Friday, November 25, 2016

पहिला पगार!

कोणे एके काळी मला जेव्हा नोकरी लागली तेव्हापासून आजतागायत मी आमच्या कंपनीत पगार खातो आहे. कारण आय.टी. कंपनीमध्ये पगार ही भरपेट खाण्याची गोष्ट आहे असं समजलं जातं. अजीर्ण झालं तरी चालेल, रेचक म्हणून इन्कम टॅक्सवाले एखादा फॉर्म पाठवतात, पण पगार दर महिन्याला भरपेटच झाला पाहिजे. प्रत्येक महिना-अखेरीस आय.टी. वाले पगाराची जी वाट पाहतात ना, त्याची तुलना केवळ चातक पक्ष्याशीच होऊ शकते. जगण्याची धडपड दोघांचीही सारखीच. मिळेल ते घ्यावं आणि गप पडावं, ते नाही. यांना पाहिजे ते सगळं तुपाशी आणि तूप पण अस्सलच हवं. चातक बिचारा फक्त मृगाचा पाउस पिऊन राहतो, तोही वर्षातून एकदा येणारा. आय.टी. कंपनीतले चातक महिन्याच्या महिन्याला प्रामाणिकपणे पगार पिऊन राहतात. कारण यांना खाबुगिरी करायचा बाकी चान्सच मिळत नाही ना!

आता इतकी वर्ष झाली, प्रत्येक वर्षात किमान १२ पगार असतात तरीही पहिल्या पगाराचं अप्रूप आणि त्याची आठवण कधीच पुसली जात नाही. का? कॉलेजात असताना स्वत:वर लादून घेतलेली आर्थिक दिवाळखोरी संपल्याचा आनंद जास्त असतो, की स्वावलंबी झाल्याचा? मिळणारे पैसे हे कष्टाचे आहेत वगैरे (गैर) समज पुसले गेले नसतात म्हणून, की आयुष्य लायनीला लागलं म्हणून? कारण काही असो, पहिला पगार म्हणजे भावनांचा कल्लोळ असतो हे खरं!

पहिला पगार मिळाला त्यावेळची गोष्ट. सगळ्या 'पहिला पगार' गोष्टींसारखीच, पण दर चतुर्थीच्या शिऱ्याची चव कशी वेगळी असते, तशी जराशी निराळी! आम्ही १४ तारखेला जॉईन झालेलो, त्यामुळे महिना-अखेरीस पगार मिळायची शक्यता फारच धूसर होती. आमच्याकडे पगार हे महिन्याच्या शेवटच्या कामाच्या दिवशी होतात. म्हणजे महिनाखेर रविवार असेल, तर शुक्रवारी पगार होतो. त्यावेळीही तशीच परिस्थिती होती. ३० तारखेला रविवार, त्यामुळे शुक्रवारी पगार होणार अशी आवई उठलेली. सगळे लोक आपापली डेबिट कार्ड  परजत ए.टी.एम. मशीन वर हल्ले करत होते, पण प्रत्येकाचं उत्तर 'शून्य' च्या वर काही जात नव्हतं! २८ तारीख झाली, २९ झाली, रविवार दिनांक ३० सुद्धा उलटून गेली. हे म्हणजे माधुरी दिक्षितच्या 'एक दो तीन' गाण्यासारखंच झालेलं. किमान ४० वेळा ए.टी.एम. मशीनचं दर्शन घेऊन आलेलो! माझे बाहेरगावाहून आलेले मैतर लोक खर्चाच्या काळजीत काळे निळे लाल पिवळे पडले, डोळ्याखाली काळी वर्तुळं आली, केस मागे मागे जाऊन टक्कल पडलं, असं काही झालं नव्हतं, पण आपल्याला शेंडी लावली बहुतेक, याचा विषाद प्रत्येकाच्या चेहऱ्यावर होता.  त्यातून महिना संपून ४ दिवस झाले तरी पगाराचं पत्त्या नव्हता. या महिन्याचा पगार पुढच्या वेळीच मिळेल अशी अजून एक निराशाजनक आवई उठलेली! मी आणि माझे नवेकोरे सहकारी, सगळेच निराशेच्या खोल-खोल गर्तेत वगैरे! आणि अचानक-

एके दिवशी संध्याकाळी आमच्या फायनान्सच्या चित्रगुप्ताचं आगमन झालं. (यमाच्या दरबारी चित्रगुप्त सगळ्यांच्या पाप-पुण्याचा हिशोब ठेवतो तसे आमचे चित्रगुप्त आमच्या पापांचा हिशोब ठेवतात आणि दर महिन्याला आमचं पाप पगारातून कापून मोकळे होतात) च्यामारी, आम्हाला तर पहिल्यांदा कळलंच नाही की हा मनुष्य कोण आणि इथे काय करतोय ते. पण आमच्यातले काही चाणाक्ष सहकारी, जे राजा मानसिंहाच्या  राज्यातून आले होते, आणि ज्यांना 'पैसे' या पदार्थाचा वास, चव, स्पर्श या सगळ्याचं ज्ञान होतं त्यांनी लगेच ओळखलं की आज चित्रगुप्त साहेब कशाला आलेत. चित्रगुप्त काही बोलायच्या आधीच टाळ्यांना सुरुवात! कमाल झाली!

