Monday, March 12, 2012

नक्षत्रं आणि राशी

मंडळी,

नक्षत्रं आणि राशी, असं नाव वाचून साधारण जो ग्रह होणं शक्य आहे, तसा राशीचक्राचा इथे संबंध नक्कीच आहे, पण थोडा वेगळ्या अर्थाने. एखादा खगोलावरचा लेख अल्पमती साथ देते तसा लिहावा हा प्रयत्न आहे. अगदीच कुणाला आवडलाच लेख, आणि चार दोन लोकांचा इंटरेस्ट वाढलाच खगोलशास्त्रात, तर आम्ही स्वतःला धन्युधन्यु समजून घ्यावे ही अल्पशी अपेक्षा. बाकी ज्योतिष या विभागाकडे वळायचा माझा अजून तरी धीर होत नाही बुवा. 'faith is a gift I'm yet to receive' असं कुठेतरी, कोणीसं, काहीसं म्हणून गेलं ना; तसं माझं या ज्योतिषाबाबत झालंय. यालासुद्धा कारणीभूत असणारी दिव्य मंडळी म्हणजे हे ग्रह, तारे वगैरे आकाशस्थ पार्टी.

आपापल्या दिलेल्या कक्षेत गपगुमान फिरणारी, बाकी जगाच्या खोड्या सोडा पण एकमेकांच्यादेखील वाटेला ना जाणारी, जमलंच तर अधूनमधून मानवजातीकडे पाहून भुवया उडवणारी, सूर्याभोवती फिरणारी त्याची पोरं पाहीली की ही जनता कुणाच्या राशीला लागेल, किंवा कुणाला वक्री वगैरे जाईल असं मुळी वाटतच नाही. किंबहुना, शनी आणि मंगळ ग्रह जर दुर्बीणीतून पाहीले तर त्यांच्या मूळ सौंदर्यापुढे नतमस्तक व्हावं वाटतं, त्यांच्याबद्दल उगाच पसरवलेल्या भितीपोटी नाही. शनी-मंगळ युती, सूर्य-बुधाचं एकत्र येणं, सध्या आकाशात एकत्र आलेले शुक्र आणि गुरु आणि अजून कोण कोण कुणाकुणाच्या गळ्यात गळे घालून फिरतायेत अशी सेलेस्टियल हार्मनी 'याची देही याची डोळा' एकदा पाहून बघा महाराजा; एकदम ओरिगिनल, इमिटेसन नाय!

तर, नमनालाच घडा उलटा करुन झाल्यावर आजच्या मूळ विषयाकडे वळूयात. आपण रोजच्या भाषेत वापरतो ते राशीला 'लागणे', नक्षत्रासारखे दिसणे, झगामगा मला बघा असणे, असले आणि अनेक वेगवेगळे वाक्प्रचार वापरतो, किंवा "सत्ताविसातून नऊ गेले तर खाली उरलं काय?" सारख्या बिरबलाच्या गोष्टी ऐकतो, मराठी क्यालेंडरं, ऋतू, सण साजरे करतो यात कुणाचा हात आहे सांगा पाहू?

सध्या आपण जी मराठी दिन-दर्शिका वापरतो, सध्या म्हणजे गेली हजार दोन हजार वर्षं आपण जी दिन-दर्शिका वापरतोय, त्यात १२ मराठी महिने आहेत. त्या १२ महिन्यांची नावं जर आपण जरा बारकाईने पाहीली तर आपल्या लक्षात येईल की ही नावं तर नक्षत्रांवरुन आली आहेत. उदाहरणार्थ, चित्रा नक्षत्रावारुन आलाय तो चैत्र महिना, विशाखा नक्षत्राचा वैशाख, ज्येष्ठा नक्षत्रानं नाव दिलं तो ज्येष्ठ आणि पूर्वाषाढा(पूर्वा) नक्षत्र असणारा आषाढ. असे बाराच्या बारा महिने बारा वेगवेगळ्या नक्षत्रांकडून नावं उसनी घेऊन आलेत. हे त्याचं कोष्टक :

