Friday, June 24, 2022

आठवांचा प्रवास

 

केव्हातरी उठावे, जावे स्वतःच्याच प्रवासा

मनाच्याच वाटा, मनातील देशा,

कधी, कुठे, कसे, कुठलेच प्रश्न नसावे

जिथे जीव जडला, तिथलेच विसावे..


स्वतःच्या प्रश्नां, स्वतःचीच उत्तरे

मनातून उतरण्या आधीच सावरावे,

स्वतःच्या प्रवासा असावे सांगाती

असे मैत्र जीवांचे बांधून घ्यावे..


मनातील कप्पे, भुयारे, चोरवाटा

तिथे सापडावा विस्मरणाचा खजिना,

या खजिन्याचे स्वतः काय करावे

असे माणिक पाचू, सर्वांत वाटून द्यावे..


विसराच्या खिडकीतून, स्मरणांचे कवडसे

त्यांचे आकार, रुकार, भान हेलावतसे,

या आकारांची करावी, छोटीशी एक नाव

वारा भरून शिडांत, गाठावा आठवणींचा गाव..


स्वतःच्या प्रवासा, असावा का किनारा

तिथे पोहोचण्या, आठवांचा ध्रुवतारा,

अशा वाटेवरती, एक स्मरणगंगा असावी

जिच्या अथांग डोही, शांतता मिळावी..


तरी वाटावे, कधी, की, परतून यावे

'स्वयम्' मधून कधी बाहेर डोकावून पहावे,

स्वतःसारखेच काही स्वप्रवासी जोडावे

'वयम्' च्या प्रवासा साथ देते असावे..


जिथे मैत्र सारे, तोच स्वदेश व्हावा

ज्यावरी मित्र सगळे, त्या वाटा जुळाव्या,

आठवांच्या सागरात, एक असे बेट असावे

सारे प्रवासी पक्षी, तिथे एक यावे..


आठवांचा प्रवास, आठवांचा विसावा,

आठवांचा प्रवासी, कधीतरी, किनारी परतून यावा..


- समीर

२५/६/२०२२