Tuesday, November 9, 2021

हिशोब

 

आयुष्याची पस्तिशी ओलांडली, 

की हिशोबाचे मांडणी करावी..

जी काही जमा, जो काही खर्च, 

जी श्रीशिल्लक, ती लिहायला घ्यावी..


आईला विचारावं, काही चुकतंय का माझं, 

तुझ्याशी वागण्यात, बोलण्यात?

पूर्वीसारखा विचारपूस करतो ना मी, 

तुला अजूनही जपतो ना मी?

आईची सगळी उत्तरं जिवापेक्षा मौल्यवान, 

ती तशीच जमेत लिहावीत..


वडिलांना विचारावं, 

गणित बरोबर यायला नक्की काय करावं?

तुमचे आयुष्याचे मार्क्स शंभरपैकी, 

एकशे अठ्ठावन्न कसे आले, मलाही सांगा..

माझं काही चुकत असेल तर 

दोन मार्क जास्त कापा, फक्त नापास करू नका..

झालीच काही गडबड, तर कान धरून चार फटके द्या, 

पण अबोला कधी धरू नका...

वडिलांची उत्तरं जपून ठेवावी, 

शेवटी हिशोब जुळवायला तीच उपयोगी यावी...


बायकोला विचारावं, फार त्रास देतो का मी? 

तुझा योग्य मान राखतो ना मी? 

वरच्या पट्टीत, रागाने, तुझ्याशी बोललोय का कधी? 

माझ्याशी लग्न केल्याचा पश्चात्ताप होतो का ग कधी?

झाला असेल कधी वाद, पण त्याच्या पलीकडे जाऊन माझं प्रेम जाणवलंय ना तुला?

तुझ्याशिवाय पानही हालत नाही हे कळलंय ना तुला?

अप्रतिमच आहेस तू.. 

हे सांगायला शब्द कमी पडले बऱ्याचदा, 

आणि म्हणायचंदेखील राहून गेलं अनेक वेळा..

पण दर वेळी समजून घेतलंसच की तू..

बायकोची उत्तरं बाजू पाहून मांडावीत, 

यातल्या खर्चातून जमेपर्यंत जायचा प्रयत्न म्हणजे आयुष्य..


बहिणीला थोडा त्रास द्यावा, 

मारामाऱ्या, उखाळ्या-पाखाळ्या..

कधी निवांत बसून गप्पा, कविता, गाणीगिणी...

तिचा रागलोभ जमेत मांडावा, आयुष्याची पुण्याई..


भावाला विचारावं, काय ब्रो, सगळं ऑलराईट?

भाऊ सांगेल ते गुमान आईकोनी घ्यावे, 

जमलं तर दोन-चार आपणही द्यावे.. 

तो जैसे वांछील तैसेच घ्यावे-द्यावे, टपाटप..

हा सगळा पॉकेटमनी, ह्याचा हिशोब नाही. 

अमर्याद कारभार..


आईंना विचारावं, माझी गाडी कुठे घसरत नाही ना?

तुमची पोट्टी माझी तक्रार करत नाही ना? 

केली तरी अजिबात लक्ष देऊ नका, 

मलाच तुमचा लेक मानत चला..

त्या सांगतील ते सगळं डोळे मिटून जमेत मांडून टाकावं, 

हे आपल्या मुठीतले झाकलेले सव्वा लाख..


पोरांना विचारावं, या वर्षी काय नवीन?

तुमच्या भरारत्या आयुष्यात काय काय स्थिर?

अधूनमधून भुर्र, टेकडी, पिक्चर, ट्रीप, फोटोगिटो करावं..

त्यांचे हसरे चेहरे कॅमेरात आणि जमेत टिपावेत..


मित्रांना तर विचारायलाच जाऊ नये, 

चाळीस शिव्या, पन्नास सल्ले, गोळ्यांसरखा वर्षाव.. 

डोक्यावर घेऊन जगाला दाखवत फिरावं अशा या मिळकती,

या फक्त जमा, इथे खर्चच नाही..


असा "जमलेला" सगळा खर्च मांडून पहावा, 

जिथे कमी पडेल तिथे किरकोळ आनंद भरून टाकावा..

उतू नये, मातू नये, उगीच माज करू नये..

कारण शेवटी चित्रगुप्त हेच पाहणार आहे, 

आणि खर्च सगळा जमेतून वजा करणार आहे, 

हिशोब सगळा जुळवून बघणार आहे..


शेवटी सगळी सुखाची ऊब, 

त्यासाठी असौख्याचं व्हावं सरपण, 

आनंद तो आपली जमा, 

खर्च तो सारा कृष्णार्पण!!


- समीर

८-११-२०२१ (पु. लं. चा १०२वा वाढदिवस)