Thursday, December 15, 2022

मुखवटा

वापरला मुखवटा मी प्रत्येक वेळी

तोच ठेवला लक्षात साऱ्यांनी

जेव्हा ओळख द्यायची वेळ आली

नाकारला खरा चेहरा सगळ्यांनी


मुखवटा होता एक सोय

मुखवटा आहे एक सुख

लपवून माझा नाव गाव

एका चेहेऱ्यास मुखवटे लाख


लावले मी शेकडो मुखवटे

अज्ञातवास जणू संपूच नये

काय कुणास मी का सांगावे

अंतरीचे गूढ कुणाच्या भये


मी कुणास ओळखत नाही

कोणी मला ओळखत नाही

मुखवटाच जाणे मुखवट्यास 

या ओळखीचा उपयोग नाही


खरे खरे म्हणजे ते काय

मुखवटा उतरवणे म्हणजे काय

आतून असेल का अजून एक

मुखवटा चढवून फेकांवर फेक


खरे कळता नाती तुटती

खरे कळता कलह होती

खोटेच ते फार सोयीस्कर

खरे पचवणे फार भयंकर


बरे झाले मुखवटा लावला

खरा चेहरा न दाखविला

माझ्या भीषण सत्यापेक्षा

दांभिक मुखवटाच आवडून गेला


- समीर

4 comments:

  1. अपूर्वाDecember 15, 2022 at 1:23 PM

    शेवटच्या दोन ओळी मनापासून आवडल्या!!!
    किती मुखवटे आपल्याला कळले आणि कितींच्या मागचा आपण खरा चेहरा पाहण्याचा प्रयत्न केला असा विचार मनात येऊन गेला🙂

    ReplyDelete
  2. मस्त रे समीर ...फारच छान

    ReplyDelete
  3. Jabardast….👌🏻

    ReplyDelete
  4. Jabardast 👌🏻👌🏻

    ReplyDelete