मग त्यांनी सविस्तर वर्णन करून सांगितलं की कसे सगळ्यांचे पगार १५ तारखेलाच तयार होते, पण पहिल्यांदाच पगार पाठवायचा असल्याने कसा तपासून पाहावा लागला. अहो, त्याकाळी मिळणारा एवढासा चिमुकला पगार तो, त्याला तपासायला का वेळ लागावा? आणि झाला समजा १०-१५ टक्क्याचा घोळ, तरी मुद्दलात पगाराचा जीव तो केवढा, त्यामुळे होणाऱ्या गोंधळाचा आकडा असा काय विशेष असणार म्हणा? पण नाही. चित्रगुप्ताच्या अडचणींची लिस्ट संपायलाच तयार नाही. आमच्या चिमुकल्या पगाराची रक्कम त्यांना कशी हिशोब करून ठरवावी लागली, काही जण २-३ दिवस उशिरा आले होते, त्यांचा पगार फायनल करताना किती त्रास झाला आणि मग कुणाचंच  बँक अकाउंट चालू झालं नसल्याने कसे सगळे चेक लिहावे लागले आणि त्यात कसा वेळ गेला वगैरे.

आम्ही सगळे कीर्तनाला बसल्यासारखे तल्लीन. चित्रगुप्ताच्या कुठलंही वाक्य संपलं की हरिनामाचा गजर करावा तसा 'हिप हिप हुर्रे' चा गजर आणि टाळ्या. कारण त्यांचं हे सगळं पुराण चालू असताना आमच्या मनात फक्त एक 'चेक' नाचत होता! आमच्या चाणाक्ष मित्रांनी (तेच ते, राजपूत रक्ताचे, राजा मानसिंहाच्या राज्यातले) तेवढ्यात हिशोब करून पगाराची रक्कम किती असेल याचे आडाखे बांधले, पैजा लावल्या. इकडे आम्ही स्वप्नात दंग झालो, की पगार मिळाला की काय करायचं? चार दोन स्वप्नं पाहून झाली असतील नसतील, शेजारी बसलेल्या मैत्रिणीने जागं केलं तेव्हा चित्रगुप्त आमच्याच नावाचा पुकारा करत होते.साक्षात चित्रगुप्ताच्या मुखी आमचं नाव! आहाहाहा!! धन्य झालो, जीव आकाशाएवढा झाला, मनाच्या राज्यात सगळीकडे वसंत ऋतू आणि अजून काय काय! उठून धडपडत पुढे गेलो आणि त्यांच्या हातून आमचं चेक नावाचं  पारितोषिक स्वीकारलं. सर्व मित्र टाळ्या वाजवत होते, आपल्याला ऑलिम्पिक मध्ये गोल्ड मेडल जिंकल्याचा फील आला होता. (त्यानंतर मात्र जेव्हा केव्हा 'चित्रगुप्त' बोलवतात ना, केवळ पोलीसातून कायदेशीर आमंत्रण आलंय असं वाटतं!) त्यादिवशी ऐकलेल्या टाळ्या ह्या मी आजपर्यंत ऐकलेल्या सर्वाधिक वेळ वाजलेल्या टाळ्या होत्या! साहजिक आहे हो, ४० जणांचा पगार-वाटपाचा कार्यक्रम असा काय टाळ्यांच्या गजरात आणि दणक्यात झालाय सांगू!

संध्याकाळी धनादेशाच्या उडत्या गालिच्यावर बसून तरंगत तरंगत घरी आलो. घरी येईपर्यंत कुण्णाला  काय पण सांगितला नाय! गुडूप घरी आलो आणि तीर्थरूप आणि मातोश्री यांच्या हातात चेक देऊन टाकला. ऑन द स्पॉट दिवाळी चालू झाली. कारण लौकिकार्थाने 'दिवटा' असणाऱ्या माझी गाडी ऑफीशीयली लायनीला लागली होती. मग काय, सतत काहीतरी खरेदी करून घरी आणावं असं वाटायला लागलेलं. आणि आपल्याला तर 'जे मनात येईल ते' करायची सवयच आहे. यातूनच 'नाठाळ' (लोकांतर्फे), 'मनस्वी' (मातोश्रींतर्फे), 'आडमुठा' (मित्रांतर्फे) वगैरे पदव्या मिळवल्या आहेत. मग उगाच स्वत:च्या इच्छा मारून नाव का खराब करा?? लगेच बदाबदा खर्च करून पाहिजे ते घेऊन आलो. प्रत्येक वेळी काहीही नवीन घेताना 'जग जिंकलंय' असा आनंद व्हायचा.

पण टोटल १५ दिवसांचा पगार, जसा अनपेक्षितपणे मिळाला तसाच संपून पण गेला. जाताना मणा-मणाचा आनंद मागे ठेवून गेला. तेव्हापासून आजतागायत दर महिनाअखेरीस पगार घेत आलोय, पण तो आनंद रिपीट नाही झाला. आणि आता तर काय, "आता उरलो पगारापुरता" अशी संतवृत्ती आलीये! सध्या 'पगारवाढ' नावाची सर्वसामान्य (आणि सर्वमान्य) अपेक्षा मनी बाळगून दिवस कंठणे चालू आहे.