Friday, July 7, 2017

खडक

 बाहेर पाऊस पडतोय. शांत, निवांत! मी उभा आहे खिडकीत, पावसापेक्षाही निवांत! माझ्याच तंद्रीत, त्या हळुवार पडणाऱ्या पावसाकडे लक्ष आहेदेखील, आणि नाहीदेखील. पाऊस रस्त्यावरच्या दिव्यात चमकतोय. देखणा,  सुंदर. रात्रीचा एक वाजलाय, की तीन वाजलेत?  किती वेळ झाला मी उभा आहे इथे, पत्ताच नाही. हातातलं घड्याळही पावसात भिजायला निघून गेलंय.  पाऊस वाढलाय आता. लक्ष देण्याइतका की दुर्लक्ष ना करता येण्याइतका, कळत नाहीये. 


मंद्रसप्तकात सुरु असलेला पावसाचा आलाप आता तारसप्तकात पोहोचलाय. तंद्री मोडून काही लक्षात यायच्या आत स्वर टिपेचा झालाय. पावसाला आता आवाजही फुटलाय आणि पायही! जमेल तिकडे, जमेल तसा धावत सुटलाय. कुठे हळू, कुठे जोरात, तिथे सहज, कुठे ठेचकाळत, धावतोय! आवाजही तसाच, जिथे सहज तिथे चुपचाप, जिथे ठेचकाळत तिथे ठणाणत. पण थांबायचं नाव नाही. 

सगळ्याच गोष्टींना एक वेग आलाय.  आजूबाजूची प्रत्येक गोष्ट वाहत चाललीये. वेळसुद्धा! मी इथे असाच उभा.  किती वेळ उभा आहे, का उभा आहे, कशासाठी उभा आहे, कुणासाठी उभा आहे, काही पत्ताच नाहीये. मध्येच मला माझं घड्याळ दिसतंय. आपले दोन्ही हात चालवत पोहतंय मस्त. वेळेचं, स्थळकाळाचं भान ना मला आहे ना त्या घड्याळाला! अचानक बरं वाटतंय, की डिजिटल घड्याळ घेतलं नाही, नाहीतर त्याला पोहता कसं आलं असतं.  सगळ्याच गोष्टी वेगात चालल्यात, मागून पुढे, डावीकडून, उजवीकडून - वाहताहेत! ना दिशांचं भान आहे ना स्वतःचं - एकच दिशा, एकच वेग, पाण्याचा!

मी आपला मध्येच उभा आहे, खडक! सगळं पाहतोय, ऐकतोय. सगळे आपल्याच तंद्रीत, धुंदीत. वाहतायेत! ती लय, तो आवाज, तो ठेका - बेधुंद व्हायला होतंय! हळूहळू हा पाऊस, हे पाणी मला विरघळवून टाकतंय. बहुधा  नववीन क्लुप्ती असावी, पावसाची! माझ्यातला ठामपणा पटला नसावा त्याला. मला असं एकाच जागी स्थिर उभं पाहून जळफळाट झाला असेल त्याचा. त्याला कुठे जमतंय एकाच जागी थांबायला. त्याच्या त्या वेगवान गर्वाला माझी ठेच लागली असेल. 

पण त्याची ताकद जाणवतेय. पूर्ण जोर लावून मला माझ्या जागेवरून हटवायच्या मागे लागलाय हा पाऊस. मला हटवतोय की विरघळून टाकतोय आतून? हळूहळू माझेच तुकडे त्या तुफान वेगात धावताना दिसायाला लागलेत मला. मीच माझ्याशीच शर्यत खेळतोय. कोणता मी पुढे जाणार, कोणता मी जिंकणार. कसली शर्यत आहे कुणास ठाऊक! आणि आता जो मागे राहिलाय, एकटाच, स्वतः:चा खडकपणा सावरून धरणारा मी, त्याचं खडकपणही विरघळून जातंय. त्याला पण धावायचंय, बेफाम, सुसाट. पण जमतच नाहीये. काहीतरी ओढून धरतंय त्याला, थांबूही देत नाहीये आणि सुटूही देत नाहीये. प्रचंड ओढाताण!

आणि एकदम हा  शेवटचा मी, सुटलोच! कसलातरी बेभान आनंद झालाय मला. गडगडत, धावत, पळत निघालोय आता - ते बाकीचे मी आहेत ना, मलाच सोडून पळालेले - त्यांना मागे टाकत! त्या पावसाचा, त्याच्या पाण्याचा, त्या वेगवान गर्वाचा चक्काचूर करत, सगळ्यात जास्त वेगात, वाहात सुटलोय मी!

'प्रवाहपतित' होण्याचं सुख एखाद्या खडकाला विचारून पहा. स्थळाचे, काळाचे, स्थैर्याचे आणि वेगाचे, पिढ्यानपिढयांचे सगळे बांध फोडून, तोडून, मोडून निघालेल्या त्या खडकाला. आकाशातून आलेली ती मुक्तीची प्रलयांकित, वलयांकित हाक ऐकण्यासाठी उभ्या देहाचे कान केलेल्या त्या खडकाला!

अजून उजाडत का नाहीये?

1 comment:

  1. Masta re! Your writing is going more and more esoteric!

    ReplyDelete