(नक्षत्र - महिना याप्रमाणे)
चित्रा - चैत्र
विशाखा - वैशाख

ज्येष्ठा - ज्येष्ठ
पूर्वाषाढा (पूर्वा-आषाढा) - आषाढ

श्रवण - श्रावण
पूर्वा-भाद्रपदा - भाद्रपद

आश्विनी - आश्विन
कार्तिक - कृत्तिका

मृगशीर्ष - मार्गशीर्ष
पुष्य - पौष

मघा - माघ
पूर्वा-फाल्गुनी - फाल्गुन

आपल्याला माहीती असलेल्या नक्षत्रांपैकी ही १२ नक्षत्रं. बाकी १५ को क्या हुएला है? तीसुद्धा आहेत. मग तुम्ही नक्की विचारणार, की याच १२ नक्षत्रांचं काय कौतुक? अर्थात, याला कारणीभूत आहे तो चंद्र. येस्सार, हाच तो चंद्र. जो पृथ्वीभोवती फिरतो, अधूनमधून ग्रहणं दाखवतो, बाकी महिन्याकाठी आपल्या कलांचं प्रदर्शन मांडून बसतो, रोम्यांटीक शीन करुन प्रेमात पडलेल्यांना जळवतो, पिच्चरमधून गाणीगिणी करायला लावतो वगैरे वगैरे.

हा चंद्र पृथ्वीभोवती फिरतो, पृथ्वी सूर्याभोवती फिरते. त्यामुळे चंद्राच्यादेखील आपसूकच सूर्याभोवती फेर्‍या होतात. पण हे सूर्याभोवती फिरताना चंद्राची थोडी धावपळच होते. म्हणजे तो पृथ्वीभोवती फिरताना समजा, एका बिंदूपासून सुरुवात करुन गोल फेरी मारून परत तिथेच आला, तर पृथ्वी तर सूर्याभोवती फिरतफिरत पुढे गेलीये ना. मग याला अजून जास्त अंतर काटून तो सापेक्ष बिंदू गाठावा लागतो. आता किती पण पळापळ केली तरी साला लेट झाला तो झालाच. असा चंद्र आपल्या आकाशात रोज थोडाथोडा उशिरा उगवतो. असं करत करत तो दर महिन्याला भलत्याच तारखा-समूहात उगवतो. म्हणजे तो उगवतो त्यावेळेला त्याच्या बॅकग्राऊंडला जो कोण तारका-समूह असेल तो. आता अशा प्रत्येक तारका-समूहाचं आपल्याला जे कौतुक, की आपण आपल्या महिन्यांना त्यांची नावं देऊन टाकली.

आकाशात अनेक तारकासमूह आहेत. म्हणजे बघा, एकदम जगन्मान्य असे ८८ तारखा-समूह आहेत. अधिक जनरल क्याटलॉगप्रमाणे तर विचारुच नका. त्यात भर म्हणजे आपण दर रात्री वेगवेगळे तारे "ये तारा, वो तारा, हर तारा" प्रमाणे जोडत वाटेल ते आकार तयार करु शकतो. आता या इतक्या तारका-समूहातून बरोबर सत्तावीसच कसे काय बरं शोधून काढले असतील? अभी इसकू भी ये चंद्रच कारणीभूत हय. आणि याच्या जोडीला बाकीचे ग्रह आणि सूर्य. हे सगळे आकाशातून एका रांगेत गेल्यासारखे जातात. काय चार-सहा डिग्री इकडे-तिकडे. आकाशातल्या या काल्पनिक रेषेवर जितके तारका-समूह आहेत ते या सत्तावीस भागात विभागून टाकले आणि झाली सत्तावीस नक्षत्रं. या सत्ताविसांना बारा लिफाफ्यात बंद केलं ते बारा लिफाफे म्हणजे आपल्या राशी.

याच बारा राशी आणि त्यातलि ही सत्तावीस नक्षत्रं यांची आणि तुमची गाठभेट करुन देण्यासाठी हा लेखनप्रपंच. मला लिहिण्याची मजा आहेच, तुम्हाला वाचायची येत असेल तर उत्तमच.
चार-पाच लेखात आपण या सगळ्यांना भेटून येऊ. लिखाण जर फारच टेक्निकल होत असेल, समजायला अवघड वगैरे वाटेल तेव्हा जरुर सांगणे.

क्रमश: