Thursday, January 6, 2011

'फेसबुक' वर आहेस का?



फेसबुक........फेसबुक चा तो निळा रंग बघूनच कंटाळा येतो....कधी ह्या कंटाळ्याचा डोंगर पार करून समजा बघितलं तर पुलंनी वर्णन केलेल्या पानवाल्याच्या ठेल्याची आठवण येते...हेच पहा ना....


 सगळ्या मित्रांचे ठराविक फोटोज ( गळ्यात हात टाकून 'ये दोस्ती नही छोडेंगे' वगैरे)........काही मित्रांचा ग्रुप ---ज्यांचे नेहेमी दारू पिताना फोटोज ( टायटल: 'इश्कने दर्दी बनाया' किंवा 'आज थोडी पी ली है' ).... ....मग अजून एक मित्रांचा समूह ज्यांचे नेहेमी कुठल्या तरी गोऱ्या मुलीबरोबर किंवा मेणाचा पुतळा असलेल्या गोऱ्या अभिनेत्री-बरोबर (उदा. शकिरा वगैरे) फोटोज... .
काही मैत्रिणींचे त्यांच्या लग्नातले जगासमोर मांडलेले 'सुंदर' म्हणावं लागतं असे फोटोज आणि त्याखालच्या त्यांच्याच गल्लीत अर्धं आयुष्य घालवलेल्या त्यांच्या मैत्रिणींच्या कॉमेंट्स 'ओह बेब्स, लुकिंग गुड!' किंवा 'वॉव, वंडरफुल कपल, लव यु गाईज!!' किंवा 'सो क्युट!' वगैरे वगैरे .......
अजून काही मैत्रिणी आणि मित्रही, ज्यांचे आपापल्या नवजात अपत्त्यांबारोबारचे फोटोज.....आणि मग त्याखालच्या बाळाचं कौतुक करणाऱ्या मावश्या 'ओह..माय क्युट बेबी !!!' 'सो SSS स्वीट...'. इत्यादी....काही जणांचे कुठल्यातरी बार मधले किंवा क्लब मधले नाचतांनाचे फोटो....आणि त्याखाली 'वॉव ...यु रॉक !!' वगैरे.........
मायामी , न्यूयॉर्क, लंडन, कॅलिफोर्निया, शिकागो, आयफेल टोवर, टोक्यो, सिंगापूर ह्या ठिकाणांचे सुमारे ५ अब्ज फोटो आणि बहुतांश फोटोज मध्ये दोन्ही हात फैलावून आकाशाकडे बघणारी ती व्यक्ती......पावडर ने मढवून अत्यंत मोठा खरा दाणा दिसणाऱ्या साखरपुड्याच्या अल्बम मधल्या  मुलीला 'खूपच छान दिसत आहेस फोटोत !' अश्या प्रतिक्रिया....
काही ठिकाणी हसू येईल इतक्या वैयक्तिक आयुष्यातल्या बाबी ( उदा. 'काल रात्री खाल्लेल्या चोकलेट केक बद्दल माझ्या प्रिय नवऱ्या (हबी डार्लिंग!) , तुला खूप धन्यवाद!' ) .........
काही अजून म्हणजे स्वतःचे किंवा स्वतःशी निगडीत फोटो न लावता कोणीतरी 'अर्जुन रामपाल', 'शाहरुख खान', 'कतरिना कैफ', 'ऐश्वर्या राय' असल्या सुमार लोकांचे  किंवा ज्यांचं नाव तोंडानी उच्चारता येणार नाही अश्या फ्रेंच मॉडेल्सचे फोटोज आणि त्या खाली फोटोच्या टायटल मध्ये 'यु आर सो ब्युटीफुल' असा काही मजकूर..!!......
ह्याशिवाय कोणीतरी गल्लीतला किड्यांचे, माश्यांचे, पानांवर पडलेल्या थेंबांचे, किल्ल्यांवरच्या भग्नावशेषांचे (सेपिया कलर मधले), फटाक्यांचे, सुरकुतलेल्या चेहेऱ्यांचे फोटो काढून एका काळ्या चौकटीत बसवून त्याखाली स्वतःचं नाव (उदा. अमित, आनंद वगैरे !....ही नावं खूप कॉमन आहेत म्हणून बरं का !) लावणारा फोटोग्राफर.........
शिवाय अजून एक नवीन टूम, पुणेरी पाट्या आणि त्याखाली ९०० वेळा 'हा हा हा !!' वगैरे.......काही अति-धार्मिक लोकही आहेतच! रोज बायबल मधलं एक वचन किंवा रोज एक तमिळ शब्द वगैरे.....
अमेरिकेत पाळीव कुत्रीही फेसबुकात समाविष्ट आहेत... कुत्र्यांचे आणि मांजरांचे केविलवाणे फोटो त्यावरची दुनियेची स्तुती-सुमनं. .... .
सचिन आणि गांगुलीचे फोटो आणि त्याखाली त्यांना दिलेलं देवपद, अनुसरून त्यांच्या आरत्या ( 'ऑफ-साईडला आधी साक्षात देव आणि मग गांगुलीच!', 'जय सचिन देवा.!' )........


असे एक नाही अनेक तर्हेचे ग्रुप्स आहेत.....पण प्रत्येकजण कुठला ना कुठला तरी आकृतिबंध अनुसरतोय. सगळेजण लग्नाआधी एकट्याचे फोटो लावणार, दोन-चार गडांवर जाऊन दोन-चारशे फोटोज लावणार नाहीतर लडाखला बाईकवर जाऊन येणार, कॉलेजमधल्या ग्रुपचा फोटो, मग साखरपुड्याचे बटबटीत फोटो, मग प्रत्येकजण आपण किती 'फुलीश रोमांटीक' आहोत हे दाखवणार...आणि लग्नाच्या आधी प्रत्येकाला विरह ( हल्ली त्याला 'जुदाई' म्हणतात!) होणार मग त्याचे फोटो........नंतर लग्नाचे फोटोज ज्यात सगळ्या मुलांनी फेटे घातले असणार, शिवाय हनिमूनचं प्रदर्शन आहेच ! तुमचं कुठल्या व्यक्तीबरोबर काय नातं आहे (प्रेयसी, प्रियकर, एकटा/टी, साखरपुडा झालेला, विवाहित इ.), ते अचूक शब्दांत सांगावं लागणार! मधून मधून आपला नवीन फोटो टाकल्यावर एकमेकांना 'सो चार्मिंग!' म्हणावं लागणार !

ह्या फोटोजवर लिहावं इतकं कमी तर व्हीडीओ चं जग तर त्याहीपेक्षा कमालीचं मजेदार आहे ! शिवाय लोकांचे एकमेकांना मेसेजेस आणि त्यातून घडणारा विनोद हा पराकोटीला जाईल एवढा आहे ! प्रश्न असा आहे, 'का?'...... काय लपवण्यासाठी ही सगळी मास्क्स (मुखवटे) लावावी?.......का सगळ्यांनी इतरांसारखं बनावं? अशी कोणती भीती आहे ज्यामुळे आपण बाहेर फेकले जाऊ ? 
आपण का एवढं खोटं बोलतोय? का उगाच दुसऱ्याबद्दल काळजी असल्याचं दाखवतोय? का इतरांचं अनुकरण करतोय? उगाच सगळ्या फोटोजना 'लाईक' करून, सगळ्यांशी गुडी-गुडी बोलण्याचा आव आणून, अमेरिकेतल्या कंपन्यांच्या फुकट जाहिराती करून, 'पॉलीटिकली करेक्ट' बोलून,  आपल्या घरीच असणाऱ्या आई-बाबांना फेसबुक वर खातं काढायला लावून  आपण काय मिळवतो आहे? भरपूर बुद्धिमत्ता असणारे आपण स्वतःला अश्या सामान्यतेत का ढकलत आहोत?  कोणत्या वेबसाईट वर प्रतिक्रिया व्यक्त करून आपल्याला जग बदलून टाकणारी कल्पना सुचणार आहे ? 



प्रिय वाचकहो, छोटी छोटी निरीक्षणं मांडावी आणि विनोदी लिहावं म्हणून बसलो होतो आणि ठरवलं होतं की कुठलाही शब्द खोडायचा नाही, पण शेवटी थोडं गंभीर झालंच! तुम्हाला काय वाटतं ते जाणून घ्यायचं आहे....

धन्यवाद!


5 comments:

  1. >>प्रश्न असा आहे, 'का?'...... काय लपवण्यासाठी ही सगळी मास्क्स (मुखवटे) लावावी?.......का सगळ्यांनी इतरांसारखं बनावं? अशी कोणती भीती आहे ज्यामुळे आपण बाहेर फेकले जाऊ ?

    अगदी मनातल लिहिलस...खूप गंभीरपणे पाहिलं पाहिजे पण अजिबात पाहिलं जास्त नाही असच विषय..आणि एक लक्षात आलं का? ज्याचा तोंडावरची माशी पण उडेल की नाही अशी शंका असणारे आपल्या फेबु खात्यात चार पाचशे मित्रमैत्रिणींचा साठा बाळगतोय ...यातील किती फेस (चेहरे) प्रत्यक्षात एकमेकांशी लाईक लाईक करून बोलतील हा एक आणखी प्रश्नच..:)

    ReplyDelete
  2. धन्यवाद अपर्णा! :)

    ReplyDelete
  3. baDHiyaa...
    well, due to new year's resolution on 1st Jan only I deleted my FB account!
    what a relief...

    ReplyDelete
  4. मुक्तपणे व्यक्त होण्यासाठी खरे तर फेसबुक हे चांगले साधन आहे.परंतू आपण म्हणता त्याप्रमाणे मुखवटे लावून हाय,हँलो करणा-यांनी हे व्यापून घेतले आहे.प्रत्येक साधनांचे चांगले-वाईट,फायदे-तोटे असतात.त्यातलाच हा प्रकार आहे.सध्या टाईमपास म्हणून याचा वापर होत आहे.हे घातक आहे.

    ReplyDelete
  5. प्रतिक्रियांबद्दल धन्यवाद!

    ReplyDelete