त्यातले प्रसंग समजून घेऊन त्यावर आपला विचार पणाला लावून, गरजेप्रमाणे गोष्टी गुगलून,  पुस्तक शांतपणे आस्तेकदम बामुलाहिजा वाचावे. तिथे घाई करायची नाही.  पुस्तकातल्या समरप्रसंगात आपणही तिथेच जिवाच्या आकांताने लढतो आहोत असे वाटून अंगात वीरश्री संचारली पाहिजे. पन्नास कोसावर ढग गडगडून काही फायदा नाही.

कवितांची पुस्तकं ही रसिक मैत्र जमवून रसग्रहण करत वाचावीत. कवीला कवितेत काय सांगायचे आहे ते सगळं एका वाचकाच्या लक्षात येणे केवळ अशक्य. तिथे 'समानशीले व्यसनेशु सख्यं' मित्र घेऊन कवितेचे साधकबाधक रसग्रहण करून ती वाचावी. बासुंदी जशी भसाभसा पित नाहीत, ती कशी तब्येतीत, प्रत्येक चमच्यात अवीट सुंदरता भरून प्यायची असते, तसचं कवितेचं.
'मधुशाला' सारख्या कविता मात्र रंगील्या मिजाशीत रांगील्या दोस्तांबरोबर ऐकाव्या, वाचाव्या. तुम्ही भले रंगीले नसाल तरीही अशा वातावरणात त्या सायंस्मरणी कवितेची झिंगच तुम्हाला पुरेशी होते.

लघुकथा संग्रह वाचताना सोबत चणे फुटाणे वगैरे घेऊन बसावे. कथेबरोबर जिभेचेसुद्धा लाड करावे. कथेची चव जिव्हेला आवडेपर्यंत हा कथायज्ञ सुरू ठेवावा. प्रत्येक कथेला पुरेसा वेळ आणि न्याय देण्याचा प्रयत्न करावा.  इथे वेळेचे बंधन नाही. हवे तसे हवे तेव्हा वाचन हीच त्याची खासियत.

विनोदी कथा वाचताना त्यातल्या विनोदाला मनमोकळी दाद द्यावी. उत्तम विनोदनिर्मिती ही अतिशय सिन्सियरपणे करायची गोष्ट आहे हे तसा विनोद स्वतःला सुचेपर्यंत कळत नाही. त्यामुळे उगीच चोरून वाचल्यासारखे करू नये. 'टवाळा आवडे विनोद' असं समर्थांनी सांगून ठेवलेलं आहेच, त्यामुळे तात्पुरतं  टवाळपण अंगिकारून पुस्तकाची मजा घ्यावी.

इतकं करूनही काही पुस्तकं असतात जी लवकर पचत नाहीत, संपता संपत नाहीत. अशा पुस्तकांना तोंडीलावणे म्हणून दुसऱ्या किंवा तिसऱ्या वाचनातली पुस्तकं घेऊन ती पूर्ण करावी. सत्याचे प्रयोग हे पुस्तक मी सुशिंच्या कादंबऱ्या सोबतीला घेऊन संपवलं होतं. इच्छाशक्तीला थेट आव्हान देणारी अशी पुस्तकं वाचून साधारणपणे एव्हरेस्ट सर केल्याचा आनंद होतो. तेवढंच काय ते सिल्व्हर लायनिंग.

ज्ञानेश्वरी, भगवदगीता, दासबोध ही वडील मंडळी, यांच्या खोड्या काढायला जाऊ नये. आपली वैचारिक पातळी, समज, आपल्या डोक्यातला कंदील एकूणच किती उजेड पाडतो या सगळ्याचा एकत्रित विचार करून या अशा पुस्तकांना हात घालावा. 'येथे पाहिजे जातीचें, येरागबाळ्याचे हे काम नव्हें', तेव्हा आपण येरूपणाच्या पुढे गेल्यावरच करायचा हा उद्योग आहे. थिल्लरपणा इथे वाचकाला सर्वस्वी उघडा पाडतो. जिथे ज्ञानेश्वरांचे पसायदान समजणेच इतके अवघड, तिथे ज्ञानेश्वरी वाचायचा प्रमाद येरुंनी शक्यतो टाळावा. दासबोध हा वाचकाच्या वर्तनातल्या ढोबळ चुका इतक्या मर्मावर बोट ठेवून दाखवून देतो की मनातल्या मनात कित्येक वेळा स्वतःचीच धिंड निघाल्याचा फिल येतो. यांच्यासाठी पोक्त वय राखून ठेवणेच योग्य. संसारातून तावून सुलाखून निघाल्याशिवाय यांच्यातला खरा अर्थ कळणार नाही, झेपणार नाही. 

बाकी पुस्तकं वाचताना दुमडू नयेत, त्यावर लिहू नये, फराटे रेघोट्या मारू नये हे तर शहाण्यास सांगणे न लगे. पुस्तकं विद्रूप करणारे पुढल्या जन्मी गांडूळ होतात असा माझा ठाम समज आहे. पुस्तक शक्यतो दोनदा तीनदा वाचावे, प्रत्येक वेळी ते नव्याने कळते हा स्वानुभव आहे. असे हे पुस्तकवाचन पुराण प्रत्येक वाचकास पुस्तक वाचनात उपयोगी पडेल असा गैरसमज करून घेऊन  हा रिकाम्या वेळचा उद्योग थांबवतो.

समीर