Saturday, May 8, 2021

कोरोना आणि मध्यमवर्गीय

गेल्या वर्षी कोरोना सुरू झाला आणि तमाम मध्यमवर्गीय जनता भूमिगत झाली. 'ऑनलाईन शॉपिंग' चळवळ पुढे नेणे, बिना मास्क बाहेर भटकणाऱ्यांच्या नावे बोटं मोडणे, 'घरच्याघरी' या शब्दाचा घासून पुसून गुळगुळीत होईपर्यंत वापर करणे, आणि असं असूनही ऑफिस-ऑफिस खेळत राहणं हे सगळं करण्यात या वर्गाचा सगळा वेळ, सगळी शक्ती खर्ची पडली.

खरंतर मध्यमवर्गीय माणूस कोरोना, कॅन्सर, टिबी, हार्ट अटॅक, कावीळ असल्या आजारांना मुळीच घाबरत नाही. 'रोजरोज तेच' यालाच तो इतका गांजलेला असतो की आजार किंवा मरण हा वेलकम चेंज वाटावा. त्याला भीती वाटते ती खर्चाची. गरिबांना केशरी कार्डाचा पाठींबा भरभक्कम असतो, श्रीमंतांकडे पैसाच भरभक्कम असतो. कुठले आजार आलेच वाट्याला तरी केशरी कार्डाच्या आणि पैसेरी नोटांच्या होड्या करून हे दोन्ही पक्ष तरून जातात. आणि काडीचाही आधार नसलेला मध्यमवर्ग रीतसर बुडतो.

त्याला भीती वाटते खर्चाची, त्याला भीती वाटते ती पै पै जोडून उभ्या केलेल्या त्याच्या इटुकल्या पिटुकल्या इंवेस्टमेंट तोडायची. खरंतर त्या इंवेस्टमेंटचा जीव इतका छोटा असतो की त्यात एका पोराचं सुद्धा शिक्षण होणार नसतं, पण त्यावर बांधलेले स्वप्नांचे इमले चक्काचूर व्हायचीच भीती वाटत असते. 

मध्यमवर्गीय माणूस हा भविष्यातल्या स्वप्नांवरच जगत असतो. त्याचा भूतकाळ अजिबात अभूतपूर्व किंवा सुखनैव नसतो,  सात पिढ्या कारकुनी करण्यात आटोपलेल्या असतात, वर्तमानकाळ त्याच कारकुनीत चाललेला असतो, त्यामुळे 'आपला भविष्यकाळ निश्चितच उज्वल असेल आणि त्यासाठी आपण लागेल ती मेहेनत करू' या एकमेव आशेवर तो प्रत्येक दिवसाचं इंधन जाळत त्या भविष्याकडे जायचा प्रयत्न सुरू असतो. अशात त्या आशेलाच काडी लावणारा कुठलाही खर्च त्याला झेपत नाही. म्हणून तो असल्या कर्मदरिद्री आजारांच्या नादीच लागत नाही.

असो. नातीगोती जपणारा आणि मित्रांसोबत(च) आयुष्य आहे असं मानणारा मध्यमवर्ग कोरोनामुळे हैराण झाला तो मुख्यत्वे घरी बांधून घातल्यामुळे. कुणी कुणाकडे जायचं नाही, यायचं नाही,मित्रांना भेटायचं नाही, ऑफिस बंद, टपरीवरचा चहा बंद, पॉलिटिकल गप्पा बंद, ट्रॅफिक बंद, त्यावरून होणारी चिडचिड बंद. रोजच्या जगण्यातली सगळी टॉनिक बंद झाल्यावर शिट्ट्या वाजणार नाही का राव! त्यातच आयुष्यभर केवळ स्वप्नात बघितलेला 'कुटुंबासमवेत वेळ घालवणे' हा इव्हेंट प्रत्यक्षात अवतरलेला पाहून त्याची खरंतर शाळा झाली. आपली स्वप्न खरी होण्याची जळी-स्थळी-काष्ठी-पाषाणी सुतराम शक्यता नसल्याने त्याला स्वप्नातच रमायला जमतं, अचानक स्वप्न खरं झाल्यामुळे धावपळ झाली. आणि समवेत घालवायला इतका वेळ मिळाला की त्याचं नक्की करायचं काय हेच मुळात समजलेलं नाही, अजूनही!

'ठेविले अनंते तैसेचि रहावे चित्ती असो द्यावे समाधान' यावर ५००% विश्वास ठेवणाऱ्या या वर्गाला अनंताने अचानक इतके चेंजेस आपल्या माथी का मारले असावेत याचा विचार करण्यापलीकडे काहीच पर्याय नाही.

अजून एका विषय म्हणजे मध्यमवर्गीय बायका. लॉकडाऊन झाल्यावर सुरुवातीचे काही दिवस संपूर्ण कुटुंब एकसंध एकत्र सुरक्षित पाहून खूश होणाऱ्या माताभगिनी त्यानंतर लगेचच हैराण झाल्या. भूतालाच काय, स्वतःचे आईवडील आणि सासुसासरे यांनासुद्धा न घाबरणाऱ्या या बायकांना 'खायला काही आहे का ' या प्रश्नाची भीती वाटायला लागली. त्यातच त्यांच्या आयुष्याचा आधार, कामवाल्या बायका, त्यासुद्धा बंद झाल्या.पूर्वी डबे पॅक करून लोकं घराबाहेर घालवले की दिवस पाचाउत्तरी सुफळ संपन्न होत होता, तिथे तोच दिवस आता साठाउत्तरी कहाणी सांगितली तरी संपत नाही. 

नोकरी करणाऱ्या बायकांचे हाल तर अजून बेकार आहेत, ऑफिस सुरू असतं, मध्येच मॅनेजर कॉल ठेवतो, तेव्हा त्याच कॉलवर आलम दुनियेसमोर पोरं पाठीमागून आरडाओरडा करतात, अवेळी खायला मागतात, मारामाऱ्या करतात, मोठमोठ्याने रडतात, नवरा केव्हाही चहा मागतो तेव्हा निव्वळ हताश व्हायला होतं. पूर्वी ऑफिसात चहा रेडिमेड मिळत असायचा, आता त्यांनी केल्याशिवाय कुणालाच चहा मिळत नाही. यात दुःख चहा करावा लागतो हे नाहीये, न मागता एकदाही चहा हातात मिळत नाही हे आहे. पूर्वी ऑफिस मधून घरी आल्यावर 'ऑफिस' हा विषय संपत असे, आता घरीच ऑफिस आल्यामुळे तिन्ही त्रिकाळ काम सुरूच असतं. ऑफिस आणि घर या दोन कधीही एकत्र न येणाऱ्या रुळांचं असं त्रांगडं होईल असा विचारसुद्धा या घर-ऑफिस-ग्रस्त बायकांनी कधी केला नसेल. 

फक्त 'समाधानी' राहता यावं म्हणून सर्व ते प्रयत्न करणाऱ्या या वर्गाला कोरोनामुळे इतकी डोकेफोड करायला लागते आहे, तितकी जर त्या अनंताला करावी लागली तर तो 'ठेविले तैसेचि रहावे' मधून स्वतःचं नाव कटाप करून घेईल. घरीच राहणे, हे जे होईल ते स्वस्थपणे पाहणे, बऱ्यावाईट बातम्या ऐकून त्यावर घरीच प्रतिक्रिया, चर्चा, चर्वितचर्वण करणे, गरजेशिवाय अजिबात बाहेर न पडणे याशिवाय काहीच करू न शकणारे, शासनाचे सगळे नियम निमूट पाळणारे, ना जमल्यास रीतसर दंड भरणारे, इतकं सगळं सोसूनही झालाच कोरोना, तर गुपचूप १५ दिवस एकांतवासात पडून राहणारे, आणि आजमितीला 'आमचा नजीकचा भूतकाळ नक्कीच सुखाचा होता' हे छातीठोकपणे सांगू शकणारे म्हणजेच मध्यमवर्गीय!


- समीर

No comments:

Post a Comment